हिंदू राजांवर अन्याय ते मुघल साम्राज्यांचं उदात्तीकरण – आपल्याला शिकवला जाणारा फसवा इतिहास!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण लहानपणापासून हे वाचत आलोय की “मनुष्य हा समूहप्रिय प्राणी आहे”. म्हणजेच, माणसाला समूहात, गटागटात रहायला आवडतं. मानवी संस्कृती ही अश्याच गटांची संस्कृती असते. जस जसा काळ पुढे जातो तस तशी विविध गटांची विविध संस्कृती तयार होते. त्यातूनच भाषा, आचार-विचार, राहणीमान ह्यातील बदल अधिक गडद होत जातात. अश्या विविध संस्कृतींना आपल्यात सामावून घेत एक रंगीबेरंगी आकर्षक चित्र उभं करणारा देश म्हणजे आपला भारत!

आपण “भारतीय” म्हणून एकत्र येतो तेव्हा ह्या सर्वच संस्कृतींचा वारसा आपल्या पाठीशी असतो.

परंतु दुर्दैवाने हा वारसा आपल्याला माहितीच नसतो. कारण –

आपल्याकडे शिकवला जाणारा चुकीचा, दिशाभूल करणारा इतिहास.

खरंतर इतिहासाच्या अभ्यासातून आपली “आम्ही सारे भारतीय एक आहोत” ही भावना वृद्धिंगत व्हायला हवी. पण तसं नं होता, आपण आपल्याच नकळत अधिक तुटत जातो.

हे सर्व का होतं, कसं होतं हे पुढील५ उदाहरणांनी बघूया.

१) हे चित्र पहा –

 

indian-history-marathipizza01

 

हे कोणत्या शाळेतील पुस्तकावरचं चित्र नाही, तर दुकानामध्ये मिळणारं ऐतिहासिक गोष्टींच पोस्टर आहे. जे बऱ्याचवेळा शाळेतील शिक्षकांमार्फत प्रकल्पासाठी वगैरे वापरायला सांगितले जाते.

यात ‘ऐतिहासिक’ हा शब्द आहे. परंतु काही मुघल कालीन वास्तू आणि ब्रिटीश कालीन इमारती वगळता इतर कोणत्याही ‘ऐतिहासिक’ वास्तूंचा यात समावेश नाही.

ना तंजावरच्या वास्तू आहेत, ना मदुराईचं मंदिर. ना कोणार्क, ना हम्पी. एवढंच काय तर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली स्थळे नाहीत. अजिंठा वेरूळ देखील नाहीत. यामध्ये कोण्या महाभागाने दिल्लीच्या बिर्ला मंदिराचा ऐतिहासिक वास्तू म्हणून समावेश केला आहे.

हे पाहून असं वाटतंय की भारताचा इतिहास हा आताच चार-पाच शतकांपूर्वी सुरु झालाय, त्या आधी जणू भारत अस्तित्त्वातच नव्हता. इतिहासाच्या अभ्यासाचे मटेरीयल म्हणून असा हा अर्धवट आणि म्हटल्यास पूर्ण चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला जातोय.

———————-

२) आता आपण शाळेतील इतिहासाकडे वळू.

 

indian-school-marathipizza01
ideasforindia.in

शाळेतील इतिहासाची सुरुवात होते सिंधू संस्कृतीपासून. त्यातही तज्ज्ञांनी आजवर केलेल्या संशोधनाकडे कानाडोळा करून जुन्या पुराण्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. त्यानंतर वेदिक ज्ञान, गणसंघ, जनपद आणि ज्या इतर प्रजासत्ताकाचे भारतात अस्तित्वात होते त्या प्रकारची माहिती सोडून थेट बौद्ध संस्कृतीची माहिती देण्यास सुरुवात होते.

कधी कधी बुद्धांबरोबर जैन संस्कृती अर्थात महावीरांची देखील माहिती दिली जाते. पण त्याच वेळची ‘उपनिषिद’ ही संकल्पना मात्र समजावून सांगितली जात नाही.

त्यानंतरच्या काळातील प्रगत भारताचे चित्र न मांडता पुन्हा राजा अशोकाचं पर्व सुरु होतं – ज्यामध्ये त्याची जीवनगाथा, बौद्ध धर्माचा प्रसार आणि इतर गोष्टी सांगितल्या जातात.

त्यांनतरची कित्येक शतके ज्यामध्ये गुप्त आणि हर्ष साम्राज्य वगैरे बराच जाणून घेण्यासारखा इतिहास होता तो वगळून आपल्या समोर उघडला जातो मुघलांचा इतिहास.

तो इतिहास आणि त्यातील इतर साम्राज्यांचे योगदान आटोपशीर घेऊन आपण येऊन पोचतो आधुनिक ब्रिटीश इतिहासामध्ये. जेथे ब्रिटीश वसाहती, त्यांनतर १९ व्या शतकात झालेल्या क्रांत्या, आंदोलने आपल्याला शिकवली जातात. पुढे भारत स्वातंत्र्य मिळवतो आणि आपला इतिहासाचा अभ्यास संपतो.

 

indian-history-marathipizza03
targetpublications.org

जेव्हा आपण १९ व्या शतकाचा इतिहास शिकत असतो, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला शिकवलं जातं, की उच्च वर्णीय हिंदूंनी नेहमीच समाजावर वर्चस्व गाजवलं. इतरांवर घोर अन्याय केले.

आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा वरील प्रकारचा इतिहास शिकताना काही विद्यार्थ्यांच्या मनात साहजिकच हा प्रश्न उभा राहत असेलच की “ज्या उच्च वर्णीय हिंदूंनी, खालच्या जातीतील लोकांवर अन्याय केले, ते नेमके कोण होते?”, कारण त्यांच्याबद्दलचा इतिहास त्यांना शिकवला गेलेलाच नसतो.

केवळ उच्च वर्णीय हिंदूंनी, ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी समाजाला रसातळाला नेले असे शिकवले जात असताना आपल्याला केवळ बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांशी निगडीतच इतिहास का शिकवला जातो? हा प्रश्न देखील विद्यार्थ्याच्या मनात येतो.

यामुळे विद्यार्थाच्या समोर दोन पर्याय उरतात:

१) विविध बिगर-हिंदू राज्यकर्त्यांनी देखील समाजात द्वेष पसरवण्याचे, शांतता भंग करण्याचे काम केले, समाजातील इतर जातींवर अन्याय केले.

२) असे अनेक हिंदू राज्यकर्ते देखील होते ज्यांनी सामाजिक तेढ निर्माण केली पण समाज सुधारण्यात देखील योगदान दिले.

पण इतिहासातील सत्य पाहायला गेलो तर लक्षात येतं की सत्य हे वरील दोन्ही पर्यायांच मिश्रण आहे. म्हणजेच हिंदू आणि बिगर हिंदू दोन्ही राज्यकर्त्यांनी भारतीय समाज घडवण्यात आणि बिघडवण्यात समान योगदान दिले. पण सत्य हे नेहमी समाजवाद्यांच्या आणि कट्टर हिंदू विचारसरणीच्या मध्येच अडकून राहिलं आहे.

———————-

३) या आधुनिक काळातही आपल्यासमोर आर्यांनी कसं आक्रमण केलं त्याचे सिद्धांत इतिहासाद्वारे मांडले जातात, जो सिद्धांत आजवर कोणालाही सिद्ध करता आलेला नाही.

केवळ आपला प्रोपोगांडा पुढे नेण्यासाठी भारताचा महान रंजक इतिहास सोडून आपल्याला खोटा इतिहास शिकवला जातोय, ज्याची आपल्याला जाणीवही नाही.

 

Aryan-Invasion-of-India-inmarathi
exploremyindia.in

ज्यामुळे जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की शाळेतील इतिहास आणि वास्तवातील इतिहास यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे आणि इथून खऱ्या गोंधळाला सुरुवात होते.

या प्रोपोगांडाचा सर्वात जास्त फटका बसतो तो आपल्या हिंदू राजांना!

समाजवाद्यांच्या आणि कट्टरवाद्यांच्या मतमतांतरामध्ये ते असे काही भरडले जातात की खरा इतिहास सोडून जे कधी घडलेच नाही ते सदर केले जाते, कधी कधी तर त्यांना इतिहासातूनच हद्दपार केले जाते. आपण दक्षिण भारताकडे पाहिलं तर लक्षात येतं की चौल साम्राज्य अजूनही तेथील इतिहासामध्ये स्थान टिकवून आहे. पण अतिशय महान विजयनगर साम्राज्याचे अस्तित्व मात्र नगण्यच आहे.

एकीकडे तमिळ लोक इतरांना सांगत असतात की, उर्वरित भारत त्यांचा इतिहास जाणून घेत नाही आणि हेच लोक महान नायक साम्राज्याला केराची टोपली दाखवतात, ज्यांनी उभारलेल्या वास्तू त्यांच्या महानतेची, विद्वतेची आजही साक्ष देतात. उदा, मदुराईचं मीनाक्षी मंदिर!

 

indian-history-marathipizza04
india.com

तसंच काहीसं आपल्या मराठा साम्राज्याबदल देखील आहे. ज्या मराठ्यांच्या शौर्याने सबंध भारत झळाळून निघाला होता, ते इतिहासात मात्र नेहमीच अंधारात राहिले. ज्या मुघलांना मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले त्या मुघलांचा इतिहास अतिशय सखोलरित्या मांडला जातो.

पण मराठ्यांचा इतिहास हा आटोपशीर घेतला जातो. बंगाल, ओडीसा, दिल्ली आणी अस्य असंख्य ठिकाणी मराठ्यांनी आपली पताका फडकावली, पण आज त्याच भागांच्या इतिहास अभ्यासक्रमात मराठ्यांना स्थान नाही.

हीच परिस्थिती आहे सातवाहन, चालुक्य या साम्राज्यांची देखील. यांना इतिहासात शोधायचे म्हटले तर अतिशय खोल जावे लागते, स्वत:हून इतिहास त्यांची माहिती कधीच देत नाही. (आपल्याला शिकवले जात नाही.)

आजच्या पिढीला कधी विचारलं तुम्हाला चौल कोण होते माहित आहे का? पाल साम्राज्याचे राजे माहित आहेत का? बरं ते जाऊ दे, आपण आपल्या पासपोर्टवर जो गणराज्य हा शब्द वापरतो तो जेथून आला त्या जगातील पहिलं प्रजासत्ताक म्हणजे वैशाली नगराबद्दल माहित आहे का? तर या सर्व प्रश्नांना नाही असंच उत्तर मिळेल.

पूर्व भारताच्या इतिहासाबद्दल आपलं ज्ञान तर अगदीच शून्य आहे. तिकडच्या एकाही अहोम, कामरूपा यांसारख्या महान साम्राज्याचा इतिहास आज कोणालाच सांगता येणार नाही, कारण तो आपण कधीच शिकलो नाही आहे. ज्यांनी जपानी आक्रमण थोपवले त्या नागा साम्राज्याचा इतिहास इतका गौरवशाली आहे की तो प्रत्येक भारतीयाला शिकवले जाणे गरजेचे होते, कलिंग साम्राज्य, काकत्य साम्राज्य, मणिपुरी राजे, यांच्याबद्दल तर न विचारलेलेचं बरे!

———————-

४) भारतीय इतिहासाला अनेक पदर आहे. तो अतिशय खोल पण जाणून घेण्यासारखा आहे. केवळ शौर्यच नाही तर विद्वत्ता देखील आपल्या इतिहासामध्ये ठासून भरली आहे. हेच ज्ञान घेऊन देशोविदेशीचे विद्वान आपापल्या प्रांतात परत गेले आणी त्यावरच उभे आहे त्यांचे आजचे विज्ञान!

गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र कोणत्याही शास्त्राचं नाव घ्या, त्यात भारतीयांचे योगदान अभूतपुर्व आहे. पण आज स्वत:ला बुद्धिवादी मानणारा एक गट मात्र या सर्व थोतांड कथा मानतो, त्यांच्या मते प्राचीन काळातील भारतीय विद्वानांचा आजच्या विज्ञानाशी काहीही संबंध नाही, ते असे म्हणतात कारण त्यांना खरा इतिहासच माहित नाही.

भारताने जगाला स्थापत्यशास्त्र शिकवले. आज अस्तित्वात असलेली भलीमोठी हिंदू मंदिरे, वास्तू, त्यावरचे कोरीव काम, अचंबित करून सोडणारे मोजमाप यांसारख्या गोष्टी त्याचीच साक्ष देतात. शूर राजे, शहारून सोडणाऱ्या युद्धकथा, अद्भुत साहित्य या गोष्टी सोडून आपण आज काय शिकतो तर कंटाळवाणा इतिहास, म्हणूनच इतिहासाच्या तासाला अनेक विद्यार्थी झोपा काढताना दिसून येतात.

 

indian-history-marathipizza05
historydiscussion.net

इतिहास हा केवळ अभ्यासासाठी नसतो. तो आपल्याला शिकवतो की आपण येथवर कसे पोचलो आहोत. त्या काळात आपण कोणत्या चुका केल्या, ज्या भविष्यात आपल्याकडून होऊ नयेत – हे आपल्याला इतिहासच शिकवतो. सोबत हे देखील शिकवतो की त्या काळात आपण किती चांगली कामे केली, जी आपल्याला भविष्यात देखील उपयोगी पडू शकतात.

अनेक जण म्हणतात की एवढा सगळा इतिहास शाळेच्या पुस्तकांमध्ये सामावणे शक्य नाही. त्यांना एवढेच सांगणे आहे की सध्या जो इतिहासाच्या पुस्तकामध्ये नको तो फाफटपसारा आहे तो जर बाजूला काढला तर सर्व इतिहास सामावणे सहज शक्य आहे.

दीर्घ इतिहास शिकवू नका, पण त्या इतिहासाची तोंडओळख तर करून द्या. विद्यार्थ्यांच्या मनाला रंजक गोष्टी आवडतं असतात आणि आपला इतिहास तसा आहे देखील, फक्त तो नीटममांडला पाहिजे, म्हणजे इतिहासाच्या तासाला कोणी झोपा काढणार नाही, उलट विद्यार्थी तो विषय आवडीने शिकतील आणि येणारी पिढी ही खोट्या रचलेल्या नाही तर खऱ्या इतिहासाचे ज्ञान घेऊन बाहेर पडेल जे सध्या आपल्या देशासाठी अतिशय गरजेचे आहे.

बालाजी विश्वनाथ या प्रसिद्ध इतिहास अभ्यासकाने भारतात इतिहास कसा चुकीचा शिकवला जातोय या क्वोरावर विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावर आधारित

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?