देशभक्तीचे तुंबलेले गटार!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

परवा दिवशी उज्माबाई भारतात दाखल झाल्या. भारतभूमीवर पाय ठेवताक्षणीच त्यांनी जमिनीचे चुंबन का काही घेतले. त्यानंतर सुषमाजींना भेटताना त्यांचे पाय धरले. लगोलग अर्धा डझन तिरंगे पाठीमागे लावून एक देशप्रेमी प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यात उज्माबाईंनी देशाचे गोडवे गायले, नरेंद्र मोदींना भेटायची इच्छा व्यक्त केली.

InMarathi Android App

वास्तविक पाहता परदेशात बंधक बनवून इच्छेविरुद्ध लग्न (थोडक्यात बलात्कार) झालेली स्त्री ही Post Traumatic Stress Disorder (PTSD) किंवा साध्या भाषेत तीव्र मानसिक धक्क्यात असायला हवी होती.

पण उज्माबाई इथे वैयक्तिक आयुष्यात काहीच न घडल्यासारखे, एखाद्या राजकीय प्रवक्त्याच्या सहजतेने प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या. अगदीच डोळे दिपून जावे आणि मती गुंग व्हावी असा तो सोहळा होता.

 

uzma-ahmad-marathipizza01
dawn.com

उज्मा ही काही पहिली मुलगी नव्हे जी अशा प्रकारात फसली होती. मागे R R पाटील गृहमंत्री असताना पण सांगलीची एक हिंदू मुलगी इंटरनेटवर एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडून तिकडे जाऊन धर्म बदलून, लग्न करून नंतर काही महिन्यांनी पस्तावली आणि परत भारतात आली. तेव्हा प्रसारमाध्यमे देशभक्तीला एवढी आसुसली नसल्याने, सोशल मीडियाच्या अभावाने आणि केंद्रातल्या लोकांना इव्हेंट मॅनेजमेंटचे अनुभव आले नसल्याने, स्थानिक पेपरातल्या २-४ फुटकळ बातम्यांपलीकडे त्याचा गवगवा झाला नाही आणि अशा असंख्य मुली आजही सीमेच्या इकडे आणि तिकडे आजही असतील.

या आंतरराष्ट्रीय प्रेमवीर सुनांच्या घरातली भांडणे जरा अति झाली की भारत-पाकिस्तान संबंधांतल्या तणावावर फोडणी म्हणून वापरता येतात. उद्या त्या सानिया मिरझाच्या घरी बिनसले तर दोन्ही देशांच्या वकीलाती, मीडिया आणि सामान्य लोक कित्येक दिवस त्याचा गुळ काढतील.

पाकिस्तानची सीमा ओलांडून (काहींच्या मते दारूच्या नशेत) गेलेला सरबजीत आणि त्यासाठी नंतर त्याच्या मृत्यूपर्यंत झालेला इमोशनल ड्रामा, नंतर ऐश्वर्याचा त्यावर आलेला सिनेमा यांतून आपल्याला नेमके मिळाले काय? अलीकडेच कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात अटक झाली व मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. त्यावर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आम्ही मुकाबला लढतोय.

भारतातल्या 90% लोकांनी हरीश साळवेंचे नाव तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ऐकले आणि 20-20 चा सामना पाहावा तसे ती कायदेशीर लढाई लोकांनी TV वर पाहिली. जिनिव्हा करार, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय राजकारण, Jurisdiction आणि Jurisprudence यातलं अवाक्षर माहीत नसणारी 99% जनता साळवेंनी कशी पाकिस्तानची जिरवली अशा आशयाच्या पोस्टी सोशल मीडियावर टाकत होती.

एका व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या एका खटल्यावर आमच्या अडाणी जनांनी सोशल मिडियाकरवी राष्ट्रप्रेमाचे गोमूत्र शिंपडायला सुरुवात केली होती.

 

facebook-marathipizza01
twitter.com

थोडा विचार करून बघा, भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे काही टोलनाका आहे का पाचपन्नास रुपये देऊन कुणीही पार करायला? आणि जर कुणी वैयक्तिक प्रेमाच्या, दारूच्या किंवा व्यवसायाच्या नशेत ती सीमा ओलांडली, तर त्यासाठी अख्ख्या देशाने देव पाण्यात का घालून बसावे?

त्या व्यक्तीचे कुटुंब, दोन्ही देशांच्या वकीलाती आणि न्यायालये मिळून बघतील की काय करायचे ते. तुम्ही सोशल मीडियावर पिटीशन लिहून काय हातभार लावणार त्यात?

जास्तीत जास्त तुम्ही मीडियाला TRP देणार आणि काही पत्रकार आणि जाहिरातदार यांचे भले करणार. दरवर्षी शेकडोे गरीब मच्छीमार लोक भारत पाकिस्तान सागरी सीमा नकळत ओलांडून दुसऱ्या देशाच्या तटरक्षक दलाच्या तावडीत फसतात आणि मरेपर्यंत दुसऱ्या देशात सडतात.  त्यांच्यासाठी आपला मीडिया कधी बोंब मारत नाही, राजकारण्यांवर आपण दबाव आणत नाही किंवा कुणी हेगच्या न्यायालयात जात नाही.

म्हणजे नकळत सीमा ओलांडून गेलेले मेले तरी चालतील, पण हौसेने काशी केलेले मात्र वाचले पाहिजेत ही आमची वृत्ती आणि प्राथमिकता!

बरं जाधव असोत, सरबजीत असो की उज्मा, यांना वाचवण्यामागे, त्याचा गवगवा करण्यामागे आपल्या देशात मानवी आयुष्याची किंमत खूप जास्त आहे असे काही आहे का? अजिबात नाही! आमच्या देशात लाखो शेतकरी फास घेऊन मेले, मॅनहोल मध्ये श्वास कोंडून हजारो सफाईकामगार मेले, आदिवासींच्या कत्तली झाल्या, रस्त्यावर अपघातात हजारो जण मरतात, हुंड्यासाठी हजारो मुली जळतात…ते कधी “भारत के बेटे/बेटी” नसतात, त्यांच्यासाठी कुणी मीडिया कोकलत नाही, राजकारणी रडत नाहीत, कुठले वकील कोर्टात जात नाहीत.

पाकिस्तानात जाऊन अत्याचार करून घेतले की मगच भारतातल्या लोकांना, मीडियाला आणि राजकारण्यांना त्याचा कळवळा!! इटालियन नाविकांनी निष्पाप भारतीय मच्छीमारांना भारतीय सीमेत गोळ्या मारून जीव मारले, पण त्यावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राजकारण सोडून दुसरे काहीही केले नाही… कारण त्यात पाकिस्तान नव्हतं ना!

 

india-pakistan-marathipizza01
dawn.com

आमच्या देशाला, इथल्या लोकांना, मीडियाला, राजकारण्यांना आणि न्यायव्यवस्थेला माणसाच्या आयुष्याची कसलीही किंमत नाहीये. जोवर त्या मरणात कुठलातरी स्वार्थ, करमणूक किंवा प्रसिद्धी नाही तोवर इथे मरणसुद्धा स्वस्त आहे!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *