तथाकथित “पुरुषसत्ताक” भारतात स्त्रियांनी केलेली प्रगती जगातल्या कुठल्याच देशाला जमलेली नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
जगात बहुतांश देशात पुरुषसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे जिथे स्त्रियांना कमी लेखले जाते. फक्त चूल आणि मूल यापुरते स्त्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवले जाते. भारत देशसुद्धा याला अपवाद नव्हता. भारतात नेहमीच पुरुषांच्या मानाने स्त्रियांचे स्थान दुय्यम राहिले होते, किंबहुना ते तसे राहावे म्हणून पुरुषांनी प्रयत्न केले होते.
बाहेरची कामे पुरुषांनी करावीत आणि घरातील चार भिंतीच्या आतली कामे स्त्रियांनी करावीत असा जणू अलिखित नियमच बनला होता.
पण म्हणतात ना, स्प्रिंग जेवढी दाबून ठेवाल, तेवढीच ती जास्त जोरात उफाळून वर येते. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा स्त्रियांनी अशीच समानतेची क्रांती केली आणि त्यांच्यातले गुण सर्वांनाच समजले.
स्त्रियांनी दाखवून दिले की त्या कुठल्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत. शिक्षणक्षेत्र असो की व्यापार, मजुरी असो की विज्ञान तंत्रज्ञान, प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. त्यापेक्षा त्यांचे एक पाऊल पुढेच आहे असे म्हंटले तर जास्त समर्पक असेल.

एवढं सगळं मिळवूनही एक क्षेत्र मात्र असं होतं ज्यात पुरुषांची मक्तेदारी अबाधित राहिली होती. ते म्हणजे वाहन चालवणे. कारण, सर्वांचेच असे मत होते की, स्त्रियांच्या शारीरिक क्षमतांच्या मर्यादेमुळे त्यांना या क्षेत्रात काही करता येणार नाही. चालकांच्या अनियमित वेळा, अफाट श्रम आणि सदैव एकाग्रता राखणे या बाबी स्त्रियांना जमणार नाहीत.
पण ऐकतील त्या स्त्रिया कसल्या? त्यांनी दाखवुनच दिले की या कामातही त्या अजिबात मागे नाहीत. त्याचा परीणाम म्हणून आज आपण स्त्रियांना दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, मालवाहतूक एवढंच काय रेल्वे सुद्धा चालवताना पाहत आहोत. हे इतक्यावरच थांबत नाही, स्त्रिया जमिनीवरच नाही तर अंतराळात सुद्धा भरारी मारून आल्याचे आपण बघतोय. मग अर्थातच विमान चालवण्यात तरी का मागे असतील?
तर आज आपण याच विषयावर भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या एका गोष्टीची चर्चा करणार आहोत… ती म्हणजे भारतीय महिला पायलटांची जगाच्या तुलनेत संख्या!
हाती आलेल्या रिपोर्ट नुसार, सद्यस्थितीत भारताने जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा महिला पायलट भरती अधिक प्रमाणात केली आहे. जगाची महिला विमान चालकांची सरासरी ५% टक्के आहे तर भारताची त्याच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १२% आहे. आहे ना गौरवास्पद गोष्ट?

पुरुषांची एकहाती सत्ता असलेल्या या क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरकाव करून घेणे फार कठीण काम. जेट एअरवेजच्या सिनिअर पायलट श्वेता सिंग या स्पष्टपणे म्हणतात,
“हे पुरुषी वर्चस्व मोडीत काढणे आमच्यासाठी खूप मोठे आव्हान होते.”
या हवाई क्षेत्रातील एक चांगली बाब म्हणजे इतर क्षेत्राप्रमाणे यात लिंगभेदावर पगार ठरत नाही. केंद्रीय करारानुसार, पायलटला त्याचे पेमेंट हे वरीष्ठता आणि किती तास काम केले यावर ठरवले जाते. त्यामुळेच स्त्री असो की पुरुष, जितका वेळ काम केले तितका पगार उचलता येतो. भेदभावाला जागाच नाही.
महिलांना पूर्णवेळ काम करता यावे म्हणून अनेक सवलतीही दिल्या गेल्या आहेत. प्रत्येक विमानतळावर महिला विमान चालकांच्या मुलांसाठी पाळणाघरे स्थापन केलेली आहेत. तसेच, महिला चालक गर्भवती असताना त्यांना विमान उडवण्याऐवजी ऑफिस मध्ये बसूनही त्याच पगारावर काम करता येते.

एक मुद्दा नेहमी मांडला जातो की, या क्षेत्रात काम करण्याच्या वेळा या अत्यंत विषम असतात. चोवीस तासांपैकी सकाळ आहे की रात्र हे न पाहता काम करावे लागते. त्यामुळे अर्थातच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
या मुद्द्याचे खंडन करताना ‘पायलट श्वेता सिंग’ म्हणतात की,
“ही अत्यंत चुकीची समजूत आहे. इतर क्षेत्रापेक्षा महिला या क्षेत्रात अतिशय सुरक्षित असून याला सर्वात ‘सुरक्षित नौकरी’ असे मानण्यास हरकत नाही”
याची खात्री तेव्हा पटते जेव्हा महिलांना घरापर्यंत सोडण्यासाठी अथवा आणण्यासाठी सशस्त्र सुरक्षा जवान तैनात केलेले दिसून येतात.
आधीच्या दशकापेक्षा या दशकात हवाई क्षेत्रात करिअर करणे हे अधिक सोपे झालेले आहे असे इंडिगो एअरलाईन्स च्या पायलट रूपींदर कौर यांचे म्हणणे आहे. हा अभ्यासक्रम ज्या ‘बॉम्बे फ्लाईंग क्लब’ या संस्थेत शिकवला जातो तिथले महिलांचे प्रवेश अर्ज गेल्या पाच वर्षात १०% वरून तब्बल २५% पर्यंत वाढले आहेत. यावरून महिलांना हवाई क्षेत्रात करिअर करण्यात किती उत्सुकता आणि इच्छा आहे याचा सहज अंदाज येऊ शकेल.

इथे प्रवेश मिळवणे सोपे नाहीच परंतु प्रवेश मिळवल्यानंतर इथे टिकून राहणेही अत्यंत कठिण काम आहे हे काही महिला पायलट सांगतात.
५० वर्षे वय असलेल्या एअर इंडियाच्या ‘कॅप्टन क्षमता बाजपेयी’ दोन दशकांपासून निरंतर सेवा बजावत आहेत. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को अश्या सर्वात लांब रस्त्यावर पूर्ण विमानात महिला कर्मचारी घेऊन प्रवास करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
ज्यावेळी क्षमता बाजपेयींनी विमान चालक बनण्याचा निर्णय घेतला तो काळ फार वेगळा होता.
त्यांना घरातून आणि समाजातूनही कडाडून विरोध झाला पण त्या झुकल्या नाहीत. त्यांनी एक यशस्वी पायलट बनून इतर महिलांना दिशा दाखवण्याचे काम केले.
बिहार मधील ‘फ्लाईंग क्लब’ च्या विद्यार्थी असणाऱ्या ‘निवेदिता भसीन’ यांनी जेव्हा पायलट प्रशिक्षणासाठी १९८७ मध्ये प्रवेश घेतला, तेव्हा त्या बॅच मधील एकमेव महिला होत्या. त्यांना बाहेरची व्यक्ती असल्यासारखी वागणूक दिली गेली होती. जेव्हा त्या शिकत होत्या तेव्हा त्या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या.

तरीही त्यांना अत्यंत खडतर प्रशिक्षण घ्यावे लागले. दुर्दैवाने त्यावेळी या क्षेत्रात पुरुषांचा पगडा असल्याने महिलांच्या मातृत्व रजेविषयी कुठले नियम बनवलेच गेले नव्हते.
ही दोन उदाहरणे तसेच आणखीही काही उदाहरणे जसे की, “कॅप्टन जसविंदर कौर, कॅप्टन अनुश्री वर्मा इत्यादी आजकालच्या नवीन प्रशिक्षणार्थींसमोरची आदर्श उदाहरणे आहेत.” यांनी भारतीय महिलांमध्ये या क्षेत्रात येण्याची चेतना जागवली आणि त्याचे परिणाम आपण बघतच आहोत.
महिला जिथे तडजोड न करता पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतील अश्या हवाई क्षेत्रासारख्या अनेक करिअर क्षेत्रांची आज भारताला गरज आहे.
सध्यातरी जगाच्या मानाने आपण भारतीय विमान क्षेत्रात तरी ‘महिला विमान चालक’ या संख्येत फार पुढे आहोत याचा आनंद मानुयात.
आणि अश्या अनेक ठिकाणी महिलांना बरोबरीची वागणूक देऊन भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करूयात…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.