“कंडोम आणू का?” : सातवीतला विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो तेव्हा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


लेखिका : मैत्रेयी गणपुले 

===

कोकणामधलं एक आटपाट नगर. गाव आणि शहर यांच्या मधलंच. तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे गजबजलेलं, तांत्रिकीकरणाकडे वेगाने जाणारं. आधुनिक होऊ पहाणारं. तिथे घडलेली एक घटना. एक माध्यमिक शाळा. इयत्ता ७ वीचा वर्ग.

वर्गावर शिक्षिका काहीतरी शिकवण्यात दंग आहेत. आणि वर्ग देखील शांत बसून ऐकत आहे.

इतक्यात काही मुलं दंग करतायत, त्यांचं शिकवण्याकडे लक्ष नाही असं शिक्षिकाबाईंच्या लक्षात येतं, आणि त्या त्या दोन्ही मुलांना वर्गाबाहेर जायला फर्मावतात.

नाईलाजाने बाईंच्या समोरून वर्गाबाहेर जाताना त्यातला एक मुलगा त्यांना विचारतो-

“आणि काय घरी जाऊन कंडोम घेऊन येऊ काय?”

 

Condom-man-inmarathi
womensrepublic.net

खाड्कन थोबाडीत मारल्यासारखा सगळा वर्ग सुन्न होऊन गोठतो!


खरोखरच त्या मुलाने थोबाडीत मारलेली असते, त्याच्या आई-वडिलांच्या शिकवणुकीवर, त्याच्या घराने दिलेल्या संस्कारांवर आणि त्याच्या आजवरच्या गुरूंनी त्याला दिलेल्या ज्ञानावर! एक सणसणीत चपराक!

 

teacher-flogging-student-inmarathi
Patrika.com

घटना एका आटपाट नगरातली असली तरी ही समस्या मात्र आता जागतिक झालेली आहे.

आणि दिवसेंदिवस ती अधिकाधिक विक्राळ होत चाललेली आहे. बलात्कारांचं वाढतं प्रमाण आणि तो होणाऱ्या मुलींचं आणि करणाऱ्या मुलाचं कमी होत चाललेलं वय आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करत आहे, केवळ पालक म्हणून आई बाबांवरच नव्हे तर एकंदरीतच बदलत जाणाऱ्या सामाजिक मूल्ये व समाजव्यवस्थेवरच!

साधारणपणे मुलं दोन अडीच वर्षांची झाली की त्यांच्या आयुष्यात टीव्ही या घटकाचा समावेश व्हायला लागतो. त्यावर आपली मुलं कार्टून्स म्हणजे नेमकं काय बघतात हा अभ्यासाचा विषय व्हावा अशी परिस्थिती आहे.

प्रत्येक कार्टूनमध्ये काहीना काही अतिरंजित घटना, भडक मारामारी किंवा दहशत निर्माण होईल असं काहीतरी आणि मग त्या सगळ्यातून सोडवणारा एक हिरो.

सगळ्या कार्टून्सचं दिसणं, वागणं, बोलणं, त्यांची वेशभूषा आणि डब केलेली असतील तर- ती दिव्य भाषा- एकूणच फार अंगावर येणारं वाटतं.

Tom&Jerry सारखी निखळ, निर्व्याज निष्पाप आणि सौम्य कार्टून मला तरी फारशी आढळली नाहीत. मुलाबरोबर कित्येकदा बसून मग हा निष्कर्ष काढला. बघवतच नाही.

सध्या घरातला टीव्ही पूर्ण बंद आहे आहे. आणि कार्टून्स बघून झाली, की रात्री विवाहबाह्य संबंध, खून, फसवणूक, भ्रष्टाचार, असल्या विषयांनी ठासून भरलेल्या ‘धन्य’ कौटुंबिक मालिका सुरु होतातच.

मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहिण्याची सुरुवातच या अशा गोष्टींनी व्हायला लागते.

त्यामुळे मुलांना कार्टून लावून देऊन पालक म्हणून आपली जबाबदारी संपत नसते तर त्यात नेमकं काय दाखवलं जातं, त्यांची आवड-निवड कुठल्या दिशेने जाते आहे याकडे बारीक लक्ष ठेवणं आवश्यक होऊन बसलं आहे.

 

Tom-and-Jerry-inmarathi00
cartoonnetwork.com

पूर्वी कोणत्याही कारणासाठी आई-बाबा किंवा अन्य कोणत्याही मोठ्या माणसाच्या अंगावर ओरडून बोलणं ही अयोग्य आणि चुकीची गोष्ट मानली जात होती. आणि ‘ताडयेत दशवर्षाणि’ हा समस्त पालकवर्गाचा मूलमंत्र होता.

मी सुद्धा लहानपणी बोलणी आणि फटके खाल्लेले आहेत. त्यामुळे आजही चुकीचं वागताना बोलताना ते फटके आठवून भीती वाटतेच.

आजही कोणतीही अयोग्य गोष्ट करू जाता, आईं-बाबांना आवडणार नाही, आजोबा ओरडतील असले धाक पाऊल अडवतात.

पण सध्या child psychology नावाचं एक प्रकरण, आणि दिवसभर कामासाठी घराबाहेर असणाऱ्या आयांच्या मनातलं मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचं guilt यामुळे “कुठे क्षुल्लक कारणासाठी ओरडायचं”, “रात्रीच काय ते भेटतो दिवसभरात, त्यातही सवयी कुठे लावत बसायच्या” या मानसिकतेतून आया ओरडून बोलाण्यासारख्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करतात.

त्यातूनच पुढे पालकांचा धाक वाटेनासा होण्याकडे पावलं पडायला लागतात. मुलांवर वचक राहणं हा प्रकार कमी होऊन ती बेलगाम होत जातात.

मुलांच्या मनात पालकांबद्दल दहशत नाही पण धाक निर्माण होणं आवश्यक आहे असं आता मी आई झाल्यावर मला पटत चाललेलं आहे.

स्त्रीला सन्मान देण्याची सुरुवात आणि सवय घरातल्याच आई-आजी-बहीण-काकू या नात्यांनी होत असते. दिवेलागणीला श्लोक म्हणून झाले की आधी आई-आजीला नमस्कार कर मग बाकी सगळ्यांना कर असं आजोबा का सांगत असतील त्याचं कारण आता कळतं.

“नुपूरं त्वाभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्”

ही लक्ष्मणाची परंपरा आणि विचार जर अशा लहान लहान घटनांमधून रुजवले गेले नाहीत, तर मग नंतर कितीही भाषणं ठोकली तरी त्याचा उपयोग होणार नसतो.

साधारणपणे माणसाची सामाजिक वर्तणूक ही घरच्या शिकवणुकीचा आरसा असते. घरात लागलेल्या सवयी आणि मिळालेले विचार घेऊनच माणूस समाजात वावरत असतो.

 

students-chanting-shlok-inmarathi
patrika.com

घराबाहेर पडून जेव्हा मुलं समाजात मिसळायला लागतात तेव्हा आजूबाजूची परिस्थिती ती पहात असतात, त्यातून विचार उचलत असतात.

अशावेळी जर शाळेत येणाऱ्या शिक्षिकाच जर त्यांच्या boyfriend च्या मागे bike वर बसून आणि स्पगेटी top घालून शाळेत येणार असतील तर बोलण्यासारखं काय उरतं?

बरं तरी बोलावं म्हटलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा! कोणत्याही सामाजिक संकेतांचं भान न ठेवता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली “मन:पूतं समाचरेत” असंच चित्र जर समाजात पाहायला मिळणार असेल तर वयात आल्यावर मुळातच उसळू पाहणाऱ्या तारुण्याला लगाम घालण्याचे आदर्श गवसायचे तरी कुठे?

बाकी इन्टरनेट आणि मोबाईलचे दुष्परिणाम, गैरवापर यावर वेगळं काही लिहिण्याची गरजच नाही.

एकीकडे पोर्नोग्राफीवरची बंदी उठवा म्हणून मागणी करायची, आणि दुसरीकडे अत्याचार वाढले म्हणून गळे काढायचे या दुटप्पीपणाला काय म्हणावं?

दिवसेंदिवस मुला-मुलींच्या लैंगिक जाणीवा जागृत होण्याचं वय कमी होत चाललं आहे, आणि त्याच वेळी लग्नाचं वय मात्र वाढत चाललं आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी लैंगिक भावना जाग्या झाल्यावर २९-३० व्या वर्षी लग्न करणं यापेक्षा कधीकधी वाटतं की बालविवाहच काय वाईट होते?


जाणिवा जागृत होत असतानाच जर जोडीदार समोर असेल तर निदान समाजातले अत्याचार आणि विकृती तरी कमी होतील – अर्थात हा फक्त एक विचार आहे – मत नव्हे!

एकंदरीतच पुढची पिढी घडवताना फक्त ती मुलांच्या पालकांची जबाबदारी न मानता सामाजिक जबाबदारी मानली जायला हवी असं वाटतं.

 

nanapatekar-inmarathi
youtube.com

घरच्या आई-बाबा आजी-आजोबांबरोबरच, समोरचे काका, शेजारच्या मामी, मावशी, हा दादा, त्या काकू, तिकडच्या गल्लीतले आजोबा यांचंही लक्ष आणि धाक आमच्या लहानपणी आम्हाला होता.

आणि आजच्या मुलांनाही तो असायला हवाच.

समाज म्हणून ते आपलं काम आहे. “आमच्या मुलाचं काय ते आम्ही बघून घेऊ”, “आम्हाला काय करायचंय त्यांची मुलगी कुठे जाते काय करते त्याचं” या मानसिकता घातक आहेत.

त्या दोन मुलांचं पुढे काय झालं, त्यांच्यावर काय कारवाई केली गेली यापेक्षाही मुळात हा प्रश्न विचारताना शिक्षिकाबाईंबद्दलचा आदर तर सोडाच पण कोणत्याही परिणामांची, पालकांची भीती आणि पर्वा त्यांच्या मनात नव्हती ही गोष्ट एक पालक म्हणून मला जास्त भयावह वाटली… तुम्हाला?


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
5 thoughts on ““कंडोम आणू का?” : सातवीतला विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो तेव्हा

 • August 24, 2018 at 11:49 am
  Permalink

  हे काहीतरीच आहे … नरकासुर रावण हे काय पॉर्न बघून बलात्कारी झाले होते का ?? बलात्कारी प्रवृत्तीचे मुळ हे पुरुषसत्ताक मानसिकतेत आणि बंदिस्त लैंगिक वातावरणात आहे

  Reply
  • February 13, 2019 at 11:20 am
   Permalink

   तुमची मानसिकता माकड सारखी आहे रावण हा बलात्कारी नव्हता किवा स्त्री प्रधान देशांमध्ये बलात्काराचे प्रमाण कमी नाही प्राणी व मनुष्य यांच्यात समाज रचना व मूल्य यांचाच तफावत आहे त्यांच्या जंगली वातावरणात सहवास बलात्कार व्यभिचार असे सामान्य आहे शक्तिशाली असणं हा एक मात्र पर्याय किंवा नियम असतो लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे समाज रचना साठी बनवलेली बंधने पुसून काढणे न्हवे.

   Reply
  • July 1, 2019 at 10:24 am
   Permalink

   माफ करा पण रावणाने सीतेच्या पावित्र्याचा भंग केला नव्हता ,बलात्कारी असा उल्लेख करणे गैर आहे

   Reply
 • October 13, 2018 at 10:19 am
  Permalink

  Truth about today’s world and sextual education desperately needed to everyone.

  Reply
 • June 11, 2019 at 9:36 pm
  Permalink

  खरं तर लेगिक शिक्षणासाठी वय या बदद्ल विचार करावा जरा जास्तच फॉरवर्ड होतंय

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?