श्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

विचार करणे – हा तसा मानवाचा सद्गुण. सद्गुणच नव्हे, मानव जातीचं हे बलस्थान आहे. रानटी आदिमानव “समाज” वसवून-घडवून आजपर्यंत टिकला, वर्धिष्णू राहिला तो ह्या वैचारिक क्षमतेमुळे. विविध प्रश्नांना भिडत, विविध संकटांशी दोन हात करत, कुठलंही नैसर्गिक शिंग-नखे-आयाळ इत्यादीरुपी संरक्षण नसताना, केवळ विचार करण्याच्या शक्तीच्या बळावर मानव पृथीवरील सर्वात डॉमिनेटिंग समूह म्हणून टिकून आहे.

 

humanevolution-inmarathi
fthmb.tqn.com

पण – अतिरेक वाईटच. कशाचाही.

“मी विचार करतो” असं वाटता वाटता चांगले चांगले शहाणे लोक कसे भरकटू शकतात ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासातून कथा-कंगोरे उकरून काढून अनावश्यक वाद घालत बसणे.

अश्याच कथांमधून – श्री राम आदर्श नाहीत – हे पटवत राहण्याची अहमहिका चालली आहे. आणि आपल्या समाजाचं दुर्दैव हे, की श्री रामांचं जे झालं तेच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचंही होतंय.

राम “देव” नाही, इथपर्यंत आलेला विचार – हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेला राम आधुनिक काळात एक व्यक्ती म्हणून सुद्धा “आयडियल” नाही इथवर येऊन जेव्हा ठेपतो तेव्हा अतिरेकी तर्क व्यावहारिक समाजभानावर मात करतो.

रामाच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवून तो कसा वाईट्ट राजा होता हे जेव्हा ठसवण्यात येतं ते कालपरत्वे बदलले गेलेले योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, नीती-अनीती चे कंगोरे दुर्लक्षित होतात.

 

ram-marathipizza00

अगदी हेच आज छत्रपतींची नको तिथे चिकित्सा करून केलं जातंय.

सतराव्या शतकात होऊन गेलेला राजा, त्या काळातील चालीरीती, रूढी इत्यादींच्या कसोट्यांवर जोखायचा असतो. एकविसाव्या शतकातील आधुनिक मूल्यांवर नाही.

ज्या काळात “प्रजेला लुटणे” हाच प्रस्थापित राजाचा आपद्धर्म मानला अन राबवला जात होता, त्या काळात शिवाजी हा एक हाडामासाचा “रयतेचा राजा” असतो, म्हणून तो महान असतो.

ज्या काळात वतनदारी – सावकारी अगदी सहज, सहाजिक होती त्या काळात गरजूंना नाडणाऱ्या मूठभरांचे हातपाय तोडू धजणाऱ्या राजाचं राज्य, म्हणून ते स्वराज्य असतं.

भटा ब्राह्मणांची भीडभाड नं दाखवता नेताजी पालकरांना पुन्हा धर्मात आणू शकतो म्हणून छत्रपती शिवाजी हा असामान्य जाणता राजा असतो.

 

Shivaji-Rajyabhishek-marathipizza01
godwallpaper.in

आता सूर्यावर डाग शोधणारे आहेतच. म्हणून काहीतरी खुसपट काढून नाक मुरडता येणं ही शक्य आहेच. परंतु ते करताना एका मोठ्या कालखंडाला ओलांडून आपण पुढे आलो आहोत हे भान विसरून चालणार नाही.

मग आजच्या काळाला समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना “आयडियल” मानायचं कशाला – हा प्रश्नही पडू शकतोच. इथेच अतिरेकी तर्क व्यावहारिक सामाजिक वास्तव बघण्यात कमी पडतं.

समाज एक होण्यास २ निमित्त ठरतात.

एक म्हणजे “बाहेरच्या शत्रूच्या भीती” असल्यामुळे एकत्र होणे.

कुणीतरी शत्रू उभा झाला (किंवा केला!) की लोक आपापसातील हेवेदावे, मतभेद विसरून त्या शत्रूविरुद्ध लढण्यास एकत्र येतात. पण ही पद्धत समाज विघातकच आहे. नकारात्मक भावनेने एकत्र आलेला समाज कुठलंही रचनात्मक, सकारत्मक कार्य साधण्यासाठी दीर्घकाल एकमुठ बनवून राहू शकत नाही.

उलट, बाहेरच्या शत्रूच्या भीतीतून अनाठायी लढाऊ उन्माद निर्माण होतो. जो त्या शत्रूची भीती नाहीशी झाली की आपली नजर “आतील” शत्रू शोधण्याकडे वळवतो. आज भारत विखंडन करण्याचे प्रयत्न ह्याच मार्गांनी होत आहेत.

बहुजनांचे शत्रू मराठे-ब्राह्मण, मराठ्यांचे ब्राह्मण-बहुजन, ब्राह्मणांचे मराठे-बहुजन असं चित्र खुबीने रंगवून वेगवेगळे पॉकेट्स आपापसात लढवले जात आहेत.

म्हणजेच, शत्रूची भीती दाखवून समाजाला एक करणे या मार्ग पायावर कुर्हाड मारून घेणारा आहे.

दुसरं निमित्त असतं – आपल्यातील आराध्य, स्फुर्तीस्थानाच्या झेंड्याखाली सामान प्रेरणेने, सामान ध्येयाने एकत्र होणे!

 

shivaji-maharaj-marathipizza

 

श्री राम हे अश्याच प्राचीन स्थानाचं उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या हिशेबाने आधुनिक काळातील सर्वात जवळचं आणि म्हणूनच सर्वात प्रिय स्थान आहे.

सुदैवाने – महाराष्ट्र देशाला शिवाजी महाराज हा फार चांगला, सकारात्मक देव लाभला आहे.

बहुजनांसि आधारु असणारा जाणता राजा जर “बहू” जनांचं आराध्य असेल तर त्यात वैचारिक खुसपट काढण्याची गरज नाही. खासकरून तेव्हा, जेव्हा ह्या आराध्याची पूजा योग्य कारणांसाठीच होत असते.

रामावर आक्षेप घेणाऱ्या अनेकांना अग्निपरीक्षा आणि तत्सम कथा बोचत असतात. त्यामुळे “राम आदर्श नाही” हे पटवून देण्याचा मोह होत असतो. ह्या कथांची ऐतिहासिक वास्तविकता वादग्रस्त आहेच, परंतु त्यात नं शिरता एक वेगळा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, जो दुर्लक्षित रहातो.

चिकित्सक लोक हे विसरतात की रामाचा आदर्श एकपत्नी-एकवचनी-एकबाणी अश्या अनेक सकारात्मक मुल्यांसाठीच घेतला जातो. प्रतिगामी आणि समाजविघातक प्रथा परंपरा दामटण्यासाठी राम “वापरला” जात नाही. मग आक्षेपाचं कारण कुठे रहातं?

शिवाजी महाराजांच्या बाबतीतही तेच आहे.

शिवबा लहानपणी आपल्या मातीच्या प्रेमाची शिकवण देतो.
तरुण शिवाजी शौर्याच्या प्रेरणा देतो.
आणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून दिशादर्शक ठरतात.

आमच्यासाठी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही तमाम जनतेसाठी शिवाजी महाराज हेच आणि इतकेच आहेत. चिकित्सकांनी पण हेच पहावं.

अश्यावेळी, ज्या गोष्टी, घटना, कृतींचा आज कुठलाही संदर्भ-महत्व नाही अश्यांना समोर ठेवून, समाजाच्या प्रेरणास्थानांचं भंजन करू नये. त्याची अजिबात गरज नाही. आणि त्यातून कोणताही सकारात्मक लाभ होणारा नाही.

सबब, काळजी करू नये.

अख्खा समाज सूर्याची तेजस्वी आभा न्याहाळण्यात आणि त्यात नहाण्यात गुंग असताना, तुम्हाला नसत्या डागांची धास्ती वाटून घ्यायची गरज नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?