बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लहानपणी एसटी बस ने प्रवास करताना कंडक्टरकाकांच्या खांद्यावरची ती तिकीटांची बॅग पाहून कायम कुतूहल वाटायचे. तसेच तिकीट काढताना ते कायम त्या तिकिटांना त्यांच्याकडच्या पंचिग मशीन ने बारीक बारीक छिद्रे पाडून द्यायचे.

तिकिटांना छिद्रे पाडण्यामागे काय कारण किंवा लॉजिक असेल ह्याचे आपल्यापैकी अनेकांना कायम कुतूहल वाटते.

आता तर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आल्यापासून ते साधे तिकीट मिळणे फार कमी झाले आहे. परंतु जेव्हा जेव्हा साधे तिकीट मिळते तेव्हा त्यांना छिद्रे पाडलेली असतात.

आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ह्यामागे कारण असू शकेल?

वेगवेगळ्या शहरांत किंवा महामंडळातील तिकिटे वेगवेगळ्या प्रकारची असतात. परंतु सर्वच तिकिटांवर काही माहिती मात्र सारखीच असते.

ती म्हणजे एकूण प्रवास भाडे, सिरीज नंबर (प्रत्येक सिरीजमध्ये ९९९९९९ इतकी तिकिटे असतात), सिरीयल नंबर, तिकीटाची वैधता दर्शवण्यासाठी काहीतरी खुण व बस सेवा देणाऱ्यांची माहिती. तसेच तिकीट काढतानाची तारीख व वेळ अश्या गोष्टी तिकिटावर असतात.

मॅन्युअल तिकिटांवर स्टेज नंबर असतात. प्रवासी जितक्या स्टेजेस प्रवास करतील त्यानुसार प्रवाश्यांना भाडे आकारणी होते. ह्या स्टेजेसचे भाडे साधारणपणे महामंडळ ठरवते. दोन स्टेजेस मध्ये किती अंतर आहे ह्यावर हे भाडे ठरते.

तसेच बस सेवा कुठली आहे म्हणजे साधी आहे की आराम की निमआराम बस आहे ह्यावर सुद्धा भाड्याचा दर ठरतो.

 

conductor-punch-ticket-inmarathi
mid-day.com

ह्या प्रवासाच्या स्टेजेसना नंबर दिलेले असतात. आणि हे स्टेज नंबर्स बदलत नाहीत. म्हणजेच बस जर मुंबईहून नागपूरला जात असेल तर मुंबई स्टेज १ असेल आणि नागपूर स्टेज १० (फक्त उदाहरण म्हणून बघा).

आता हीच बस नागपूरहून मुंबईला परत जात असेल तरी स्टेज नंबर बदलत नाहीत. मुंबई ही स्टेज १ व नागपूर हे स्टेज १०च राहील.

कंडक्टरला प्रत्येक स्टेजच्या शेवटच्या थांब्यानंतर ती स्टेज “क्लोज” करावी लागते. उदाहरणार्थ A ते J असा दहा थांब्यांचा एक सेक्शन आहे. त्यात A स्टेज १ आहे , D ही स्टेज २ आहे , G ही स्टेज ३ आहे व J ही स्टेज ४ आहे. तर कंडक्टरला C ह्या थांब्यानंतर स्टेज क्लोज करावी लागेल.

स्टेज क्लोज करण्यासाठी कंडक्टर C ह्या थांब्यापर्यंत विकल्या गेलेल्या तिकिटांचा सिरीयल नंबर त्याच्याकडच्या नोंद वहीत लिहून ठेवतात. ही सिस्टीम तिकीट विक्रीचा एक विशिष्ट पॅटर्न कायम ठेवण्यासाठी वापरली जाते.

परंतु बेस्ट आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील बस सेवा ही क्लोज करण्याची सिस्टीम वापरत नाहीत. हे कंडक्टर जितक्या तिकिटांची विक्री झाली आहे त्यांची एन्ट्री अगदी शेवटी त्यांच्याकडच्या नोंदवहीत करतात.

काही महामंडळात तिकिटांवर “फ्रॉम” स्टेज आणि “टू” स्टेज लिहिलेली असते तर काही तिकिटांवर फक्त “फ्रॉम” स्टेज लिहिलेली असते.

तर काही महामंडळातील तिकिटांवर स्टेज नंबर दिलेलेच नसतात. आपले महाराष्ट्र राज्य महामंडळाचे व KSRTC चे बस तिकीट जवळपास सारखेच असते. ह्यात जे एक ते नऊ हे जे नंबर आहेत ते स्टेज नंबर आहेत.

 

conductor-punch-ticket-inmarathi01
mindlessmumbai.com

ह्या तिकिटावर कंडक्टर १९९ व्या स्टेज पर्यंत पंच करू शकतात. १९९ साठी ते डावीकडे सर्वात वरच्या १ ह्या आकड्यावर पंच करतात.

उदाहरणार्थ एखाद्या प्रवाष्याचे तिकीट हे १०३ ते ७५ ह्या स्टेजपर्यंतचे असेल तर कंडक्टर तिकिटावरील डाव्या बाजूला “पासून”च्या बाजूला जो १ हा आकडा आहे त्यावर पंच करतील तसेच त्याच कॉलममधील ० व ३ ह्या आकड्यांवर पंच करतील आणि उजवीकडे “पर्यंत” चा जो कॉलम आहे त्यातील ७ व ५ ह्या आकड्यांवर पंच करतील.

अनेक महामंडळात फक्त “फ्रॉम” स्टेज पंच करण्याची पद्धत आहे. ह्यातसुद्धा अनेक पद्धती आहेत. मुंबईत बेस्टमध्ये प्रवास करणाऱ्यांनी पाहिले असेल तर तुमच्या अप च्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते तर त्याच दोन ठिकाणांदरम्यानच्या डाऊनच्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते.

बेस्टची ही पद्धत महाराष्ट्रातील अनेक शहर बस सेवा महामंडळात वापरली जाते.

अप आणि डाऊन प्रवासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पंच करावे लागते. प्रवासाच्या दिशेनुसार स्टेज नंबर पंच केला जातो. तर काही ठिकाणी जसे की TNSTC कोइम्बतुरमध्ये कंडक्टर हे स्टेज नंबरच्या ठिकाणी छोटासा कट देतात.

 

conductor-punch-ticket-inmarathi02
mumbai-magic.blogspot.com

ह्यात डावीकडचा कॉलम डाऊनसाठी तर उजवीकडचा अपसाठी आहे. ज्या स्टेजचे तिकीट असेल तिथे कंडक्टर छोटासा छेद देतात. MTC चेन्नईच्या तिकिटांवर सुद्धा अश्याच पद्धतीने छेद देतात.

तसेच अपच्या दिशेने प्रवास असेल तर तिकिटाच्या डाव्या बाजूस वरती छेद देतात आणि डाऊनच्या दिशेने प्रवास असेल तर उजव्या बाजूला वरती छेद देतात.

तर KeSRTC चे कंडक्टर लोक ज्या स्टेजचे तिकीट आहे त्या नंबरवर एक खूण करतात. तर TNSETC च्या तिकिटावर स्टेज नंबर सह चिल्ड्रन, अडल्ट, लगेज, कॉम्बिनेशन असे चार बॉक्स असतात. तुम्ही जसा प्रवास कराल त्याप्रमाणे त्या त्या बॉक्स मध्ये पंच केलेले असते.

प्रत्येक ठिकाणची पंचिंगची पद्धत वेगवेगळी असते. आपल्याला समजायला थोडी कठीण आहे परंतु कंडक्टर लोकांसाठी हे नेहमीचे काम आहे. त्यामुळे ते अगदी झोपेत सुद्धा तुमचे तिकीट फाडू शकतात.

तर पुढच्या वेळी तिकीट काढल्यावर तुमच्या कंडक्टर काकांनी तिकिटाला कुठे आणि का छिद्रे पाडली आहेत हे तुम्ही आता समजून घेऊ शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?