या मुंबईकर स्त्रीने अशी शक्कल लढवलीय की वीजबिल झटक्यात कमी झालंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

वीज दिवसेंदिवस महाग होत चालली आहे आणि विजेच्या उपकरणांशिवाय तर आपले पान देखील हलू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. सामान्य माणसाने महिन्याचे वीजबील बघितले तर एसीत देखील घाम फुटतो.

पण आपल्या हातात वीज वाचवण्यापलीकडे काहीच नसते. खरं तर सौर ऊर्जेसारखा पर्यावरणपूरक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पण फार कमी लोक ह्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करतात.

 

solar-power-inmarathi02
eqmagpro.com

आता वेळ आली आहे की आपण पारंपरिक नैसर्गिक संसाधनांवरचा भार हलका करून पर्यावरणपूरक इंधनाचा विचार केला पाहिजे. भारतात पावसाचे काही महिने सोडल्यास प्रचंड प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध असते आणि आपण ह्या शक्तीचा अमर्याद स्रोत वाया घालवतो आहोत.

अर्थात लोकांमध्ये हळूहळू सौर ऊर्जेविषयी जागरूकता वाढत आहे आणि लोक सोलर हिटर, सोलर बल्ब, सोलर पम्पसारख्या पर्यायांकडे वळू लागले आहेत.

मुंबईच्या फिजियोथेरपीस्ट आणि पिलाटीज ट्रेनर डॉक्टर रीमा ल्युईस ह्यांनी मात्र सौरऊर्जेकडे वळून त्यांचे विजेवरील अवलंबित्व खूप कमी केले आहे.

त्यांनी त्यांच्या वाशीच्या दुमजली घरात पर्यावरणपूरक बदल करून घेतले आहेत जे फारच प्रशंसनीय आहेत.

रीमा ह्यांचा जन्म बंगळुरू मध्ये झाला आणि तिथेच त्यांचे बालपण गेले. त्या नेहमीच निसर्गाशी जवळीक साधून राहिल्या आहेत आणि बागकाम करणे, फुलांची झाडे लावून त्यांची देखभाल करणे, झाडे लावणे त्या कायमच करत आल्या आहेत. झाडांची त्यांना खूप आवड आहे.

 

reema lewis inmarathi
The Better India

लग्नानंतर रीमा मुंबईला आल्या आणि तिथे आल्यावर त्यांनी त्यांची डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरु केली. त्यांच्या घरात त्यांनी भरपूर झाडे लावून संपूर्ण घरच हिरवेगार करून टाकले. ह्याखेरीज त्यांनी त्यांच्या घरात अनेक पर्यावरणपूरक बदल घडवून आणले.

द बेटर इंडियाशी बोलताना डॉक्टर रीमा म्हणाल्या की , “२०१० साली माझ्या मुलाच्या वेळेला मी गरोदर असतानाच मी व माझ्या पतींनी घरात सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

आम्ही नुकतेच नवीन घर घेतले होते आणि आमच्या बाळासाठी एका इको फ्रेंडली घरापेक्षा दुसरे कुठले चांगले गिफ्ट कुठलेच नसेल असा आम्ही विचार केला. पर्यावरणपूरक घर तयार करायचे म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागणार होत्या.

सर्वप्रथम आम्ही घरात गरम पाण्यासाठी सोलर वॉटर हिटर बसवून घेतले. घरातील बाथरूम आणि स्वयंपाक घरातील सगळे नळ सोलर वॉटर सिस्टीमला जोडून घेतले.

सोलर वॉटर हिटरद्वारे गरम झालेले पाणी आम्ही आंघोळीसाठी वापरतो तसेच भाज्या धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी देखील वापरतो. मला ठाम विश्वास आहे की ही पृथ्वी आपल्या सगळ्या गरजा नैसर्गिकरित्या पूर्ण करू शकते.

पण आपली हाव त्याही पुढची असल्याने ती हाव ही पृथ्वी पूर्ण करू शकत नाही. आपल्या पुढच्या पिढीला चांगले वातावरण मिळावे ह्यासाठी प्रत्येकानेच पर्यावरण व निसर्गाचे संवर्धन करून आपल्या पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे.”

 

reema lewis 1 inmarathi
www.thebetterindia.com

चार वर्षांपूर्वी रीमा ह्यांच्या घरात त्यांनी व त्यांच्या पतीने सोलर पीव्ही पॅनेल्स बसवून घेतले आणि आज त्यांचे संपूर्ण घर सौरउर्जेवर चालते आहे. सोलर पॅनेल्स बसवुन घ्यायच्या आधी त्यांना दहा हजार रुपये इतके वीजबिल भरावे लागत होते.

उन्हाळ्यात तर त्याहीपेक्षा जास्त बिल येत असे. पण आज त्यांच्या घरात ५ किलोवॅटची सोलर सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवर घरातली बहुतांश उपकरणे चालतात.

डॉक्टर रीमा म्हणतात की, “मॅजेंटा पावर ह्यांच्या साहाय्याने आम्ही हे सोलर पॅनेल्स बसवून घेतले. मॅजेंटा पावर हे रीन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स व इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगची सुविधा देतात.

त्यांच्या साहाय्याने आम्ही घरी सोलर पॅनेल्स बसवून घेतले आणि तेव्हापासून आमचे वीजबिल जास्तीत जास्त हजार रुपये येते. कधी कधी तर आमचे वीजबिल फक्त तीनशे रुपये सुद्धा येते.

जेव्हा ढगाळ वातावरण नसते तेव्हा मला घरात विजेचा वापर अजिबातच करावा लागत नाही. घरातील सगळे लाईट ,पंखे, एसी, फ्रिज आणि अगदी माझ्या घरातच असलेले माझे क्लिनिक सुद्धा सोलर पावरवर चालतात.

 

reema lewis 2 inmarathi
The Better India

अर्थात हे सगळे पॅनेल्स वगैरे बसवून घ्यायला आम्हाला अडीच लाख रुपयांचा खर्च आला. पण तेवढं बिल आपण काही वर्षात भरतोच. आम्ही हा सगळं खर्च काय तो एकदाच केला आणि आता आम्हाला आयुष्यभर सौर ऊर्जा मोफत वापरायला मिळते आहे.”

त्यांनी त्यांची पेट्रोलवर चालणारी गाडी सुद्धा विकून टाकली आणि इलेक्ट्रिक कार घेतली. त्यांना दर महिना नऊ हजार रुपये इतका पेट्रोलचा खर्च येत असे. आज त्या केवळ पाचशे रुपयांत महिनाभर गाडी चालवतात.

त्यांनी त्यांच्या पार्किंगच्या जागेत एक EV चार्जिंग युनिट बसवून घेतले आहे आणि हे युनिट सुद्धा त्यांच्या घरातल्या सोलर पॅनेल्सला जोडलेले आहे. म्हणजेच थोडक्यात त्यांची गाडी सुद्धा सौरऊर्जेवर चालते.

त्या Mahindra e2o ही गाडी वापरतात आणि शहरात त्या ह्याच गाडीने प्रवास करतात. एकावेळी चार्ज केल्यानंतर ही गाडी सुमारे १०० किमी इतके अंतर चालू शकते आणि गाडीची बॅटरी शंभर टक्के चार्ज करण्यासाठी कमीतकमी सहा तास लागतात.

सौरऊर्जेच्या वापराबरोबरच त्या त्यांच्या घरातल्या कचऱ्यापासून नैसर्गिक खत तयार करत. कंपोस्ट आणि गांडूळखत त्या तयार करतात आणि त्या खताचा वापर त्या त्यांच्या टेरेस गार्डनच्या झाडांसाठी करतात.

त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये पुदिना,पपई, भोपळा, काकडी अश्या भाज्या तर आहेतच शिवाय काही फुलझाडे व इतर काही झाडे आहेत. त्यांच्या कुटुंबाला भाज्या व फळे खाण्याची आवड असल्याने त्यांच्या घरी भरपूर ओला कचरा तयार होतो.

त्यापासून त्या हे खत बनवतात जे खत त्यांच्याच झाडांना मिळते. गांडूळ खतासाठी त्या रेड रिगलर नावाची गांडूळाची प्रजाती वापरतात. ह्या प्रजातीची गांडूळे कचऱ्याचे जलद विघटन करतात.

तसेच त्यांच्या घरी जो सुका कचरा तयार होतो तो सुद्धा रिसायकल करण्यात येतो. रिसायकल होऊ शकणारे प्लास्टिक त्या प्लास्टिक रिसायकल करणाऱ्या संस्थांना देतात.

 

reema lewis 3 inmarathi
The Better India

जे प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही ते त्या एका एनजीओकडे पाठवतात. हे एनजीओ तेच प्लास्टिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या पॅकिंगसाठी उपलब्ध करून देतात.

रीमा म्हणतात की ,”झीरो वेस्ट हेच माझे ध्येय आहे. आणि माझा विश्वास आहे की ठरवलं तर प्रत्येक व्यक्ती हे करू शकते. अनेक लोकांना इको फ्रेंडली मार्ग पत्करणे जिकिरीचे आणि वेळखाऊ प्रकरण वाटते.

मी एक आई आहे, एक व्यावसायिक आहे तसेच माझ्या घराची जबाबदारी देखील माझ्यावर आहे.ह्या सगळ्यातून मी हे मॅनेज करू शकते तर सगळीच माणसे करू शकतात.

दिवसभरातून फक्त १५ मिनिटे मी ह्या सगळ्यासाठी घालवते ज्याने माझे घर पर्यावरणपूरक आणि हिरवेगार राहते. इको फ्रेंडली जीवनपद्धतीचा अवलंब करण्यास फार वेळ द्यावा लागत नाही.

 

eco friendly inmarathi
Association for Psychological Science

प्रत्येक कुटुंब इको फ्रेंडली जीवनशैलीचा अवलंब करू शकते, मग ते सौरऊर्जा वापरणे असो की नैसर्गिक खत तयार करणे असो. छोट्या छोट्या सवयींतून तुम्ही मोठा बदल घडवून आणू शकता.

बाजारात जाताना एक कापडी पिशवी बरोबर बाळगली तर प्लास्टिकचा वापर कमी करण्यात तुम्ही हातभार लावू शकता. मी तर दूध सुद्धा थेट डेअरीमधून घेते म्हणजे ते प्लास्टिक सुद्धा घरात येत नाही.”

डॉक्टर रीमा जे करतात ते काही फार कठीण नाही. आपण सगळे सुद्धा ते नक्कीच करू शकतो आणि पर्यावरणाचा रक्षणासाठी हातभार लावू शकतो. त्यांचा मार्ग आपण स्वीकारला तर पुढच्या पिढीला आपण एका सुंदर हिरव्यागार पृथ्वीचे दर्शन घडवू शकतो.

 

ENVIRONMENT INMARATHI
Zee News

ह्यासह आपण आज इको फ्रेंडली जीवनपद्धती स्वीकारून आपले रोजचे खर्च कमी करू शकतो हा तर किती मोठा फायदा आहे!

आपण सर्वांनीच पर्यावरणपूरक जीवनपद्धतीचा स्वीकार करणे हे आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी व आपल्या पुढच्या पिढीच्या चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहे. नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “या मुंबईकर स्त्रीने अशी शक्कल लढवलीय की वीजबिल झटक्यात कमी झालंय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?