' BHU मध्ये “चांगली सून” होण्याचं ट्रेनिंग देणारा कोर्स : सत्य आणि बोचरं निर्लज्ज वास्तव – InMarathi

BHU मध्ये “चांगली सून” होण्याचं ट्रेनिंग देणारा कोर्स : सत्य आणि बोचरं निर्लज्ज वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

काही दिवसांपूर्वी एका बातमीने सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. बातमी अशी होती की बनारस हिंदू विद्यालयात म्हणे आता “आदर्श सून” होण्यासाठी स्पेशल कोर्स सुरू झाला आहे. ह्या कोर्स मध्ये म्हणे आदर्श सून कशी असावी ह्याचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

आपल्याकडे मीडियाने प्रेक्षकांची नस अगदी बरोब्बर ओळखली आहे. कुठली बातमी सनसनाटी होईल आणि त्याने टीआरपी वाढेल हे मीडियाला माहीत झाले आहे.

म्हणूनच “बनारस हिंदू विद्यालयात तयार होतील आदर्श सुना” छाप हेडलाईन छापून मीडियाने ही बातमी कॅश केली.

आपल्या देशात टोकाचे मतप्रवाह असणारे अनेक लोक आहेत. त्या दोन्ही मतांच्या वाचकांना ही बातमी खेचून घेणार हे मीडियातील मुरलेल्या खेळाडूंना माहीत होते. दोन प्रकारच्या व्यक्तींना ही बातमी क्लिक होणार होती.

एक म्हणजे “फेमिनिस्ट” लोकांना (ह्यात पुरुष बायका सगळेच आले) आणि दुसरे ते लोक जे आजही आपल्या मुलांसाठी घर सांभाळून मगच नोकरी करणारी, सासू, सासरे, सणवार कुलाचार व्यवस्थित करणारी, गोरी पान ,सुंदर, गृहकर्तव्यदक्ष (म्हणजे काय ते देवालाच ठाऊक) , आल्या गेल्याचं न कंटाळता, न थकता हसतमुखाने सगळं करणारी थोडक्यात आदर्श सून शोधत असतात. ह्या दोन्ही गटांना ह्या बातमीने भुरळ घातली.

 

sperm-count-inmarathi
indiatimes.com

बातमीत असे दिले आहे की बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून हा कोर्स डिझाईन करण्यात आला आहे व ह्या कोर्समध्ये आदर्श सून बनण्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग मुलींना दिले जाणार आहे. मीडियाने ही बातमी ज्या अँगलने दिली आहे त्यावरून असेच दिसते की मीडियाला ह्या बातमीने केवळ खळबळ उडवून द्यायची होती.

एका मिसलीडिंग हेडलाईन खाली वेगळीच माहिती ह्या बातमीत दिली आहे.

एकतर बनारस “हिंदू” विद्यालय म्हटल्यावर आधीच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असलेले लोक त्यांच्या मनात असलेल्या ग्रहांसह ही बातमी वाचणार आणि त्यात “आदर्श सून” वगैरे हेडलाईन दिल्यावर पुरोगामी आणि प्रतिगामी दोघेही ही बातमी आवर्जून वाचणार हे बातमी छापणाऱ्यांना चांगले ठाऊक आहे.

परंतु जशी हेडलाईन दिली आहे त्याप्रमाणे बातमीत सनसनीखेज असे काहीच नाही. ह्या बातमीची हेडलाईन मिसलीडिंग आहे.

खरं तर हा मुलींसाठी एक कौशल्यविकास अभ्यासक्रम आहे जो खरं तर मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल. ह्यात मुलींना कम्युनिकेशन स्किल्स,सेल्फ कॉन्फिडन्स,इंटरपर्सनल स्किल्स, स्ट्रेस हँडलिंग, कम्प्युटर स्किल्स, प्रॉब्लेम सॉलव्हिंग स्किल्स ह्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हा कोर्स “यंग स्कील्ड इंडिया” ह्या स्टार्टअप ने एका एनजीओ बरोबर “डॉटर्स प्राईड- ,मेरी बेटी मेरा अभिमान” डिझाईन केला आहे.

ह्या कोर्स मध्ये फॅशन स्किल्स, मॅरेज स्किल्स तसेच सामाजिक जीवनात कसे आत्मविश्वासाने वावरावे हे सुद्धा शिकवण्यात येणार आहे. यंग स्कील्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव ह्यांच्या मते मुलींचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना आत्मनिर्भर होता यावे तसेच त्यांच्यातला न्यूनगंड कमी व्हावा हा ह्या कोर्सचा उद्देश आहे. ह्या कोर्सदरम्यान मुलींना प्रोफेशनल स्किल्स ट्रेनर, फॅशन डिझायनर तसेच काऊन्सिलर्स मार्गदर्शन करतील.

 

skill-inmarathi
msdf.org

म्हणजे थोडक्यात हा इतर व्होकेशनल कोर्सेस सारखाच एक कोर्स आहे. ह्या सर्व गोष्टी होम सायन्स ह्या अभ्यासक्रमात सुद्धा शिकवतातच! महत्वाची गोष्ट अशी की बनारस हिंदू विद्यालयाने हा कोर्स तयार केलेला नाही. एका खाजगी संस्थेचा हा कोर्स आहे जो फक्त युनिव्हर्सिटीच्या आवारात घेतला जाणार आहे.

बातमी छापणाऱ्या लोकांनी मात्र ह्या सरळ साध्या पर्सनॅलिटी गृमिंगच्या कोर्सला वेगळेच भासवले.

हेडलाईन मधून असेच जाणवते की जणू बनारस हिंदू विद्यालयात मुलींना साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन मुकाट्याने घरचे काम , सासरच्यांची सेवा , मुलांना “संस्कार” देणे म्हणजेच थोडक्यात “चूल आणि मूल” ह्याचे प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल. परंतु सत्य हे बातमीशी विसंगत आहे.

एकीकडे ह्या बातमीने सो कॉल्ड पुरोगामी लोकांना,

“भारतीय स्त्रियांवर अजूनही चूल व मूल” ह्याचीच सक्ती केली जाते , हिंदू समाज कसा प्रतिगामी आहे, हिंदु धर्मात बायकांचे हक्क कसे डावलले जातात”

ह्या सगळ्याला एक मोठी युनिव्हर्सिटी “हिंदू” असल्याने ह्यासाठी स्पेशल कोर्स डिझाईन करून पाठिंबा देते असे बोलायची संधीच मिळेल.

तसेच दुसऱ्या बाजूला खरंच अशी बुरसटलेली विचारसरणी असणारे असा कोर्स आलाय हे ऐकून आपल्या मुली सुनांना “नीट वळण लावण्यासाठी” ह्या कोर्सला घालण्याचा गंभीरपणे विचार करतील. भारतात अजूनही असा विचार करणाऱ्यांची काहीही कमतरता नाही. अजूनही अनेक लोक मुलींच्या शिक्षणाला महत्व देत नाहीत. मुलापुढे मुलीचे शिक्षण डावलले जाते.

मुलीला आत्मनिर्भर होण्यासाठी नाही तर “चांगला नवरा मिळण्यासाठी” शिकवणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही.

 

adarsh-bahu-inmarathi
indiatimes.com

ह्याच विचारसरणीचा फायदा घेऊन मीडियावाले ह्या साध्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोर्सच्या बातमीचा विपर्यास करतात व लोकांची नाडी जोखून टीआरपी मिळवतात आणि कोर्सचे मार्केटिंग करणारे सुद्धा प्रतिगामी लोकांच्या ह्याच विचारसरणीचा फायदा घेऊन कोर्सचे व्यवस्थित मार्केटिंग करण्यात यशस्वी होतात.

आपल्याकडे फेमिनीजम ह्या शब्दाचा विपर्यास झालाय. ह्याला कारणीभूत ह्या नव्या काळातल्या सो कॉल्ड फेमिनिस्टच आहेत.

स्वैराचाराला स्वातंत्र्य म्हणून ह्यांनी फेमिनिझम हा शब्दच बदनाम केला आहे.

ह्याचेच दुसरे टोक म्हणजे मुलींचे हक्क डावलणारे लोक आहेत. स्त्रियांना भाषणस्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क, आत्मनिर्भर होण्याचा हक्क, समाजात सगळीकडे सुरक्षितपणे वावरण्याचा हक्क ह्या लोकांना अवाजवी वाटतो.

ह्यांच्या मते “संस्कारी भारतीय नारी” आत्मनिर्भर वगैरे होत नसते.

तिला कम्युनिकेशन स्किल्सची तर अजिबातच आवश्यकता नसते कारण तिने कशाविरुद्ध तोंडच उघडायचे नसते. कॉन्फिडन्स वगैरे शब्द तर तिच्या शब्दकोशात असायलाच नकोत कारण चुकीच्या प्रथांविरुद्ध आत्मविश्वासाने उभी राहणारी, आपले मत उघडपणे मांडणारी सून ह्या लोकांना आवडेल?

हे सगळे पाश्चिमात्य चोचले आहेत. आमच्या भारतीय संस्कृतीत आमच्या खानदानी संस्कारी सुना डोक्यावर पदर घेऊन, खाली मान घालून पतीपरमेश्वराच्या आज्ञेचे पालन करत असतात.

पतीपरमेश्वराच्या मातृदेवी व पितृदेवांची गपचूप सेवा करत असतात. त्या कुठलेच प्रश्न विचारत नाहीत की उलटून बोलत नाहीत.

ह्या लोकांसाठी एक प्रश्न आहे. ज्या भारतीय संस्कृतीवर हे लोक स्त्रियांचे हक्क हे पाश्चिमात्य आक्रमण समजतात त्या भारतीय संस्कृतीत गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, यशोधरा,राजकन्या हेमलेखा (ह्या तर त्यांच्या पती व सासूच्याही गुरू होत्या असे म्हणतात). या सगळ्याचा त्यांना कसा विसर पडतो?

या सगळ्या प्रकरणात बोध घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे, मिडियाची बातमी ट्विस्ट करून दाखवण्याची पद्धत, आणि “आदर्श सून” या मार्केटिंग ला लोकांनी दिलेला प्रतिसाद.

दुसरी गोष्ट जास्त गंभीर आहे. आपली आदर्श सून असावी आणि ती आदर्श असण्याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. त्या साच्यात बसणारी स्त्री तयार करणारा हा कोर्स असल्याचे समजून लोकांनी प्रवेशासाठी गर्दी केली. हे अजूनही आपण त्या मानसिकतेतून बाहेर न आल्याचे लक्षण आहे,

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?