पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पहिला पाऊस पडला की, मातीचा इतर सर्व सुगंधांहून वेगळा सुवास आपल्याला धुंद करून जातो. मात्र असा कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध कसा तयार होतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडलाय का? पावसाकडून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या कवींनी खूप रम्य कविता रचल्या आहेत.

मग ते ना. धो. महानोरांचे ‘जाई जुईचा गंध मातीला’ हे गीत असो किंवा शांताबाईंच्या भरून भरून आभाळ आलंय मधल्या,

‘शकुनाचा आला वारा,
माझ्या मनात ओल्या धारा,
आला वास ओला,
मातीचा सोयरा’

या ओळी असोत..

कित्येक कवींना या पावसाने, मातीच्या सुवासाने लिहितं केलंय. पण हा सुगंध मातीत कोण पेरतं हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? त्याचं उत्तर शोधायचा कधी प्रयत्न केला आहे?


 

rain-inmarathi
roadcompass.org

मातीचा गंध हा वेगवेगळ्या कारणांमुळे येतो.

यापैकी मातीचा एक प्रकारचा सुगंध हा विशिष्ट जीवाणूंमुळे निर्माण होतो. माती वरून कोरडी दिसत असली तरी आत थोडा ओलावा असतो. त्यात असिनोमायसेटिस नावाचे जीवाणू वेटोळे करून राहात असतात. जेव्हा जमीन वाळते तेव्हा हे जीवाणू मातीचे स्पोअर्स (बीजूक) तयार करतात.

जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा असिटिनोमायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोअर्स हवेत उधळतात. पावसाच्या पाण्यातील बाष्प आणि पाऊस हे एरोसोल या एअर फ्रेशनर सारखे काम करतात.

हे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत भिजलेल्या मातीचा सुगंध घेऊन येतात. या स्पोअर्समध्ये मातीचा सुवास असतो. हे जीवाणू जगभर आढळतात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोडसर असा वास येतो त्याचा संबंध आपण पावसाशी जोडतो. हे जीवाणू ओलाव्यात वाढतात मात्र जमीन पावसाच्या पाण्याने भिजून माती कोरडी व्हायला लागली की सुगंध हवेत सोडतात.

 

rainy-inmarathi.
steemit.com

पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास निर्माण होतो. वातावरणातील रसायनांमुळे विशेषतः शहरी भागांतील पावसाचे पाणी काही प्रमाणात आम्लधर्मी बनते.

हे पाणी मातीवर पडल्यानंतर त्या आम्लधर्मी पाण्याशी मातीतील रसायनांची अभिक्रिया होते व सुवास निर्माण होतो. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीतील माती मोकळी होते. भूगर्भातील खनिजे या पाण्याने सुटी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते. त्यामुळे अतिशय वेगळा उग्र वास येतो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. या अभिक्रियेतून येणारा वास हा विचित्र दर्प असल्यासारखा असतो.

म्हणूनच पाऊस पडल्यावर येणारा वास हा प्रत्येक वेळी सुवास नसतो. जीवाणूंच्या स्पोअर्समुळे येणाऱ्या सुगंधासारखाच हा दर्प सुद्धा लक्षणीय असतो.

याशिवाय पावसामुळे तिसऱ्या प्रकारचा वासही तयार होतो. हा वास वनस्पती व झाडे जे तेल उत्सर्जित करतात त्यापासून निर्माण होतो. हे वनस्पतींनी उत्सर्जित केलेले तेल खडकावर पडते. त्या तेलाची सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया होते आणि वायू उत्सर्जित होतो.

हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.

 

rainfall-head-inmarathi
geek.com

हे काही सर्वसाधारणपणे पावसानंतर जमिनीतून येणारे वास आहेत. याशिवाय देखील इतर काही पावसानंतरचे वास असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींशी पावसानंतरच्या गंधांबद्दल बोलत असाल तेव्हा कदाचित तुम्हाला एक सांगायचं असेल आणि तुमच्या मित्राला काही वेगळंच वाटत असेल पण पावसानंतर वातावरणात एक विशिष्ट सुवास भरून राहिलेला असतो यावर तुमचं निश्चितच एकमत होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *