फाशीची शिक्षा दिल्यानंतर जज साहेब पेनाची निब का तोडतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

आपल्याकडे फाशीची शिक्षा हि अगदी दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे “रेअरेस्ट ऑफ द रेअर” गुन्हा केल्यास देण्यात येते. कोर्टात अशी पद्धत आहे कि फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायमूर्ती महोदय ज्या पेनाने फाशीच्या शिक्षेबद्दल न्यायालयीन कागदपत्रांवर लिहिले जाते त्या पेनाची निब आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच तोडून टाकतात.

ह्याचे कारण काय असावे ?

जजसाहेबांसारखी मोठ्या हुद्द्यावरची व्यक्ती ही कृती आवर्जून करत असेल तर त्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. आज आपण हेच कारण जाणून घेणार आहोत.

मृत्युदंड हा कायदा किंवा नियम नाही तर नियमांना एक अपवाद आहे. म्हणजेच जेव्हा सर्व नियम व कायदे मोडल्याची परिस्थिती निर्माण होते तसेच जेव्हा दुसरा कुठलाच उपाय किंवा मार्ग उरत नाही तेव्हाच अपवादात्मक केसेसमध्ये व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा मिळते.

एखाद्याने आपत्कालीन परिस्थितीत अचानकपणे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी किंवा रागाच्या भरात कुणाचा जीव घेण्याचा अपराध केला असेल तर त्याला हॉट ब्लडेड मर्डर म्हणतात. आणि एखाद्याने ठरवून, व्यवस्थित योजना आखून एखाद्याचा जाणीवपूर्वक जीव घेतला तर त्याला कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतात.

 

murder-inmarathi
deccanchronicle.com

कोल्ड ब्लडेड मर्डर करणे जास्त कठीण काम आहे कारण हा अपराध करणारा शांत व थंड डोक्याने सगळी योजना आखत असतो आणि नंतर गुन्हा केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्याचीही त्यांच्या डोक्यात योजना तयार असते.

कुणाचाही जीव घेणे हे नॉर्मल माणसासाठी अत्यंत अवघड असते.

जरी खून करणे कायद्याला मान्य असते तरीही नव्वद टक्के लोकांनी आयुष्यात कधीही कुणाचा खून केला नसता. आपला राग शांत करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी नॉर्मल लोकांनी दुसरा कुठलाही मार्ग शोधला असता परंतु कुणाचा जीव घेणे नॉर्मल लोकांना शक्य नाही.

कोल्ड ब्लडेड मर्डर करणारे लोक एकतर खुनशी असतात किंवा विकृत किंवा मानसिक रुग्ण तरी असतात.

परंतु हेच काम आर्मी मध्ये असणाऱ्यांना किंवा फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या जज साहेबांना आयुष्यात अनेकदा “कामाचे स्वरूप” म्हणून करावे लागते.

आर्मीमधल्या लोकांना देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांना किंवा शत्रू देशाच्या सैनिकांना नाईलाजाने मारावे लागते. असे असले तरी कितीतरी लोकांना युद्धानंतर मानसिक आधाराची किंवा कौन्सेलिंगची गरज पडते.

शांतपणे फाशीची शिक्षा सुनावताना मात्र जजसाहेबांच्या मनात मात्र काय उलथापालथ घडत असेल हे तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसे कल्पनाही करू शकत नाहीत.

कितीही म्हटले की ते कामाचे स्वरूप आहे, त्यांना सामाजिक स्वास्थ्यासाठी तसेच पीडितांना न्याय मिळावा ह्यासाठी असे करावेच लागते, तरीही न्यायाधीश हि सुद्धा हाडामांसाची माणसेच असतात.

त्यांनाही मन व भावना असतात. शिक्षा करताना मन कितीही कठोर केले तरी एखाद्याचा जीव घ्यावा असा आदेश देताना त्यांच्या मनालाही कुठेतरी अपराधी वाटतच असणार.

 

sentenced-to-death-inmarathi
thefinancialexpress.com

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पेनाची निब तोडणे हा काही न्यायालयाचा नियम नव्हे तर ही एक परंपरा आहे. ह्या परंपरेला एक प्रतीकात्मक बाजू आहे तर एक भावनिक बाजू सुद्धा आहे. तुमच्या समोर कितीही धूर्त, कावेबाज, दुष्ट व हिंसक अपराधी असला तरीही तुम्ही मानसिकरित्या नॉर्मल असलात तर तुमचे हात अश्या विकृत व्यक्तीलाही मृत्युदंड सुनावताना थरथरतीलच.

ज्या जजने सर्वात पहिल्यांदा मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर निब तोडली असेल ती त्यांनी मुद्दाम न तोडता चुकून त्यांच्या हातून तुटली असेल. कदाचित त्यांचे हात इतक्या टोकाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यावेळी थरथरलेच असतील.

इतकी टोकाची शिक्षा सुनवावी लागल्यामुळे जजसाहेब भावनावश झाले असतील आणि भावनेच्या भरात त्यांच्या हातून पेनाची निब तुटली असेल असा तर्क काही लोक ह्याबाबतीत करतात.

खरे तर असे कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नाही. ह्या पद्धतीबाबत अनेक ठिकाणी फक्त विविध थियरीज दिल्या आहेत. ह्यातले काय सत्य आणि काय काल्पनिक आपण सांगू शकत नाही कारण हा कायदा नाही तर काळाच्या ओघात एक प्रथा तयार झाली आहे. आजही कुठले न्यायाधीश जर फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर निब तोडत नसतील तर ते कायद्याचे उल्लंघन ठरणार नाही.

भारतात ही प्रथा ब्रिटिशांच्या राज्यापासून अस्तित्वात आली. ब्रिटीश न्यायाधीश आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पेनाची निब तोडत असत. हि प्रथा भारतात सर्वात पहिल्यांदा कुठल्या जजने सुरु केली ह्याची माहिती उपलब्ध नाही.

 

pen-nib-inmarathi
dailysocial.com

एखाद्या केसचा निकाल लागल्यानंतर ,शिक्षा सुनावल्यानंतर कोर्ट functus officio होते म्हणजेच कोर्टाचे अधिकार समाप्त होतात. त्यानंतर कोर्ट एखाद्याची शिक्षा कमी किंवा वाढवू शकत नाही.

एकदा फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जजसाहेबांना त्यात बदल करण्याचे अधिकार उरत नाहीत.

म्हणजेच शिक्षेच्या आदेशावर जजसाहेबांनी हस्ताक्षर केले कि विषय संपला. निब तुटली. म्हणजेच प्रतीकात्मकरित्या असे आहे की एकदा शिक्षा सुनावल्यानंतर मृत्युदंड देणारे जजसुद्धा त्यांना कितीही वाटले तरी हा निर्णय रद्द किंवा बदलू शकत नाहीत.

ह्यामागे अशी एक श्रद्धा सुद्धा आहे कि ज्या पेनाने एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा आदेश देण्यात आला आहे, त्या पेनाचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही कामासाठी केला जाऊ नये.

म्हणजेच ज्या लेखणीने एखाया व्यक्तीला मृत्यू दिला आहे, ती लेखणी नष्ट करून टाकणेच योग्य आहे जेणे करून ती लेखणी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये.

 

what-happens-after-death-inmarathi01
sideeffectspublicmedia.org

ह्याबाबतीत आणखी एक थिअरी अशी सांगतात की ज्या पेनाने जजसाहेबांनी मृत्युदंडाची शिक्षा लिहिली, तो पेन सतत त्यांना आपल्या निर्णयाची आठवण करून देत राहील.

जेव्हा जेव्हा हे जजसाहेबांना आठवेल तेव्हा त्यांना “ती शिक्षा देणे कितीही न्याय्य व योग्य” असले तरीही एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा आपण आदेश दिला आहे ह्या भावनेने दु:खी व अपराधी वाटत राहील.

म्हणूनच तो पेन त्या क्षणीच नष्ट करून टाकणे योग्य आहे. माणूस कितीही नीच असला तरीही त्याचा मृत्यू आपल्या आदेशानुसार होणे ह्याचे दु:ख जजसाहेब निब तोडण्याद्वारे व्यक्त करतात.

तसेच समाजातील कुठल्याही व्यक्तीने परत अशी वेळ आणू नये असा त्यात एक सूचक संदेश असतो. किंवा आता निकाल दिल्यानंतर ह्या केसशी आपला काही संबंध उरलेला नाही असा संदेश जजसाहेब ह्या कृतीतून संदेश देत असावेत.

 

judge-inmarathi
patrika.com

तुमच्यापैकी काही प्रॅक्टिकल लोकांना असे वाटेल की ह्यात जजला इतकं इमोशनल होण्यासारखं काय आहे? हे तर त्यांचे कामच आहे.

परदेशात काही ठिकाणी मृत्युदंड फाशी देऊन नाही तर इलेक्ट्रिक चेअरद्वारे दिला जातो. त्या इलेक्ट्रिक चेअरजवळ पाच स्विचेस असतात. परंतु पाच पैकी एकाच स्वीचचे कनेक्शन इलेक्ट्रिक चेअरला जोडलेले असते.

मृत्युदंड देणाऱ्या पाच लोकांनी हे पाच स्वीच एकदम दाबायचे असतात. ह्या पाचही लोकांना नेमक्या कुठल्या स्वीचचे कनेक्शन चेअरला जोडले आहे हे माहित नसते त्यामुळे कुणालाच कळत नाही की कोणाच्या स्वीचमुळे आरोपीचा मृत्यू झाला. ही सगळी व्यवस्था फक्त लोकांना अनावश्यक अपराधी भावना येऊ नये ह्या साठी असते.

कारण माणूस कितीही प्रॅक्टिकल असला तरीही आपल्यामुळे एखाद्याचा जीव जातोय हे माहित असताना त्याला अपराधी भावना मानसिक त्रास देतेच हे नक्की!

ही निब तोडण्याची प्रथा म्हणजे अपराधी भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “फाशीची शिक्षा दिल्यानंतर जज साहेब पेनाची निब का तोडतात?

 • July 2, 2019 at 8:59 am
  Permalink

  मला खूप चांगली माहिती मिळत असून यामुळे आता
  मला शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न
  नोकरी संदर्भ काही तरी मार्गदर्शन अपेक्षित आहे
  धन्यवाद।।।।।।।,,,,,,,,,

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?