' तुमच्या वेदना दूर करणा-या कॅप्सूलबाबतची ही खास बाब तुम्हाला नक्कीच माहित नसेल… – InMarathi

तुमच्या वेदना दूर करणा-या कॅप्सूलबाबतची ही खास बाब तुम्हाला नक्कीच माहित नसेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आजारी पडल्यावर डॉक्टर जी काही औषधे देतात, त्यात बऱ्याचदा एक तरी कॅप्सूल असतेच आणि आपणही कॅप्सूल दिली म्हणून खुश होतो, कारण एकतर तिचा स्वाद गोळ्यांप्रमाणे कडू नसतो. सरळ तोंडात घातली की पोटात जाऊन स्थिरावते, त्यामुळे कडू औषध वगैरे खाल्ल्याचा फीलही येत नाही.

पण काय हो, या अश्या कॅप्सूलबद्दल एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आली आहे का? आम्ही कॅप्सुलाच्या रंगाबद्दल म्हणतोय…!

तुम्ही देखील पाहिलंच असेल की कॅप्सूल नेहमी दोन रंगात असते, वरच्या बाजूस एक रंग असतो आणि खालील बाजूस एक रंग असतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल, कॅप्सूल रंगीबेरंगी किंवा आकर्षक दिसावी म्हणून दिला असेल रंग….पण विश्वास ठेवा खरंच असं नाही आहे.

कॅप्सूलवर असणाऱ्या दोन रंगामागे देखील लॉजिक आहे.

 

capsules-marathipizza01
vitakem.com

हे लॉजिक जाणून घेण्यापूर्वी प्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे की कॅप्सूलची निर्मिती प्रकिया काय आहे. त्यापूर्वी तुम्हाला अजून एक धक्कादायक गोष्ट सांगतो-

कधीतरी कॅप्सूल उघडून बघा, तुम्हाला दिसेल की बाहेरून एकाच आकाराचे वाटणारे कॅप्सूलचे दोन्ही भाग प्रत्यक्षात मात्र एकसारखे नाहीत. एक भाग मोठा आहे, तर दुसरा लहान.

तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल की मोठ्या भागात लहान भागापेक्षा जास्त औषध आहे.

याचाच अर्थ हा की मोठा भाग म्हणजे कंटेनर असून लहान भाग ही कॅप्सूलची कॅप (झाकण) आहे.

 

capsules-marathipizza02
rvcj.com

आता आपण पुन्हा कॅप्सूलच्या निर्मिती प्रक्रियेकडे वळूया. कॅप्सूल तयार करताना कॅप्सूल फिलिंग मशीनचा वापर केला जातो. या मशीनमध्ये मोठा भाग अर्थात कंटेनर खाली ठेवला जातो. त्यानंतर त्यात औषध भरले जाते, औषध भरून झाल्यावर त्यावर कॅप्सूलचा लहान भाग अर्थात कॅप बसवली जाते.

तर अशी ही निर्मिती प्रक्रिया लाखो कॅप्सूल बनवताना गुंतागुंतीची ठरेल, जर कॅप्सूलचे दोन्ही भाग हे एकाच रंगाचे असतील, जरी त्यांचे आकार लहान मोठे असले तरी एकाच रंगाच्या कॅप्सूलमुळे गोंधळ उडण्याची जास्त शक्यता आहे.

म्हणूनच निर्मितीप्रक्रियेमध्ये काही गोंधळ होऊ नये. कॅप्सूल योग्यरीतीने भरली जावी म्हणून कॅप्सूलच्या दोन भागांना वेग वेगळा रंग दिला जातो.

 

capsules-marathipizza03

दुसरं एक सायकोलॉजिकल कारण म्हणजे, लहान मुल औषधाच्या गोळ्या खाताना कुरकुर करतात. पण रंगीबेरंगी कॅप्सूल मात्र त्यांना एखादी टॉफी वा चॉकलेट सारखी भासते आणि ते कोणतीही कुरकुर न करता तिचे सेवन करतात.

म्हणजे एक प्रकारे लहान मुलांना भुलवून त्यांच्या पोटात औषध ढकलण्याचे काम ही रंगीबेरंगी कॅप्सूल करते.

अजून एक व्यावसायिक कारण म्हणजे जर एखादी कंपनी विविध आजारांसाठी विविध कॅप्सूल बनवत असेल आणि त्यांनी प्रत्येक कॅप्सूल मध्ये एकाच रंगाचा वापर केला, तर कोणती कॅप्सूल कोणत्या आजारासाठी आहे हे ओळखण्यात गफलत होऊ शकते. म्हणून कंपन्या देखील विविध रंगाच्या कॅप्सूल बनवण्यावर भर देतात, जेणेकरून कॅप्सूलचा केवळ रंग पाहून कॅप्सूल कोणत्या आजारावरची आहे हे ओळखता येऊ शकते.

सोबतच ती कॅप्सूल कोणत्या कंपनीची आहे हे देखील ग्राहकाच्या लक्षात राहते. (सदर व्यावसायिक कारण किती खरं आहे याबद्द्द्ल मात्र शंका आहे.)

capsules-marathipizza04
ldoceonline.com

असं आहे हे कॅप्सूलच्या रंगाचं फारसं कोणाला माहित नसलेलं प्रकरण!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?