सौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले कल्पनेपलीकडील काही कठोर नियम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सौदी अरेबिया हा देश एक इस्लामी देश आहे. सौदी अरेबिया देशातील कायदे किती कडक आहेत, हे आपल्यातील बहुतेकांना माहित असतीलच. येथे राहणाऱ्या लोकांवर विविध पद्धतीची बंधने लादण्यात आलेली आहेत. तुम्ही जरी तिथे कामासाठी गेलात, तरीदेखील तुम्हाला त्यांचे हे कायदे आणि नियम पाळावेच लागतात.
खासकरून, या देशामध्ये स्त्रियांवर खूप जास्त बंधने लादण्यात आलेली आहेत.
त्यांची ही बंधने इतकी जाचक आहेत की, आपल्या देशातील स्त्रियांना चांगल्या प्रकारची वागणूक आणि मान मिळतो असे म्हणावे लागेल.नुकतेच त्यांमधील एक बंधन हटवण्यात आलेले आहे.
पूर्वी सौदी अरेबिया येथील स्त्रियांना गाडी चालवण्याची परवानगी नव्हती, पण आता ही बंदी हटवण्यात आलेली आहे. आता तेथील स्त्रिया देखील गाडी चालवू शकतात. तरीदेखील अजून काही असे विचित्र कायदे तिथे आहेत, जे आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहेत.

चला तर मग जाणून घेऊया की, सौदी अरेबियातील स्त्रियांना अजून कोणकोणत्या बंधनांमध्ये तेथील सरकारने अडकवले आहे.
१. प्रत्येक स्त्रिच्यामागे एकतरी कायदेशीर पुरुष व्यक्ती हवी.
सौदी अरेबियामध्ये जर एखाद्या स्त्रिच्यामागे तिचे पालनपोषण करणारा कायदेशीर पुरुष व्यक्ती नसेल, तर अश्या स्त्रीकडे लोक वाईट नजरेने पाहतात. तसेच, येथे स्त्रियांना बँकेचे खाते खोलायचे असल्यास, पासपोर्ट किंवा व्हिसा मिळवण्यासाठी एखाद्या पुरुषाच्या परवानगीची आवश्यकता असते.

२. स्त्रियांना त्यांची सुंदरता दर्शवेल, असे कपडे घालण्याची परवानगी नाही.
येथील स्त्रियांना मग त्या स्थानिक असो वा परदेशी सगळ्यांना नेहमी बुरखा घालूनच राहावे लागते. चेहरा नेहमी झाकून ठेवला नाही तरी चालतो. पण त्या आपली किती त्वचा दाखवू शकतात आणि किती मेकअप करू शकतात, यावर कडक नियम आहेत.

३. पुरुषांबरोबर संवाद साधण्यावर देखील मर्यादा आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे, आता येथील स्त्रियांना गाडी चालण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. पण अजून हा कायदा अंमलात आणायचा बाकी आहे – कारण येथील पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना महिला चालकाशी कसा संवाद साधायचा हे माहित नाही.
तसेच, येथील काही बँकेमध्ये आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी यांना आत – बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत.

४. महिलांना जिम आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्याची परवानगी नाही.
सार्वजनिक ठिकाणांवरील स्विमिंग पूल आणि जिममध्ये जाण्याची स्त्रियांना परवानगी नाही. अरलेन गेटझ यांच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांना या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.
कारण येथे येणारे पुरुष हे स्विमसूट्समध्ये, तसेच कमी कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे स्त्रियांना विचित्र वाटेल, असे गृहीत धरून ही बंदी लावण्यात आलेली आहे.

५. देशात स्त्रिया आपल्या मर्जीने खेळाचा सराव करू शकत नाही.
सौदी अरेबियाने दोन महिला क्रिडापटूंना लंडन ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली होती. पण स्त्रियांना देशामध्ये कुठेही स्वतःच्या मर्जीने खेळाचा सराव करण्याची अनुमती नाही. येथील स्थानिक धर्मगुरूंना जागतिक स्तरावर स्त्रियांनी असे खेळ खेळलेले आवडत नाही.
तसेच, अश्या जागतिक स्तरावर खेळणाऱ्या स्त्रियांना ते वेश्या म्हणून संबोधतात. असे करण्यासाठी स्त्रियांना त्यांचे पालनपोषण करणाऱ्या पुरुषांची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच, खेळ खेळताना देखील प्रत्येकवेळी डोके झाकून ठेवणे गरजेचे आहे.

६. दफनभूमीमध्ये स्त्रियांना जाण्यास परवानगी नाही.
जर आपण एक स्त्री असाल आणि जर तुम्हाला तुमच्या दफनभूमीमधील नातेवाईकांना भेट द्यायची इच्छा असेल, तरीदेखील तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. व्हॅनिटी फेअरच्या ए गर्ल्स गाइड टू सौदी अरेबीच्या मते, या दफनभूमीमध्ये स्त्रियांना मृत्युनंतरच नेले जाते.

७. तुम्ही येथे विकत घेतलेले कपडे घालून पाहू शकत नाही.
जर तुम्ही सौदी अरेबियात एक मस्तपैकी ड्रेस खरेदी केलात आणि तो ड्रेस तुमच्यावर कसा वाटतोय, हे पाहण्यासाठी जर तुम्ही तेथे ट्रायल रूम शोधाल, तर तुम्हाला ते मिळणार नाहीत.

हे सर्व वाचूण क्षणभर आपण एकविसाव्या शतकात आहोत की मध्ययुगीन काळात – असा प्रश्न पडतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
तो देश अजूनही पुरुषांच्या मानसिक गुलामीतून निघालेला नाही