भारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

चहा! असं चहाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मानसिकरीत्याच मरगळलेला माणूस ताजातवाना होतो. कट्टर चहाप्रेमींना रात्री झोपेतून उठवून विचारले ,”चहा घेणार का?” तरी नाही म्हणणार नाहीत कारण चहाप्रेमींच्या मते चहाला नाही म्हणणे हे मोठे पाप आहे! पृथ्वीवरचे अमृत म्हणजे अमृततुल्य चहा असे सर्व चहाप्रेमींचे मत असते.

चहा हे पेय नसून ती एक संस्कृती असते आणि चहा करणे हे एक काम नसून तो एक सोहळा असतो. उत्तम चविष्ट चहा करता येणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही महाराजा!

जो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते असा चहा करण्याची कला फक्त काहीच लोकांच्या हातात असते. चहा म्हणजे माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारी संस्कृती आहे.

अबोल्याचे रूपांतर जवळिकीत करणारी, अनोळखी लोकांना मैत्रीत बांधणारी, श्रमपरिहार करणारी अशी ही संस्कृती आहे.

 

tea-inmarathi
heritage.com

अरे ह्या चहाच्याच साथीने अनेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार सापडतात, टपरीवर “पेशल कटिंग” मारता मारता दु:ख हलकी होतात आणि आयुष्यातल्या समस्यांवर उपाय सापडतात. असा हा चहा म्हणजे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चहाने ऍसिडिटी होते वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.

अस्सल चहाप्रेमी व्यक्तीला कधीच चहाने त्रास होत नाही. अश्या ह्या चहाने आपलं जग व्यापून टाकलंय आणि आपल्याला जगाशी जोडून ठेवलंय असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

आज हे चहापुराण तुम्हाला ऐकवलं जातंय कारण आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे! त्या निमित्ताने एक कप फक्कड चहा करा आणि तो चहा घेता घेता हे चहापुराण वाचा!

आपल्याकडे चहा आला तो दोनशे तीनशे वर्षांपूर्वी! ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर चहा हे पेय आणले. परंतु त्या आधी प्राचीन काळापासून आपल्या शेजारील देशात म्हणजेच चीन मध्ये चहाचे सेवन केले जाते.

चहा हे ब्रिटिशांचे आवडीचे पेय असल्याने ते सतराव्या-अठराव्या शतकात आपल्याबरोबर चहा घेऊन आले आणि तेव्हापासून चहा हा असंख्य भारतीयांच्या गळ्यातला ताईत झाला. आपली दिवसाची सुरुवातच चहाने होऊ लागली.

 

tea2-inmarathi
india.com

आपण असे समजतो की चहा हे ब्रिटिशांचे पेय आहे. परंतु चहाचा शोध हा इसवी सन पूर्व काळात चीन मध्ये लागला.शांग राजवटीत युनान ह्या प्रदेशात चहा हे औषधी पेय म्हणून चहाचा शोध लागला. चहा घेण्यासंदर्भातील सर्वात जुना रेकॉर्ड हा इसवी सन तिसऱ्या शतकातील आहे.

एका औषधाच्या माहितीसंदर्भातल्या कागदपत्रांत हुआ ताओ ह्याने चहाचा उल्लेख केलेला आढळून येतो. सोळाव्या शतकात लेबनन मध्ये व्यापारी आणि पोर्तुगीज प्रिस्ट ह्यांची चहाशी प्रथम ओळख झाली.

सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये चहा लोकप्रिय झाला. आपल्या देशात चहाची लागवड तसेच चहा घेणे हे ब्रिटिशांनी सुरु केले. त्या आधी चहावर फक्त चिनी लोकांचे मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरु केली.

इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चीनमधील एक राजा शेन नून्ग ह्याला सत्तेवरून पायउतार करून दुर्गम भागात ,जंगलात एकांतवासात पाठवण्यात आले.

त्याच्याकडे काहीही उरले नसल्यामुळे एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत होता तेव्हा त्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्या पानांमुळे त्या पाण्याचा रंग बदलला आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजाला एकदम तरतरीत झाल्यासारखे वाटले.

तेव्हापासून त्याने त्या झाडाची पाने घालून गरम पाणी पिणे सुरु केले आणि त्या प्रदेशात त्या विशिष्ट झाडांचा शोध घेतला.

 

bhakti-tea-inmarathi05
indianeagle.com

हळू हळू त्याच्या असेही लक्षात आले की ह्या झाडाची पाने घातलेले गरम पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते.. त्यानंतर त्याने ह्या झाडाचा प्रचार देशभर केला. आणि चीनमधून चहाची कीर्ती जगभर पसरली. चहाच्या शोधाबाबतीत अश्या अनेक रंजक कथा सांगितल्या जातात.

तिसऱ्या शतकापर्यन्त चहा फक्त चीनमध्येच लोकप्रिय होता. त्यानंतर आठव्या शतकात चहाची कीर्ती अनेक देशांत पोचली. सिल्क रोड मार्फत भारतात आलेला चहाचे हिमालयात वास्तव्य करणारे भटके लोक सुद्धा सेवन करू लागले होते.

परंतु हे लोण संपूर्ण भारतात ब्रिटिशांनी पोचवले. चीन ते युरोप ह्या मोठ्या प्रवासा दरम्यान चहाची क्वालिटी टिकून राहत नसे. ती तशीच टिकून राहावी म्हणून त्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले गेले. आणि सुरुवातीला प्यायला जाणारा ग्रीन टी हा नंतर ब्लॅक टी झाला. ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी हे सगळे प्रकार चहाच्या एकाच झाडापासून तयार होतात फक्त त्यांवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते.

चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड करण्याचे ठरवले. परंतु ह्यात यश मिळायला इंग्रजांना तब्बल एक दशकभर प्रयत्न करावे लागले.भरपूर संशोधन करावे लागले.

त्यानंतर चहाच्या चिनरी ह्या जातीची आसाम व दार्जिलिंगमध्ये यशस्वीपणे लागवड करण्यात आली.

 

 

भारतात चहा लोकप्रिय व्हावा म्हणून ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. विविध मार्केटिंग स्टॅटेजीज वापरल्या आणि आजची परिस्थिती बघता ब्रिटिशांचे प्रयत्न फळाला आले असेच म्हणावे लागेल. चहा फक्त काही शतके जुना आहे असे म्हटल्यास आपला विश्वास बसणार नाही इतके चहाने आज आपले जीवन व्यापले आहे. चहाशिवाय आपला दिवस सुरु होत नाही.

भारतीयांच्या जीवनात चहा हा दुधात साखरेसारखा मिसळून गेला आहे. ह्या चहाने भारतात लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.

चहा उत्पादनात आज आपला जगात दुसरा क्रमांक आहे.

 

munnar_boh-marathipizza
Munnar_Boh tea plantation

आणि चहा घेण्यात बहुतेक भारतीयांचाच पहिला नंबर असावा) तर आजच्या आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने चहाच्या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया.

वर बघितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे चहा हे चहाच्या कॅमेलिया सिनेन्सिस ह्याच झाडापासून तयार केला जातात फक्त त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात.

जगात चहाचे हजारो प्रकार बघायला मिळतात. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात ,कुठल्या मातीत झाले आहे तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे ह्यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव अद्वितीय आहे.

व्हाईट टी –

 

white-tea-inmarathi
Twinings.com

व्हाईट टी हा चहाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. ह्यावर अतिशय कमी प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. ह्याचा रंग आणि चव दोन्हीही सौम्य असतात. ह्याची चव नैसर्गिकरीत्याच गोड आणि सुंदर असते.

ग्रीन टी –

green tea-inmarathi
brewfull.com

आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा चहाचा प्रकार हल्ली ट्रेंडिंग आहे. जगात आणि त्यातल्या त्यात आशियाई लोकांत सुद्धा ह्याच प्रकारचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. काही ठिकाणी ग्रीन टी मध्ये विविध प्रकारची फुले किंवा फळे घालून सेन्टेट आणि फ्लेवर्ड ग्रीन टी बनवण्याची पद्धत आहे. साध्या ग्रीन टीला सौम्य चव असते.

वूलॉन्ग टी –

 

oolong-tea-inmarathi
news18.com

हा चिनी चहा आहे. हा चहाचा हा प्रकार चीनमध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेक चायनीज हॉटेल्स मध्ये हा चहा मिळतो.

ब्लॅक टी –

 

Black-tea-inmarathi
Teabox.com

आपण सगळे जो चहा पीत मोठे झालो आहोत तोच हा ब्लॅक टी. हा चहा स्ट्रॉंग चवीचा असतो. आपल्याला हाच कडक चहा आवडतो. कडाक्याची थंडी असो की मरणाचा उकाडा, दूध व साखर घालून केलेला गरमागरम चहा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा आहे.

काही लोक हाच ब्लॅक टी आईस टी म्हणून सुद्धा आवडीने पितात.

हर्बल टी –

 

harbal-inmarathi
food.com

ह्या चहामध्ये कॅमेलिया झाडाची पाने नसतात. ह्या चहाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे Rooibos tea दुसरा mate tea आणि तिसरा प्रकार म्हणजे हर्बल इन्फ्युजन्स होय. ह्यातील हर्बल इंफ्युजन्स मध्ये शुद्ध औषधी वनस्पती, फुले व फळे असतात.

हे चहाचे प्रकार गरम किंवा चिल्ड स्वरूपात प्यायले जातात. Rooibos Tea हा दक्षिण आफ्रिकन रेड बुश पासून तयार करतात. ह्या चहाला रेड टी असे म्हणतात.

हा चहा अतिशय चविष्ट लागतो आणि अनेक प्रकारच्या फ्लेवर्समध्ये मिळतो. हा चहा गरमागरम किंवा चिल्ड पिता येतो.

तर Mate Tea हा कॉफीप्रेमींचा आवडता चहाचा प्रकार आहे. कारण ह्या चहाची चव कॉफीसारखी असते. Mate हे अर्जेंटिना मध्ये उगवणारे एक जंगली झुडूप आहे. ह्या झुडुपाच्या पानांपासून चविष्ट चहा तयार होतो.

ब्लूमिंग टी –

 

bloomingtea-inmarathi
organic.com

ह्या चहाला फुलांचा चहा किंवा हस्तकला असलेला चहा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण ह्याचे झाड जेव्हा वाढते तेव्हा त्यांना खरंच फुले येतात. टी आर्टिस्ट हे चहाचे झाड स्वत: विविध प्रकारे बांधून ठेवतात आणि चहा करताना त्यात स्पेशल फ्लेवर किंवा सुगंध घालतात. तसेच डिझाईन सुद्धा तयार करतात.

म्हणूनच ह्या चहाला हस्तकला असलेला चहा असे म्हणतात. हे चहाचे झाड खूप सुंदर दिसते म्हणून लोक एकमेकांना रोमँटिक गिफ्ट म्हणून सुद्धा देतात.

टी ब्लेन्डस –

टी ब्लेन्डस म्हणजे अनेक प्रकारचे चहा एकत्र करून एक उत्तम चवीचा प्रीमियम प्रकारचा चहा तयार करतात.

 

blends-inmarathi
tea.com

तर असे हे चहाचे विविध प्रकार आहेत. जगात पेयांमध्ये पाण्यानंतर चहाचा क्रमांक लागतो. जसे वाईन टेस्टिंग हे मोठे काम असते तसेच टी टेस्टिंग हे सुद्धा एक मोठे काम असते. चहाप्रेमी ह्याकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघू शकतात. चहा हा योग्य प्रमाणात घेतला तर आरोग्यासाठी चांगलाच आहे.

चहावर जितकी कमी प्रक्रिया केली असेल तितके त्यात अँटीऑक्सिडेंट्स जास्त असतात. म्हणूनच ब्लॅक टी पेक्षा ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे असे म्हणतात.

कट्टर चहाप्रेमी मात्र कडक चहाशिवाय दुसरे काही मिळमिळीत सहनच करू शकत नाही. मग राजेहो वाट कसली बघताय?

आज तर आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, त्यानिमित्ताने ठेवा चहाचे आधण आणि मित्रमंडळी किंवा कुटुंबाबरोबर घ्या फक्कड चहाचा आस्वाद!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल !

 • December 15, 2018 at 4:12 pm
  Permalink

  खूप छान लेख

  Reply
 • December 15, 2018 at 4:39 pm
  Permalink

  छान माहीती…….सुंदर लेख.; अभ्यासपुर्ण ; अप्रतिम …..

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?