अश्वत्थामा डोक्यावर जखम घेऊन आजही या किल्ल्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

महाभारत हा भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा आणि पवित्र ग्रंथ आहे. व्यासांनी सांगितलेल्या आणि श्री गणेशांनी लिहिलेल्या या ग्रंथाला एक वेगळे स्थान देण्यात आलेले आहे. महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध, तसेच त्यांच्या जीवनाचे वर्णन करते.

श्रीकृष्णाची हुशारी, अर्जुनाची शूरता, भीमाचे बळ आणि कर्णाची दानशूरता ह्या सर्वांचे वर्णन या महाकाव्यात करण्यात आलेले आहे.

जर तुम्ही महाभारत वाचले असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल, तर तुम्हाला त्यातील अश्वत्थामा हे पात्र माहित असेलच.

 

Asirgarh fort and ashwathama story.Inmarathi
patrika.com

अश्वत्थामा हा महाभारतातील इतर प्रमुख पात्रांसारखाच एक आहे. ज्याचे अस्तित्व आज देखील आहे. हे ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी निघालेल्या अश्वत्थामाला त्याची एक चूक महागात पडली आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला अमरत्वाचा आणि युगानयुगे भटकण्याचा शाप दिला. गेल्या जवळपास पाच हजार वर्षांपासून अश्वत्थामा भटकत आहे.

असे मानले जाते की, मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये असलेल्या असीरगढ किल्ल्याच्या शिवमंदिरामध्ये अश्वत्थामा सर्वात पहिल्यांदा पूजा करण्यासाठी येतो.

या शिवलिंगावर दरदिवशी सकाळी ताजी फुले आणि गुलाल चढवलेले मिळणे, हे सर्वात मोठे रहस्य आहे. महाभारताच्या कथेत अश्वत्थामा या पत्राची भूमिका काय हे थोडक्यात पाहू.

गुरू द्रोणाचार्याचा पुत्र होता अश्वत्थामा

अश्वत्थामा हा महाभारत काळातील द्वापारयुगामध्ये जन्मला होता. त्याला त्यावेळी श्रेष्ठ योध्यांमध्ये गणले जात असे. तो गुरु द्रोणाचार्याचा पुत्र आणि कुरु वंशाचे राजगुरू कृपाचार्याचा भाचा होता. गुरु द्रोण यांनी कौरवांना आणि पांडवाना शस्त्र विद्येमध्ये पारंगत बनवले होते. महाभारताच्या युद्धाच्या वेळी गुरु द्रोणाचार्याने हस्तिनापुर राज्याशी असलेल्या निष्ठेमुळे कौरवांची साथ देणे योग्य समजले.

 

Asirgarh fort and ashwathama story.Inmarathi1
hunt.in

अश्वत्थामा देखील आपल्या पित्याप्रमाणे शास्त्र आणि शस्त्रविद्येमध्ये निपुण होता. या पिता – पुत्राच्या जोडीने युद्धाच्या दरम्यान पांडवांच्या सैन्याला छिन्न विछिन्न केले होते. पांडव सेनेला निराश होताना पाहून श्रीकृष्णाने द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी युधिष्ठिरला कूटनीतीचा वापर करण्यास सांगितले. या योजनेनुसार युद्धभूमीमध्ये ही गोष्ट पसरवण्यात आली की, अश्वत्थामा मारला गेला आहे.

श्रीकृष्णाने दिला शाप

जेव्हा द्रोणाचार्याने धर्मराज युधिष्ठिरकडून अश्वत्थामाच्या मृत्यूची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा युधिष्ठिरने हे उत्तर दिले की, अश्वत्थामा आता “नरो वा कुंजरो वा” (अश्वत्थामा मारला गेलेला आहे, पण तो नर होता कि हत्ती होता, हे मला माहित नाही. ) हे ऐकून गुरु द्रोणाचार्य मुलाच्या विरहामध्ये शस्त्राचा त्याग करून युद्धभूमीमध्ये बसले आणि त्याचा फायदा घेत पांचाल नरेश द्रुपदचा पुत्र धृष्टद्युम्न याने त्यांचा वध केला.

 

Asirgarh fort and ashwathama story.Inmarathi2
indiatimes.in

पिताच्या मृत्यूमुळे अश्वत्थामा विचलित झाला. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामाने पिताच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी पांडव पुत्रांचा वध केला, तसेच पांडव वंशाचा समूळ नाश करण्यासाठी उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या अभिमन्यूचा पुत्र परीक्षितला मारण्यासाठी ब्रम्हास्त्र चालवले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने परीक्षितची रक्षा करत दंडाच्या स्वरूपात अश्वत्थामाच्या माथ्यावर लागलेली मणी काढून त्याला तेजहीन केले आणि युगानयुगे भटकण्याचा त्याला शाप दिला.

पाहणारा वेडा होतो

असे म्हटले जाते की, असीरगढच्या व्यतिरिक्त मध्यप्रदेशच्या जबलपूर शहरात गौरीघाटाच्या (नर्मदा नदी) किनाऱ्यावर देखील अश्वत्थामा भटकत राहतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे, कधी–कधी मस्तकावर असलेल्या घावातील रक्त थांबवण्यासाठी हळद आणि तेलाची मागणी देखील करतो. याबाबतीत खूप जणांच्या आपापल्या गोष्टी आहेत. गावातील कितीतरी वृद्ध माणसांचे म्हणणे आहे कि, जो एकदा अश्वत्थामा पाहतो, त्याचे मानसिक संतुलन बिघडते.

 

Asirgarh fort and ashwathama story.Inmarathi3
blogspot.com

शिवमंदिरामध्ये करतो पूजा

किल्ल्यामध्ये असलेल्या तलावामध्ये स्नान करून अश्वत्थामा शिवमंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जातो. काही लोकांचे म्हणणे आहे की, तो उतावली नदीमध्ये स्नान करून पूजेसाठी येथे येतो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोंगराच्या माथ्यावर बनलेल्या या किल्ल्यावर स्थित असलेला तलाव बुरहानपुरच्या एवढ्या तप्त उन्हामध्ये देखील कधीही सुकत नाही. या तलावाच्या थोडे पुढे गुप्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे.

या मंदिराच्या चारही बाजूंना खोल दरी आहे. किंवदंतीच्यानुसार, याच दऱ्यांमधील एका दरीमध्ये एक गुप्त रस्ता बनलेला आहे, जो खांडव जिल्ह्याच्या वनामधून जात सरळ या मंदिरामध्ये निघतो. याच रस्त्याने अश्वत्थामा मंदिराच्या आत येतो. या मंदिरामध्ये कोणतीही उजेडाची सुविधा नाही आहे. तरीही येथे दररोज पूजा केली जाते. या शिवलिंगावर दररोज ताजी फुले आणि गुलाल चढवलेला असतो.

 

Asirgarh fort and ashwathama story.Inmarathi4
blogspot.com

बुरहानपुरचे इतिहासतज्ञ डॉ. मोहम्मद शफी, सेवा सदन महाविद्यालयाचे प्रोफेसर यांनी सांगितले की, बुरहानपुरचा इतिहास महाभारताच्या काळाशी जोडलेला आहे. पहिल्यांदा ही जागा खांडव वनाशी जोडलेली होती. या किल्ल्याचे असीरगढ नाव हे एका प्रमुख गुराखी आसा अहिरच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या किल्ल्याला स्वरूप इसवीसन १३८० मध्ये फारुखी वंशाच्या बादशहांनी दिले होते.

अश्वत्थामाविषयी शफी साहेब म्हणतात की, मी लहानपणापासूनच या अश्वत्थामाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. मानल्या तर त्या खऱ्या, नाही मानल्या तर खोट्या आहेत.

असीरगढ किल्ला बुरहानपुरपासून जवळपास २० किमी उत्तर दिशेला सातपुडा डोंगरांच्या शिखरावर समुद्र सपाटीपासून ७५० फूट उंचीवर स्थित आहे. बुरहानपुर हे खंडवापासून जवळपास ८० किमी लांब आहे. येथून बुरहानपुरपर्यंत जाण्यासाठी ट्रेन, बस आणि टॅक्सी सहज मिळते.

तर महत्वाची गोष्ट ही, की महाभारत, रामायण हे ग्रंथ म्हणजे आपले सांस्कृतिक संचित आहे. म्हणजे त्यांच्यातील कथांशी, प्रसंगांशी आपल्या श्रद्धा जोडलेल्या असणे स्वाभाविक आहे.

महाभारताच्या बाबतीत अशा कित्येक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतील. त्याची सत्यासत्यता काय, हे पडताळून पाहण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. त्याने काही साध्यही होणार नाही. पण या आख्यायिका आणि दंतकथांनी लोकांना नेहमी कोड्यात टाकले आहे हे मात्र खरे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?