' नाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर – InMarathi

नाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

===

झुंडीतली माणसं (लेखांक सहावा)

लेखांक पाचवा: मोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर

===

The battlefield is a scene of constant chaos. The winner will be the one who controls that chaos, both his own and the enemies. – Napoleon Bonaparte

जनता चळवळी आणि कोठल्याही उपयुक्त संस्था अशा दोन्हीकडे मानवी मन ओढले जाते. तथापि जनता चळवळीचे आणि व्यवहारोपयोगी संस्थांचे आकर्षण या दोन्हीमध्ये मूलभूत फ़रक आहे. व्यवहारोपयोगी संस्था माणसाच्या वैयक्तीक उत्कर्षाला संधी उपलब्ध करून देतात. सहाजिकच स्वार्थी हेतूने लोक या संस्थांकडे आकर्षित होतात.

याच्या उलट स्थिती जनता चळवळीची असते. ज्यांना स्वत:बद्द्ल अत्यंत तिटकारा उत्पन्न झाला आहे, ज्यांना स्वत:चा सहवास जड वाटू लागला आहे, असे लोक जनता चळवळीकडे आकृष्ट होतात.

थोडक्यात, स्वत:चा फ़ायदा करून घेण्यासाठी अथवा मोठेपणा मिळवण्यासाठी लोक या चळवळीकडे वळत नाहीत. स्वत:चा फ़ायदा साधण्यासाठी नव्हेतर स्वत:चा, स्वत:च्या क्षुल्लकतेचा, न्युनत्वाचा विसर पडावा म्हणून तिकडे वळतात. (‘झुंडीचे मानसशास्त्र’ पृष्ठ १०५)

 

mass-moment-inmarathi
2.bp.blogspot.com

उपरोक्त उतार्‍यातील विधाने अतिशय चमत्कारिक वा परस्परविरोधी वाटतील. पण बरकाईने त्यांचा अभ्यास केला तर त्यातल्या विरोधाभासातले सार लक्षात येऊ शकेल. चळवळ आणि संस्था यातला फ़रक आधी ओळखला पाहिजे.

चळवळ ही नुसतीच झुंड असते आणि संस्था जबाबदार लोकांचा मेळा असतो.

ह्या संस्थेमध्ये जमलेले लोक आपल्या स्वार्थासाठी लाभासाठीच एकत्र आलेले असतात, हे कोणी नाकारू शकत नाहीत. पण आपला मतलब साधण्यासाठी ते ज्या कामांना आरंभ करतात वा त्यांचे नियोजन करतात, ते पर्यायाने एकूण समाज व लोकसंख्येलाही काही अंशी उपकारक व उपयुक्त असू शकते.

उलट चळवळी काहीतरी उध्वस्त करण्याच्या मनसुब्याने एकत्र आलेला जमाव असतो.

त्याला काही उभारण्याची इच्छा नसते, की आसक्ती नसते. उलट आपले आयुष्य उध्वस्त झालेले आहे, तसेच समोर दिसणारे जगही उध्वस्त जमिनदोस्त करून टाकण्याची अतीव इच्छा सतावत असते.

कालपरवा म्हणजे गेल्या महिन्याभरात भारतात दोन घटना एकमेकांशी तुलना करून बघता येतील. एका बाजूला भीमा कोरेगाव संबंधाने महाराष्ट्रात हिंसाचार माजला होता आणि नंतर चार आठवड्यानी पद्मावत नावाच्या चित्रपटाचे निमीत्त साधून उत्तर भारता्तील अनेक राज्यात हिंसेने थैमान घातले होते.

त्यात सहभागी झालेले जमाव किती आवेशात होते आणि कसे हिरीरीने आपली भूमिका मांडत होते, ते आपण बघितलेले आहे. त्यापैकी कितीजणांनी अस्मिता वा अभिमानास्पद असे काही करून दाखवलेले आहे काय? त्यांची भाषा अभिमान, स्वाभिमान वा अस्मितेची नक्की होती. पण यात पुढाकार घेणार्‍या कुणाही एका नेत्याचे वा पाठीराख्याचे कुठले कर्तृत्व समोर आलेले नाही.

 

padmavati-protest-inmarathi
i.ndtvimg.com

किंबहूना अशा जमावाला जमवून त्याच्या विध्वंसक कुवतीवर त्याचे नेते धमकीची भाषा वापरत होते.

आजच्या आधुनिक युगात अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधी उपलब्ध करून देणार्‍या शेकड्यांनी संस्था भारतात कार्यरत आहेत. ज्यांना खरोखर कर्तृत्व गाजवायचे आहे, त्यांनी थोडी मेहनत घेऊन तिथपर्यंत मजल मारण्याची गरज आहे. पण तिकडे पाठ फ़िरवून बसलेल्या लोकांचा अशा चळवळी व संघर्षात पुढाकार दिसेल.

अशा आत्मविश्वास गमावलेल्यांना कच्चा माल म्हणून वापरून चळवळी उभ्या रहात असतात. आपली कर्तृत्वहीनता हाच आपल्यावर लादलेला अन्याय असल्याची भाषा त्यातून कानी येत असते. आपला नाकर्तेपणा लपवण्याची केविलवाणी धडपड त्यातून लपत नाही.

राजपूतांची करणी सेना असो किंवा नेहरू विद्यापीठातून आलेले खालिद वा मेवानी असोत, त्यांना संधी मिळालेली नाही असे कोणी म्हणू शकत नाही. इतक्याच संधीवर बाबासाहेबांनी देशाची घटना बनवण्यापर्यंत आपले कर्तृत्व सिद्ध केले. तर राजपूत लढवय्यांनी त्यांच्या कालखंडात आपली राज्ये साम्राज्ये उभारलेली होती. कालपरवा थैमान घालणार्‍या कोणापाशी तशी कुवत दिसून आली आहे?

मेवानीसारखा कालचा पोरगा कुठेतरी बोलताना बाबासाहेबांशी माझे मतभेद असल्याचे बेधडक सांगून टाकतो. त्याला शिकण्याची उत्तम संधी मिळालेली असताना, त्याने बाबासाहेब तरी पुर्णपणे वाचलेले अभ्यासलेले आहेत काय?

त्याने ज्या साम्यवादी तत्वज्ञानाचे गोडवे गाताना बाबासाहेबांचा उपमर्द केला आहे, तो साम्यवाद तरी सखोल अभ्यासला आहे काय?

 

kanhaiya-gujarat-jignesh-mewani-inmarathi
forwardpress.in

अभ्यास केला नसेल तर तो दोन्ही विचार उध्वस्त करायला पुढे सरसावलेला असतो आणि आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी असे उथळ बोलत असतो. तितके सुद्धा कर्तृत्व नसलेले शेकडो लोक असतात आणि आपल्या अपयशाला झाकण्यासाठी वा त्यापासून पळ काढण्यासाठी, त्यांनाही काही मार्ग हवा असतो.

अशी मंडळी मग जनता चळवळीत बिनचेहर्‍याचे लढवय्ये होतात.

तेच करणी सेनेचे दिसेल. राजपूतांचा इतिहास इतकाच प्रभावशाली असल्याचा वारसा असेल, तर त्यासाठी संघर्ष करायला उतरणार्‍यांची हिंमत बघूनच कुणा निर्मात्याला चित्रपट काढायची हिंमत झाली नसती.

शासन व कायद्यांची शक्ती प्रबळ असल्याने किंवा तिच्याशी झुंजण्याची शक्ती नसल्याने, हतबल झालेल्यांना कुठली तरी पळवाट हवी असते आणि चळवळ किंवा आंदोलन ही त्यातली सर्वात सोपी पळवाट असते.

त्यात काही उभारायचे नसते; तर जे काही उभे आहे, ते उध्वस्त करण्याची धमकी देऊन आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा खेळ चालत असतो. अशा हिंसाचारात पुढाकार घेणार्‍या किंवा त्यात पकडले जाणार्‍या डझनावारी लोकांना खाजगीत शांतपणे बसून जुना इतिहास विचारला, किंवा त्यांच्या अस्मितेची व्याख्या विचारली तरी चार शब्दात काही सांगता येत नाही. पण रस्त्यावर उतरले, मग त्यांच्यात दिव्य शक्ती संचारलेली असते.

उद्या त्यांच्याच हाती कायदा सुव्यवस्था वा कारभार सोपवला, तर त्यातले बहुतेक लोक पळ काढतील, अशी त्यांची क्षमता असते. झुंड म्हणून असलेली शक्ती व्यक्तीगत दुबळेपणा़चा पुरावा असतो.

आपले दुबळेपण सांगता येत नाही आणि लपवताही येत नाही, तेव्हा त्याचे उदात्तीकरण आवडू लागते. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपण अन्यायाचे बळी आहोत, ही सर्वात सोपी पळवाट असते. त्यातून आपल्या न्युनगंडालाच अहंगड बनवणे सोपे होऊन जाते. आपण बळी असल्याचा पवित्रा घेतला, की समोरच्याला अपराध भावनेने गुंडाळणे सोपे जात असते. काश्मिरात किंवा पॅलेस्टाईन या भागातील हिंसाचार बघितला, मग त्याचे नेमके उदाहरण मिळू शकते.

 

mob-psychology-inmarathi
breakinginthehabit.files.wordpress.com

या दोन्ही भागात हिंसाचार माजवणारे जमाव कुठली उपयुक्त संपत्ती निर्माण करीत नाहीत आणि मिळणार्‍या अनुदानित रकमेचीही माती करून टाकतात. आपण समाजोपयोगी काही करू शकत नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे. पण ते कबुल केल्यास अनुदानही बंद होऊ शकते. मग पॅलेस्टाईनच्या मुक्तीची घोषणा करीत हिंसा माजवणे सोपा मार्ग ठरतो. कशासाठी व कोणते स्वातंत्र्य त्यांना हवे आहे?

जितके स्वातंत्र्य आहे, त्याचा उपयोग करूनही सामर्थ्य संपादन करता येऊ शकते आणि त्याच्या बळावर स्वातंत्र्य आत्मसात करता येऊ शकते. त्या प्रतिकुल स्थितीत इस्त्रायल युद्धाच्या छायेतही टिकून राहिला आहे आणि सामर्थ्यशाली झालेला आहे ना?

पाकव्याप्त काश्मिरपेक्षाही भारतात काश्मिरी लोकांना अधिक स्वातंत्र्य व अधिकार बहाल झालेले आहेत. मग त्याचा उपयोग करून भारत सरकारलाही नमते घ्यायला भाग पाडले जाऊ शकते. दगड मारून नव्हेतर आपल्या गुणवत्तेने व कर्तबगारीने सरकारला प्रभावित करण्यात कुठली अडचण आहे?

लोटा घेऊन मारवाडमधून बंगाल वा तामिळनाडूत पोहोचलेला व्यापारी मुळातच रोजगार शोधत तिथे गेला होता. पण आपल्या कुशलतेवर त्याने संपत्ती निर्माण केली आणि अशा परक्या प्रदेशातही त्याने राजकारण वा निर्णय प्रक्रीयेवर कब्जा केला आहे ना? मग इतरांना त्यात कसली अडचण आहे? नाकर्तेपणाखेरीज अन्य काय अडचण आहे?

चळवळीचा दावा नेहमी आपल्यावर अन्याय होत असल्याचा असतो. पण सामर्थ्य संपादन करण्याचा प्रयास क्वचितच त्यातून केला जातो. मात्र अशा अन्याया विरुद्ध लढताना आपण इतरांच्या विरोधात जे काही करीत आहोत, त्या विध्वंसातून इतरांवर अन्याय करीत आहोत, याचे भान कितीसे असते? अशा हिंसक आंदोलन दंगलीत अकारण सामान्य माणसांचे नुकसान होत असते. त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? त्यांच्यावर कोणी दांडगा माणूस अन्याय करूत नाही. त्यांनी कसले आंदोलन छेडावे? त्याचे उत्तर सोपे आहे.

जेव्हा झुंडीला कोणी आवर घालू शकत नाही वा तसे होताना दिसत नाही, तेव्हा प्रतिक्रीया म्हणून दुसर्‍या बाजूची झुंड उदयास येत असते.

आज भारतात सेक्युलर, पुरोगामी म्हणून जे कोणी आहेत, त्यांच्या विरोधात उमटणारी प्रतिक्रीया नेमकी त्याचे उदाहरण आहे. मागल्या सहासात दशकात पुरोगामीत्व म्हणून जे नाटक रंगवले गेले, त्यातून सहनशील हिंदू समाजाची कोंडी होत गेली आणि आज ज्याला हिंदूत्ववाद म्हणून हिणवले जाते, ती नवी प्रतिक्रीयात्मक झुंड उदयास आलेली आहे.

 

Secular-faces-inmarathi
1.bp.blogspot.com

इस्लाम वा ख्रिश्चन धर्माच्या आक्रमकतेला पाठीशी घालण्याला पुरोगमीत्व ठरवण्यात आले, तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जी प्रतिक्रीया उमटली, तेच आजचे हिंदूत्व आहे. त्यापेक्षा त्याला कुठला धर्माचा आधार नाही. कुठल्याही हिंदूत्ववादी संघटनेला आपल्या राजकीय सामाजिक आंदोलनासाठी धर्मशास्त्रात आधार शोधता येणार नाही किंवा सांगता येणार नाही. पण हिंदूत्वाचा आवेश बघितला तर त्यातली झुंडशाही लपून रहात नाही.

कुठल्याही मुस्लिमबहुल भागात हिंदूची हत्या झाली, मग त्याचे तीव्र पडसाद उमटतात. त्याचे खापर भाजपा वा संघावर थोपण्यापेक्षा, त्यातली प्रतिक्रीया समजून घेतली पाहिजे. मगच पुरोगामीत्वातला दोष लक्षात येईल. तिकडच्या झुंडीला पाठीशी घालण्यातून आजच्या हिंदू झुंडीला पुरोगाम्यांनीच जन्म दिला आहे.

गुजरातची दंगल अकस्मात उसळली नव्हती. तेव्हाही अयोध्येतून कारसेवा उरकून माघारी परतणार्‍या हिंदूंना रेलगाडीचा डबा पेटवून मारण्यात आलेले होते. ५९ हिंदूंना जाळण्यात आले तरी संसदेत अर्थसंकल्प मांडला जात होता आणि कोणाच्या डोळ्यात दोन अश्रू ओघळले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी गुजरात पेटला होता.

जळीत कांडातील हिंदूंचे कोळसा झालेले मृतदेह घरोघर जाताना बघून, कोणाला काय वाटले असेल? दिल्लीनजिक दादरी गावात जमावाने एका अखलाक नावाच्या मुस्लिमाला ठार मारले, तर देशभर काहूर माजलेले होते. पण ५९ लोकांना रेल्वेच्या एका डब्यात होरपळून ठार मारले गेले, तेव्हा देशातल्या बहुतांश साहित्यिक विचारवंत लोकांचा अंतरात्मा कुंभकर्णाने दिलेली गोळी घेऊन झोपा काढत होता.

तेव्हा देशातले पुरोगामीत्व म्हणजे जिहादी इस्लामी हिंसाचाराचे स्वरूप होऊन गेलेले होते. वाजपेयी सत्तेत असून त्याला रोखू शकले नाही, की मोदी सरकार काही करू शकले नाही. त्यामुळे झुंडीला उत्तर देण्यासाठी गुजरातमध्ये हिंदूत्वाची झुंड उदयास आली.

तिला कायदा व कोर्टाच्या सापळ्यात ओढण्याचे सलग अथक प्रयत्न झाले. त्यातून देशव्यापी हिंदू झुंड पसरत गेली. सोशल मीडिया असेल किंवा अन्य माध्यमातून असेल, तावातावाने बोलणारे लिहीणारे हिंदू त्याच झुंडीचे भाग असतात. त्यांना धर्माचे वा कुठल्या विचारांचे कौतुक उरलेले नाही. पुरोगामी आणि इस्लामी जिहादी झुंड एकच झालेले असून त्याच्याशी टक्कर देण्यासाठी कायद्यामध्ये कुठली सुविधा उरलेली नाही. म्हणून दुसर्‍या बाजूची झुंड उभी राहिली आहे.

 

hindu-terror-inmarathi
i1.wp.com

तिला जितके हिणवले गेले, तितकी ती झुंड अधिक प्रभावी होत चालली आहे. अशा झुंडीला विचार नसतो की विचार करण्याची तिच्यापाशी क्षमता नसते. जितके न्युनत्व तिच्या माथी मारले जाईल, तितकी झुंड अधिक उसळी मारून वर येत असते. कारण झुंडशाहीला झुंडीनेच आवरता येत असते. हे तारतम्य ज्या समाजातील बुद्धीमंतांमध्ये शिल्लक रहात नाही, त्या देशात कायद्याचे राज्य उरलेले नसते.

तिथे कायद्यावर विसंबून लोक शांत रहात नाहीत. तर दुसर्‍या बाजूला झुंड आकार घेऊ लागते. कारण धर्म कुठलाही असो, जातपात कुठलीही असो, तिथेही नाकर्त्या लोकांची संख्या पुरेशी असतेच. त्यांनाही आपले न्युनत्व झटकून टाकायला निमीत्त हवे असते. झुंडीत घुसले, मग जबाबदारी संपत असते. आपला चेहरा झाकला जात असतो आणि संख्याबळाने अंगी आवेश संचारत असतो. आपण काही महान पराक्रम गाजवित असल्याची धारणा इतकी प्रभावित होते, की परिणामांची पर्वा रहात नाही. आपल्यालाच इजा होईल वा आपणही मारले जाऊ याची चिंता उरत नाही.

मुंग्या किंवा कळपातल्या पशू जीवांनी जसे सर्वस्व झोकून द्यावे, तशी झुंडीतली माणसे पुढे सरसावत असतात. त्यांना पराक्रम पुरूषार्थ गाजवण्यापेक्षा आपला नाकर्तेपणा लपवण्याची संधी अपुर्व वाटत असते. म्हणूनच अशा झुंडींना निष्ठूरपणे आवाक्यात ठेवता आले, तरच कायद्याचे राज्य चालू शकते आणि त्यात मानवता किंवा पक्षपाताची बाधा झाली, मग झुंडी आवरणे अशक्य होऊन जाते.

त्यात हकनाक मेलेल्यांचे पुन्हा राजकीय भांडवल केले जाते आणि अजूनही झुंडीपासून दुर राहिलेल्यांच्या मनात शंका व भयाचा पगडा निर्माण होतो. यातून झुंडीचे बळ वाढत जाते.

तिथे विचार विवेक यांना स्थान नसते. व्यक्तीला स्थान नसते आणि आकाराला व हिंसेला प्राधान्य असते. म्हणून त्यात विचारांचे गुर्‍हाळ घालण्यापेक्षा निर्दयपणे सर्व झुंडींना नामोहरम करण्यातून कायदा सुव्यवस्था निर्माण करावी लागत असते. त्यात सहभागी झालेल्या मनुष्यबळाला व्यवहारी व समाजोपयोगी संस्थांकडे वळवण्याला पर्याय नसतो. त्या

विध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते. ते शहाण्यांचे नव्हेतर प्रशासकाचे काम असते. नेपोलियनने त्याचे मोजक्या शब्दात उत्तर दिलेले आहे.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?