टॉयलेट फ्लश करण्यात घोळ झाला आणि हिटलरची युद्धनौका बुडाली…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

युद्ध ही अशी घटना असते जिच्यासाठी अनेक मोठमोठे शोध लागतात. सुपरग्ल्यु, इंटरनेट, मिलिटरी टेक्नॉलॉजी असे कितीतरी शोध हे युद्धासाठीच लागलेत. अर्थात हे शोध सेनेसाठी आणि नंतर सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा उपयोगीच ठरलेत.

पण कधी कधी मात्र ही मिलिटरी टेक्नॉलॉजी आपल्याच अंगावर उलटू शकते आणि त्यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते.

अत्याधुनिक जर्मन पाणबुडी U-1206 जी खास दुसऱ्या महायुद्धादरम्यान युद्धासाठी तयार करण्यात आली होती, तिच्याबाबतीत असेच घडले. एक लहानशी चूक जर्मनीला भारी पडली आणि अख्खी पाणबुडी कायमसाठी समुद्राच्या तळाशी गेली. इतिहासात अश्याही काही विचित्र आणि गमतीशीर घटना घडलेल्या आहेत की वाचणाऱ्याला त्या खऱ्या आहेत की नाही हा प्रश्न पडतो.

आता तुम्हाला कुणी सांगितले की टॉयलेट फ्लश करण्यात घोळ झाला आणि चक्क युद्धनौका बुडाली तर ह्यावर तुमचा विश्वास बसेल का?

 

U-1206 Inmarathi
War History Online

पण ही घटना खरी घडलेली आहे.

आता टॉयलेट फ्लश करणे ह्यात होऊन होऊन काय चूक होऊ शकेल आणि त्या चुकीमुळे असे कितीसे नुकसान होऊ शकेल? पण हीच चूक U-1206 च्या कॅप्टनने केली आणि त्यामुळे त्याची पाणबुडी कायमची समुद्रात बुडाली.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जर्मन टाईप VIIC ही पाणबुडी त्या काळची सर्वात आधुनिक युद्धनौका होती. पण ह्याच प्रकारची एक युद्धनौका U-1206 मात्र अत्यंत विचित्र कारणामुळे तिच्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाली कारण युद्धनौकेच्या कॅप्टनने त्यातील हाय टेक टॉयलेट चुकीच्या पद्धतीने वापरले.

ही घटना कुठल्याही विनोदी सिनेमात शोभेल अशीच आहे. पण ही घटना म्हणजे अचानक घडलेला दुर्दैवी अपघात आहे, जो खऱ्याखुऱ्या नेव्हल इंजिनियरिंगच्या समस्येमुळे घडला.

ह्या घटनेच्या अनेक वर्षे आधी जर्मन शास्त्रज्ञ नेक्स्ट जनरेशन अंडरसी प्लम्बिंग तयार करण्याच्या प्रयत्नात होते. त्या आधी पाणबुड्यांमध्येच सांडपाणी साठवण्याची व्यवस्था होती. त्यासाठी पाणबुड्यांमध्येच सेप्टिक टँक्स असायचे.

 

U-1206 Toilet Sank InMarathi
PopularMilitary

जर्मन यु- बोटींमध्ये त्यांनी पाणबुडीचे वजन आणि जागा कमी करण्यासाठी बोटीतले सांडपाणी थेट पाण्यात सोडण्याची व्यवस्था केली होती. पण हे सगळं व्यवस्थित चालणे महत्वाचे होते.

पण हे एक आव्हान होते. ही सिस्टीम तेव्हाच व्यवस्थित चालू शकत होती जेव्हा पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ असेल. समुद्राच्या पृष्ठभागाजवळ पाण्याचे प्रेशर कमी असते.

पण जेव्हा पाणबुडी अनेक दिवस खोल समुद्रात असताना हे सांडपाणी बाहेर टाकले जात नसेल तेव्हा पाणबुडीतल्या लोकांना कशाला तोंड द्यावे लागत असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा युद्धनौका आणि अँटी सबमरीन तंत्रज्ञान आधुनिक झाले.

उथळ पाण्यात किंवा समुद्राच्या पृष्ठभागावर युद्धासाठी पाणबुड्यांचा काहीही उपयोग नव्हता. पण १९४५ साली जर्मन टॉयलेट टेक्नॉलॉजीमध्ये खूप प्रगती झाली.

जर्मनीतील काही अत्यंत हुशार शास्त्रज्ञांनी नवे अत्यानुधिक “डीपवॉटर हाय प्रेशर टॉयलेट” तयार केले. ह्या टॉयलेटमध्ये खोल समुद्रात असताना देखील फ्लश करता येण्याची सोय होती.

 

toilet-sub Inmarathi
All That’s Interesting

पण हे टॉयलेट अत्याधुनिक असले तरी ते अत्यंत किचकट होते. पहिले म्हणजे ते टॉयलेटमधील सांडपाणी अनेक चेम्बर्समधून नेऊन एका प्रेशराइझ्ड एयरलॉक मध्ये जात असे. त्यानंतर काँट्रॅप्शनद्वारे हवेच्या प्रचंड दाबाखाली ते समुद्रात प्रेशरने सोडले जात असे.

म्हणजेच एखाद्या टॉर्पेडोप्रमाणे सांडपाणी समुद्रात सोडले जात असे. हे टॉयलेट कसे वापरायचे ह्याचे प्रशिक्षण प्रत्येक पाणबुडीवरील स्पेशालीस्टला दिले जात असे.

टॉयलेट व्यवस्थित चालण्यासाठी कुठला व्हॉल्व कधी उघडायचा आणि कधी बंद करायचा ह्याचा एक ठरलेला क्रम होता.

U-1206 ही पाणबुडी १४ एप्रिल १९४५ रोजी समुद्रात आठ दिवसांच्या पॅट्रोलींगसाठी समुद्रात उतरली होती. कार्ल अडोल्फ श्लीट हा सत्तावीस वर्षीय तरुण ह्या पाणबुडीचा कॅप्टन होता. पाणबुडी समुद्रात २०० मीटर खाली असताना श्लीटने हे टॉयलेट कसे वापरायचे हे बघण्याचे ठरवले.

पण त्याला टॉयलेट स्पेशालिस्ट म्हणून प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. त्याने मदतीसाठी एका इंजिनियरला बोलावले. पण त्या इंजिनियरने चुकून चुकीचा व्हॉल्व फिरवला आणि सांडपाणी जे प्रेशरने समुद्रात सोडण्यात येणार होते, ते चुकून तितक्याच प्रेशरने पाणबुडीत सोडले गेले आणि गंभीर परिस्थिती उद्भवली.

सगळे सांडपाणी पाणबुडीच्या आत आले आणि पाणबुडीतल्या भल्यामोठ्या बॅटरीज त्या पाण्याखाली गेल्या. त्या बॅटरीज बाथरूमच्या खाली लावलेल्या होत्या.

 

karl-adolf-schlitt InMarathi
g.cz

बॅटरी आणि सांडपाणी ह्यांत रासायनिक क्रिया घडली आणि तिथे क्लोरीन वायू तयार झाला. हा विषारी वायू हळूहळू सगळीकडे पसरला आणि मग कॅप्टनने पाणबुडी घाईने पृष्ठभागावर आणण्याची ऑर्डर दिली.

पाणबुडीतील कर्मचाऱ्यांनी पाणबुडीची तरंगण्याची शक्ती वाढावी म्हणून बॅलास्ट टँक्स उडवून दिले आणि त्यांचे टॉरपेडोज सुद्धा फायर करून टाकले. पण असे करून देखील परिस्थिती आणखी बिघडली. पृष्ठभागावर पाणबुडी आणताच परिस्थिती आणखी बिघडली.

कारण त्यांच्या पाणबुडीला ब्रिटिश विमानांनी घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. आता त्यांच्याकडे एकच पर्याय शिल्लक होता. तो म्हणजे पाणबुडी सोडून देणे. अखेर त्यांनी पाणबुडी सोडून दिली आणि रबरी बोटीचा आसरा घेतला.

 

Army of Hitler InMarathi
Stunning Places

ते त्या रबरी बोटींतून स्कॉटिश किनाऱ्यावर पोहोचले. ह्या कठीण प्रवासात त्यांचे तीन सहकारी मरण पावले आणि अनेकांना ब्रिटिश जहाजांनी ताब्यात घेतले. श्लीट मात्र युद्ध लढला आणि २००९ साली त्याचे निधन झाले. ती पाणबुडी मात्र आजही नॉर्थ सी च्या तळाशी आहे.

एका चुकीच्या फ्लशमुळे हा अख्खी पाणबुडी बुडाल्याची ही इतिहासातील एकमेव घटना असावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?