व्हिजा नाही पण परदेशात फिरायची इच्छा आहे? ह्या सात देशांत तुम्ही व्हिजाशिवाय सुद्धा जाऊ शकता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


काही अपवाद सोडले तर जवळजवळ प्रत्येकालाच फिरायला जाण्यास आवडते. वेगवेगळी ठिकाणे बघून, तिथले स्पेशल जेवण, तिथले वातावरण, तिथली माणसे, तिथली संस्कृती बघायला बहुसंख्य लोकांना आवडते. भारतातल्या भारतात सुद्धा अनेक अशी ठिकाणे आहेत जी परदेशातल्या प्रसिद्ध ठिकाणांच्या तोडीस तोड आहेत.

भारतात आपल्याला भाजून काढणाऱ्या वाळवंटापासून ते गोठवून टाकणाऱ्या बर्फाळ प्रदेशापर्यंत आणि समुद्रापासून ते हिल स्टेशनपर्यंत सर्वच प्रकारची, अगदी ऐतिहासिक वारसा सांगणारी ठिकाणे सुद्धा आहेत.

जर तुम्ही पट्टीचे पर्यटक असाल आणि तुमचे संपूर्ण भारतभ्रमण पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या देशाचा व्हिजा मिळणे. तुमची एखाद्या देशात जाण्याची कितीही इच्छा असली आणि तुमची आर्थिक तयारी जरी असली पण तुमचे व्हिजा ऍप्लिकेशनच रिजेक्ट झाले तर तुमची कुणीच मदत करू शकत नाही.

अमेरिकेचा नुसता ट्रॅव्हल व्हिजा मिळेपर्यंत सुद्धा आपल्या मनात धाकधूक असते कारण अमेरिकेचा व्हिजा मिळणे कठीण आहे असे लोक म्हणतात.

जगातील सर्वात पावरफुल पासपोर्ट हा सिंगापूरचा समजला जातो. आपल्या भारताच्या पासपोर्टचा २०१८ मध्ये ६६ वा क्रमांक होता. त्यामुळे बऱ्याच प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी त्या त्या देशांमध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिजाची आवश्यकता असते.

 

Image result for visa
tourmyindia.com

पण जगात असेही काही सुंदर देश आहेत जिथे जाण्यासाठी भारतीयांना आधीच व्हीजची खटपट करण्याची गरज नाही.

आपल्या भारतीय लोकांना भारतीय पासपोर्टवर २५ देशांत जाण्यासाठी व्हीजची आवश्यकता नाही. त्यातील हे ७ देश आहेत जिथे जाण्यासाठी आपल्याला व्हिजा लागत नाही.


१) इंडोनेशिया

scriptmag.com

भारतीय पासपोर्टधारकांना इंडोनेशियात जाण्यासाठी टुरिस्ट व्हिजाची गरज नाही. व्हिजा न घेता जास्तीत जास्त ३० दिवस तुम्ही येथे राहू शकता. आग्नेय आशियात वसलेला हा देश हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर ह्यांच्या मध्ये वसलेला आहे.

तब्बल १७ हजार पेक्षा जास्त बेटे असलेला हा देश जगातील सर्वात मोठा आयलंड कंट्री म्हणून ओळखला जातो. येथे जावा बेटावर सर्वात जास्त लोकसंख्या आहे.

जकार्ता ही ह्या देशाची राजधानी आहे. जकार्ता हे आशियातील सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. ह्या देशात १२७ नैसर्गिक जागृत ज्वालामुखी आहेत आणि फिरण्यासाठी भरपूर देवळे व बीचेस आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असलेले बाली हे इंडोनेशियामध्ये आहे.

इंडोनेशियन द्वीपसमूहात गिली ,लॉमॉक व कोमोडो बेट अशी अनेक प्राचीन बेटे आहेत जी बघण्यासारखी आहेत.

२)भूतान

bhutan inmarathi
scriptmag.com

हा आपला एक लहानसा शेजारी देश आहे. ह्या देशात जाण्यासाठी आपल्याला व्हिजाची आवश्यकता भासत नाही. जगातील सर्वात सुखी देश म्हणून भूतानचे नाव घेतले जाते. आपल्या स्वप्नातील सुंदर गाव जसे असेल अगदी तसेच भूतान आहे.

थिंफू ही ह्या देशाची राजधानी असून त्या ठिकाणची सुंदर बौद्ध मंदिरे व मठ प्रसिद्ध आहेत. ताशीचो डीझोन्ग हा प्रसिद्ध बौद्ध मठ व सरकारी महाल ह्याच देशात आहे. ह्या महालाच्या छप्परावर सोन्याची पाने आहेत.

हे सुंदर ठिकाण बघायलाच हवे असे आहे. तसेच पारो तेथील टायगर्स नेस्टसह भूतान हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. तुम्हाला माहित असेलच की भूतान हा जगातील एकमेव कार्बन निगेटिव्ह देश आहे.म्हणूनच हा देश एकदा तरी बघायला हवा आणि आपल्याला तर ह्या देशात जाण्यासाठी कायम दार उघडे आहे.

३)मालदिव्स

soneva-jani-maldives-inmarathi
scriptmag.com

हिंदी महासागर व अरबी समुद्रात वसलेला हा छोटासा देश भारत व श्रीलंकेच्या नैऋत्येला आहे. माले ही ह्या देशाची राजधानी आहे. भारतीय लोकांमध्ये हनिमून डेस्टिनेशन म्हणून हा देश प्रसिद्ध आहे. प्राचीन बीचेस असलेल्या ह्या देशात प्रवाळांचे खडक (अटॉल्स) बघायला मिळतात.

हिंदी महासागरात वसलेले हे स्वर्गीय ठिकाण असून ह्या देशात २६ अंगठीच्या आकाराचे अटॉल्स आहेत. निळेशार पाणी, पांढरी वाळू, हिरवीगार झाडे आणि स्वच्छ हवा असे सुंदर व शांत वातावरण येथे अनुभवायला मिळते. भारतीय पासपोर्टधारकांना येथे बिना व्हिजाचे ९० दिवस वास्तव्य करण्यास परवानगी आहे.

४)मॉरिशस

shutterstock-inmarathi
worldatlas.com

मालदिव्स प्रमाणेच मॉरिशसला सुद्धा भारतीयांना बिना व्हिजाचे नव्वद दिवस वास्तव्य करण्यास परवानगी आहे. सुंदर बीच व मोठमोठे डोंगर येथे बघायला मिळतात. रेनफॉरेस्ट कसे असते हे बघायचे असेल तर ह्या देशात जायलाच हवे. आफ्रिका खंडापासून २००० किमी लांब हिंदी महासागरात हा देश वसलेला आहे.

ह्या देशाची राजधानी पोर्ट लुईस आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे नष्ट पावलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या अनेक जमातींपैकी डोडो पक्ष्याचे ह्याच ठिकाणी वास्तव्य होते.

येथे बघण्यासारखे म्हणजे मॉरिशियस बोटॅनिकल गार्डन होय. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील हे सर्वात जुने बोटॅनिकल गार्डन आहे. तसेच येथील ब्लॅक रिव्हर जॉर्जेस नॅशनल पार्क सुद्धा अतिशय दर्शनीय आहे.

५) नेपाळ

everest-tkelly-inmarathi
welcomenepal.com

हा आपला सख्खा शेजारी देश कायम आपल्या स्वागतासाठी तयार असतो. १९५० साली नेपाळ व भारतात झालेल्या मैत्री व शांतता करारानुसार भारतीय लोक नेपाळमध्ये कुठल्याही व्हिजाशिवाय राहू शकतात, फिरू शकतात आणि काम सुद्धा करू शकतात. असेच स्वातंत्र्य भारतात नेपाळी लोकांना सुद्धा मिळाले आहे.

पुरातन देवळे व उत्तुंग हिमालयाचे दर्शन घ्यायचे असेल तर नेपाळला जायलाच हवे. अर्थात २०१५ च्या मोठ्या भूकंपामुळे देशाच्या पर्यटनावर खूप गंभीर परिणाम झाला पण हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर, दरबार चौक, प्रसिद्ध शाही राजवाडा -नारायणीती ही आवर्जून बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जगातील सर्वात उंच शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट सुद्धा नेपाळमध्येच आहे. त्यामुळे ह्या शिखराचे दर्शन घ्यायचे असल्यास नेपाळला जायला हवे.

६)सिशेल्स

 

seychelles_tropical_island-inmarathi
seychellestaxitours.sc

हिंदी महासागरात वसलेला हा छोटासा देश म्हणजे ११५ बेटांचा द्वीपसमूह आहे. निळे-हिरवे पाणी, शांत -एकाकी वातावरण, पांढरी वाळू आणि हिरव्यागार वृक्षांनी आच्छादलेले डोंगर असे दृश्य सिशेल्समध्ये बघायला मिळते. तुम्हाला समुद्रकिनारी फिरायला जायचे असेल पण गर्दी नको असेल तर तुमच्यासाठी सिशेल्स हा उत्तम पर्याय आहे.

अनेक नवी जोडपी हनिमूनसाठी सिशेल्सला जातात. येथील पिंक सॅण्ड बीच तर निसर्गसौंदर्याचा एक अद्भुत नमुना आहे.

ला डिग बेटावर असलेले अँसे सोर्स डी’आर्जंट हे ते बेट आहे जिथे गुलाबी वाळू बघायला मिळते, त्याचबरोबर प्रचंड ग्रॅनाईटचे खडक आणि अस्मानी रंगाचे निळेशार पाणी ह्यामुळे ह्या बीचचे अनेक फोटोग्राफर्सने असंख्य फोटो आजवर काढले आहेत.


स्कुबा डायविंग करणाऱ्या लोकांसाठी तर हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल अशी प्रवाळांचे खडक आणि त्याच्या जोडीला निळेशार आकाश व त्याच रंगाचे पाणी असे स्वर्गीय दृश्य येथे दिसते. अल्देब्रा आणि मे व्हॅली ही युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे घोषित केली आहेत. इथे सापडणाऱ्या दुर्मिळ प्रजाती बघण्यासाठी मात्र तुम्हाला परवानगी घ्यावी लागते.

भारतीयांना सिशेल्समध्ये जाण्यासाठी तर व्हिजा लागत नाही पण तिथे पोहोचल्यानंतर ऑन अरायव्हल व्हिजा मिळतो. त्या व्हिजावर आपल्याला तीस दिवस येथे वास्तव्य करण्याची परवानगी आहे.

७)फिजी

redcrescent.org.mv

भारतीयांना येथे जाण्यासाठी प्री अरायव्हल व्हिजा घेण्याची गरज नाही. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडच्या ईशान्येला दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला हा देश म्हणजे ३०० बेटांचा द्वीपसमूह आहे. ह्या देशाची राजधानी सुवा येथे आपल्याला प्राचीन ब्रिटिश बांधकामाचे उत्तम नमुने बघायला मिळतात.

पामची भरपूर झाडे असलेला समुद्रकिनारा आणि ज्यांचा तळ सुद्धा अगदी स्पष्ट दिसू शकेल अशी नितळ खाऱ्या पाण्याची निळी सरोवरे हे फिजीचे वैशिष्टय आहे. असे निसर्गसौंदर्य लाभलेला हा देश जगातील सर्वात सुखी देशांपैकी एक आहे.

तर असे हे सात निसर्गसौंदर्याने नटलेले देश आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हीजाची खटपट करण्याची मुळीच गरज नाही. तिथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त आर्थिक तयारीची गरज आहे. ती असली की मग काय, “बस बॅग भरो और निकल पडो”.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
3 thoughts on “व्हिजा नाही पण परदेशात फिरायची इच्छा आहे? ह्या सात देशांत तुम्ही व्हिजाशिवाय सुद्धा जाऊ शकता

 • April 11, 2019 at 1:47 pm
  Permalink

  माहीती दिल्याबद्दल आभारी आहोत.

  Reply
 • April 11, 2019 at 2:56 pm
  Permalink

  वा खूप छान व सविस्तर माहिती दिली आहे

  Reply
 • April 12, 2019 at 6:49 am
  Permalink

  माहितीपूर्ण सुंदर लेख!–सतिश दाते

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?