ड्रग्ज मार्केट, स्मगलिंग याबद्दल ऐकून आहात? आज प्रत्यक्ष त्या दुनियेची ‘आतील’ माहिती जाणून घ्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अंमलीपदार्थांचा व्यापार हा अत्यंत जुन्या भारतीय व्यापारापैकी आहे. औषधांमधील वापराबरोबरच धार्मिक कार्यक्रमात गांजा, अफु, भांगेचे सेवन करणे पुर्वापार आहे. गेल्या काही काळापासुन या व्यापारावर स्मगलर, संघटीत गुन्हेगार आणि दहशतवादी यांच्या अभद्र युतीने नियंत्रण मिळवले आहे. या व्यापारातुन मिळालेला जवळपास 15% हिस्सा काश्मीर, नागालॅंड, पंजाब येथील दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे आपण घेत असलेला एक झुरका देशद्रोही काम आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अंमलीपदार्थांच्या समुद्रीमार्गाने स्मगलिंग साठी कसाब आणि गॅंग आली तोच समुद्री मार्ग कित्येक शतकं वापरला जातो, याच रूटवरून मुंबई स्फोटासाठी RDX आले.

असो. आधी किरकोळ असलेले गांजा चरस चे स्मगलिंग 1980 च्या दशकात हेरॉईन वर चालु लागले तेव्हा या प्रकाराची दखल सर्व स्तरावर घेतली गेली.

 

drugs_-marathipizza01
yffpindia.wordpress.com

 

भारत पाकिस्तान सीमा

अंमलीपदार्थ विशेषतः हेरॉईन (हलक्या दर्जाचे हेरॉईन म्हणजे ब्राऊनशुगर) पाकिस्तानातुन भारतात येण्याचे महत्वाचे मार्ग म्हणजे पंजाब, जम्मुकाश्मीर, राजस्थान आणि गुजरात. यामध्ये थरचे वाळवंट हा सोयीस्कर मार्ग, कारण हा अफुची शेती माळवा प्रांतात चालत असे, तेव्हा पासुन कराची मार्गे चिन पर्यंत माल पोहोच करणारा हा पारंपारिक मार्ग आहे. अत्यंत विस्तिर्ण वाळवंट, कमी सुरक्षाव्यवस्था आणि लपण्यासाठी जागेची मुबलकता यामुळे स्मगलरांचा हा आवडता मार्ग.

पाकिस्तानच्या साहिवाल, रहिमयारखान, सक्कर, खोखरापुर येथून आलेला हा माल भारतातील चुरु, सिकार, किशनगड, रामगड, बारमेर, जैसलमेर अशा ठिकाणांवरून पुढे दिल्ली मुंबई साठी रवाना होतो.

पंजाब मध्ये दहशतवाद जोरावर असताना अंमलीपदार्थाचा व्यापार उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत होता. या व्यापारासाठी लाहोर, फाजिल्का, भटींडा, दिल्ली हा मार्ग वापरला जात होता. दुसरा मार्ग म्हणजे अटारी वाघा बॉर्डर. (समझौता एक्सप्रेस मधुन सुद्धा हा माल येतो जातो असे बोलतात.) याचा परिणाम म्हणजे अमृतसर हे अंमलीपदार्थाच्या व्यापाराचे महत्वाचे केंद्र बनलेले आहे. याशिवाय अजनाला, गुरदासपुर यासारखी सीमावर्ती ठिकाणं देखिल या व्यापाराचे केंद्र बनली, कारण कुंपणाच्या आत असलेली भलीमोठी शेतं, रस्ते आणि रेल्वेचे जाळे आणि सीमेवर असल्याचा फायदा अशी योग्य वातावरण निर्मिती याठिकाणी झालेली आहे.

 

drugs_-marathipizza02
hindustantimes.com

जम्मुकाश्मीर मधे अखनुर, सांब, सुंदरबनी, राजौरी वरुन पुंच जम्मु हायवे वरून पठाणकोट, गुरदासपुर, अमृतसर, फरीदकोट, जैसलमेर, अहमदाबाद आणि शेवटी मुंबई असा माल सप्लाय होतो. बॉर्डर जेव्हा टाईट होते तेव्हा अफगाणीस्तानातुन पाकिस्तान आणि पाकिस्तानातुन (कराची) भारत (कच्छचे रण) असा समुद्रीमार्गाने माल येतो. त्यासाठी छोट्या छोट्या बोटी वापरल्या जातात.

या व्यापारात दाऊद, नायजेरीयन, अफगाण, केनियन सिंडीकेट काम करतात. माल नेण्याऱ्याला कुरीयर म्हटले जाते. शेतकरी, गावकरी, प्रवासी, उंट यांच्या मार्फत माल पाठवला जातो. तो माल अमृतसर जयपूर दिल्ली मधे नायजेरीयन किंवा केनियन सिंडीकेट कडे हस्तांतरीत केला जातो. त्यांच्या कडुन देशांतर्गत तसेच अमेरिका युरोप कॅनडा मधे पाठवला जातो.यासाठी पोस्टल तसेच कुरीयर सेवा देखिल वापरली जाते.

नेपाळ भुटान सीमा

चरस आणि गांजा यांचे स्मगलिंग मुख्यतः नेपाळ आणि भुतान वरुन चालते.

येथून हा व्यापार अधिक सोप्या पद्धतीने चालतो कारण रस्त्यांचे जाळे आणि open border policy. बिरगंज, रक्सॉल, मोतीहारी मधुन पाटणा किंवा नेपाळगंज, बहारीच, बाराबंकि मधुन लखनौ याशिवाय अजुन दोन route मार्गाने गांजा चरस भारतात येतो. तेथुन देशांतर्गत तसेच आलेला माल पुढे अमेरिका युरोप मध्ये जातो.

 

drugs_-marathipizza03
thehindu.com

 

म्यानमार सीमा

अफु भारतात येण्याचा मार्ग म्हणजे म्यानमार भारत बॉर्डर. उपखंडात 95% अफु उत्पादन करणारा देश म्हणजे म्यानमार. म्यानमार मधुन न्यु सोमताल, सुगनु, चुडाचंदपुर मधुन इंफाळ तसेच खिमान, बेहियांग, सिंघाट यामार्गाशिवाय होमलीन, कामजोंग मार्गाने 90% भारतात येतो. याशिवाय काही माल मिझोराम मध्ये देखिल म्यानमार आणि बांगलादेशातुन येतो.

अरूणाचल, नागालॅंड हि सिमावर्ती राज्य यातुन सुटलेली नाहीत. भारतातुन कोलकत्ता, गुवाहाटी येथील कारखान्यातुन म्यानमार मधे ephedrine सारखा माल पोचतो.

बांगलादेश सिमा

बांगलादेश भारतात हेरॉईन, चरस , गांजा, अफुची जोरदार स्मगलिंग चालते. भारतातील खोकल्या वरील कफ सिरपला बांगलादेशात जोरदार मागणी आहे. पुन्हा एकदा येथेसुद्धा उत्तम वाहतुकीची साधनं, सीमेवरील लाचलुचपत वगैरे व्यवसायासाठी पोषक वातावरण जमुन आलेले दिसते.

छोट्या छोट्या बोटींचा, दळणवळणांच्या साधणाचा योग्य वापर श्रीलंका, मालदिव, थायलंड, मलेशिया, सिंगापुर अशा विविध देशात कोलकत्ता, मुंबई, तामिळनाडु, कोची अशा देशांतर्गत विविध ठिकाणांवरून माल पुढे युरोप अमेरिका खंडात पोहचतो.

 

drugs_-marathipizza04
dawn.com

हवाई मार्गात हैदराबाद, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम, अमृतसर, दिल्ली, बेंगलोरचा वापर होतो. नायजेरीयन टोळी दिल्ली – लागोस- अदिसअबाबा तसेच मुंबई -लागोस- अदिसअबाबा रूट वापरते. बहुतांश आजारी रूग्ण म्हणुन दाखल होणारे हे अंमली पदार्थांचे कुरीयरच असतात.
विविध मार्गाने येणारे 70% हेरॉईन तसेच 40% अफु पकडले जाते तरी त्याची होणारी सहज उपलब्धता यावरून येणाऱ्या मालाची आवक तुमच्या लक्षात येईल.

देशांतर्गत व्यापारामधे पोलीस आणि नार्कोटिक्स विभागाच्या आशिर्वादाशिवाय हा व्यवसाय सुरूच करता येत नाही.

संबंधित अधिकारीच कुठल्या भागात व्यवसाय चालु शकेल हे हेरून योग्य त्या पंटरला व्यवसाय लावुन देतो. सगळ्या विभागांची मांडवली व्यवस्थित केली जाते. त्याच्या शिवाय कुणी माल विकायचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्या वर रेड पडते. ज्याच्या वर आशिर्वाद आहे त्यांच्या वर देखिल रेड पडतेच. कारण पोलीस खात्यात खाणारी तोंडं एवढी आहेत कि कुठला तरी विभाग किंवा अधिकारी राहुन जातोच आणि मग तो योग्य तो कसुर काढतो.

या व्यवसायात किरकोळ व्यापारी कायम मरतो. त्यामुळे कुणी इच्छुकाने या लफड्यात पडु नये – कारण हा अजामिनपात्र गुन्हा देखिल आहे.
माझ्या शहरात म्हणजे पुण्यात अशी कित्येक ठिकाणं आहेत जेथे हवा तितका माल मिळतो. माझ्या सारख्याला माहिती असणाऱ्या गोष्टी पोलीसांना माहिती नसतील असे होऊ शकते का? पण शेवटी पैसा महत्वाचा आहे, मग तो दुसऱ्याच वाटोळं होऊन का मिळेना हि वृत्ती वाढली आहे. तुमच्या शहरातील परिस्थिती तुम्हाला माहिती.

याशिवाय सांगायचे म्हटले तर मला चांगले आठवते माझ्या लहानपणी अंमलीपदार्थ विरोधात मोठी मोहिम चालवुन जनजागृती केली जात होती. पुढे इतर समस्या मोठ्या झाल्या आणि हि जनजागृती मागे पडली. सद्यपरिस्थितीत गावखेड्यापर्यंत अंमलीपदार्थांनी आपले जाळे टाकलेले आहे. कॉलेज, शाळा , वसतीगृहं, डिस्कोथेक आदी ठिकाणी याचे दलाल रोज नवीन गिऱ्हाईकं आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

 

drugs_-marathipizza06
hindustantimes.com

माझ्या ओळखीत कितीतरी जण याच्या आहारी गेलेले आहेत. सुरुवातीला किक देणारी हि नशा पुढे पुढे त्या माणसाला इतके बधीर करून टाकते कि आपल्या वेगळ्याच विश्वात तो जगत रहातो. शारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी हि नशा सगळं कळत असुन सुटत पण नाही. यासाठी आपल्या आजुबाजुला लक्ष ठेवा तुमचा परिचित, आप्त या नादी लागलेला असु शकतो त्याला वेळीच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?