“आमचा पक्ष, विरोधी पक्ष!” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आदरणीय श्री विश्वम्भर चौधरी सरांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

(होय, चौधरी सर हे आमचे “सर”च आहेत आणि आमच्यासाठी “आदरणीय” सुद्धा आहेत. ज्यांना चौधरी सरांच्या हेतू आणि स्थानावर शंका / आक्षेप आहेत, त्यांनी पुढील पोस्ट वाचली नाही तरी चालेल.)

पोस्ट अशी :

===

“तुमचा अजेंडा काय आहे?” असा खोचक प्रश्न मला अनेकजण विचारतात. त्यावर मी ‘कायमस्वरूपी विरोधी पक्ष’ आहे असं उत्तर देतो. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सत्तेच्या वळचणीला बसू नये यावर माझा गाढ विश्वास आहे.

राहूल गांधींचं आणि माझं शेत शेजारीशेजारी नाहीत त्यामुळे आमचं काही धुर्यावरचं भांडण नाही! तरीही २०११ पासून २०१४ पर्यंत मी काॅंग्रेसवर प्रचंड आणि कठोर टीका केलेली आहे. काॅंग्रेसवर टीकेचा मुख्य भाग ‘भ्रष्टाचार’ हा होता. इंदिरा गांधीच्या आणिबाणीचा अपवाद सोडला तर त्यानंतर कॉंग्रेसनं लोकशाहीलाच आव्हान दिलं, किंवा सेक्युलॅरिझमला आव्हान दिलं असं कधी मला तीव्रतेनं जाणवलं नाही. भ्रष्टाचार आणि विकृत भांडवलशाही, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या तीनपैकी कॉंग्रेसबाबत आक्षेप केवळ भ्रष्टाचाराबाबत होता. टीका तेवढ्यापुरतीच होती. मी कॉंग्रेसवर चॅनलवरून किती कडक टीका करत असे याला सगळ्याच पक्षांचे प्रवक्ते साक्षी आहेत.

मोदीजींचं आणि माझंही शेत शेजारीशेजारी नाही. आमचाही सामायिक धुरा नाही! मी २०१४ पासून या सरकारवरही टीका करतोय. हे मान्य की मोदी सरकारचं भ्रष्टाचाराचं कोणतंही ‘मोठं’ प्रकरण अजून तरी बाहेर आलेलं नाही पण विकृत भांडवलदारी, लोकशाही मूल्यव्यवस्था आणि सेक्युलॅरिझम या तीनही मुद्द्ययांवर बरेचदा टीका करावी लागली ती सरकारच्या याबद्दलच्या वागणुकीमुळे. तीन मुद्दे विरोधातले असल्यामुळे साहजिकच या सरकारवर तीन पट जास्त टीका करावी लागते.

तेंव्हा अजेंडा काहीच नाही. कोणताही पक्ष आणि कोणतही सरकार मोठं नसून लोक, लोकशाही, देश आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूता हेच सर्वोच्च आहेत हे मात्र मनात खोलवर रूजलेलं आहे म्हणून ‘कायमस्वरूपी’ विरोधी पक्ष. बाकी काही नाही. कोणाशी वैर नाही. व्यक्तींशी भांडण नसून व्यवस्थाबदलाचा अजेंडा जरुर आहे.

===

vishwambhar chudhari post opposition inmarathi

 

===

एखाद्या राजकीय पक्षेतर संस्था / व्यक्तीने “कायमस्वरूपी विरोधी पक्ष” असणं म्हणजे काय हे व्यवस्थित डिफाईन करायला हवं. विचारवंत, पत्रकार ह्यांनी “कायमस्वरूपी विरोधक” असणं आवश्यक आहेच. पण विरोधक असणं म्हणजे काय ह्यात गफलत करून चालणार नाही.

सत्तेतील “पक्षाचे” विरोधक की सत्तेचे? की सत्तेत बसणाऱ्या लोकांचे? लोक बदलले की जुने विरोधक मित्र बनावेत का? विरोध करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? ह्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. असं का, ह्याचं उत्तर चौधरी सरांच्या लिखाणात खचितच सापडतं.

लोकांना चौधरी सरांचा “छुपा अजेंडा आहे” असं वाटणं निव्वळ हास्यास्पद आहे. त्यांचा २०१४ पुर्वीचा ताजा इतिहास सोयीस्कररित्या विसरल्याचं लक्षण आहे हे.

पण – २०१४ पूर्वी “काँग्रेस विरोध = भाजप समर्थन” अश्या प्रकारचं लिखाण चौधरी सर करत नव्हते…! त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा प्रखर विरोध केला तरी “म्हणून भाजप / मोदी चांगले आहेत” असं कुठेही लिहिल्या बोलल्याचं आठवत नाही.

आता मात्र “भाजप / नरेंद्र मोदी नकोत, (अन म्हणून) काँग्रेस हवीये” असं त्यांच्या लिखाणातून पदोपदी जाणवतं. चक्क “काँग्रेसने नेमकं काय वाईट केलं?” ह्या प्रश्नापासून “राहुल गांधी हेच देशाचे नेते” पर्यंत चे संदेश त्यांच्याकडून जाताहेत. हे जबाबदार विरोधकांचं काम नाही.

“काँग्रेस ने लोकशाहीला आव्हान दिलं नाही” अन काँग्रेस “सेक्युलर” आहे हे म्हणणं कुणाही निष्पक्ष व्यक्तीला पटणार नाही. भाजप – संघ कनेक्शन जितकं उघड आहे तितकंच “सत्तेतील काँग्रेस – काँग्रेस पक्षप्रमुख” कनेक्शन सर्वश्रुत आहे.

काही संस्था मोडकळीस आणल्या, आपले चेले हव्या त्या ठिकाणी बसवले, हव्या त्या फॉरमॅट मधील संस्था उभ्या केल्या…हे काँग्रेसच्याच राजकारणाचं स्वरूप आहे. भाजपने सरळ कॉपी केली आहे. सल्लागार मंडळ म्हणून उभी केलेली NAC पंप्र कार्यालयाला सरळ आदेश देते, इतर खात्यांना देखील परस्पर संदेश पाठवते हे अजिबातच लोकशाहीवादी नाही.

 

 

“राहुल गांधी फारफार ग्रेट आहेत आणि ते आहेत तसेच रहावेत!” अश्या शुभेच्छा (?) देणाऱ्या पोस्ट्स आता थांबाव्यात. राहुल, सोनिया ह्यांनी त्वरित सुधरावं आणि ते शक्य नसेल तर कुणा इतर लायक, मोदींहून सरस व्यक्तीला समोर आणावं हा दबाव निर्माण करायला हवा. आणि जो पर्यंत तसं होत नाही तो पर्यंत काँग्रेस / राहुल गांधींबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न / लिखाण अजिबात होऊ नयेत.

हे झालं पक्षीय राजकारणाबद्दल. खरी समस्या त्याहून मोठी आहे. “विरोध” म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल आहे.

गोरखपूर घडून गेलं. एल्फिन्स्टन रोड घडून गेलं. त्याआधीही व्यवस्थेचे धिंडवडे निघणाऱ्या घटना घडत जाताहेत. गेल्या ७० वर्षात ह्याच अन अश्याच घटना घडत रहात आहेत. “आमचा पक्ष, विरोधी पक्ष!” हे म्हणवणाऱ्यांनी ह्याच प्रश्नांना चिकटून रहायला नको का? सत्तेत नेहरू आहेत की सिंग की मोदी की गांधी – त्याने राजकीय पक्षेतर विरोधकांना फरक का पडावा?

गेल्या ७० वर्षात आमची वैद्यकीय क्षेत्रं फ्लॉलेस होऊ शकली नाहीत. ९ वीतील विद्यार्थी १६ चा पाढा म्हणू शकत नाही आणि इंग्रजी व्याकरणातील डायरेक्ट-इनडायरेक्ट रूपांतरं करू शकत नाही ही आमच्या शासकीय शिक्षणाची गत आहे. ही गत अनेक ठिकाणी शिक्षकांचीही आहे! आमच्या डोळ्यादेखत सार्वजनीक वाहतूक अक्षरशः खड्ड्यात गेली आणि त्या जागी खाजगी वाहतूक स्थानापन्न झाली. हा “विकृत भांडवलदारी” प्रवास समाजवादी भारतात फार आधीपासून आहेच की. ही २०१४ नंतरचीच डेव्हलपमेंट नव्हे.

 

gorakhpur-hospital-tragedy-marathipizza
AFP | dnaindia.com

हे सगळं च्या सगळं सरकारचं अपयश आहेच. पण सरकारचं हे अपयश पचत गेलं, दुर्लक्षित रहात गेलं, भारतीय जनता त्याविरुद्ध चिडून उठली नाही – हे “आमचा पक्ष विरोधी पक्ष” असं म्हणत रहाणाऱ्या बुद्धिवंत समुदायाचं अपयश नाही तर कुणाचं? लोकल म्युनिसिपालिटी निवडणुकांमध्ये भारतीय सैन्याची सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तान आणि आतंकवाद चा मुद्दा उभा होतो आणि त्यात चक्क मोठे विचारवंत सहभाग घेतात हे याची देही याची डोळा बघितलं आहे आम्ही. “हा कॉर्पोरेशन चा मुद्दा नाही…इथल्या कचरा, रस्ते, वाहतूक बद्दल बोला” हे म्हणण्याची / लिहिण्याची एकाही प्रस्थापित संपादक / विचारवंताची बिशाद नाही – हे ह्या पुरोगामी महाराष्ट्राचं वास्तव आहे.

हे सगळं असं होत रहातं आणि आमचेच विचारवंत शेवटी “भारतीय लोक व्यक्तिपूजक आहेत!” , “खऱ्या समस्यांकडे कुणी लक्षच देत नाही” अश्या तक्रारी करत रहातात. भारतीय लोकांचं लक्ष व्यक्तिपूजेकडून, फालतू अस्मिताबाजी राजकारणाकडून वळवायचं काम कुणाचं? ही जबाबदारी कुणाची? – हा कळीचा मुद्दा आहे.

“आमचा पक्ष विरोधी पक्ष” – असं म्हणताना नेमकं काय अपेक्षित आहे, गृहीत आहे ह्याचा साकल्याने विचार होणं आवश्यक आहे.

भक्तांचे (भाजप / भाजपेतर, सर्वच भक्तांचे) खुळचट टोमणे सोडा. पण हे वरील मुद्दे चौधरी सर आणि समस्त प्रस्थापित पत्रकार, विचारवंतांनी गांभीऱ्याने विचारात घ्यावेत अशी कळकळीची विनंती आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 204 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?