गोरखपूरचे “साठ सरकारी मर्डर” घडण्यामागची खरी कारणं “ही” आहेत

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.

===

गोरखपूर सिव्हिल मध्ये ऑक्सिजन संपला म्हणून साठ कोवळ्या जीवांचा बळी गेला.. वाचून कोणीही सेन्सिटिव्ह माणूस सुन्न होईल अशीच ही घटना आहे. जे कोणी या घटनेवर सरकारच्या बाजूने एक्सक्युजेस देतील ते लोक “माणूस” म्हणायच्या लायकीचेच नव्हेत. आणि, अशा ‘माणूस’ नसलेल्यांसाठी हा लेख.

गोरखपूर मधील घटना ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं, पण आश्चर्य मात्र अजिबात वाटलं नाही. आज कोणतंही सिव्हिल हॉस्पिटल बघा.. क्षमतेपेक्षा ओसंडून वाहत आहे. खाटांची संख्या तिथे येणाऱ्या पेशंट्स च्या संख्येशी कुठंच ताळमेळ खात नाही. गाऱ्हाण्यांची लिस्ट काढायची म्हटलं तर पेनातली शाई संपेल.


शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात.. पण, शहाण्याने सरकारी हॉस्पिटलचीही पायरी चढू नये, हे ही तितकंच खरं आहे…

gorakhpur-hospital-tragedy-marathipizza
AFP | dnaindia.com

 

पुरेसे कर्मचारी नसतात. वार्डबॉय नसतात. आणि असले तरी ते काम करत नसतात. बहुतांश सरकारी कार्यालयाप्रमाणे इथेही पाट्या टाकणे आणि टंगळमंगळ सुरू असते. जो काम करतो त्याच्याच अंगावर पडतं सगळं काम. बाकी, पेशंटच्या अंगावर खेकसणे एवढंच काहींचं दिवसभराचं काम असतं. आपल्यापैकी कोणी कोणत्याही सरकारी हॉस्पिटलचा अनुभव घेतला असेल तर जरा आठवा, सौजन्याची वागणूक तुम्हाला किती वेळा मिळलीये? आणि चुकून एखादा सिव्हिलमधला कर्मचारी सौजन्याने बोललाच् तर भीती वाटते, की हा आता पैसे मागतोय की काय!!

बाय चॉईस म्हणून नव्हे तर मजबुरी म्हणूनच लोक सरकारी दवाखान्यात जातात…!

सरकारी दवाखान्यातली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे औषधांची आणि साधनांची उपलब्धता…!

टेंडर निघून ही औषधखरेदी केली जाते. मात्र कुठल्यातरी विचित्र फर्मास्युटिकल कंपन्याची नावे असतात काही गोळ्यावर. अत्यंत सुमार दर्जा. बऱ्याच वेळा डॉक्टरलाही समजत असतं की ह्या गोळ्यांनी पेशन्टला काही अपेक्षित गुण येत नाहीये. पण पर्यायच नसतो. त्याला महागातली पण चांगली औषधे डॉक्टर लिहून देऊ शकत नाहीत (नियमांचे बंधन) आणि पेशन्ट पण तसे अफोर्डिंग नसतात.

बऱ्याच औषधांचं एकदमच बल्क पर्चेसिंग होतं. मग फतवा निघतो – “अँम्पीसिलिनचा खूप स्टॉक आलाय, आता महिनाभर एकच अँटिबायोटिक वापरायचं.” कधी कधी एक्सपायरी डेट जवळ आलेली औषधे पर्चेस केली जातात किंवा कधी कमी वापर झाल्यामुळं खूप सारा स्टॉक असाच एक्सपायर होऊन जातो, मग त्याची गुपचूप विल्हेवाट लावली जाते.

Requirement चा आणि availability चा काहीही संबंध नसतो.. तुम्ही कधीही requirement पाठवा, ते औषध पाठवायचं तेव्हाच पाठवितात आणि हॉस्पिटलला मिळायचं तेंव्हाच मिळतं. सगळ्या गोष्टी लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या असतात. त्याला बायपास करावं तर मग भ्रष्टाचाराचे आरोप होतात.. मग कोणीही जीवावर उदार होऊन किंवा जबाबदारी अंगावर घेऊन काम करायला धजत नाही.

एक खूप जुना किस्सा सांगतो. माझ्या एका PHC ला मेडिकल ऑफिसरशीप नुकतीच घेतलेल्या मित्राला मी कामानिमित्त भेटायला गेलो होतो. तो निराश दिसला. मी म्हटलं, ‘काय झालं रे?’ तर म्हणाला, आज दिडशेची ओपीडी केलीय.. मी म्हणालो, मग? तर तो म्हणाला –

काही नाही रे…सगळ्यांना Ranitidin, Gelusil, MVBC आणि cough syrup आलटून पालटून दिलेय. आजार काहीही असो…हीच औषधं शिल्लक आहेत. याने काही अपाय नसला तरी, मला लोकांची फसवणूक केल्याचं फिलिंग काही जाता जात नाही.

मी पण सुन्न झालो. थोडंसं सावरून म्हटलं, “फसवणूक तू नाही, सरकार करतंय लोकांची. चल तू, पीजी एन्ट्रन्सचा अभ्यास कर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कर म्हणजे ही MOship ची मगजमारी करावी लागणार नाही.” असो.

काहीवेळा, खूप सारी वेगळी, पण महत्वाची इंजेक्टबल्स उपलब्धच् नसतात. मी RH ला इंटर्नशिप करत असतानाची गोष्ट आहे. रात्री तीनच्या दरम्यान Acute asthmatic attack चा एक पेशन्ट टाचा घासून घासून माझ्याच पायाजवळ एक्सपायर झाला. त्यावेळी त्याच्या बायकोचा टाहो आणि छोट्या मुलीचा चेहरा मला अजिबात बघवला नाही. मी नवखा होतो. प्रचंड भीती आणि दुःखाने मी गलितगात्र झालो आणि तोंड फिरवून दुसऱ्या वार्डमध्ये निघून गेलो.

त्यात, तिथं Aminophylline आणि इतर ड्रग उपलब्ध करून न देणाऱ्या सरकारची चूक होती? का तिथं प्रयत्न करुन पण यश न देऊ शकलेल्या माझी चूक होती? का दारिद्र्यामुळं सरकारी दवाखान्यात याव्या लागलेल्या त्या मजुराची चूक होती? हे तुम्हीच ठरवा…!

पण त्या पहाटे मी शपथ घेतली.. की काहीही करायचं, पण सरकारी नोकरी मात्र अजिबात करायची नाही…कारण, मी निगरगट्ट होऊच शकत नाही…मी पेशंट्सच्या मजबुरीकडे त्रयस्थपणे बघूच शकत नाही…मी हतबल जिणं जगूच शकत नाही…

सरकारला लोकांच्या आरोग्याशी काहीही घेणंदेणं नाही. त्यांना गळ्यात स्टेथोस्कोप घालून लोकांसमोर फक्त एक माणूस उभा करायचाय. खेडोपाड्यात आणि गावोगावात सार्वजनिक आरोग्याची अक्षरशः चेष्टा सुरू आहे. सरकार लोकांची फसवणूक करतेय आणि बोट डॉक्टरांकडे दाखवितेय.

म्हणजे, सरकारने डॉक्टरांना बॉर्डरवर बलाढ्य शत्रूसमोर उभे केलेय आणि लढायला हातात मशिनगन उपलब्ध करून देऊ शकले नाही की मग चाकू सुरे देऊन वेळ मारून नेतंय आणि पब्लिकला वाटतेय की डॉक्टरने आता आपलं रक्षण करावं..!!

कसं शक्य आहे सांगा…?

समाजातल्या प्रत्येकानं आपापल्या ओळखीतल्या किंवा मित्रातल्या कोणत्याही सरकारी डॉक्टरला सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल विचारावं.. सगळ्यांची तीच सेम गाऱ्हाणी असतील.. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीच परिस्थिती आहे..

रुग्णालय आणि आरोग्याशी संबंधित सिस्टीमच एवढी “गहन” आणि “अवाढव्य” आहे, की नवीन प्रशासन चाचपडतेच अंधारात.. आणि मुरलेल्यांना तर सगळ्याच् पळवाटा माहिती आहेत..

MOship करणारा नवीन डॉक्टर काही दिवसांतच इथे पागल होऊन जातो.. लवकरच त्याला ‘मनाला काही लागून न घ्यायची’ आणि ‘अंगावर काही येऊ न द्यायची’ सवय लागते.. मग तो फक्त मिटींग्ज अटेंड करायला आणि कागदं रंगवायला शिकतो.. आणि कर्मचारी पाट्या टाकायला शिकतात.. सरकार योजना आणतं, सतराशे साठ अहवाल मागवतं, मिटींग्ज होतात, थोडंफार घडतं, थोडं बिघडतं.. साध्य काहीच होत नाही.. काही निधी हवेत उडतो, काही निधी मातीत जिरतो, आख्खी बाग कागदावर असते पण प्रत्यक्षात चार दोनच झाडंच् उगवून येतात.. आणि वर्षोनुवर्षे हेच सुरू आहे.. कोणीही सुज्ञ माणूस त्या दुष्टचक्रातून लवकर बाहेर पडायचं बघतो.. किंवा मग मजबुरीनेच् नोकरीत थांबतो..

आपण पाहतो की समाजात कुठलीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी लोक लाखोंच्या बोली लावतात.. पण डॉक्टर्स मात्र सरकारी नोकरी करायला अजिबात तयार होत नाहीत…का असं असावं बरं.?

डॉक्टर्स सरकारी नोकरी करायला का तयार होत नसावेत.?

मग डॉक्टर्स सरकारी नोकरी करत नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध फतवे काढा, नियम बनवा, बॉन्ड कंल्पल्सरी करा.. डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारा.. मीडियातून नाचक्की करा.. पण स्वतःतच् खोट आहे, हे काही तुम्ही मान्य करू नका..!!  शासनाला स्वतःची सडलेली आणि भ्रष्ट सिस्टीम सुधारायची नाहीये आणि ते त्यांना शक्यही वाटत नाहीये.. त्यापेक्षा मग डॉक्टरांकडे बोट दाखविणे आणि त्यांना दोषी ठरविणे जास्त सोपे आहे.. आणि ते समाजाला मान्यही आहे..

यातूनही अनेक सरकारी डॉक्टर आपापल्या परीने चांगली सेवा देत असतात.. वाखाणण्याजोगे काम करत असतात.. पण ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच्.. आणि त्यांना ह्या सिस्टीमला बायपास केल्याशिवाय ते शक्य होत नाही.

त्यासाठी त्यांना रिस्क घ्यावी लागते अन मग शत्रूही निर्माण होतात.. तरीही त्यांच्या हातात असलेल्या शक्य त्या गोष्टी ते करत असतात.. मेडिकल कॉलेज अटॅच् असलेल्या ठिकाणी तर निवासी डॉक्टर्स चोवीस तास कार्यरत राहतात, आणि तिथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळते.. हे एवढेच काही थोडेफार आशेचे किरण..

कधी ऑपरेशन थिएटर असतं, पण उपकरणं नसतात.. कधी उपकरणं असतात, पण तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात.. एक आहे तर एक नाही, असं सोयी सुविधांचा लपंडाव सुरु असतो..

काही असो वा नसो, सरकारी दवाखान्यात एक गोष्ट मात्र हमखास असते.. ती म्हणजे राजकारण्यांचा उपद्रव..!! त्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल..

आणि ही परिस्थिती प्रत्येक सरकारी गोष्टीत, आस्थापनेत, विभागात आहे.. सरकारी शाळा असो, सरकारी ट्रान्सपोर्ट असो, सरकारी कार्यालये, पोलीस, न्यायव्यवस्था, रस्ते, वीजमंडळ असो.. सरकारी यंत्रणांकडून सगळीकडेच् पब्लिकला गंडवलं जात आहे.. सगळ्या गोष्टी भ्रष्ट सिस्टीमने ड्रिव्हन आहेत..

पण या इतर सगळ्या विभागांपैकी केवळ आरोग्याच्या बाबतीत मात्र सरकार डॉक्टरांकडे बोट दाखविण्यात यशस्वी झालेय..

सरकारी शाळांच्या दर्जाच्या बाबतीत कधी शिक्षकांना मारहाण होत नाही, किंवा एसटी बसच्या खराब सेवेने ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण होत नाही.. पण सरकारी दवाखान्यात सुविधा नाही मिळाल्या तर डॉक्टरला बेदम चोपणाऱ्या समाजाला, एक टक्केही वाटत नाही की जाऊन आपल्या आमदाराला जाब विचारावा..!! हे आपले सामूहिक दुर्दैव आहे..

परदेशात फिरायला जाऊन आलं की, या कोणत्या देशात अन् कसल्या समाजात आपण राहत आहोत याचं प्रचंड वाईट वाटतं.. वैयक्तिक पातळीवर स्वतःपुरत्या कितीही गोष्टी बदलायचा प्रयत्न केला तरी शक्यच होत नाही.. उलट आपणच् वेडे ठरतो.. प्रयत्न तोकडे पडतात..

सरकारी पातळीवरूनच् मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले पाहिजेत.. पण सरकारी अनास्था संपत नाही.. वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येतात अन जातात, पण सिस्टीम तीच असते.. तात्पुरती मलमपट्टी होते, पण बदल घडत नाहीत..

आरोग्यविभागाच्या या अनागोंदीकडे आणि सरकारी हॉस्पिटलमधल्या लालफितीच्या कारभाराकडे पाहिलं तर पेशन्ट मरतात याचं आश्चर्य वाटतच नाही.. उलट पेशन्ट बरे कसे होतात, याचंच जास्त आश्चर्य वाटत राहतं.. म्हणूनच गोरखपूरच्या घटनेचं मला आश्चर्य वाटत नाही.. कारण इथं काहीही घडू शकतं..!

जिथं लाखो लोक उपचाराअभावी आणि मूलं कुपोषणानं मरतात, जिथं लाखो शेतकरी आत्महत्या करतात, हजारो बेरोजगार जीव देतात, तिथं आम्ही मिरवणुका, होर्डिंग्ज, उत्सव, धार्मिक उन्माद आणि जातीय अस्मिता यातच् आपापले सौख्य सामावून घेतोय.. देशभक्तीचे कार्ड खेळायचे, का अवॉर्डवापसी करायची यातंच मशगुल राहतोय..

जिथं सरकारकडून काय मागावे, आणि सरकारने कशाला प्राधान्यक्रम द्यावा याची जराही अक्कल समाजाला नाही..

तिथं, कोवळ्या जीवांनो, तुम्ही जन्म घेतलात, हेच तुमचं दुर्दैव आहे.. ऑक्सिजन अभावी झालेली तुमच्या कोवळ्या जीवाची तडफड माझ्या मनातून अजिबातच जात नाहीये..

बाळांनो, या देशातला माझ्यासकट प्रत्येक हतबल नागरिक तुमचा गुन्हेगार आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “गोरखपूरचे “साठ सरकारी मर्डर” घडण्यामागची खरी कारणं “ही” आहेत

  • August 14, 2017 at 11:32 am
    Permalink

    People should stop asking for free everything from Govt. Govt. should provide only Dr.’s free service-medicines/diagnostic tests etc. at price or arrange joint ventures with Pvt. bodies, charitable trusts-as part of CSR projects of industries. How to remove craze of price driven mentality from Indians,is great task.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *