एखादं गाणं/चाल आपल्या डोक्यात सतत घोळत राहण्यामागचा मेंदूचा “विचित्र” घोळ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखाद्या दिवशी असं होतं की, आपण सकाळी एखादं गाणं रेडियोवर किंवा येता जाता कुठेतरी ऐकतो आणि नंतर संपूर्ण दिवसभर त्या गाण्याचे काही शब्द किंवा चाल किंवा संपूर्ण गाणंच आपल्या डोक्यात फिट्ट बसतं.

काम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा ते गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. हे असं परीक्षेच्या वेळी तर हमखास होतं.

म्हणजे आपण पेपर लिहिताना लक्ष केंद्रित करून प्रश्नाचं उत्तर आठवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो आणि बॅकग्राउंडला कुठलंतरी रँडम गाणं सतत मेंदूत वाजून आपल्या पेपरची आणि कॉन्सन्ट्रेशनची वाट लावत असतं!

आपण ते मेंदूत वाजणारं गाणं अव्हॉइड करायचा प्रयत्न करून सुद्धा ते आपण विसरू शकत नाही आणि दिवसभर मनातल्या मनात किंवा उघडपणे एकच गाणं गुणगुणत राहतो.

असं का होतं? हा मेंदूतील केमिकल लोचा तर नाही ना? आज जाणून घेऊ आपल्या डोक्यात बॅकग्राउंडला वाजणाऱ्या गाण्याचं शास्त्रीय कारण!

शास्त्रज्ञांच्या मते ह्या मेंदूतील घोळासाठी ईयरवर्म्स किंवा जर्मनमध्ये ओहरवर्म जबाबदार आहेत.

घाबरू नका हे ईयरवर्म्स म्हणजे तुमच्या इयरकॉर्ड्स मधून तुमच्या कानातून जाऊन मेंदूत संगीताची अंडी घालणारे किडे नाहीत. इयरवर्म्स पॅरासिटिक आहेत कारण त्या तुमच्या मेंदूत जाऊन बसतात आणि कॉग्निटिव्ह इच किंवा ब्रेन इच तयार करतात.

कॉग्निटिव्ह इच म्हणजे आपला मेंदू त्या गाण्याच्या रिदममध्ये तयार झालेल्या रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण कुठलेही गाणे ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूतील “ऑडीटरी कॉर्टेक्स” हा भाग उद्दीपित होतो.

 

earworm-inmarathi01
neurosciencenews.com

डार्टमाउथ विद्यापीठात रिसर्च करणाऱ्या शास्त्रज्ञांनी ह्यासाठी एक प्रयोग केला. ज्या व्यक्तींवर त्यांनी हा रिसर्च केला त्यांना शास्त्रज्ञांनी त्यांच्या ओळखीच्या गाण्याच्या थोड्या ओळी ऐकवल्या. गाणे अर्धवट ऐकल्यानंतर ह्या प्रयोगात सहभागी होणाऱ्यांच्या ऑडीटरी कॉर्टेक्सने आपोआप गाणे पूर्ण केले.

सोप्या शब्दात सांगायचे तर ह्या गाण्याचा थोडा भाग ऐकल्यानंतर मेंदूने ते गाणे पूर्ण केले व नंतर त्यांचा मेंदू ते गाणे दिवसभर रिपीट करत राहिला.

आता ह्या ब्रेन इच वर ते गाणे परत परत मनातल्या मनात म्हणत राहणे ह्याशिवाय दुसरा उपाय नाही. ह्यावर आपला काही कंट्रोल सुद्धा नाही. हे म्हणजे डास चावण्यासारखे आहे.

डास चावल्यावर आपण त्या ठिकाणी जितके खाजवू तितकी अधिक खाज येत राहते आणि आपण अधिक अधिक खाजवत सुटतो. तसेच हे ब्रेन इच म्हणजे एक न संपणारी सायकल आहे.

परंतु हे सर्वच गाण्यांबाबत होत नाही. काही ठराविक गाणीच आपल्या डोक्यात जाऊन बसतात. ह्याचे काय कारण असावे ह्याबाबत सुद्धा अनेक थिअरीज आहेत.

काही रिसर्चर्स असे म्हणतात की, ही मनात अडकून बसलेली गाणी म्हणजे आपल्याला नको असलेल्या विचारांसारखी असतात. जितके आपण ह्या विचारांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो तितके जास्त ह्या विचारांच्या गर्तेत अडकत जातो.

काही एक्स्पर्टस म्हणतात की, ह्या इयरवर्म्स म्हणजे मेंदूला दुसरे काही काम नसताना तो स्वतःला बिझी ठेवण्याचा मेंदूचा प्रयत्न असतो. ह्या ईयरवर्म्सस संदर्भात अनेक थिअरीज आहेत तसेच ह्यांना अनेक नावेही आहेत.

काही शास्त्रज्ञांनी ह्या गोष्टीला रिपीट्युनीटीस म्हणतात तर काहींनी ह्याला मेलडीमेनिया असेही नाव दिले आहे.

 

earworm-inmarathi
science.howstuffworks.com

युनिवर्सिटी ऑफ सिनसिनाटी कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन येथील मार्केटिंग ह्या विषयाचे प्रोफेसर जेम्स केलॅरीस ह्यांनी ईयरवर्म्स आणि ब्रेन इच ह्यावर रिसर्च केला आहे. त्यांना असे आढळले की जगातील ९९ टक्के लोकांना ह्या गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी अनुभव येतोच.

परंतु स्त्रिया, संगीताच्या क्षेत्रात काम करणारे लोक, तणावग्रस्त लोक, थकलेले लोक तसेच न्यूरॉटिक लोकांना हा अनुभव वारंवार येण्याची शक्यता जास्त असते.

संगीतकारांना ह्याचा अनुभव वारंवार येतो कारण ते कायमच संगीतावर काम करत असतात परंतु स्त्रियांना वारंवार हा अनुभव का येतो हे केलॅरीस ह्यांना अजून शोधून काढता आलेले नाही.

तसेच सर्व गाणी आपल्या लक्षात न राहता काही विशिष्ट गाणीच आपल्या मनात रुतून का बसतात ह्याचे कोडेही शास्त्रज्ञांना अजून उलगडलेले नाही. परंतु ही गाणी व्यक्तिपरत्वे वेगळी असतात. जी गाणी सोपी, उडत्या चालीची, मनाचा ठाव घेणारी तसेच सोप्या शब्दांची असतात किंवा वेगळ्या चालीची किंवा अधिक तालबद्ध असतात त्या गाण्यांच्या बाबतीत हा अनुभव जास्त येतो.

कधी कधी तर जाहिरातींमधील जिंगल्स सुद्धा ह्याच कारणाने आपल्या मेंदूत सतत वाजत असतात.

आकडेवारी असे सांगते की, बऱ्याच लोकांच्या म्हणजेच ७४ टक्के लोकांच्या मनात गाणी अडकून बसतात, १५ टक्के लोकांच्या मेंदूत जाहिरातींच्या जिंगल्स वाजतात तर ११ टक्के लोकांच्या मनात इंस्ट्रुमेंटल म्युझिक वाजत असतं.

डोक्यात विशिष्ट गाणं अडकणे ही आपल्यासाठी डोकेदुखी असते पण हीच गोष्ट म्युझिक कंपन्यांसाठी आनंदाची असते कारण त्यांची गाणी लोकांच्या मेंदूत रजिस्टर होतात.

ह्यात नोंद घेण्याची गोष्ट अशी की, आपल्याला आवडणारी गाणीच आपण मनातल्या मनात गुणगुणतो. नावडत्या गाण्यांबाबत असे घडण्याची शक्यता कमी असते. बकनेल युनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने ह्याबातीत अभ्यास केला असता अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे नमूद केले की, त्यांच्या आवडीची गाणी त्यांच्या मनात सतत रिपीट होत असतात.

३० टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्याबाबतीत कुठल्याही चांगल्यावाईट गाण्याचा त्यांना असा अनुभव येतो. तर १५ टक्के लोकांना त्यांच्या नावडत्या गाण्याविषयी असा अनुभव येतो.

 

earworm-inmarathi02
hearingtracker.com

ह्या ईयरवर्म्सवर उपाय काय?

दुर्दैवाने ह्या ईयरवर्म्सवर खात्रीलायक उपाय अजून तरी सापडलेला नाही. एकदा ही ईयरवर्म तुमच्या कानातून मेंदूत शिरली की, ती तिथे किती काळ अडकून बसेल काही सांगता येत नाही. ते गाणे विसरायला आपल्याला काही तास ते काही दिवस सुद्धा लागू शकतात. जर एखादे “आपली मुंबई चांगली मुंबई” सारखे मास्टरपीस डोक्यात अडकून बसले तर अगदी संयमी माणूस सुद्धा इरीटेट होईल.

बऱ्याचदा ह्या ईयरवर्म्स आपोआपच तुमच्या मेंदूतून बाहेर पडतात, परंतु जर तुमच्या मनात “सेल्फी मैने ले ली आज” सारखे गाणे अडकून तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर ह्या काही टिप्सचा वापर करून तुम्ही त्या गाण्यापासून सुटका करून घेऊ शकता.

१. तुमच्या आवडीचे दुसरे गाणे ऐका किंवा म्हणा.

२. व्यायाम करा किंवा दुसऱ्या कुठल्याही कामात स्वत:चे मन गुंतवा.

३. तेच गाणे संपूर्ण ऐका (हा उपाय काही लोकांना लागू पडतो)

तुमच्या मनात एखादे गाणे असेच सतत वाजत असेल तरी काळजी करु नका. जगात जवळजवळ सर्वांनाच हा अनुभ येतो आणि हे अगदी नॉर्मल आहे.

परंतु एखादे गाणे अस्तित्वात नसतानाही ते तुमच्या मनात सतत वाजत असेल तर मात्र डॉक्टरांना भेटा. कारण हे लक्षण एन्डोम्युझीया ह्या आजाराचे असू शकते.

ह्या आजारात लोकांना अस्तित्वात नसलेले संगीत ऐकू येते असे म्हणतात.

बाकी ह्या ईयरवर्म्सने मोझार्ट सारख्या मोठ्या संगीतकारालाही सोडले नाही तर आपण तर फार सामान्य आहोत. मोझार्टची मुले वडिलांना त्रास देण्यासाठी म्हणून पियानोवर अर्धीच मेलडी वाजवून पसार होत असत. मग अस्वस्थ झालेल्या मोझार्टला पियानोवर ती मेलडी संपूर्ण वाजवल्यावरच स्वस्थता मिळे!

तर मग आज तुमच्या मनात कुठले गाणे वाजतेय?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?