कोलेस्टेरॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी १२ सहज सोप्या टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण डॉक्टरकडे जातो, तपासणी झाल्यावर लक्षात येतं की, कोलेस्ट्रॉल वाढलंय. आपल्याला खूप टेंशन येतं की आता काय करायचं? कसं हे कमी करायचं?

आपल्याला तर वाटत असतं की, आपण काहीच जास्त खात नाही तरी कसं काय आपला असा रिपोर्ट आला?

आपण अगदी हतबल होऊन जातो. तर मंडळी हतबल होऊ नका. चांगला आहार आणि चांगला विचार हेच आपल्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे.

डॉक्टर आपल्याला औषधं तर देतीलच तरीही आपल्या जर योग्य आहार घेतला तर तुम्ही हृदयरोग आणि कोलेस्ट्राल वाढ या रोगांवर नियंत्रण आणू शकाल. पाहुया त्यासाठी खास टीप्स.

१. कोलेस्ट्रॉलची गरज :

आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असतेच. ते अजिबात नसूनही चालत नाही, पण ती थोड्या प्रमाणात असते, पण बर्याच लोकांच्यात ती कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते.

 

 

ldl आणि hdl अशा दोन कोलेस्ट्रॉलच्या दोन लेव्हल असतात. ldl म्हणजे जास्त कोलेस्ट्रॉल. ही लेव्हल वाढते कशामुळे तर बर्याचदा मांसाहरी किंवा तेलकट खाण्यामुळे.

जर तुमची ldl लेव्हल वाढली तर त्याचा परिणाम हृदयावर होऊन हृदयरोग सुद्धा होऊ शकतो. hdl कोलेस्ट्रॉल लेव्हल म्हणजे शरीरातली कोलेस्ट्रॉल मेंटेन आहे.

२. खाताना तुमच्या हाताचा वापर करा :

आपल्याकडून खूप खाल्लं जातं. बाहेर गेल्यावर तर काही लिमीटच राहात नाही त्यामुळे वजन वाढतं कोलेस्ट्राल वाढतं. आपण एका वेळी किती खायचं याचं माप ठरवण्यासाठी आपण आपल्या मुठीचा वापर करू शकता.

 

An open bag of potato crisps.

पूर्वी म्हणत मूठभर शेंगदाणे, चणे. म्हणजे खाण्यासाठी मुठीचं माप होतं. खरोखरच आपले पूर्वज हुशार होते. आता मूठ जाऊन पॅकेटचं माप आलं आहे. किती पॅकेट फस्त केली हे आपण पाहतो.

वेफरचं एक पाकीट, बाकरवडी एक पाकीट. तर तसं न खाता आपण एका वेळी आपण किती खावं यासाठी आपल्या हाताचं माप घ्या.

जर तुम्हाला मासे किंवा मटण खायचं असेल तर आपला हात पुढे केल्यानंतर त्याच्या खोलगट भागात जेवढे मावते तेवढेच तुम्ही ते पदार्थ खा. जर तुम्हाला ताजी फळं खायचीयत किंवा ड्रायफ्रूटस् खायचेत तर ते तुमच्या मुठीत बसतील एवढे खा.

आणि जेवण, उकडलेल्या भाज्या, भात, पास्ता हे खायचं असेल तर ते तुमचे दोन्ही हात पुढे करून त्यांची ओंजळ करून त्यात जेवढं बसेल तेवढंच खा. यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

३. स्वादिष्ट आणि पौष्टिक

 

 

आपण आपल्या जेवणात ताजी फळ आणि भाज्या यांचा समावेश करून कोलेस्ट्रॉलची लेव्हल खाली आणू शकतो. फळं आणि भाज्यांमध्ये फायबर असते त्याचा शरीराला फायदा होतो.

तळलेलं किंवा कमी फॅट असणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. असं पथ्य पाळल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल मेंटेन राहतेच, पण ब्लड प्रेशर पण नॉर्मल राहाते आणि वजनसुद्धा वाढत नाही.

४. कडधान्य खाऊन दिवसाची सुरुवात करा.

 

 

एक बाऊलभर मोड आलेले मूग, मटकी किंवा इतर कडधान्ये खाणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. नाश्त्यासाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी येते.

त्याच बरोबर ब्राऊन किंवा वाईल्ड तांदूळ किंवा पॉपकॉर्न हेही पर्याय नाश्त्यासाठी आहेत.

५. सुकामेवा :

 

 

बदाम, पिस्ता अक्रोड किंवा इतर सुकामेवा हे जास्त खाल्ल्याने अपायकारक होतात, परंतु प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीराला चांगला फायदा होतो.

यावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे रोजच्या रोज थोडा सुकामेवा खातात त्यांना हृदयविकाराची शक्यता कमी असते. पण त्याचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून जाडी आणि कॅलरी प्रमाणात राहील.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकामेवा नुसताच खा त्याला साखर किंवा चॉकलेट किंवा मीठ लावून खाऊ नका किंवा ते तळूनही खाऊ नका.

६. हे पण लक्षात ठेवा

 

 

आपल्या शरीराला थोड्या प्रमाणात फॅटसुद्धा आवश्यक असतं. म्हणजे स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. जसे की, तेल, तूप. पण हे कमी प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

घरचे लोणी किंवा घरगुती कढवलेले तूप यातील चांगल्या घटकांमुळेसुद्धा शरीराला फायदा होतो. पण ते प्रमाणात खाणे महत्त्वाचे. लक्षात ठेवा की चांगल्या पदार्थात जास्त कॅलरी असते तेव्हा ते प्रमाणात खाणे योग्य.

७. खाण्यातून कार्बोहायड्रेटस मिळवा.

 

 

बीन्स आणि संपूर्ण धान्य जसे तपकिरी तांदूळ, गहू, ज्वारी यामध्ये अधिक फायबर असतात, आणि आपल्या रक्तातील साखर ते वाढवत नाहीत. ते कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि खूप वेळपर्यंत आपली भूक भागवू शकतात.

जास्त करून पांढरे पदार्थ कमी खावेत. पांढरे पदार्थ म्हणजे ब्रेड, पांढरे तांदूळ, पेस्ट्री हे पदार्थ आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.

त्यामुळे ते खाल्लं तरी तुम्हाला परत परत भूक लागत राहते आणि आपण परत परत खात राहतो व वजन, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग या रोगांना आमंत्रण देतो.

८. मिनिटांचा व्यायाम

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण दररोज म्हणजे आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास वेळ हा व्यायामासाठी काढला पाहिजे.

 

 

आपण सर्व काही करतो पण व्यायाम मात्र टाळतो. कारण एकच वेळ नाही. टीव्ही, व्हाटस्अॅप, फोनवर गप्पा, झोप या सगळ्यासाठी आपल्याकडे वेळ असतो, पण व्यायाम करायचा म्हटलं की, वेळ नाही हे कारण पुढे येतं. तसं करू नका.

तुम्हाला सलग अर्धा तास वेळ मिळत नसेल तर १५ मिनिटं सकाळी, १५ मिनिटं संध्याकाळी अशा दोन सत्रात व्यायाम करा. काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे.

त्यामुळे तुमचे शरीर नक्कीच सक्रिय राहील. वजन आटोक्यात राहील त्यामुळे कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही.

९. सोपे आणि सोयीस्कर

जर तुम्ही व्यायाम करत नसाल, तर निदान चालणं तरी सुरू करा. हा सगळ्यात सोयीस्कर आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही कधीही, कुठेही करू शकता. चालण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी असते.

 

 

वजन कमी होते, हाडं मजबूत होतात. मन:स्थिती सुधारते, तणाव कमी होतो. बाकी काही व्यायाम करत नसाल तर निदान चालणं तरी सुरू केलंच पाहिजे.

मंडळी, बिन पैशाचा हा व्यायाम आहे. मोठ्या मोठ्या जिममध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे असं नाही. चालण्यानेही तुम्हाला खूप फायदा होईल. ‘शुभस्य शीघ्रम’ चांगल्या गोष्टीला वेळ कशाला? लगेचच चालणं सुरू करा.

१०. काय आणि कुठे खाल?

 

 

घरी बनवलेलं अन्न हे नेहमीच चांगलं असतं. जास्तीत जास्त घरी केलेलंच जेवण जेवत जा. हॉटेलमधील जेवणात चरबी, कॅलरी आणि सोडियम जास्त असते.

पण अगदीच इलाज नसेल तर तुम्ही भोपळा, भाजलेले, उकडलेले किंवा भिजलेले पदार्थ निवडा. तळलेले नको. आणि अगदी भरपेट जेवू नका, पोटात थोडी जागा ठेवा ज्यानं तुम्हाला जडत्व येणार नाही.

११. रेडीमेड पदार्थ

शक्यतो ताजे अन्न खा. पॅकेटमधील इन्स्टंट फूड खाणे टाळा.

१२. शांत, प्रसन्न राहा.

 

 

खाणं-पिणं-चालणं हे सर्व आवश्यक आहेच, पण आणखीन एक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे प्रसन्न मन. आपलं मन जर प्रसन्न असेल, तर आपण निरोगी राहू शकतो. तर सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे निम्मे आजार बरे होतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?