' जगाची रीत न्यारी: गोंगाट करणारे होतात प्रसिद्ध आणि काम करणारे मात्र अनाम! – InMarathi

जगाची रीत न्यारी: गोंगाट करणारे होतात प्रसिद्ध आणि काम करणारे मात्र अनाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

संयुक्त राष्ट्राच्या क्लायमेट ऍक्शन समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या आधी एका सोळा वर्षाच्या मुलीने जोरदार भाषण केले. तिच्या भाषणामुळे लोक खूप प्रभावित झाले. ही षोडशा स्वीडन ह्या देशाची ग्रेटा थनबर्ग ही एक पर्यावरण कार्यकर्ती आहे.

तिने संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय क्लायमेट ऍक्शन समिटमध्ये संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस ह्यांच्यासह जगातील सर्व मोठमोठया नेत्यांना फैलावर घेत असे भाषण केले की, “तुम्ही आमची स्वप्ने, आमचे बालपण हे सगळे आमच्यापासून हिरावून घेतले.

तुमच्या पोकळ आश्वासनांनी आमच्यापासून आमचे निरागस बालपण हिरावून घेतले. अजून तरी माझ्या आजूबाजूचे वातावरण बरे आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. पण लोक ह्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे भोग भोगत आहेत. त्यामुळे त्यांचे जीव जात आहेत.

संपूर्ण इकोसिस्टिम नष्ट होत चालली आहे. एका बाजूला लोकांचे जीव जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मात्र पैसे आणि विकासाच्या गप्पा मारत आहात? हे करण्याची तुमची हिम्मत कशी होते?” तिच्या भाषणादरम्यान ती भावनिक झाली आणि म्हणाली, “तुमच्यामुळे आम्हाला अपयश आले आहे.

 

Greta Thundberg INMarathi

तरुण लोकांचा असा समज आहे की तुम्ही आम्हाला फसवले आहे. आम्हा सर्व तरुणांचे लक्ष तुमच्यावर आहे आणि जर तुम्ही परत आम्हाला निराश केले तर आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

“आपण विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत आणि तुम्ही मात्र पैसे आणि आर्थिक विकासाच्या काल्पनिक कथांमध्ये रममाण झाला आहात. हे करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? “

ग्रेटा असे देखील म्हणाली की, “आज जग जागे झाले आहे आणि आता तुम्हाला मर्यादा आखावीच लागेल.युवकांना हे लक्षात आले आहे की तुम्ही पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावर आमची फसवणूक केली आहे आणि आता जर तुम्ही ह्यावर काही पावले उचलली नाहीत तर युवा पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही.”

ही सोळा वर्षीय ग्रेटा “राईट लाइव्हलीहूड” ह्या पर्यायी नोबेल पुरस्काराची विजेती आहे. गेल्या वर्षी ती शाळा बुडवून स्वीडनच्या संसदेबाहेर  निदर्शक म्हणून उभी राहिली होती आणि तिने “पृथ्वी व पर्यावरण वाचवा” अशी विनंती केली होती.

त्याच वेळेला ती प्रकाशझोतात आली होती. तिचे अत्यंत आवेशाने बोलणे, पर्यावरणाविषयीची कळकळ ह्यामुळे तिचे जगभरात सगळीकडे कौतुक झाले.

पर्यावरणाविषयी इतका कळवळा असलेली ग्रेटा प्रत्यक्षात पर्यावरणासाठी नेमके काय ग्रेट काम करते हे मात्र कुणीही लक्षात घेत नाही. ग्रेटाला इतकी प्रसिद्धी मिळण्यात कदाचित तिच्या प्रसिद्ध आईवडिलांचाही वाटा असू शकतो.

तिची आई मालेना एमान एक आंतरराष्ट्रीय ऑपेरा सिंगर आहे तर वडील स्वान्ते थनबर्ग हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. अर्थात ग्रेटाला वयाच्या आठव्या वर्षापासूनच पर्यावरणाविषयी चिंता सतावू लागली.

 

Greta`s Parents InMarathi

तिला ऍस्पर्जर्स सिंड्रोमने सुद्धा ग्रासले. एस्परर सिंड्रोम हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. या आजारामध्ये व्यक्तीला ज्या प्रकारे समजते, आणि ज्या पद्धतीने ती बोलते आणि इतर लोकांशी वागते त्यावर परिणाम होतो. एस्परर सिंड्रोम ने बाधित व्यक्ती चार-चौघांप्रमाणे लोकांमध्ये उठत-बसत नाही, आणि प्रतिकुल सामाजिक परिस्थितीत प्रत्येकासारखा वागू शकत नाही.

या आजारावर मात करत पर्यावरणासाठी जनजागृती करणे खरं तर अत्यंत मोठी गोष्ट आहे. पण तिच्याहीपेक्षा महत्वाचे आणि मोठे काम करणाऱ्या लोकांविषयी मात्र कुणालाही फार माहिती नाही.

म्हणतात ना, “बोलणाऱ्याचे दगड सुद्धा विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे सोने देखील कुणाला माहिती होत नाही.”

ग्रेटाने जे कळकळ दाखवली त्याबद्दल कौतुक आहेच पण तिच्याहीपेक्षा महत्वाचे कार्य करून देखील ह्या तरुणाविषयी फार कुणाला माहिती नाही. तरीही तो शांतपणे आपले काम करतो आहे.

बॉयन स्लॅट हा पंचवीस वर्षीय डच तरुणाच्या एका शोधाने समुद्रातले प्रदूषण कमी होण्यात मदत मिळतेय. हा तरुण व्यावसायिक एक एरोस्पेस इंजिनीयरिंगचा ड्रॉप आउट आहे आणि ओशन क्लीनअपचा सीईओ आहे.

द ओशन क्लीनअप ही नेदरलँड्समधील एक बिगर-सरकारी अभियांत्रिकी पर्यावरण संस्था आहे. ही संस्था असे तंत्रज्ञान तयार करते ज्यामुळे समुद्रांतील प्लास्टिकचे प्रदूषण बाहेर काढून टाकता येते. सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी विविध चाचण्या घेऊन एक फुल स्केल प्रोटोटाइप समुद्रात काम करण्यासाठी सोडला.

 

Boyan Slat The Ocean Cleanup

दोन महिने चालल्यानंतर ह्या प्रोटोटाइपला काम करण्यात अडचणी येऊ लागल्या आणि नंतर तो प्रोटोटाइप तपासणी आणि दुरुस्तीसाठी हवाई येथे नेण्यात आला. आता जून २०१९ मध्ये त्यांनी समुद्रात काम करण्यासाठी दुसरा प्रोटोटाइप सोडला आहे.

बॉयनची ही संस्था समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी कसे करायचे ह्यासाठी विविध प्रयोग करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करते आहे.

बॉयन स्लॅटने ही संस्था २०१३ साली सुरु केली. ह्या संस्थेने उत्तर पॅसिफिक महासागरात दोन मोहिमा आखल्या व त्यावर अनेक सायंटिफिक पेपर्स प्रसिद्ध केले.

२०२१ पर्यंत एकूण अश्या ६० सिस्टिम्स समुद्रांत सोडण्याचे ह्या कंपनीचे ध्येय आहे. 

ह्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच मधील कमीत कमी पन्नास टक्के तरी कचरा बाहेर काढता येऊ शकेल असा कंपनीचा अंदाज आहे. इतके मोठे ध्येय ठेवून काम करणाऱ्या बॉयनने फार कमी वयात विविध तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून तो नवनवीन मशीन्स तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याने २१३ वॉटर रॉकेट्स एकाच वेळी लाँच करण्याचा विक्रम केला होता. त्याचा हा विक्रम गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आला आहे.

 

Ocean Cleanup InMarathi

२०११ साली तो ग्रीसमध्ये मासेमारी करत असताना त्याच्या हाती माश्यांऐवजी प्लास्टिकच लागले. त्यावेळी त्याने त्याच्या हाय स्कुल प्रोजेक्टसाठी “समुद्रातले प्लास्टिक प्रदूषण” हा मोठा विषय निवडला आणि समुद्रातले प्रदूषण स्वच्छ करणे अशक्य का आहे ह्यावर त्याने अभ्यास करणे सुरु केले.

त्याने नंतर समुद्राच्याच लाटांचा वापर करून एक पॅसिव्ह सिस्टीम तयार करण्याची कल्पना मांडली. त्याने ही कल्पना २०१२ साली TEDx टॉक मध्ये मांडली. बॉयनने त्याचे एरोस्पेस इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून त्याचा संपूर्ण वेळ ह्याच महत्वाच्या कार्यात व्यतीत करण्याचे ठरवले.

त्याने द ओशन क्लिनअप ही संस्था सुरु केल्यापासून ह्या संस्थेला युरोपातील व्यावसायिक व सिलिकॉन व्हॅलीतील व्यावसायिकांकडून ३१.५ मिलियन डॉलर्स इतकी देणगी मिळाली आहे. 

 

Ocean Clean up Team InMarathi

इतके महत्वाचे कार्य करून देखील त्याच्याविषयी फार कुणाला माहिती नाही कारण तो त्याचे काम गोंगाट न करता शांतपणे करतोय आणि वेळोवेळी योग्य त्या व्यासपीठावर त्याच्या कल्पना मांडतोय.

गोंगाट न केल्यामुळे त्याच्याविषयी कुठेही चर्चा होत नाही आणि सामान्य माणसापर्यंत त्याचे कामच पोहोचत नाही.

पण त्याने त्याला फारसा फरक पडत नसावा कारण योग्य त्या लोकांपर्यंत त्याचे काम पोहोचले आहे आणि मोठमोठ्या कंपन्यांकडून त्याला आर्थिक मदत मिळते आहे.

Greata or Boyan InMarathi

इकडे ग्रेटा मात्र गोंगाट करून जगाचे  लक्ष वेधून घेत असली तरी लोकांना बॉयन स्लॅट विषयी माहिती असणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?