' गबाळी बाई की नीटनेटकी बाई? : बायकांचे कपडे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती – InMarathi

गबाळी बाई की नीटनेटकी बाई? : बायकांचे कपडे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका : प्राजक्ता काणेगावकर

===

विधान १ – बायकांच्या कपड्यांवरून त्यांचे चारित्र्य आणि वर्तणूक ठरवू नये
विधान २ – बायकांनी गबाळे राहू नये

वरील दोन विधाने ही सकृतदर्शनी परस्परविरोधी वाटू शकतात. पण जरा विचार केला तर या दोन विधानांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे हे लक्षात येईल. या दोन विधानाच्या भोवती तुमच्या आमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा संकल्पना निगडित आहे हे नक्की.

बायंकाचे कपडे हा जागतिक चर्चेचा विषय आहे. यावर अनंत काळ परिसंवाद होऊ शकतात. तेही कुठल्याही निष्कर्षाला न येता. बायकांनी स्लिव्हलेस घालू नये इथपासून पूर्ण अंगभर असलेली बर्कीनी (बुरखा आणि बिकिनी याचे कॉम्बिनेशन) घालावी इथून या सगळ्या चर्चेची सुरुवात होते. मग –

साडीच कशी चांगली, अंगभर कपडे असावेत, गुढघ्याच्या खाली येणारे कपडे हवेत, क्लीवेज दिसणारे,पाठ उघडी टाकणारे कपडे नकोत, ड्रेस कोड इत्यादी बरेच विषय यामध्ये येतात. मग बायकांनी असे कपडे घातले की पुरुष चाळवतात इत्यादी.

 

photos.filmibeat.

 

यात आम्ही पुरुषांना शिकवू बाईचा आदर करायला असे कुठेच येत नाही हा मुद्दा वेगळा. अनेक वेळा चर्चेत असलेला विषय आहे हा. कपड्यांचा आणि वागण्याचा फारसा काही संबंध नसावा हे आसाराम बापू इत्यादी अंगभर कफनीधारी बुवा आणि नखशिखांत दागिने घालणाऱ्या राधे मा सारख्या लोकांनी सिद्ध केलेच आहे. त्यामुळे विधान एक मला मान्य आहे.

आता प्रश्न येतो विधान क्रमांक दोनचा कारण जसे विधान एक मला मान्य आहे तसेच मी विधान दोनवर ही ठाम आहे.

आपल्याकडे पोषाखी वृत्तीवर टीका करणारे अनेक सुविचार, अभंग, गीते आहेत. वरवरचे सौन्दर्य बघू नये, मन चंगा तो जग चंगा वगैरे गोष्टींवर आपला विश्वास असतो. तो बरोबरही आहे.

पण म्हणून सतत वेष बावळा ठेवून आपण हिंडतो का हा खरा प्रश्न आहे. वेष बावळा ही तुमची आयडेंटिटी असेल तर वेष बघू नये हे मान्य आहे. पण “मी हुशार आहे हो, पण मी बावळा राहीन” हे मात्र जरा चुकतंय.

बरं त्यातून तुम्ही सतत बावळे नसता. लग्न समारंभाला जाताना तुम्ही छान नटून थटून जाता, मैत्रिणींबरोबर जाताना आवर्जून सलवार कुर्ता, जीन्स शॉर्ट टॉप घालून जाता, गॉगल, पर्सेस शूज, चप्पल ऍक्सेसरीजची काळजी घेता आणि मग बावळेपणा करत असाल तर तुम्हाला बावळा वेष आणि टापटीप राहणे यातला फरक कळतोय हे निश्चित आहे.

मग सोयीशास्त्राप्रमाणे “आज आत्ता मी बावळट आहे हां कपड्यांच्या बाबतीत, पण मी हुशार आहे!” असे कसे म्हणून चालेल?

सध्याच्या जगात अंतरी नाना कळा असल्या तरी प्रेझेंटेबल असलेच पाहिजे, हा नियम आहे. तुम्ही कितीही नाकारलेत तरी तुमचे कपडे आणि राहणीमान यांचा तुमच्याबद्दल प्रथमदर्शनी मत बनवण्यात खूप मोठा वाटा असतो.

म्हणून तुम्ही जिमीचूचे किंवा लुबोटानचे शूज घातले पाहिजेत आणि तुमच्याकडे हायडिझाईनचीच पर्स पाहिजे असे नाही. ती पोषाखी वृत्ती झाली. पण म्हणून स्लीपर घालणेही चूक आहे.

आता यावर कुणी असेही म्हणेल की बायकांनी सतत प्रेझेंटेबलच असले पाहिजे का? याला इंग्लिश मध्ये डॉल अप असे म्हणतात, म्हणजे आपल्या माय मराठीत शोभेची बाहुली. तर उत्तर आहे – मुळीच नाही.

तुमच्या आमच्या घरात बायका ह्या उत्तम शिक्षण घेतलेल्या, कर्तृत्व असलेल्या, नोकरी करणाऱ्या, जग पाहिलेल्या अशा असतात. शोभेची बाहुली नक्की नसतात.

बायकांकडून फक्त हीच अपेक्षा ठेवणारा घरातला पुरुषवर्ग असेल तर त्याला ठणकावून “हे चालणार नाही” असे सांगणाऱ्या असतात.

जो पुरुष सुज्ञ आहे त्याला “आपली बायको/गर्लफ्रेंड/फियान्सी ही शोभेची बाहुली नाही” हे माहित असते. त्यामुळे “छान राहा” असे म्हणणारा नवरा तुमची शोभेची बाहुली करायलाच टपलाय असे सरसकट विधान करणे हे अन्यायकारक आहे. याची दुसरी बाजू सुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे.

साधी गोष्ट आहे. उद्या तुमचा नवरा/बॉयफ्रेंड/ फियॉन्से जर घरी कापून केलेली जीन्सची चतकोर किंवा जॉकीच्या बॉक्सर शॉर्ट्स किंवा चट्टेरी पट्टेरी पायजमा आणि गंजी मध्ये हमरस्त्यावर गेलेला तुम्हाला चालणार आहे का? (इरेला पेटून हो म्हणू नका. मुद्दा विचारत घ्या.)

मग “तुम्ही नाईटीमध्ये बाहेर जाऊ नये”, अशी त्याने अपेक्षा केली तर लगेच तो तुम्हाला “शोभेची बाहुली” करतोय हा निष्कर्ष कुठून येतो? एखाद्या दिवशी छान तयार झाल्यावर तुम्ही त्याच्याकडे प्रतिक्रियेच्या अपेक्षेने बघत असाल तर तिथे तुमची अस्मिता, स्वाभिमान इत्यादी इत्यादी मध्ये येत नाही का? मग “ते प्रेम झाले हो” असे पण समर्थन करेल कुणी. असो बापडे. आपल्या सोयीप्रमाणे संकल्पना मोडणे नाहीये का हे?

 

kangana ranaut queen inmarathi

 

एक इंटरेस्टिंग माहिती सांगते. संपूर्ण पाश्चिमात्य जगात बायका पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतात. स्वतःच्या हक्कांबद्दल कमालीच्या जागरूक असतात. पुरुषांच्या बरोबरीने सिगारेट ओढतात. सध्या बायकांनी सिगारेट ओढण्यात पुरुषांनाही मागे टाकले आहे. आपल्याकडेही हे लक्षणीय वाढते प्रमाण आहे.

 

anushka-ciggarate-smoking-inmarathi

 

यावर बरेच संशोधनही झाले आहे. त्यावर एक मजेची कंमेंट अशी होती की

“आता कुठे बायकांनी स्मोक करायला सुरुवात केली आहे, त्या आता पुरुषांची बरोबरी करून त्यांना मागे टाकतील, तेव्हा त्या सिगारेट ओढायचे बंद करतील…!”

गम्मत अशी आहे की एरवी सगळ्या बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्य मानणारे आपण, सिगारेट ओढणारी मुलगी किंवा बाई दिसली की मात्र जजमेंटल होतो! यात मी सिगारेट ओढायचे समर्थन करत नाहीये.

पण एकीकडे मी “स्वतःचे स्वातंत्र्य” आणि “स्वयंनिर्णय” याबद्दल भांडणार, कमालीची जागरूक असणार, “स्वतःचे अस्तित्व” यासाठी झगडणार आणि दुसरीकडे “तो” सिगारेट ओढतो म्हणून “मी” पण ओढणार – ह्यात विरोधाभास नाही जाणवत? तुम्ही सिगारेट ओढणे किंवा न ओढणे हे तुमच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

“पुरुष ओढतात, मग मी पण स्वतःला सिद्ध करायला ओढणार” यावर नाही. एक्सटर्नल गोष्टींवर नाही. यात सिगारेट हे उदाहरण झाले. पण पुरुषांशी कॉम्पिटिशन म्हणजे स्त्रीमुक्ती अशी जर संकल्पना असेल तर ती मुळात चूक आहे हे सांगायचा हा प्रयत्न आहे. त्याच लॉजिकने घरातला पुरुष गबाळा आहे ना मग मी पण गबाळेपणा करणार हे विधान घ्यावे.

मला आणखी एक बेसिक प्रश्न नेहमी पडतो.

मुलीच्या किंवा बाईच्या कपड्यावरून तिला जोखू नये, यात दुमत नाही. पण याचा अर्थ “कपड्यांचं भान असू नये” असा नाही…!

 

kareena-skirt-inmarathi
mrpopat.in

 

शॉर्ट स्कर्ट घालणे चूक नाही. अजिबात नाही. पण तो घातल्यावर मी फतकल मारून वाट्टेल तशी बसेन हे चूक आहे…! बघणारा किंवा बघणारी तुमच्या स्कर्टकडे बघत नसून, तुम्ही त्या स्कर्टचा आब कसा राखताय याकडे जास्त बघत असतो/असते.

लो कट घालणे चूक नाही. पण लो कट घालून मुद्दाम पुढे झुकून बसणे चूक आहे. हाच नियम मुद्दाम बटणं उघडी टाकून बावन्न इंच दाखवत फिरणाऱ्या मुलांनाही लागू पडतो. या गोष्टी अनावधानाने होऊ शकतात. ते ठीक आहे.

पण कळून सवरून असे होणे आणि मग आरडाओरडा करणे हे चूक आहे. हाच न्याय सकाळच्या उन्हात आतमध्ये परकर किंवा सलवार न घालता पारदर्शक दिसणाऱ्या नाइटीज घालून हिंडणाऱ्या बायकांनाही तितकाच लागू पडतो.

फॅशन आणि स्टाईल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कर्स्टी क्लेमेंट्स ही ऑस्ट्रेलिया व्होग या नियतकालिकाची संपादक होती. रिसेप्शन पासून सुरुवात करून ती नंतर संपादक झाली. तिने तिच्या पुस्तकात सांगितलेला एक किस्सा आहे.

ती पॅरिसमध्ये असताना एकदा एक मुलगा तिचा पाठलाग करत होता. बराच वेळ तिच्या मागे होता. एका चौकात त्याने तिला गाठले. ती घाबरली. त्यावर तो तिला म्हणाला –

“तुम्हाला फार छान स्टाईल सेन्स आहे. तुम्ही फॅशनेबल आहात पण त्याहीपलीकडे जाऊन तुमची स्वतःची एक स्टाईल आहे. ती तुमच्या मेकअप मधून, कपड्यांच्या रंगसंगतीमधून कळतेय. तुम्ही माझ्याबरोबर एक ग्लास शॅम्पेन घ्याल? इन युवर ऑनर”.

कर्स्टीला त्याची मजा वाटली. त्यानंतर तिने लिहिले आहे की स्टाईल ही स्वतःची असते. फॅशन बदलते, पण स्टाईल बदलत नाही…! त्या मुलाबरोबर मी शॅम्पेन घेतली का? “ऑफ कोर्स आय डिड!”.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःला काय चांगले दिसते आणि काय नाही याची बऱ्यापैकी जाणीव असते. काही काही कपडे घातले की आपले आपल्यालाच छान वाटते. काही कपडे घातले की आपल्याला माहित असते की “आपण आज खूप छान दिसत नाही आहोत, पण चालून जाईल!”. यामध्ये सगळे रंग सगळ्या फॅशन्स येतात.

तुमची स्वतःची स्टाईल तुम्हाला सापडणे गरजेचे आहे. जरा या दिशेने पण विचार करा.

मला स्वतःला पिस्ता कलर किंवा शेवाळी रंग चांगला दिसत नाही, हे मलाच कळत असते. केवळ शेवाळी किंवा खाकी रंगाची फॅशन आहे म्हणून तो घातलाच पाहिजे असे नाही. इथे आपण स्वतंत्र विचार का करत नाही?

लेटेस्ट ट्रेंड माहित असणे ठीक आहे. पण त्या ट्रेंड प्रमाणेच कपडे घातले पाहिजेत असे नाही. तो ट्रेंड वळवून वाकवून स्वतःप्रमाणे फिरवत येतो. आणि जर तुम्हाला कुणी काही विचारले, तर जरूर सांगा “ही माझी स्टाईल आहे…!”

बायकांनी कपडे काय घालावेत हा त्यांच्यापुरता आणि त्यांचाच असलेला चॉईस इथे येतो. गाऊन घालून बाहेर पडणे हे गबाळे आहे हे कळत असताना ते माझे स्टाईल स्टेटमेंट आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर विषयच संपला. माझ्या माहितीत अनेक बायका आहेत ज्यांना साडी नेसायला आवडत नाही.

कितीतरी समारंभात त्या मस्त जरीचा किंवा भारीतला सलवार सूट घालून येतात. त्यांना पाहून एकीकडे आपल्याला हेवा वाटत असतो आणि एकीकडे “काय बाई आजच्या दिवशी तरी साडी नेसून यायचे ना हिने…” अशी टिपण्णी करतो. हे जरा गमतीशीर नाहीये का?

जर तुम्हाला काय कपडे घालायचेत हे स्वातंत्र्य हवे असेल तर मग समोरच्यालाही तुमच्या कपड्यांवर बोलायचे स्वातंत्र्य आहे. What applies to you applies to me इतकी साधी गोष्ट आहे ही.

पाश्चिमात्य आणि आपली फॅशन अशी एक आपल्याकडे निष्कारण स्पर्धा चालते.

जगभर भारतीय पद्धतीचे कपडे, स्टाईल्स आणि रंग यांचे प्रचंड कौतुक होत असते. “वेस्टर्न घालू नये” असे माझे म्हणणे अजिबात नाहीये. तिथल्या फॅशन्स आपण वाळवून वाकवून घेतल्या आहेतच की. जीन्स वर टिकली लावणे, बांगड्या घालणे इत्यादी प्रकार आपण करतच असतो. (त्यातच एखाद्या साडीवर कुंकू न लावणे हे ही अंतर्भूत होते.)

पण – रात्रीचे कपडे ते लोकही घराबाहेर घालत नाहीत हे विसरतो. त्यातही हाऊसकोट म्हणून आपण नाइटी घालत नाही. हाऊसकोट म्हणजे एप्रन सारखे वरून घालणे. आपण नाइटी म्हणून घालतो. मग त्या कपड्यात बाहेर जाणे हे कसे काय समर्थनीय असू शकते? त्यावर ओढणी घेणे हे त्याचे भारतीयीकरण किंवा फ्युजन नाही. तो केवळ गबाळेपणा आहे.

ऋजुता दिवेकरने ऑलिव्ह ऑइल बद्दल एक स्टेटमेंट केले आहे. ती म्हणते “आपल्या स्वयंपाकघरात ऑलिव्ह ऑइल वापरणे याची फॅशन आहे. जसे काही आपण ऑलिव्ह ऑइल मध्ये स्वयंपाक केला तर आपल्या हृदयाला आपोआप एक संरक्षक कवच मिळणार आहे. इटलीच्या स्वयंपाकघरातून आपल्याला पाहिजे तेव्हढाच सोयीस्कर घटक आपण उचलतो आणि त्याचे सु-परिणाम व्हावेत अशी अपेक्षा करतो. उचलायचे तर सगळेच घ्या…!” हेच उदाहरण इथेही लागू पडते.

या सगळया लिखाणामध्ये तुम्हाला असे वाटेल की हिला बायकांच्या सकाळी होणाऱ्या गडबडीचा कल्पनाच नाहीये. असे मुळीच नाहीये. सगळ्या बायकांप्रमाणेच माझाही दिवस सकाळी पावणेपाचला सुरु होतो तो जवळपास रात्री साडेदहा पर्यंत सुरु असतो.

कितीही झोपायला उशीर झाला तरी उठायची वेळ ही ठरलेली असते. त्यामुळे सकाळच्या मिनिटामिनिटाचे मोल मलाही कळते. आदल्या दिवशी रात्री घातलेली नाइटी बदलायला उठल्या उठल्या मोजून दीड मिनिट लागतो आणि हे मी स्वानुभवाने सांगतेय.

तुम्ही सकाळी वॉकला जाताय. तेव्हढ्यासाठी तुम्ही नवीन शूज आणले आहेत. कौतुकच आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष देताय. एकदा निघायच्या आधी आरशात बघा. तुम्हाला छान वाटतंय का नाइटी आणि शूज घालून?

मी घरातल्या बाकीच्या माणसांचे (नवरा इत्यादी) मत विचारत नाहीये. “तुम्हाला” स्वतःला छान वाटतंय का? मग एक मिनिट आणखी द्या स्वतःला. शूजच्या लेसेस बांधायच्या आधी पटकन सलवार सूट घाला. ते शक्य आहे.

माझ्या आजीने नव्वदी ओलांडली आहे. ती आत्ता आत्ता गेल्या पाच वर्षात मोठ्या मिनातवारीने गाऊन घालायला तयार झाली. ती अधून मधून बाहेर उन्हात येऊन बसते. तेव्हाही ती कटाक्षाने कपडे बदलते. या आधी तिच्या व्यवस्थित असण्यादिसण्यावरून आम्ही तिची मस्करी पण खूप केली आहे.

दुसऱ्या दिवशी नेसायची साडी, ब्लाउज असे सगळे आदल्या दिवशी रात्री हँगरला लावून ठेवायची ती. परकराला पण इस्त्री करत असे ती.

कुणाकडेही पैसे मागायचे नाहीत म्हणून सव्वीस वर्षे नेटाने नोकरी करून तिने बंगला बांधला नवी पेठेत. उत्तम आर्टिस्ट आहे. आणि मुख्य म्हणजे मी तिला इतक्या वर्षात कधीही स्वस्थ बसून राहिलेले पाहिलेले नाही. आजही तिचं कपाट उघडलं की व्यवस्थित लावून ठेवलेले कपडे, प्रत्येक गोष्टीची ठरलेली जागा इत्यादी गोष्टी बघायला मिळतात.

तिला आम्ही गमतीत ओ सी डी म्हणतो. ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर. सगळ्या गोष्टी जागच्या जागीच पाहिजेत, व्यवस्थितच पाहिजेत याचा अतिरेक असणारी माणसे. विनोदाचा भाग सोडून देऊ आपण पण आपल्या ढिसाळ राहण्याचे आपण चुकीचे समर्थन करतोय का हे प्रत्येक बाईने खरंच विचारून पाहिले पाहिजे स्वतःला. खरीच कारणे आहेत का कारणे शोधलेली आहेत हे एकदा जरूर विचार स्वतःला.

बायकांवर होत असलेले अत्याचार, हल्ले, बलात्कार हे क्षम्य नाहीतच आणि असे वागणाऱ्या पुरुषांना सार्वजनिक शिक्षा झाल्या पाहिजेत या मताची मी आहे. स्त्रीने तिच्या मुक्तीसाठी सातत्याने झगडा केला आहे.

लढा दिला आहे. पण मला हल्ली बऱ्याचदा असे वाटते की स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त पुरुषी वर्चस्वापासून मुक्ती इतकाच अर्थ घेतला जातोय. पुरुषांशी बरोबरी करणे हा त्यातला हेतू नाहीये.

स्त्रीची मुक्ती म्हणजे “मला माणूस म्हणून किंमत द्या, माणसासारखे वागवा”. Treat and respect me like a human being and in turn I treat and respect everyone around me like a human.

आणखी एक उदाहरण माझे आवडते आहे. टाटा कन्सल्टन्सीचा कुठलाही ऍन्युअल रिपोर्ट काढा गेल्या सात ते आठ वर्षांमधला. एकमेव स्त्री आहे त्यांच्या डायरेक्टर लिस्टमध्ये. तिचे नाव आरती सुब्रमणियन.

तिचे फोटो जर तुम्ही बघितलेत तर ती साधा कॉटनचा सलवार सूट आणि पायात सँडल्स अशी दिसेल. एखाद दुसरा फोटो साडीतला असेल. बुद्धिमत्ता तिच्या नजरेत आणि चेहऱ्यावर दिसते. पण म्हणून तिने बावळा वेष घातलेला नाही. साधी आहे पण प्रेझेंटेबल आहे.

सांगायचा मुद्दा हा आहे की “कपडे नाहीत हो आमच्याकडे!” म्हणून शॉपिंगला जायची गरज नाहीये. आपल्याकडे असलेल्या कपड्यांमध्ये पण आपण छान दिसूच शकतो, छान राहूच शकतो.

“मी गरीब बिचारी बापडी” नाहीतर मग “मी एकदम रणरागिणी!” अशा दोन टोकाच्या भूमिका का घेतात बायका? माझ्या मते बायका ह्या गरीब बिचाऱ्या मुळीच नसतात. आणि हे मी चांगल्या अर्थी म्हणतेय. बाई असणे भाग्याचे आहे आणि ते खूप वेगळे रसायन आहे. निसर्गानेच तिला चिवट बनवले आहे. टफ केलेले आहे. ज्याला “कोअर ऑफ स्टील” असे म्हणतात तशा असतात बायका.

सगळ्याच बायका ह्या पैसे असलेल्या सामाजिक स्तरातून येत नाहीत. सगळ्याच बायका ह्या सुखवस्तू असतात असे नाही. प्रत्येक बाईचा लढा वेगळा, प्रश्न वेगळे आणि संघर्ष वेगळा. आणि तरीही बाईने बाईपण राखलंय. ते मला फार महत्वाचे वाटते.

एखादीला नाही इच्छा छान राहायची, बाईपण मिरवायची कबूल आहे. पण म्हणून सरसकट सगळ्याच बायका ह्या “गरीब बिचाऱ्या” हे स्ट्रेच आहे. माझ्या माहितीत तरी बायकांना छान राहायला, मिरवायला आहे त्यात नटायला सजायला आवडतेच.

मग मी गबाळेपणा करत असेन तर तेव्हढ्यापुरती मी गरीब बिचारी राणी आणि इतर वेळी मी फुलराणी हे लंबक विधान आहे.

शेवटी इतकेच म्हणेन की छान रहा की स्वतःसाठीच… बघा तुम्हालाच मस्त वाटेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?