मेघालयातल्या या गावात मुलांना नावेच नसतात, तर असते एक विचित्र ओळख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशातलंच मेघालय राज्यातलं एक छोटंसं गाव जिथली लोकवस्ती आहे ७००.  इथली एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे जन्मलेल्या एकाही व्यक्तीला किंवा मुलाला त्याच्या नावाने ओळखले जात नाही.

म्हणजे त्याचं बारसं होत नाही आणि नाव ठेवलं जातं नाही. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं ना?

निनावी माणूस, आजपर्यंत तरी आपल्यापैकी कोणी ऐकलं नसावं. पण ही एक अनेक वर्षांपासून त्या गावामध्ये चालत आलेली प्रथा आहे. ह्या प्रथेला आपण हसून त्याची खिल्ली सुद्धा उडवू. पण ह्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन आल्यावरच आपल्याला खरे वाटेल.

मेघालयमधल्या पूर्व खासी ह्या डोंगराळ भागातल्या घनदाट जंगलात वसले आहे हे छोटे गाव. ह्या डोंगराळ भागात अनेक गावे वसली आहेत त्यामध्ये सगळ्यात विलक्षण असे हे गाव आहे. त्या गावचे नाव आहे ‘काँगथोन्ग’.

 

kongthong-inmarathi
amazingworldreality.com

ह्या गावात राहणाऱ्या लोकांची संख्या ७०० च्या आसपास असेल. इथल्या लोकांनी बांधलेली घरे विलक्षण आहेत, त्यावर रांगोळी सारखे ठिपके ठिपके आहेत. ही घरे शेताच्या जवळच उभी केलेली आहेत त्याला टुमदार झोपडीच म्हणता येईल. ह्या घरांभोवती सुपारीच्या झाडांची झालर शोभून दिसते.

ह्या लोकांचा मुख्य उद्योग म्हणजे शेती करणे आणि जंगलात जाऊन शिकार करणे.जंगलातच वसलेले हे टुमदार गाव असल्याने शिकार करून आणून त्या प्राण्यांचे मांस हे अन्न. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव त्यामुळे अतिशय शांत असे ह्या लोकांचे जीवन.

हे गाव म्हणजे ध्वनींचे गाव म्हणता येईल. इथे कोणी कोणाला नावाने ओरडून हाक मारत नाही.

जसे पाण्याने भरलेल्या वेग वेगळ्या आकाराच्या भांड्यांवर आपण काठीने मारले तर वेगवेगळे ध्वनी तरंग आपल्याला ऐकू येतात. तसेच वेगवेगळे अंगाई गीतासारखे गुणगुणले जाणारे ध्वनी (Tune) लोकांच्या तोंडून ऐकायला येतात.

अंगाई गीते गाताना बाळाला झोप लागल्यावर तोंड बंद ठेऊन आई तेच गीत हुंकारांनी (Humm) गुणगुणते त्याच प्रमाणे इथली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हाक मारताना गुणगुणते आणि ती व्यक्ती लगेच त्या गुणगुणण्याला प्रतिसाद देते. म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला पडतो.

ह्या गुणगुणण्यात समोरच्या व्यक्तीचे नाव असते. म्हणजेच ह्या गावातली ती आगळी वेगळी प्रथा आहे. ह्या गावात कोणालाही नाव घेऊन हाक मारली जात नाही तर जन्मतः च त्याच्या नावाऐवजी एक धून तयार केली जाते.

आपण जसे मुलाचे बारसे करून त्याचे नाव ठेवतो त्याचप्रमाणे ह्या गावातल्या मुलाच्या जन्मापूर्वी त्या मुलाची माता एक धून तयार करते. तीच धून त्या मुलाला जन्मानंतर सतत ऐकवली जाते. ती ऐकल्यावर तो मुलगा किंवा मुलगी धून म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रतिसाद देतो.

 

kongthong1-inmarathi
daily.social

म्हणजे जसें नावाने हाक मारल्यावर मूल आपल्याकडे वळून बघायला लागते आणि तेच नाव त्याच्या लक्षात राहून, हाक मारल्यावर तिकडे पाहते. तसेच ह्या गावातली पद्धत म्हणजे नावाऐवजी धून म्हटली जाते ( humming). ती धून ऐकू आली की मूल वळून बघायला लागते.

हळू हळू हीच धून त्याची ओळख ठरते. ही धून गुणगुणली गेली की त्या मुलाला हाक मारली अशी कायमची ओळख ही धून ठरली जाते.

ह्या धून मध्ये शब्द नसतात फक्त नादाची करामत असते आणि हीच नावाप्रमाणे ओळख होते ( ID ). अशी वेगवेगळ्या मुलांसाठी वेगवेगळी धून असते आणि तीच त्या मुलाची ओळख म्हणून वापरली जाते.

एक मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या व्यक्तीला, मुलांना बोलावण्यासाठीही धून गायली जाते. त्यामुळे शेतात काम करतांना सुद्धा कोणालाही बोलावणे शक्य होते. ही धून सतत वापरली जाण्यामुळे मुलांच्या सवयीची झाली आणि हीच सर्वमान्य झाली.

 

whistling-village-inmarathi
aleteia.org

पण दुर्गम भागात आणि जंगलाशी सतत संपर्क असल्यामुळे काही लोकांमुळे अंधश्रद्धा सुद्धा पसरली गेली. त्या लोकांचे असे म्हणणे आहे की ही धून जर कधी जंगलात राहणाऱ्या भूत पिशाच्च यांनी ऐकली तर ते पुन्हा ती धून त्या मुलाला किंवा व्यक्तीला बोलावण्यासाठी वापरतात.

भुतांनी जर ती धून वापरली तर ती व्यक्ती खूप आजारी पडते. आपल्याला ही अंधश्रद्धाच वाटते पण त्या लोकांचा ह्यावर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ते जंगलात गेल्यावर ही धून उच्चराताना काळजी घेतात.

पण ह्या प्रकारची शिट्टी वाजवून ते संकट काळात आपल्या जवळच्या व्यक्तीला, मित्राला सावध करू शकतात. जर कोणी चोर, दरोडेखोर आले असतील तर मदत मागण्यासाठी ह्या गाण्याचा वापर करता येतो आणि आपली सुटका करून घेता येते.

दरमासिअस रानी नावाच्या त्या गावातल्या सल्लागार व्यक्तीने सांगितले की ही धून आम्ही एका व्यक्तीसाठी निवडली तर ती आम्ही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरत नाही. जरी एखादी व्यक्ती मृत्युपावली तर तिची धून ही कोणा दुसऱ्याला देत नाही. ती धून त्या व्यक्तीबरोबरच बंद केली जाते.

उन्हाळ्याच्या दिवसात पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात हे गावातले लोक एक कार्यक्रम ठेवतात. त्या दिवशी सगळे लोक त्या चंद्रप्रकाशांत एकत्र येतात. मैदानात अग्नी पेटवला जातो आणि सगळ्या लग्न न झालेल्या तरुण तरूणींना एकत्र बोलावले जाते.

 

fire-inmarathi
asiasociety.org

तरूण मुलांना आपली आपली धून ही मोठ्या आवाजात सगळ्या गावासमोर म्हणायला सांगितली जाते. आणि जो तरुण ती धून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरात म्हणून दाखवेल त्याला त्याच्या लग्नाला ह्या कार्यक्रमात मुलगी निवडायचा मान दिला जातो आणि त्याचे लग्न जमवले जाते.

अशी ही ह्या गावाची विलक्षण पद्धत सगळ्यांना चकित करते. मेघालय भागात कधी जाण्याचा प्रसंग आल्यास ह्या गावाला भेट द्यायला विसरू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मेघालयातल्या या गावात मुलांना नावेच नसतात, तर असते एक विचित्र ओळख!

  • October 22, 2018 at 5:23 pm
    Permalink

    मस्तच.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?