बॅटमॅन ते डंकर्क : “दि आय मॅक्स एक्सपीरियन्स” चा तांत्रिक उलगडा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

द डार्क नाईट’ रीलीज झाला, हीथ लेजर वारला आणि ३ गोष्टींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. पहिली बॅटमॅन, दुसरी नोलन, आणि तिसरी IMAX. नोलनबाबा त्यांचे सिनेमे IMAX मध्ये शूट करतात म्हणून ते भारी दिसतात, असं खूप लोकांकडून ऐकलं होतं. तेव्हा मी अकरावी-बारावीला असेन. अक्कल कमी, इंग्रजीची मारामार तरी सिनेमे पहायचा किडा होताच.

“बाबा, हा IMAX मधला पिच्चर आहे, आपल्याला पाहिलाच पाहिजे!”

असं सांगून मी बाबांना अलका टॉकीजची तिकीटं काढायला लावली. ते सुद्धा हिंदी डब्ड व्हर्जनची. सिनेमा कडकच होता पण दिसायला काही फार वेगळा नव्हता. पण हे मान्य करण्याचा बाणेदारपणा तेव्हा अंगात नसल्यामुळे “काय भारी प्रिंट, काय भारी प्रिंट” करत बाहेर आलो.

 

christopher-nolan-inmarathi
indianexpress.com

कळत्या वयात बापासोबत पाहिलेला हा पहिलाच सिनेमा.

मग नंतर

“अलका टॉकीजला IMAX तुझ्या काकाने पाहिलं होतं का?!”

अशा स्वरूपात निरनिराळ्या लोकांकडून माझा पाणउतारा करण्यात आला. तेव्हा आमच्याकडे बीएसएनएलचा २५० रुपयाचा इंटरनेट प्लॅन होता. १जीबी फ्री वाला. त्यावर जरा अभ्यास केल्यावर स्वत:ची चूक कळली आणि मग थोडावेळ उशीत तोंड घालून रडलो. पुढे अडीच-तीन वर्षांनी हैदराबादला जाण्याचा योग आला तेव्हा तिथल्या सायंस सिटीमध्ये खरंखुरं IMAX पाहिलं तेव्हा आत्मा शांत झाला.

पण तरी अजून IMAX मागचा टेक्नीकल आस्पेक्ट मला समजला नव्हता. हा रीळावर शूट केलेला सिनेमा असतो एवढंच माहित होतं. डीजीटल कॅमने शूट केलेली प्रिंट ही रिळावर शूट केलेल्या प्रिंटपेक्षा सुपीरीअर असते असा माझा गैरसमज होता. पण तसं नसतं.

डीजीटल प्रिंट ही जास्त क्लीन असली तरी रिळावरची प्रिंट ही जास्त खऱ्यासारखी दिसते.

रीळवाला IMAX कॅमेरा आणि रेग्युलर रीळाचा कॅमेरा यातला मुख्य फरक म्हणजे IMAX चं रीळ हे रेग्युलर रीळापेक्षा मोठं असतं आणि ते लेंसमागे आडवं धरल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त भाग हा चित्र रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे मग हे रीळ IMAX च्याच अवाढव्य स्क्रीनवर प्रोजेक्ट केलं गेलं तरी चित्र न फाटता अस्सल रीळावरची रीॲलीस्टीक प्रिंट एकदम लार्जर दॅन लाईफ स्वरूपात आपल्याला दिसते.

 

IMAX_Slide4-inmarathi
millson.net

किंबहुना म्हणूनच या प्रकाराला IMAX म्हणजे Image MAXimum असं म्हणलं जातं. हे रीळावर बर्न झालेलं चित्र असल्यामुळे त्याला डीजीटल रेझोल्युशन नसतं, पण तुलना करायचीच झाली तर त्याच क्वालीटीचं डीजीटल फूटेज हे जवळजवळ 10K ते 12K असेल.

पण यात एक गोची आहे. एखाद्याने IMAX चं रीळ वापरून सिनेमा शूट केला तरी तो थीएटरमध्ये दाखवण्यासाठी अवाढव्य स्क्रीन(जवळजवळ ७२फूट बाय ५३फूट) आणि ते रीळ हॅंडल करू शकणारा स्पेशल प्रोजेक्टर लागतो. हा सगळा खर्च करणं प्रत्येक थीएटर चेनला शक्य होईलच असं नाही.

यावर तोडगा म्हणून IMAX कंपनीने डीजीटल प्रोजेक्टर्स काढले. म्हणजे शूट रीळावर करायचं, त्याचं डीजीटल स्वरूप बनवायचं आणि मग ते या प्रोजेक्टरमधून दाखवायचं.

हे केल्यामुळे कोणत्याही थीएटरला त्यांच्या एखाद्या स्क्रीनमध्ये थोडासा बदल करून IMAX मध्ये शूट झालेले सिनेमे दाखवणं शक्य झालं. पण याला रीळाच्या प्रोजेक्टरची सर नाही. शिवाय या अशा पद्धतीत स्क्रीनही IMAX इतका मोठा नसतो. बऱ्याच ठिकाणी तो IMAX स्क्रीनच्या ३०% पण नसतो. शिवाय त्याच्या लांबी आणि रूंदीचं प्रमाण हे IMAX स्क्रीनच्या प्रमाणात नसल्यामुळे मूळ प्रिंटमधला थोडा वरचा आणि खालचा भाग इथे क्रॉप केला जातो.

 

imax-theatre-inmarathi
s3.amazonaws.com

हे नवे प्रोजेक्टर बऱ्याचदा 4K असतात त्यामुळे तसंही 10K वाली IMAX प्रिंट तिथे पाहणे हा कॉंप्रमाईजच आहे, पण इलाज नसतो. शेवटी हा बीझनेस आहे. (काही ठिकाणी ड्युअल प्रोजेक्षन, म्हणजे दोन प्रोजेक्टर्स वापरून ब्राईटनेस ॲड्जस्ट केलेला असतो. अशी प्रिंट वरकरणी रिळवाल्या प्रिंट सारखी दिसली तरी खरं तर तिचा फक्त ब्राईटनेस जास्त असतो, रीझोल्यूशन नाही)

आता तर साध्या रेग्युलर कॅमेऱ्यावर शूट झालेला सिनेमाही नंतर डीजीटली रीमास्टर करून IMAX फॉर्मॅटमध्ये कंव्हर्ट करता येतो.

अशा वेळी मग मूळ लहान चित्र IMAX फॉर्मॅटसाठी मोठं करताना त्यात बरीच डीजीटल फेरफार, पिक्सल बाय पिक्सल मॅनीप्युलेशन असले बरेच चाळे करावे लागतात, आणि ते ही प्रत्येक फ्रेमसाठी! हे काम करायला २० एक्सपर्ट लोक ठेवले तरी त्यांना काही आठवडे लागू शकतात.

लोगन, स्पायडरमॅन : होमकमिंग असे अनेक सिनेमे याच पद्धतीने IMAX रीळावर शूट न करता नंतर कंव्हर्ट करून IMAX स्क्रीन्सवर दाखवले गेले.

या अशा डीजीटली फाकवलेल्या (याला टेक्नीकली Uprezzing असं म्हणतात) प्रिंटला रीळाची सर येते की नाही, हे ते कंव्हर्जन किती चांगल्या प्रकारे केलं जातंय यावर अवलंबून असतं. सध्या तरी मूळ IMAXवर शूट केलेली प्रिंटच जास्त खरी आणि हाय क्वालीटीची वाटत असली तरी पुढच्या काही वर्षात रेंडरींग सॉफ्टवेअर पुरेसं मॅच्युअर झालं आणि या कामासाठी लागणारी प्रचंड कंप्युटेशन पॉवर स्वस्त झाली तर हा फरक साध्या डोळ्यांना समजणारही नाही.

 

imax-cinema-inmarathi
cache-graphicslib.viator.com

गमतीचा भाग असा की IMAX कंपनी या सगळ्या प्रकारांना ‘The IMAX Experience’ अशा एकाच कॅटेगरीखाली मार्केट करते, जे थोडसं दिशाभूल करणारं आहे. पण पुन्हा, शेवटी हे बिझनेस मार्केटिंग आहे; वेगवेगळ्या IMAX थीएटर्स मधला फरक समजून घेणं ही आपलीही जबाबदारी आहेच. दुसरं म्हणजे एखाद्या प्युअर समजल्या जाणाऱ्या माध्यमावर टेक्नॉलॉजीनं आक्रमण करणं यात नवीन असं काहीच नाही.

आज कागदावरही डिजिटल मीडिया आक्रमण करतोच आहे. पण ही सगळी टेक्नॉलॉजी, डिजिटल रायटींग पॅड्सना जास्तीत जास्त खऱ्या कागदासारखा फील यावा यासाठी रक्त आटवते आहे.

“Hamlet’s Blackberry: Why paper is eternal ” या लेखामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे :

“For some of the roles paper currently fulfills in our media lives, there is no better alternative currently available. And the most promising candidates are technologies that are striving to be more, not less, like paper. Indeed, the pertinent question may be not whether the old medium will survive, but whether the new ones will ever escape paper’s enormous shadow.”

IMAX चे रीळवाले कॅमेरे अवजड आणि कॅरी करायला अवघड असतात. त्यामुळे सिनेमामधला प्रत्येक सीन या कॅमेऱ्याने शूट करणं प्रॅक्टीकल नसतं. मग असं असताना एखादं डिजिटल रेंडरिंग सॉफ्टवेअर, साध्या कॅमेऱ्याचं फुटेज हे मोठ्या फिल्मवर रेकॉर्ड झाल्यासारखं दिसावं यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यात वावगं ते काय?

मोठ्या स्क्रीन्सना मात्र पर्याय नाही. हैदराबादच्या IMAX थिएटरला जो फील येईल तो पुण्याच्या वेस्टएन्ड मॉलमध्ये येणार नाही हे मात्र नक्की!

 

Prasad's-imax-hyderabad-inmarathi
s3.ap-southeast-1.amazonaws.com

कट टू २०१७. डंकर्क. यावेळेस मी मागच्यासारखा बनणार नव्हतो. पुण्यातल्या वेस्टएंड मॉलमधलं IMAX स्क्रीन हे वर सांगितलं तसं डीजीटलवालं IMAX आहे हे मला माहित झालेलं होतं. कोणताही सिनेमा हा पूर्ण स्टार्ट टू एंड IMAX रीळावर शूट होत नाही याचीही आता मला कल्पना होती.

द डार्क नाईट मध्येही जेमतेम २८ मिनीटाचंच फूटेज हे रीळावरचं होतं. डंकर्कमध्ये मात्र जवळजवळ ७९मिनीटाचं फूटेज नोलनने रीळावर शूट केलेलं आहे.

बाबांना घेऊन वेस्टएंड मॉलला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे इथे जास्तीत जास्त 4K फूटेज दिसतं, तरी तेही व्हिजुअली चांगलंच होतं. बाबा तर हे असलं काहीतरी पहिल्यांदाच पाहत होते. बारावीला डार्क नाईटच्या वेळी त्यांना IMAXचं काही सोयरंसुतक नव्हतं. पोराच्या हट्टापायी हा माणूस उगीचच थीएटरमध्ये येऊन बसला होता. यावेळी मात्र त्यांना सिनेमा आवडला. आयुष्यात बऱ्याचदा एक वर्तुळ संपतं आणि दुसरं सुरू होतं.

 

youtube.com

माझी आणि IMAX ची गोष्ट ‘द डार्क नाईट’ ला सुरू होऊन ‘डंकर्क’पाशी संपली. बाबा मात्र नंतर सगळ्यांना मी IMAX ला जाऊन आलो असं सांगत होते, पुढच्या वेळी इथे 3D साठी येऊ म्हणत होते. त्यांची आणि IMAX ची गोष्ट आता कुठे सुरू होत होती.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?