लोक घरात “फिश टँक” फक्त हौस म्हणून ठेवतात असं वाटतं? वाचा त्याचे ‘आश्चर्यकारक फायदे’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
हौसेला मोल नसते असं म्हणतात. मग काही लोक घरात हौस म्हणून चांगल्या जातीची मोठी मोठी कुत्री पाळतात, शेपर्ड, डालमेशियन, डॉबरमन, बुलडॉग ही मोठी मोठी कुत्री, तर अनेक ल्युसी वगैरे छोटी छोटी केसाळ कुत्री पाळतात.
ही कुत्री दिसायला सुंदर असतात म्हणून हौस म्हणून पाळतात. पण ज्यांच्याकडे मोठी जागा असेल तेच लोक अशा मोठ्या कुत्र्यांना पाळू शकतात.
छोटी घरे ज्यांची असतील ते वेगवेगळ्या प्रकारची मांजरं पाळतात. मांजर कुत्र्यापेक्षा जरा थाटातच राहते. सोफे गाद्यांवर आरामात लोळत पडणार, दूधच पिणार, अंगाशी चिकटणार आणि सारखं आळशीपणाने लोळत पडणार.

पण ही कुत्री आणि मांजरं पाळायची म्हणजे त्यांच्याकडे लक्ष द्यायला एक माणूस गुंतून पडतो. कुत्र्यांना बाहेर फिरवून आणायचे, त्याची स्वछता ठेवायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळायच्या, रोग प्रतिकारक लस टोचून आणायची वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ह्यासाठी त्यांची काळजी घेणारी जास्त माणसे घरात लागतात.
ह्यासाठी घर मोठे असो की छोटे, जागेची अडचण न होता पाळता येईल असे प्राणी म्हणजे शोभेचे मासे. घराच्या आकाराप्रमाणे छोटे मोठे अक्वेरियाम आपल्याला घरात ठेवता येते. आजकाल छान सजावट केलेली अक्वेरियम तयार मिळतात. त्याप्रमाणे सुशोभीकरण करता येते.
मोठ्या अक्वेरियममध्ये अनेक प्रकारच्या माशांना समाविष्ट करता येते. छोट्या फिशटँक मध्ये सुंदर मासे, छोटे मासे सोडता येतात. त्यांचे खाद्य सुद्धा दुकानात मिळते. त्यामुळे हे असे फिशटँक घरात ठेवणे सोपे असते.
बरं ह्या माशांना वेळेवर खाद्य पुरवले की बाकी काही चिंता नसते. ते दिवसभर आपल्या भ्रमंतीमध्ये व्यस्त असतात. कुठल्याही प्रकारचा आरडा-ओरडा नसतो. अतिशय शांतपणे ते आपल्याला त्यांचा सुंदर सहवास देतात.

मुख्य म्हणजे हे मासे दिवसभर पाण्यात इकडून तिकडे अथक फिरत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे नुसते पाहत बसलो तरी आपली करमणूक होते. हे मासे पाळल्यामुळे आपल्याला किती प्रकारे फायदे होतात हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.
पहिली गोष्ट घरात आपण हे फिशटॅन्क ठेवतो त्यामुळे घरातल्या लहान मुलांची, वृद्ध लोकांची चांगली करमणूक होते. दिवसातला कंटाळवाणा वेळ आपण ह्या फिश टँकसमोर बसलो तर वेळ छान जातो.
–
- जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात
- पुण्यातील एकमेव Petxi टॅक्सी सर्विस- खास तुमच्या लाडक्या पाळीव दोस्तांसाठी!
–
ह्या माशांचे आकर्षक रंग, त्यांच्या चपळ हालचाली, त्यांचे चालणारे खेळ मोहून टाकतात आणि वेळ कसा गेला हेच कळत नाही.
दुसरा मोठा फायदा म्हणजे ह्या माशांच्या खेळाकडे तासभर बघत बसलो तर वाढलेले ब्लड प्रेशर कमी होते. हा अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो.
पुढचा मोठा फायदा म्हणजे मनाला खूप शांतता मिळते. पाणी मनाला थंडावा देते आणि त्यामुळे खूप शांत वाटते. तसेच हे मासे कोणताही आवाज करत नाहीत आणि त्यांची पाण्यातली हालचाल मनाला भुरळ घालते आणि शांत शीतल असा अनुभव आपल्याला येतो.
वृद्ध लोकांना काही वेळा अल्झायमरसारखा आजार होतो. अशा वृद्धांच्या ह्या आजाराला बरं करण्याची ताकद ह्या फिशटॅन्कच्या सहवासात आहे. आता हा परिणाम का आणि कसा होतो ह्याचा शास्त्रीय शोध अजून लागला नाही.

कदाचित ही ताकद अक्वेरियम मधल्या आकर्षक माशांच्या खेळामध्ये असावी. करमणूक, शांतता, ब्लड प्रेशरवर नियंत्रण हे ह्यामागचे कारण असू शकते.
कोणत्याही कारणाने जर आपण मानसिक तणावाखाली असू तर डोळ्याने एखादा करमणुकीचा कार्यक्रम पहिलावर आपला ताण तणाव निश्चितच कमी होतो. तसेच अक्वेरियम ही एक करमणूकच असल्याने त्याच्या समोर थोडा वेळ घालवला तर आपला मानसिक ताण कमी होतो. म्हणजे तणाव कमी करण्याचे मोठे काम अक्वेरियम करते.
आपल्या ऑफिसमध्ये जर असे मोठे अक्वेरियम असेल तर काम करणारे लोक मनाने फ्रेश होऊन चांगले काम होऊ शकते. उत्पादनातही वाढ होऊ शकते. कारण कंटाळा निघून जाण्याचे एक साधन म्हणून हे उपयोगी पडते.
लहान मुलांना काहीतरी शिकण्यासाठी अक्वेरियमची चांगली मदत होते. ती कशी? तर साधारण बोलता येणाऱ्या मुलांना जर अक्वेरियम समोर उभे करून काही प्रश्न विचारले तर हळू हळू मुलांना त्यातून काही शिकता येते.
माशांची नावे सांगून पुन्हा विचारून पाहिल्यास मुले बरोबर उत्तर देतात. कोणत्या माशाचा कोणता रंग हेही ते ओळखायला लागतात. पुढे अनेक प्रकारची माहिती सांगून त्याबद्दल शिक्षण देता येऊ शकते.
लहान मुले जर कोणत्या कारणाने नाराज झाली असतील, रुसली असतील, दुखावली असतील किंवा खूप रागावली असतील तर त्यांच्यातल्या ह्या नकारात्मक उर्जेला काढून टाकण्यासाठीही माशांचा फायदा होतो. त्यांना अक्वेरियमच्या समोर बसवले तर पुन्हा सकारात्मक विचार आणण्याचे काम मासे करतात.

फेंगशुई मध्ये फिश टँकला फार महत्व दिले गेले आहे. सकारात्मक ऊर्जा भरून ठेवण्यासाठी ह्या फिश टँकला घरात ठेवणे जरुरीचे असते असे सांगितले जाते. त्याशिवाय घरामध्ये वेग वेगळ्या दिशेला तो फिश टँक ठेवल्यामुळे काय प्रगती होते हे ही सांगितले गेले आहे.
धनसंपत्तीसाठी ते कोणत्या दिशेला ठेवावे, घरातल्या सगळ्या लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या ठिकाणी ठेवावे, व्यवसाय नोकरीत प्रगतीसाठी कुठे असावे असे फिशटँकला यात फार महत्व दिले आहे.
या अक्वेरियमच्या घरात असण्याने एक प्रकारे मेडिटेशन होते. मनाला शांतता लाभते, ताण तणाव कमी होतो, त्यामुळे आपोआपच ब्लड प्रेशर कमी होते, मनाला उभारी येते, उत्साह येतो, प्रगतीकडे वाटचाल होते आणि मानसिक समाधान मिळते, व्याधींवर नियंत्रण ठेवले जाते. असे अनेक फायदे होतात.
म्हणून घरात फिश टँक अथवा अक्वेरियाम ठेवल्यास प्राणी पाळायच्या हौसेबरोबरच अनेक फायदेही मिळतील.
–
- मोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले!
- अमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
छान माहिती मिळाली
Mast sir…