' २०१८ मधील या पाच चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून टाकलाय – InMarathi

२०१८ मधील या पाच चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून टाकलाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतात दरवर्षी असंख्य चित्रपट प्रदर्शित होतात.

किंबहुना भारतीय चित्रपटसृष्टी ही कदाचित जगातील सगळ्यात जास्त निर्मितीमूल्य असलेली चित्रपटसृष्टी असेल. (फक्त बॉलिवूड नाही तर संपूर्ण भारतात ज्या ज्या भाषेत चित्रपट होतात ते सगळे)

गेल्या ५-६ वर्षात विविध भाषांमधील चित्रपट बघणं सुरु केल्यामुळे हिंदी चित्रपट बघणं खुप कमी झालंय.

पण ह्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत चमत्कारकरीत्या अत्यंत वेगळे विषय घेऊन चित्रपट निघाले. त्यामुळे टॉप ५ च्या लिस्टमध्ये तब्बल २ हिंदी चित्रपट आहेत.

टॉप ५ म्हणुन मी जे चित्रपट काढले आहे त्याचे पॅरॅमिटर थोडे वेगळे आहेत.

कथा, त्याला हाताळणारे हात, तिला हाताळताना रूपक म्हणुन वापरात येणारे संवाद, सिनेमॅटोग्राफी, आणि ह्या सगळ्यांचा अप्रतिम मिलाप म्हणजे ऑन स्क्रिन आउटपुट!!

 

Cinema-inmarathi
frostscience.org

ह्या सगळ्या श्रेणीवर उतरलेले माझ्या आवडीचे टॉप ५ चित्रपट मी सांगतोय. ह्यातले कुठले कुठले तुम्ही बघितले, तुम्हाला आवडले ते कळवा.

तर हे आहेत २०१८ मध्ये मला आवडलेले टॉप ५ चित्रपट..

५. नाळ (मराठी)

नागराज मंजुळेच्या चित्रपटांचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे नाळ गर्दी खेचणार आणि गल्ला कमविणार ह्यात शंकाच नव्हती.

पण नाळ हा चित्रपट नागराजपेक्षाही दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटीचा आहे, चैत्याची भूमिका जगलेल्या त्या लहानग्या श्रीनिवास पोकळेचा आहे.

श्रीनिवास कुठेही चैत्या नावाचं पात्र वटवतो आहे असं वाटत नाही. किंबहुना चैत्या आणि श्रीनिवास मुळात वेगळे नाहीतच इतका नैसर्गिक अभिनय त्या लहानग्या श्रीनिवासचा होता.

 

naal-inmarathi
youtube.com

ह्या चित्रपटात अक्टिंगमध्ये नागराजला पार खाऊन टाकलेल्या त्या लहानग्या श्रीनिवाससाठी तरी हा चित्रपट बघितला नसेल तर नक्की बघा.

टॉप ५ मध्ये नं ४ वर दोन चित्रपट आहे त्यामुळे ४.१ आणि ४.२ लिहितोय पण दोन्ही तितकेच आवडले त्यामुळे दोन्ही नं ४ च आहेत.

४.१ अंधाधुन (हिंदी)

तुकड्या तुकड्यांनी समोर येणारा अत्यंत वेगळा विषय, विषयामध्ये गुंतवून ठेवणारे ट्विस्ट, एका ठराविक वेगाने पुढे जात जाणारी कथा आणि शेवटपर्यंत तुम्हाला डोक्यात विचारांचा भुंगा वाजवत ठेवायला लावणारी बांधणी!!

आयुषमान आणि तब्बू एकदम वेगळ्या धाटणीची जोडी आणि त्या दोघांनीही आपापल्या भूमिकेचं सोनं केलं आहे.

साचेबद्ध धाटणीतुन बाहेर पडुन चित्रपट सुरु असतांना डोकं वापरायला लावणारा चित्रपट म्हणुन अंधाधुन एकदा तरी बघायला हवाच.

आयुषमान खुराणाचा मला आवडलेला सगळ्यात अप्रतिम चित्रपट!!

 

andhadhun-inmarathi (1)
indiatoday.com

४.२ Pariyerum Perumal (तमिळ)

मराठीत जातीसंघर्षावर आधारित चित्रपट बरेच झालेत. नाटकं देखील झाली.

पण जितके चित्रपट झाले त्यातील बोटांवर मोजण्यासारखे असतील की ज्यांनी मराठी नाटकांइतका ह्या विषयाला बेधडक आणि बेरडपणे तितका हात लावला असेल.

विजय तेंडुलकर ह्यांची लेखणी आग लावु शकेल इतकी दाहक होती, समाजात जे दिसेल ते त्याच प्रखरपणे ती मांडायची.

नागराजने सैराटमध्ये ज्या विषयाला हात आवरता घेत लावला होता तो हात बेरडपणे त्याच विषयाला लावला तो तमिळ दिग्दर्शक मारी सेल्वराजने त्याच्या Pariyerum Perumal मधुन.

विषय तोच मागास जातीतील मुलगा उच्च जातीच्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण सेल्वराजने प्रेम दाखवताना वाहवत जात मुळ विषय भरकटू दिला नाहीय.

 

Pariyerum-Perumal-inmarathi
TheNewsMinute.com

उलट जातीद्वेषाचा प्रश्न इतक्या बेरडपणे मांडला आहे की तो अंगावर येतो.

नायकाचा कुत्रा आणि त्याच्या आजुबाजुला गुंफलेली कथा, त्याच्या जातीच्या विवंचना आणि त्याचं समाजातील स्थान ह्यांचा जुळवुन दाखविलेला मेळ म्हणजे हा चित्रपट.

काही काही सीन्स तर अंगावर काटा आणतात. विशेषतः दलित जातीतील लोकांना मारल्यानंतर त्या लोकांवर पेशाब करणारा सीन.

आणि नायिकेचा बाप जेंव्हा नायकाला म्हणतो “Kula Saamikku Seiyyara Sevai” तेंव्हा नायकाला तुझ्या प्रेमाला तुला मरताना बघायचं असेल तर साला तुझं प्रेम ते प्रेमच काय??ही गर्भित ऑनर किलिंगची धमकी देतो त्या शॉटचे एक्सप्रेशन.

एकूण अत्यंत गंभीर विषय असुनही प्रेक्षकांपर्यंत तो पोहचवताना त्यात कुठेही विषयातील गाभ्याची हेळसांड होणार नाही ह्याची मारी सेल्वराजने पुरेपूर काळजी घेतली आहे.

गंभीर आणि अंगावर काटा आणणारा जातीय संघर्षाचा विषय कदाचित महाराष्ट्रात इतका गंभीर नसावा. पण मी तमिळनाडूमध्ये बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यामुळे हा विषय आणि त्याचं गांभीर्य ह्याला मी चित्रपट बघतांना रिलेट करू शकलो.

जातींच्या प्रश्नाकडे डोळे उघडे ठेवून बघायचा असेल तर Pariyerum Perumalनक्की बघा.

३.१ गीत गोविंदम (तेलुगू)

व्यक्तिशः रोमँटिक मुव्ही हा प्रकार फारसा मला कधीच शिवला नाही.

त्याला कारणं अनेक असतील पण मुख्य कारण प्रेम शोधण्याच्या महाविद्यालयीन कालखंडात मी मित्रांसोबत टवाळक्या, कॅम्पस प्लेसमेंटची तयारी, फुकाचे माज, ट्रेकिंग ह्यात घालविली.

त्यामुळे असले हळुवार विषय कधी पचायचेच नाहीत. नोकरीनिमित्त दक्षिण भारतात स्थायिक झाल्यावर दाक्षिणात्य चित्रपट बघायला लागलो आणि का कोण जाणे पण त्यांच्या सरळ साध्या आणि सामान्य माणसांशी निगडित लव्ह स्टोरीजच्या प्रेमात पडलो.

कुठेही हिडीस अंगविक्षेप नाही की लव्ह स्टोरी आहे म्हणुन कथानकाची गरज नसतांना मुद्दाम घातलेले किसिंग सीन्स नाहीत.

पण दोन जीवांमधील प्रेम आणि त्याची इन्टेन्सिटी मात्र प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहचायची.

अशीच सहज, सरळ आणि कुठलेही आडवळणं न घेता जाणारी सहज सरळ प्रेम कहाणी म्हणजे गीत गोविंदम!!

 

Geetha_Govindam_inmarathi (1)
indiaglitz.com

विजय देवरकोंडा हा माणुस मुळातच प्रचंड ग्रेसफुल आहे. तो चित्रपटात असला तर त्याच्यासमोर कोण अभिनेत्री आहे हा विषयच येत नाही. कारण तो समोर असला तर अभिनेत्रींकडे लक्षच जात नाही!!

गीत गोविंदम मध्ये काय वेगळं झालंय??

समोर रश्मिका मानधना नावाची कर्नाटका क्रश असो वा प्रियांका जवळकर (टॅक्सीवाला फेम) सारखी हॉट अभिनेत्री असो नजर विजय वरच राहते. आणि तो ही तेलुगू चित्रपटातील नायकाच्या कर्तव्याप्रमाणे हा चित्रपट पूर्णपणे त्याच्या कवेत घेतो.

गीत गोविंदम मध्ये एक Ideal Bachelor म्हणुन वावरताना विजय आजच्या टिपिकल husband material मुलांना ज्याप्रकारे रिप्रेसेंट करतो त्यातच चित्रपटाची अर्धी बाजी मारली जाते.

हैदराबादला जाणाऱ्या बसमधुन सुरु झालेला प्रवास साठा उत्तराची कहाणी संपवून बसमध्यल्या सीनवरच संपतो.

गीत गोविंदम ह्या चित्रपटाचं अजुन एक बलस्थान म्हणजे त्याची गाणी!! सिद श्रीराम कम्माल गायला आहे.

सिदचा व्यसन लावणारा आवाज, इवलुश्या नाकावर सबंध चित्रपटभर राग घेऊन वावरणारी गोड रश्मिका आणि शेवटी ऑल इन ऑल विजय देवरकोंडा ह्या नावाची छाप सोडुन भाव खाऊन गेलेला विजय..

गीत गोविंदम ट्रीट आहे!!

३.२ तुंबाड (हिंदी)

तुंबाडच्या ट्रेलरमध्ये जेंव्हा हस्तर ह्या शब्दाचा उल्लेख ऐकला तेंव्हाच कान टवकारले गेले.

नारायण धारप आणि रत्नाकर मतकरींच्या गूढ अगम्य कथा वाचुन मोठी झालेली एक संपूर्ण पिढी महाराष्ट्राने बघितली आहे. त्यांच्यासाठी नारायण धारप ह्यांच्या हस्तर आणि बळी ह्या कथा विसरणं शक्यच नाही.

धारपांच्या ह्या दोन कथांचा प्लॉट तुंबाडमध्ये राही अनिल बर्वेनी घेतला आहे.

आपल्याकडे गूढपट आणि भयपट ह्या दोन्ही श्रेणींमध्ये प्रचंड गफलत होते. आक्राळ विक्राळ काहीसे हास्यास्पद दिसणारे हिडीस भुत नामक कार्टून दाखविले की आपल्याकडे त्याला भयपटात गिनतात.

पण मुळात भय ही भावना भुत दिसण्यात नव्हे तर गूढ आणि अगम्य गोष्टींमध्ये असते हेच मुळात आपल्या लोकांना पटत नाही.

मतकरी असो वा धारप त्यांनी ह्या गूढ आणि अगम्यतेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्याच उंचीवरून दिग्दर्शक राही अनिल बर्वे तुंबाडला मोठ्या पडद्यावर दाखवितो.

 

tumbbad-inmarathi

 

तुंबाड चित्रपटामागे दिग्दर्शकाची तब्बल १२ वर्षांची मेहनत आहे, आणि ती चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये दिसते.

तुंबाड हा हस्तरसाठी, सावकार किंवा त्या नायकासाठी लक्षात राहात नाही. तो लक्षात राहतो माणसाच्या नकळत त्याच्यावर हावी होणाऱ्या षड् रिपूंच्या  वासनांसाठी!!

चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गूढ सिनेमॅटोग्राफी, धो धो कोसळणाऱ्या पावसातील अप्रतिम फ्रेम्स आणि सबंध चित्रपटात क्षणापुरतंही न दूर झालेलं गूढ वातावरण तुंबाडला एक अविस्मरणीय अनुभव बनवितो!!

काही लोकांनी त्यातल्या त्यात काही समीक्षकांनी जेंव्हा तुंबाड हा टुकार ‘भयपट’ आहे म्हणुन त्याची बिभत्सना केली तेंव्हा खरंच वाटलं की आपली चित्रपटसृष्टी अजुनही गुढपट ह्या श्रेणीसाठी तितकी प्रगल्भ नाहीय का??

अर्थात हा वैयक्तिक विषय आहे. पण निदान एक गूढपट देण्याचं धाडस करणाऱ्या राही अनिल बर्वेला हॅट्स ऑफ म्हणुन तरी हा क्लासिक गूढपट बघायलाच हवा.

२. वाडा चेन्नई (तमिळ)

गँगवॉर संबंधित चित्रपट आपल्याला काही नवे नाही. वासेपूरनी तर पार पोट भरून फुटेस्तोवर ह्या विषयाची हौस भागवुन दिली आहे.

आताशा ह्याप्रकारात तर सेक्रेड गेम्स आणि मिर्जापूर सारख्या वेब सिरीजनी भर घातली आहे. तरीही वाडा चेन्नई (वाडा चेन्नई म्हणजे नॉर्थ चेन्नई) मध्ये असं नेमकं काय वेगळं आहे??

तेच खुन त्याच मारामाऱ्या तेच गँगवॉर, हो तेच आहे, पण एकच गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे व्हाईट ते ग्रे शेड ह्याचं रूपांतर दाखविणारी मुळ कथेला घट्ट चिपकुन बसलेली पटकथा!!

लेखक दिग्दर्शक वेत्रीमारन ह्याने उत्तर चेन्नईचे डार्क ग्रे शेड दाखविताना अम्बु (धनुष) ह्या नॅशनल लेव्हल कॅरम प्लेयरमधील ग्रे शेड वाढवत, त्याचं पूर्ण गँगस्टरमध्ये होणारं परिवर्तन  जे ठेहराव घेत दाखविले आहे त्याला तोड नाहीय.

 

vada-chennai-dhanush-inmarathi (1)
movienews360.com

खुन-मारामाऱ्या, रक्तपात चिक्कार गोष्टी आहे ह्या चित्रपटात.

अगदी पहिल्याच शॉटमध्ये चाकूने लहान-लहान तुकडे केलेला खुन आणि त्या चाकुवर लागलेले मनुष्य प्राण्याच्या मांसाचे तुकडे आणि अंगावर उडालेल्या चिळकांड्या.

इतकं असुन सुद्धा गुणा, सेंथील, वेलू आणि पळानी ज्या शांतपणे देशी दारू ढोसतात तिथूनच तुमच्या अपेक्षा चित्रपटासाठी वाढुन जातात.

तुमच्या अपेक्षा हा चित्रपट नुसता पूर्ण करत नाही तर वाजत गाजत पूर्ण करतो.

वाडा चेन्नई हा चित्रपट एकूण तीन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच भागात दिग्दर्शक वेत्रीमारनने सिक्सरच मारला आहे. उरलेल्या दोन भागात तो काय तांडव करेल ह्याची पुसटशी कल्पना तो ह्या चित्रपटात देतो.

अर्थात ते कळलं तर पुढच्या भागाची उत्सुकता राहणार नाही.

धनुष मला विजय सेतुपती नंतर सध्याच्या घडीतील तमिळ नायकांमधील सगळ्यात जास्त आवडणारा अभिनेता आहे. प्रचंड कॅलिबर असणारा अभिनेता आहे हा, आणि वाडा मध्ये तो तसुभरही निराश करत नाही.

मी आतापर्यंत बघितलेला वन ऑफ द बेस्ट ग्रे शेड मुव्ही वाडा चेन्नई. अजिबात चुकवू नये असा वाडा चेन्नई!!

फार कमी चित्रपट असतात जे ह्रदयाचा कोपऱ्यात आठवणींच्या कप्प्यात हळुवार जपून ठेवायचे असतात, त्यातला एक म्हणजे टॉप नं १!!

१. ’96’

ह्या स्पॉटसाठी beyond any doubt एकच नाव होतं

ह्या चित्रपटाचं टीजर प्रदर्शित झालं तेंव्हाच उत्सुकता चाळवली गेली. विजय सेतुपती आणि त्रिशा ही आऊट ऑफ द बॉक्स जोडी, आणि वरून त्यात विजयचा Life Of Ram गाण्यामधला दाढीतला Raw (खरं तर जंगली) लुक.

त्यानंतर 96 चं ट्रेलर आल्यावर मात्र मी उडालोच. एक तर लव्ह स्टोरी तीही शाळेतली आणि आता चाळीशीत पोहचलेली, वरून ट्रेलर मध्ये निवडुन असे संवाद होते की नेमका विषयाचा अंदाजच येणार नाही पण Apple products च्या पॅकेजिंग वरून त्याच्या आतल्या मुख्य प्रॉडक्टची मार्केट व्हॅल्यू कळते.तसंच 96 च्या ट्रेलरचा फील rich होता.

 

96-tamil-movie-inmarathi
tolltwood.com

तमिळ चित्रपटांच्या तारखांच्या बाबतीत खुप घोळ असतो. नेमकी प्रदर्शनाची तारीख कळायला वेळ लागतो.

शाळेतल्या लव्ह स्टोरीज वर किंवा टीन एज लव्ह स्टोरीज वर आपल्याकडे चिक्कार चित्रपट झाले अगदी शाळा, टाईमपास, ते ती सध्या काय करते इथपर्यंत!!

त्यात ती सध्या काय करते हा चित्रपट शाळेतील अर्धवट राहिलेली लव्ह स्टोरी एका मॅच्युअर वयात आल्यावर काय वळण घेते यावर भाष्य करते. पण conclusion काय तर प्रेम होतं but now lets move on in our own life.

96 ह्याबाबतीत थोडा वेगळा आहे, नायक नायिका दोघंही इतके अगतिक आहेत की त्यांना Move On करावं लागतंय आणि त्याचा त्यांनाच काय तर चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा प्रचंड त्रास होतो. अर्थात दोघे याही वयात त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम लपवित नाहीत.

96 चा दिग्दर्शक C.Prem Kumar सबंध चित्रपट भर तुमच्या ह्रदयावरून अलगद चाकू फिरवत असतो, तुम्ही असह्य होऊन ते बघत असता आणि ज्या क्षणाला चित्रपट संपतो त्या क्षणाला तुमच्या भावनाआवेगाचा ग्राफ इतका वर गेलेला असतो की ह्या सिनेमातून बाहेरच्या जगात यायला तुम्हाला किमान ५-१० मि तरी लागतात.

आयुष्यात एका दिवसांत मिळालेल्या १२ तासांत तुम्हाला २२ वर्षांचं आयुष्य त्यात उभे राहिलेले प्रश्न, त्यांची उत्तरं, तुमचं प्रेम त्याचा ओलावा सगळं सगळं अनुभवायचं असतं पण अट एकच वेळेची मर्यादा फक्त आणि फक्त १२ तास!!

ह्या १२ तासांचा प्रत्येक सेकंद अन सेकंद राम (विजय) आणि जानू (त्रिशा) जगतात आणि त्यांचं ते ऑनस्क्रीन जगणं प्रेक्षकांना श्रीमंत करून जातं!!

 

96-inmarathi
softhead.com

कास्टिंग बद्दल काय बोलणार सगळेच आपापल्या जागी फिट बसले आहेत. शाळेतले राम आणि जानू ते त्या दोघांचे सवंगडी सगळेच. त्रिशाचा कदाचित तिच्या सबंध कारकीर्दीमधला सर्वोत्तम परफॉर्मन्स तिने 96 मध्ये दिला असेल. त्रिशाला मी ओल्ड वाईन म्हणतो, ती जशी जशी तिच्या चाळीशीकडे चाललीय तशी तशी तिची अभिनय क्षमता अजुन मुरत चाललीय, आणि तिचा मुरलेला matured अभिनय डोळ्यासमोर रेंगाळत राहतो.

सगळ्यात शेवटी विजय सेतुपतीबद्दल, विजय मला तमिळ चित्रपटसृष्टीचा पारस दगड वाटतो.

ज्या ज्या प्रोजेक्टला त्याने हातात घेतलं आहे त्या त्या प्रोजेक्टस ना आपल्या परिस स्पर्शाने त्याने सोनं केलंय. कुठल्याच अँगलनी तो टिपिकल नायक पठडीतील अभिनेता नाहीय, किंबहुना वयाच्या ३५ नंतर त्याने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आहे त्यामुळे काळा-सावळा पोट सुटलेला, विजय हा हिरो कसा असु शकतो हा विचार बॉलिवूडच्या चित्रपटांवर वाढलेल्या लोकांना नक्कीच पडु शकतो.

चाळीशीतला एक कडक शिस्तीचा फोटोग्राफी मेंटर, हनुमान उपासक ब्रह्मचारी राम जेंव्हा त्याची जानू २२ वर्षांनी त्याला भेटते तेंव्हा लोण्याहून मऊ होतो हे अफाट ट्रान्सफॉर्मेशन विजय भन्नाट दाखवतो.

तो इतका भारी वावरलेला आहे की त्या राम नावाच्या कॅरेक्टर बद्दल तुमच्या मनात एक प्रकारची empathy दाटुन येते. इतक्या वर्षानंतर भेटलेली त्याची जानू आता लग्न करून तिच्या संसारात सुखी आहे, तिला मुलगी आहे तरीही रामच्या घरात त्याच्याच बेड वर झोपलेल्या जानूची दृष्ट काढणारा राम आणि तिच्या गळ्यातल्या मंगळसुत्राला दुरूनच नमस्कार करणारा राम अगदी त्याच्या नावसारखाच निर्मळ आहे. 96 हा मस्ट वॉच आहे, अजिबात मिस करू नये असा…

96 मधले बरेच सीन मला आवडतात पण त्यातल्या त्यात आवडलेले दोन सीन्स म्हणजे जानू नी कॉलेजमध्ये पहिल्यांदा साडी घातल्यावर ती किती गोड लाजत होती ह्याचं वर्णन तिच्याच समोर करणारा राम जेंव्हा तिला विचारतो “Ippra intha termi maa” (तुला माहितीय तू कशी दिसत होतीस) म्हणत कल्याणम (लग्न) मधील मंगळसुत्र विधी एक शब्दही न बोलता इनॅक्ट करतो.

आणि दुसरा सीन जानू आणि राम हॉटेलमध्ये रामच्या विद्यार्थिनींना “Kathale Khathale” च्या मंद स्वरात त्यांची न पूर्ण होऊ शकलेली प्रेम कहाणी कशी पूर्ण झाली हे खोटंच सांगत असतात!! हे लिहिताना माझ्या अंगावर काटा आलाय इतके शब्दांच्या पलीकडले भाव आहेत त्या सीन्सचे!!

96 च अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं पार्श्वसंगीत आणि त्याची जादुई गाणी!!

संगीतकार गोविंद वसंता मुळचा केरळ त्रिशूरचा. कप्पा टीव्हीवरील Music Mojo कार्यक्रम जे बघतात त्यांना thaikkudam bridge ( होय तेच खेळ मांडला गाण्याचा रिमेक करणारे) आणि त्याचा अवलिया गोविंद वसंता माहिती असेल. गोविंद वसंताच्या स्ट्रगलिंग पीरियड मध्ये त्याच्या बैंडचा लाइव्ह परफॉर्मेंस मी कोच्चीला १०-१५ फुटांवरून बघितला होता.

ही मंडळी खरच प्रचंड मेहनती आहेत, संगीतावर प्रचंड श्रद्धा ठेवून intensively क्रिएटिव्ह आहेत.

त्या गोविंद वसंताची प्रगती बघताना खुप आनंद होतो. जरा धाडसी विधान ठरेल पण तो असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहिला तर आज रहमान नावाच्या अवलियाला जे अढळपद प्राप्त आहे ते गोविंद वसंताला देखील खुणावु शकतं!!

एकूण काय भाषेची कुठलीच अडचण न येता तुम्ही 96 पूर्णपणे एन्जॉय करू शकता.

आयुष्यात कुणावर तरी प्रेम केलं असेल आणि ते व्यक्त करू शकले नसाल तर 96 तुमच्याचसाठी आहे. थंडीमुळे आज 31st निमित्ताने कुठे बाहेर जाणार नसाल आणि घरात कुटुंबासोबत एकटेच असाल तर 96 बघणं चांगला पर्याय ठरू शकतो.

तुमच्या प्रिय व्यक्तीचा सहवास आणि ऑनस्क्रीन विजय-त्रिशाची आऊट ऑफ द बॉक्स जोडी!! शिंगल्या लोकांनी मात्र एकट्यानेच बघावा. फहदचा Njan Prakashan (मल्याळम) आणि विजय सेतुपतीच्या कारकीर्दीतला २५ वा चित्रपट Seethakathi (तमिळ) बघायचे राहून गेले, टेलीग्राम वर आले की बघेन.

२०१९ मधील जानेवारी महिनाच इतके जबरदस्त variations घेऊन आला आहे पुलंचा बायोपिक भाई, मनमोहनसिंग ह्यांच्या कारकीर्दीवरील AccidentalPrimeMinister, बाळासाहेब ठाकरेंवरील ठाकरे, आंध्रप्रदेश मधील करिष्मायी नेते N.T रामाराव ह्यांच्या कारकीर्दीवरील NTR, रजनीचा-विजय सेतुपती आणि नवाजुद्दीनचा पेट्टा, Surgical Strike वरचा उरी असा फुल पॅक धमाकेदार जानेवारी महिना आपली वाट बघतोय. तेंव्हा खिशाला लागणाऱ्या चोटीची जुळवाजुळव आताच करून ठेवा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?