यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द का उच्चारला जातो?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये काही ठराविक वर्षांनी होम-हवन केले जाते. जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख-शांती अबाधित राहावी. या होम-हवनाच्या वेळी भटजी आपल्याला यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द उच्चारायला सांगतात. घरी पूजा आयोजित केली असेल किंवा लग्नाच्या वेळीही यज्ञकुंडात आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द म्हणावा लागतो. आपणही भटजी सांगतो तसे करतो आणि स्वाहा शब्द म्हणून मोकळे होतो. पण कधी तुमच्या मनात विचार आलायं का की हा स्वाहा शब्द का बरं म्हणावा लागतो? या शब्दाचे इतके काय महत्त्व आहे?
यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ म्हणण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. ऋषीमुनी देखील यज्ञकुंडाभोवती देवाची आराधना करायचे तेव्हा आहुती देताना न चुकता स्वाहा म्हणायचे. पुराणात असे सांगितले आहे की ऋग्वेद काळामध्ये देव आणि मनुष्य यांमधील माध्यम म्हणून अग्नीची निवड केली होती. असे मानले जाते की अग्नीच्या तेजामध्ये सर्व काही पवित्र होऊन जाते. जेव्हा आपण एखादी गोष्ट देवतांना समर्पित करताना आहुती म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा अग्नीच्या मार्फत ती देवांपर्यंत पोचते. पण असे करताना स्वाहा हा शब्द उच्चारणे अतिशय आवश्यक आहे, अन्यतः तुम्ही समर्पित केलेली गोष्ट देवतांपर्यंत पोचणार नाही.
स्वाहा या शब्दाचा अर्थ आहे- देवाला प्रिय असणारी गोष्ट निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने देवाला अर्पण करणे.
धार्मिक ग्रंथांनुसार कोणतेही होम-हवन तोपर्यंत सफल मानले जात नाही जोवर होम-हवनाची सामग्री देव स्वीकारत नाही. मुख्य म्हणजे देव या सामग्रीचा तेव्हाच स्वीकार करू शकतो जेव्हा तुम्ही ‘स्वाहा’ शब्दाचे उच्चारण करून ती सामग्री यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अर्पण करता.
अग्नी आणि ‘स्वाहा’शी संबंधीत अनेक आख्यायिक आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. श्रीमद्भागवत आणि शिवपुराणामध्ये ‘स्वाहा’शी निगडीत अनके वर्णने आहेत.
एका पौराणिक कथेनुसार, ‘स्वाहा’ ही दक्ष प्रजापती राजाची मुलगी होती. जिचे लग्न अग्नीदेवासोबत लावून देण्यात आले होते. त्यामुळेच अग्निदेव केवळ आपली पत्नी स्वाहा हीच्या माध्यमातूनच हवन सामग्री ग्रहण करतात आणि पुढे ही सामग्री आपण ज्या देवाला अर्पण करू त्याच्यापर्यंत पोचते.
दुसऱ्या एका कथेनुसार स्वाहा निसर्गाची एक कला होती, जिचे लग्न देवतांच्या आग्रहानुसार अग्नीदेवांशी झाले होते. यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी तिला स्वत:हून एक वर दिला होता की केवळ तिच्याच माध्यमातून देवता हवन सामग्री स्वीकार करतील आणि तेव्हापासून यज्ञकुंडामध्ये अग्नीच्या माध्यमातून हवन सामग्री अर्पण करताना ‘स्वाहा’ उच्चार करण्याची प्रथा सुरु झाली.
सर्व पुराण ग्रंथांमध्ये ‘स्वाहा’ संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी या सर्व ग्रंथामध्ये एकच विचार मांडण्यात आला आहे की अग्नीला समर्पित असणारे मंत्रोच्चार आणि सोबत ‘स्वाहा’चे उच्चारण केल्यास तुम्ही अर्पण केलेली गोष्ट देवतांपर्यंत नक्की पोचते !
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.
Nice, thanks for Sharing