यशस्वी लोकसुद्धा असे टोकाचे निर्णय का घेत असावेत? विचारात पाडणारी उत्तरं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

“कॉफी पिउयात” असं म्हणल्यावर मित्रांबरोबर असताना हमखास “सी सी डी ला जाऊ” असंच निघतं. त्यातले त्यात  खास मैत्रिणीबरोबर जायचं असेल तर हे कॉफी शॉप योग्यच मानलं जातं.

तिथली कॉफी जवळ जवळ सगळ्यांनाच आवडते. अर्थात महाग असते, पण आवडीला पुढे मोल नाही.

आपल्या सगळ्यांना मोठ मोठ्या हॉटेल्स बद्दल नेहमीच असं वाटत असतं किवा अंदाज लावतोच आपण की याचा मालक किती सुखी असेल यार, एवढा पैसा आहे मग काय चिंताच नसेल.

पण ‘सीसीडी’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते एका दुर्दैवी कारणामुळे. सीसीडीचे मालक व्ही जी सिद्धार्था गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. काल आठ दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीच्या किनारी सापडल्याची बातमी आली आहे.

 

v g sidhhartha inmarathi
Livemint

पोलीस तपासात त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड न तर सापडली, पण त्यानंतर आठ दिवस ते बेपत्ता होते. काल त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी थोड्याच काळाच्या अंतराने झालेल्या हिमांशू रॉय आणि भय्युजी महाराज देशमुख यांच्या आत्महत्यांनी सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली होती.

यातील एक जण IPS अधिकारी तर दुसरा आध्यात्मिक गुरू. आणि आता व्ही जी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची बातमी आली आहे.

व्यथित करणारी बाब ही की इतके यशस्वी लोक आत्महत्या का करतात?

नैराश्य, आर्थिक अडचण, कौटुंबिक कलह यातील कुठल्याही समस्यांवर काही उपाय होऊ शकत नाही अस वाटण्याइतपत हे लोक कसे गेले हाच प्रश्न आहे.

तिघेही उच्चभ्रू वर्तुळात उठबस असलेले, दोघांचाही मित्र परिवार मोठा, त्यात राजकारण्यापासून सिनेकलाकार यांच्या पर्यंत अनेकांचा समावेश. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणे सामान्य नागरिकांपेक्षा अधिक सुलभ झाले असते तरीही त्यांनी आत्महत्या हा पर्याय का निवडावा? मुळात आत्महत्या म्हणजे नेमके काय हे आधी पाहिले पाहिजे.

 

bhaiyyuji-inmarathi
livemint.com

स्वतःच स्वतःच्या जीवाचा अंत घडवून आणणे म्हणजे आत्महत्या.

आत्महत्येचे दोन प्रकार आहेत :

समाजपुरस्कृत, समाजाला संमत अगर अभिप्रेत असलेली आत्महत्या हा पहिला प्रकार आणि समाजाला मान्य नसलेली, वैयक्तिक कारणाने केलेली आत्महत्या म्हणजेच समाजनिंद्य आत्महत्या हा दुसरा प्रकार.

यातील पहिला प्रकार गौरविण्यात येतोे, या मध्ये समाधी, सती, जोहर, जपन्यांची हाराकीरी, उद्देश प्राप्तीसाठी मृत्यू पत्करणे यात क्रांतिकारकांची फाशी ते सत्याग्रहयांचे प्राणांतिक उपोषण या सारखे प्रकार येतात.

समाजाशी असलेली बांधिलकी जपण्यासाठी बलिदान देने पूज्य मानले जाते. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्म आत्महत्येला पाप मानतात मात्र हिंदुधर्म तसे मानत नाही. प्रसंगानुरूप त्याचे महत्व बदलते.

व्यक्ती समाजाशी एकरुप जितका जास्त होईल तेवढी अशा आत्महत्यांची संभावना अधिक संभवते. (संदर्भ:मराठी विश्वकोश) तर दुसऱ्या प्रकारची आत्महत्या ही वैयक्तिक समस्या, नैराश्य, आर्थिक अडचणी यामुळे होते.

यामध्ये वैयक्तिक हित पाहिले जाते व सामाजिक जबाबदारी झटकली जाते म्हणून अशा आत्महत्येला पाप किंवा गुन्हा मानण्यात येते. पण एवढ्याने ही समस्या सूटणार आहे का? आज बदलत्या जीवनशैलीने जीवनातील ताणतणाव वाढवलेला आहे.

कौटुंबिक संवाद कमी होत आहे. कामानिमित्य बऱ्याचदा कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहते त्यातूनही अंतर वाढत आहे. वाढलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावी लागणारी कसरत, वाढलेल्या सामाजिक अपेक्षा यामुळे आज आपल्यातील प्रत्येक जण एकप्रकारच्या दबावात आहे.

 

Suicide-reuters-inmarathi
financialexpress.com

बेरोजगारी ही एक समस्या बनूनराहिली आहे. ऐन उमेदीच्या काळातील तरुणांची नौकरी साठीची धडपड यात आयुष्यातील एक महत्वाचा वेळ खर्च होतोय.

त्यात जर नौकरी मिळालीच तर ठीक नाहीतर वाढत वय, नौकरी, सामाजिक कौटुंबिक दबाव आणि वाया गेलेली वर्षे यामुळे समाजातील एक मोठा वर्ग आज हतबल आहे. यासाठी समाज म्हणून आपण कारणीभूत आहोत.

जेंव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्या वेळी त्याला जरी त्याची वैयक्तिक कारणे कारणीभूत दिसत असली तरीही प्रत्यक्ष कारण हे सामाजिक असू शकते.

बहुतेकदा ते असतेही. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे कित्येकांनी आपले आयुष्य वास्तवापासून कित्येक मैल दूर आणले आहे. इथून परतून वास्तवाचा रस्ता धरताना चेहऱ्यांना लावलेलं मुखवटे सोडवत नाहीत आणि सर्वांसमोर आपला खरा चेहरा येईल या भीतीने लोक जगत असतात.

एखाद्या व्यक्तीला आहे त्या परिस्थितीत समाज स्वीकारू शकत नाही हे खरतर त्या समाजाचं अपयश म्हणायला हवं.

 

india.com

सत्यापासून पाळणारा समाज जी किंमत चुकवतो त्या किमतीचा एक एक हप्ता म्हणजे एक व्यक्ती असते जिला आपलं जीवन अस अर्धवट सोडावं लागत.

आज लोकांच्या अपेक्षाना सीमा उरली नाही आहे. स्वतःकडून एखादी गोष्ट अपेक्षली तेंव्हा त्या गोष्टीचा सारासार विचार झाला पाहिजे आज तो होताना दिसत नाही. जर ती गोष्ट आपल्याकडून झालीच नाही तर…? या तरच उत्तर तयार नसेल तर वास्तवाला भिडताना अडचण येते.

अन अशावेळी मनात आलेली द्वंद्व कुणासमोर मांडावी असा एकही पर्याय ज्यांना दिसत नाही ते शेवटचा पर्याय स्वीकारतात. आपल्याकडे खरतर कुणी आत्महत्या का करत यावर फार ढोबळ उत्तर दिली जातात.

आर्थिक समस्या, कौटुंबिक वाद, गंभीर आजारपण नाहीतर परीक्षेतील अथवा प्रेमातील अपयश, झालं. या पेक्षा वेगळा विचार करायला कुणी तयार ही नाही. काही कारणे मानसिक असू शकतात असा विचारही कुणी करत नाही.

माणसाच्या मानसिक आरोग्याबद्दल आपल्याकडे ठार अज्ञान आहे, त्यामुळे तणावाच्या स्थितीतून जानाऱ्या व्यक्ती सोबत कुठल्या वेळी कसं वागावं याचा साधा विचार ही होत नाही.

 

suicide-inmarathi
xakac.info

आपल्याकडे जरी आत्महत्येवर विशेष अभ्यास झाला नसला तरी पाश्चात्य जगात विविध अभ्यासकांनी दीर्घकाळ ‘माणूस आत्महत्या का करतो’ या विषयावर चिंतन केलेले दिसून येते.

फ्रॉइडच्या मते एखाद्या व्यक्ती अथवा वस्तू विषयी असणारे प्रेम असफल झाले तर त्या प्रेमाचे द्वेषात अगर रागात रूपांतर होते आणि या भावनांचा उलट परिणाम त्या व्यक्तीवर होऊन व्यक्ती आत्महत्या करते.

पण फक्त प्रेम असफल झाल्याने किंवा द्वेष किंवा रागाने आत्महत्या होते हे म्हणणं धाडसाच आणि एकांगी होईल. माणसाच्या मनात एकच भावना कशी असू शकते ?

तिथे अनेक भावनां असू शकतात न्यूनगंड, भीती या बाबी पण विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत. तर मेनिंगर या संशोधकाच्या मते मारण्याची अथवा मारण्याची इच्छा असते तेंव्हा व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते.

कदाचित भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशात आत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याने तिकडे या विषयावर अधिक अभ्यास झाला असेल परंतु आपल्याकडे देखील आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

 

suicidal-inmarathi
youtube.com

त्यामुळे बदलत्या जीवनमाना सोबत कौटुंबिक संवाद किंवा त्याला पर्यायी ठीकाणे समाजात उपलब्ध झाली पाहिजेत. व्यक्ती आत्महत्या का करते हे नेमकं कुणीही सांगू शकत नाही.

कारण जाणारा आपल्यात कोणत्या मानसिक स्थितीत होता हे त्याच्या शिवाय दुसरं कुणी कसं सांगणार? पण आपल्या मनात काय चाललंय हे कुणाला तरी सांगणं हे तरी आपण करू शकतोच आणि कुणी असा सांगणारा आढळला तर ऐकून घेणंही आपलं कर्तव्य असलं पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?