' प्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीयांसाठी : चांद्रयान-२ मोहीम अचानक रद्द होण्यामागचं कारण – InMarathi

प्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीयांसाठी : चांद्रयान-२ मोहीम अचानक रद्द होण्यामागचं कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रात्री सगळं जग शांत झोपलेलं असताना काही जणांच्या हृदयाचे ठोके जलद पडत होते. घड्याळाच्या टिकटिक आवाजाबरोबर काळजाचा ठोका देखील अगदी आपला आपल्याला ऐकायला येईल इतकी उत्सुकता ताणली गेली होती.

बाकी जग जेव्हा क्रिकेटच्या विश्वचषकाचा सामना आणि विम्बल्डन पुरुष अंतिम सामना यात मश्गूल होते तेव्हा भारताच्या श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ चांद्रयान २ मोहिमेचा काउंटडाऊन चेक करत होते.

इकडे जोकोविचने फेडररला हरवून विम्बल्डन विजेतेपद खिशात घातले तर विश्वचषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरून इंग्लंड जोरदार सेलिब्रेशन करू लागले.

भारतीय मंडळी दोन्ही थरार अनुभवून मध्यरात्री झोपेच्या आधीन झाली पण खूप जणांना अर्थातच अजून एक थरार अनुभवायचा होता म्हणून ती मंडळी जागीच होती.

 

final inmarathi
indiatoday.com

पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान २ अवकाशात झेपावणार होते. गेली २ वर्षे खूप मेहनत घेऊन इस्रोचे शास्त्रज्ञ अखेरीस जेमतेम तासाभरात होणाऱ्या उड्डाणावर लक्ष ठेवून होते.

GSLV MK 3 हे प्रक्षेपक यान आपल्या महत्वाकांक्षी मोहिमेसाठी सज्ज होत होते. कॉम्प्युटरवर मॉनिटरिंग सुरू होते..

आता बरोब्बर एक तास उरला होता. सगळेजण विलक्षण उत्तेजित अवस्थेत होते कारण ही मोहीम पार पाडणारा जगातील केवळ चौथा देश ठरणार होता भारत आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोचणारा जगातील पहिलाच देश ठरणार होता भारत!

सगळेच तंत्रज्ञ डोळ्यात तेल घालून निरीक्षण करत असताना अचानक एका तंत्रज्ञाच्या नजरेस एक लहानशी चूक नजरेस पडली आणि क्षणार्धात सगळीकडे संदेश गेला.

प्रक्षेपणास जेमतेम तासभर उरलेला असताना ही मोहीम थांबवण्यात आली.

 

final inmarathi
The Indian Express

अशा प्रकारे मोहीम अबॉर्ट करणे हे या फिल्ड मध्ये नवीन नाही. अगदी नासा असेल किंवा रशियाची स्पेस एजन्सी असेल कोणीही कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीत.

मग तो छोटासा तांत्रिक बिघाड असेल वा नॅनो सेकंदांचा वेळेत फरक असेल कोणतीही स्पेस एजन्सी हा धोका पत्करत नाही.

यापूर्वीदेखील कोणतेही बिघाड नसताना सर्व काही व्यवस्थित असतानाही प्रक्षेपणानंतर यान कोसळण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळेच अगदी बारीकसा बिघाड देखील दुर्लक्षित करून चालत नाही.

कल्पना चावलाचा अपघात सर्वांना आठवत असेलच.

ती तर मोहिमेवरून परतत असताना यानाच्या बाहेरील उष्णतारोधक टाईल निखळल्याने पृथ्वीवर परतताना यानाचे तापमान वाढून यानाने पेट घेतला होता आणि कल्पना चावला मृत्युमुखी पडली.

या प्रकारचे अपघात केव्हाही होऊ शकतात म्हणूनच अत्यंत काटेकोरपणे सर्व नियोजन केले जाते. आता पुन्हा जीएसएलव्ही मार्क ३ चे उड्डाण केव्हा होईल ते सांगता येत नाही.

 

final inmarathi
The Indian Express

मुळात हे मिशन अचानक थांबवावे लागले याचे कारण काय? तर असे सांगितले जाते की इंधन भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही मोहीम थांबवावी लागली.

उड्डाण करण्यासाठी हवामानाची अनुकूलता असावी लागते. त्यासाठी रडारच्या साह्याने चांगले हवामान केव्हा मिळेल याची आकडेमोड करून दोन तीन तारखा काढल्या जातात.

आपल्याकडे लग्न मुंज किंवा इतर चांगल्या गोष्टींसाठी मुहूर्त काढला जातो तसाच मुहूर्त हवामानाचा सुद्धा काढला जातो. यालाच विंडो असे म्हटले जाते.

ही विंडो १४ व १५ जुलै अशी मिळाली होती. पुढील विंडो २८ व २९ जुलै असेल असे ऐकिवात आहे. परंतु आत्ताच त्याबद्दल काही सांगता येणार नाही.

आत्ताच्या परिस्थितीत सर्वप्रथम इंधनाच्या टाक्या मोकळ्या करून यानाचे इंजिन तसेच प्रक्षेपकाची पूर्ण तपासणी करून बिघाड दुरुस्त केला जाईल आणि त्या नंतरच प्रक्षेपणाची तारीख कळवली जाईल असे इस्रोने सांगितलंय.

यासाठी दहा दिवस किंवा महिना देखील लागू शकतो.

 

chandrayan inmarathi
Zee News

चांद्रयान मोहीम ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

१५ ऑगस्ट १९६९ मध्ये विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इस्रोने म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अनेक अवघड मोहीम सफलतेने पार पाडल्या आहेत.

सुरवातीच्या काळात सायकलवरून किंवा बैलगाडीतून सुटे भाग वाहून नेणारी म्हणजे अगदीच बाल्यावस्थेत गरीब असलेली संस्था जेव्हा आपल्या उपग्रहासोबत इतर देशांच्या उपग्रह वाहून नेऊन अंतराळात प्रस्थापित करते तेव्हा आपल्या देशासाठी ही प्रचंड अभिमानाची बाब असते.

गेल्यावर्षी तर एकाचवेळी १०४ उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत प्रस्थापित करून इस्रोने जगाच्या पुढेच आपले पाऊल टाकले.

जे या क्षेत्रातील दादा असलेल्या अमेरिकेच्या नासाला जमले नाही ना रशिया अथवा चीनला जमले ते भारताने करून दाखवले.

चांद्रयान मोहीम एक आखण्यात आली तेव्हा अमेरिका किंवा इतर देशांना भारताला अंतराळ मोहिमेत यश मिळेल असे वाटले नव्हते, पण भारतात तयार केलेल्या पी एस एल व्ही सी 2 या प्रक्षेपकाने २२ ऑक्टोबर २००८ ला यशस्वी उड्डाण केले आणि ४ नोव्हेंबर २००८ ला ते चंद्राच्या कक्षेत पोचले.

 

pslv-indian-inmarathi
livemint.com

यानाची गती मंद करून १४ नोव्हेंबरला त्यातील मुन इम्पॅक्ट प्रोब चंद्रावर आदळवून भारताने अशी मोहीम राबवून आपला तिरंगा चंद्रावर रोवला. (प्रोबच्या चारही बाजूना तिरंगा कोरलेला होता.) अशी कृती करणारा जगातील चौथा देश ठरण्याचे भाग्य भारतास लाभले.

त्या प्रथम मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर असलेली माती, पाणी, बर्फ या सर्वांचाच अभ्यास करून ही माहिती छायाचित्रे व दृश्यचित्रे यांच्या माध्यमातून पृथ्वीवर भारतात पाठवली गेली आणि त्यावरच चांद्रयान २ मोहीम आधारित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आणखी नवीन माहिती या दुसऱ्या मोहिमेत गोळा केली जाणार आहे.

आता आपले यान चंद्राच्या दक्षिण धृवाजवळ उतरणार असल्याने तो देखील विक्रमच असणार आहे कारण अद्याप पावेतो कोणत्याच देशाला ही कामगिरी जमली नाहीय.

आता इस्रो नवीन तारीख लवकरच जाहीर करेल.

ही मोहीम तात्पुरती एका छोट्याशा कालावधीसाठी थांबवण्यात आली असल्याने कोणीच नाराज व्हायचे कारण नाही.

 

missile inmarathi

 

नासाने तर १० असफल मोहिमानंतर अपोलो ११ मोहिमेतून चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले होते. आपण तर पहिल्याच मोहिमेत यश प्राप्त केले हे विसरता कामा नये.

इस्रोच्या चांद्रयान मोहिम २ साठी आणि नंतर लागोपाठ सुरू होणाऱ्या मंगळ, शुक्र व सूर्य या नवीन मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?