स्त्रीला केवळ योनी पुरतंच संकुचित करणाऱ्या, प्रिय स्वरा भास्कर, यांस…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रिय स्वरा भास्कर,

प्रामाणिकपणे सांगायचे तर तुमच्यासारख्या प्रचंड अभिनयक्षमता आणि त्यासोबत विचार करायची क्षमता असलेल्या अभिनेत्रीबाबत मला खूप कौतुक वाटायचं. एक कठपुतळी बाहुली न बनता तुम्ही निर्भयतेने तुमचे विचार लोकांसमोर मांडता.

आजच्या जगामध्ये स्त्रीवादी असण्याला फार उपहासात्मक नजरेने पहिले जाते, अशा काळात तुम्ही लोकांना स्त्रीवादी विचारसरणीचा स्वीकार करण्यास सांगता, यासाठी तुमच्या धारिष्ट्याचं कौतुक करावं ते कमीच!

 

swara bahskar inmarathi

 

कालच तुम्ही श्री. भन्साळी सरांना लिहिलेलं पत्र वाचलं, आणि एखादी बुद्धिमान व्यक्तीदेखील सवंग प्रसिद्धीसाठी काय थराला जाऊ शकते याचे ते उत्तम उदाहरण वाटले. (द वायर वर प्रसिद्ध झालेलं स्वरा भास्कर ह्यांचं पत्र : लिंक)

तुमच्या पत्रातील पोकळ स्त्रीवादी विचार म्हणजे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला मारलेली चपराक आहे असे वाटले.

भारत पाकिस्तान विभाजन असो अथवा कुठलीही दंगल, स्त्रियांवर प्रथम हल्ला केला जातो. याचे कारण फक्त हे नाही कि स्त्रिया अबला आहेत, तर याचे कारण हे देखील आहे कि स्त्रिया हा प्रत्येक कुटुंबाचा सन्मान असतात.

तुम्ही बरोबर म्हणालात, कि बलात्कारानंतरही स्त्रीला जगण्याचा हक्क आहे, नवरा मेल्यानंतरही तिला जगण्याचा हक्क आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचे निर्णय कालानुरूप आणि परिस्थितीनुरूप बदलू शकतात. ऐतिहासिक काळात बलात्कार झाल्यावर “आयुष्य जगणं” नसायचे, तर स्त्रियांना आणि त्यांच्या संततीला आयुष्यभर गुलाम बनून राहावे लागायचे. धर्मपरिवर्तन, भाषापरिवर्तन आणि सन्मानहीन जगण्यापेक्षा त्या काळी स्त्रिया आत्मदहन करायच्या.

पत्रामध्ये तुम्ही सती जाणे आणि जोहार करणे या दोन्ही गोष्टींची गफलत केलेली आहेच, परंतु स्वाभिमानाने मृत्यूला कवटाळण्यापेक्षा कुणाची बटीक बनून राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.

 

jauhar_padmini marathipizza

 

प्रांजळपणे बोलायचे तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अन त्यासोबतच हा त्या काळातील सामाजिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा विषय आहे.

एका दूरच्या प्रांतातील चवताळलेल्या क्रूर आक्रमकांनी लचके तोडण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणाऱ्या राजपूत महिलांचा निर्णय मला मान्य आहे, कारण हा निर्णय घ्यायची धमक त्यांच्यात होती. श्री. भन्साळी यांनी पद्मावत काव्यावर चित्रपट तयार केला असेल तर त्यामध्ये जोहार हा असणारच, कारण आत्मसन्मानाने स्वतःच्या आयुष्याचा स्वतः निर्णय घेऊन मृत्यूला सामोरे गेलेल्या स्त्रियांची शौर्यकथा हेच तर खरे काव्याचे गमक आहे.

तेराव्या शतकातील परिस्थितीनुसार घेतलेल्या त्यांच्या निर्णयावर आणि ते घडले तसे मांडणाऱ्या दिग्दर्शकावर असे प्रश्न उठवणे संयुक्तिक वाटत नाही.

स्त्रीवाद हा फक्त योनी आणि त्यावरील स्वामित्वाबाबतच न बोलता महिलांच्या एकूणच अधिकारांबाबत बोलतो. स्त्रीत्वाला अनेक छटा आहेत.

स्त्रीच्या सन्मान, अधिकार, स्वातंत्र्य आणि एकूण अस्तित्वापेक्षा तुम्हाला फक्त तिची योनी जाणवली हि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

 

rape-molestation-women-marathipizza

 

प्रत्येक जागतिक विचारसरणीचा आशय आणि संदर्भ हा देशानुसार, सामाजिक व्यवस्थेनुसार आणि संस्कृतीनुसार बदलत असतो.

भारतीय संस्कृतीने सुरुवातीपासूनच स्त्रियांना प्रचंड स्वातंत्र्य आणि हक्क दिलेले आहेत. भारतीय प्राचीन इतिहासामध्ये मातृसत्ताक पद्धती असलेल्या बऱ्याच समाजपद्धती होत्या.

काळानुसार सामाजिक व्यवस्था बदलणे हि संस्कृती संवर्धनाची गरज होती, आणि भारतीय समाज असे बदल फार लवकर स्वीकारतो. यामुळेच बाकी संस्कृतींप्रमाणे आपली समाज व्यवस्था नामशेष झालेली नाही.

आता मुद्दा हा आहे कि या भारतीय व्यवस्थेमध्ये स्त्रीवादी विचारसरणीला आपण कु ठे पाहतो. जो टोकाचा स्त्रीवाद पाश्चिमात्य देशांमध्ये अवलंबला आहे, तो भारतात अवलंबायची गरजच नाहीये.

तुमच्या पत्रामध्ये तुम्ही भारतातील स्त्रीवादी चळवळीमुळे महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, सामान वेतनाचा अधिकार आणि वडिलोपार्जित संपत्तीवरील अधिकार मिळाले असे लिहिले आहे.

तुमच्यासारख्या जे. एन. यु . मधील उच्चशिक्षित व्यक्तीला हे माहित असायला हवे कि बाकी देशांमध्ये महिलांना न मिळालेले हे सर्व अधिकार भारतीय महिलांना कुठल्याही चळवळीशिवाय मिळाले आहेत.

होय, याच सहिष्णू भारताच्या राज्यघटनेने हे अधिकार सर्व महिलांना दिले आहेत.

 

constitution-of-india-inmarathi
patsariya.com

एवढेच नव्हे, तर भारतीय राज्यघटनेने पंचायतराजच्या अंतर्गत एक तृतीयांश महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देखील दिलेले आहे.

किशोरी विकास योजना, निर्भया ऍक्ट , घरेलू हिंसा आणि हुंडाविरोधी कायदा असे अनेक कायदे आपल्या शासनाने पारित केले आहेत. त्यामुळे तुला कायमच असहिष्णू वाटणाऱ्या आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने फक्त शहरेच नव्हे तर गावांमधील स्त्रिया देखील आत्मनिर्भरतेने, सन्मानाने जगात आहेत.

ज्याप्रमाणे मार्क्सवाद हा भारतातील जातिव्यवस्थेच्या चौकटीमध्ये बाणवता येऊ शकत नाही, तसेच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये क्रांतिकारी स्त्रीवाद बाणवणे अशक्य आहे. असे करताना मुलभूत समस्या न सुटता आपली पूर्ण समाजव्यवस्था मोडकळीस येऊ शकते.

आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच स्त्रीला रणरागिणी दुर्गेच्या स्वरुपात पूजले गेले आहे. इतिहासामध्ये देखील संकटसमयी महिलांनीच नेतृत्व करून संकटांवर मात केलेली दिसून येते.

 

rani lakshmibai-inmarathi02

 

उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर,सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, कमलादेवी चटोपाध्याय, सावित्रीबाई फुले अशी किती नावे घेऊ?

त्यांनी त्यांचे स्त्री असणं स्वीकारून विश्वविक्रमी काम करून दाखवले. समाजव्यवस्था न झिडकारता आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रश्नांचे उपाय शोधले, कारण फक्त स्त्रीकडेच नवनिर्मितीचा ऊर्जास्रोत असतो.

जिथे तुम्हाला भारतीय स्त्री हि फक्त योनी स्वरूपात, हतबल अबला असलेली दिसते, तिथे ती मला घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करणारी रणरागिणी दिसते.

मान्य आहे कि समाजामध्ये प्रचंड वाईट गोष्टी होत आहेत. बलात्कार, हुंडाबळी, ऑनर किलिंग अशा अनेक गोष्टींनी समाजाला पोखरलेले आहे. परंतु या सर्व प्रश्नांचे मूळ काय आहे?

जेव्हा माणूस आपले संस्कार आणि संस्कृती विसरतो तेव्हाच तो जनावराच्या पातळीला जाऊन अशी कामे करतो. जर समाजाला आणि पर्यायाने स्त्रियांना अशा गोष्टींपासून वाचवायचे असेल तर उत्तम चारित्र्य आणि शिक्षण यांचा समन्वय असलेली नवीन पिढी घडवणे हाच उपाय आपल्याकडे आहे.

यासाठी मजबूत कुटुंबव्यवस्थेमधून हि मूल्ये आणि संस्कार जपले गेले पाहिजेत असे मला वाटते.

त्यामुळे स्त्री व पुरुषांनी हि एकत्रित जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. इथे पाश्चिमात्य देशांसारखा क्रांतिकारी स्त्रीवाद बाणवून कौटुंबिक व्यवस्थेला सुरुंग लावणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.

जसा समाज हा दोन चार लेखांनी आणि मुलाखतींनी बदलत नसतो, तसा तो सिनेमामध्ये स्त्रियांना दारू पिताना दाखवूनही बदलत नसतो.

सामाजिक परिवर्तन हे आर्थिक आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामधून घडत असते. अनेक शासकीय आणि अशासकीय संघटना वर्षानुवर्षे सामाजिक प्रश्नांवर काम करून परिवर्तन घडवत आहेत. जोपर्यंत आपण या प्रश्नांवर काम करत नाही, तोपर्यंत टीका करण्याचा देखील नैतिक अधिकार आपल्याला नसतो. त्यामुळे असे लेख लिहून पांढरपेशा समाजामध्ये सवंग प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही योगदान देऊ शकाल, तेव्हा स्त्रीवादाबाबतची तुमची तळमळ जाणवेल.

शुभेच्छा !

मृण्मयी व्यंकटेश सातपुते

(लेखिका उच्चशिक्षणासाठी कॅनडास्थित आहेत.)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?