“के तेरा हिरो इधर है!” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

डेव्हिड धवन म्हणजे नव्वदच्या दशकातील एक नावाजलेले नाव. आजही नाइंटीजमधील डेव्हिड धवनचे, विशेषतः गोविंदासोबतचे सिनेमे, तितकेच आवडीने पाहिले जातात.

डेव्हिडच्या मोठ्या मुलाने, रोहितने वडिलांच्या पायावर पाय ठेवत दिग्दर्शनातच आपले नशीब आजमवायला सुरुवात केली. आता दुसऱ्या मुलाचा नंबर होता, वरुणचा.

 

varun-dhavan-inmarathi02
healthyceleb.com

डेव्हिड धवनच्या छत्रछायेखाली आहे म्हटल्यावर आयुष्यभर बापाच्या चित्रपटात काम मिळण्याची गॅरंटी तर होतीच, शिवाय त्याला विशेष काही करावे देखील लागले नसते. पण युकेमधून बिजनेस मॅनेजमेंट केल्यानंतर, त्याने निर्णय घेतला, तो करन जोहरला ‘माय नेम इज खान’ साठी असिस्ट करण्याचा. पुढे त्याला, करण जोहरच्याच ‘स्टुडेंट ऑफ दि इयर’ या चित्रपटातून, नवोदित आलीया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यात तिघांच्याही कामाची दखल घेतली गेली.

त्यानंतर वरुणला घेऊन डेव्हिडने ‘मैं तेरा हिरो’ बनवला आणि त्यात प्रेक्षकांना डेव्हिड-गोविंदावाली केमिस्ट्री दिसली. चित्रपट टिपिकल धवन टाईप मसालापट होता. त्याच वर्षी करन जोहर आणि शशांक खेतानने डीडीएलजेचं रिवाईज्ड वर्जन, ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’ आणला. नटखट वरुण आणि चुलबुली आलीया ही जोडी यातही नावाजली गेली.

 

varun-dhavan-inmarathi03
bollywoodhungama.com

पुढच्याच वर्षी, श्रीराम राघवनने त्याच्या क्राईम थ्रिलरमध्ये नवाजसोबत वरुणला कास्ट करून सर्वांनाच चकित केले, पण वरुणने मिळालेल्या संधीचे सोने केले. ‘बदलापूर’, वरूणच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट म्हणता येईल. या माईलस्टोन सिनेमामुळे त्याची कॉमेडी आणि लव्हर बॉयची इमेज बदलली. बदलापूरमध्ये वरुणपेक्षा नवाजच्या कामाची जास्त तारीफ झाली असली तरी, वरुणने त्या कामासाठी घेतलेली मेहनत, त्याच्या व्यक्तिमत्वात होत गेलेले मानसिक आणि शारीरिक बदल वाखाणण्याजोगे होते. त्याने तो रोल इतका कंविक्शनने केला की त्या थरारक अनुभवानंतर तो काही काळ डिप्रेशनमध्ये गेला होता.

त्यानंतर आलेली डान्स फिल्म ‘एबीसीडी २’, रोहित शेट्टीची मल्टीस्टारर ‘दिलवाले’ आणि भाऊ रोहित धवनने दिग्दर्शित केलेला ‘ढिशूम’ याबद्दल मिक्सड रिव्ह्यूज ऐकण्यात आले असले तरी, फिल्म्स बॉक्सऑफिसवर चालल्या. हंप्टी शर्मानंतर शशांक, वरुण आणि आलीया हे त्रिकुट पुन्हा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये एकत्र आले आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नव्वदच्या दशकात गाजलेल्या डेव्हिड धवनच्याच जुडवाच्या सिक्वेल ‘जुडवा २’ मध्ये त्याने पुन्हा एकदा कॉमेडीत ‘आपल्या बापाचे राज्य’ असल्याचे सिद्ध केले.

 

varun-dhavan-inmarathi
zeenews.india.com

वरुणने आजवर केलेल्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप गेलेला नाहीये, हे विशेष असले तरी, वरुण धवन प्रतिगोविंदा किंवा प्रतिसलमान होतोय की काय ही भीती वाटू लागली असतानाच काही दिवसांपूर्वी ‘ऑक्टोबर’चा ट्रेलर आला. शुजित सरकार-जुही चतुर्वेदी, ही जोडी म्हणजे काहीतरी पोएटिक अनुभव असणार याची खात्रीच. ट्रेलरमध्ये दिसणारा निरागस वरुण भावला. हा चित्रपट येणाऱ्या दिवसांत कलेक्शनच्या बाबतीत बॉक्सऑफिसवर काय जादू करू शकेल माहीत नाही, पण जाणकार प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी वरुणच्या कामाची, ‘आजवरचा बेस्ट परफॉर्मन्स’ म्हणून तारीफ केली आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

varun-dhavan-inmarathi04
thebrunettediaries.com

यशराजच्या आगामी ‘सुई धागा’मध्येही तो अनुष्कासोबत प्रोमिसिंग वाटत आहे. शरत कटारीयाचा दिग्दर्शनाचा पहिला अनुभव असणारा ‘दम लगा के हैशा’ मनात अजूनही ताजा असताना, सुई धागा बद्दल जास्तच उत्सुकता आहे. यशिवाय ‘बद्रीनाथ’नंतर पुन्हा एकदा शशांक खेतान सोबत तो दिसेल, ‘एबीसीडी ३’ मध्ये कतरीना कैफ सोबत, तर ‘टू स्टेटस’ फेम अभिषेक वर्मन दिग्दर्शित करन जोहरच्या ‘कलंक’ या मल्टीस्टाररमध्ये तो आलीया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूरसोबत दिसेल.

वरुण आपल्या अभिनयाने आणि विविधांगी रोल्सने आपल्याला असाच उत्तरोत्तर चकित करत राहो, ही सदिच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?