संघ कार्यकर्ता विरुद्ध भाजप राज्य सरकार : एका अक्राळविक्राळ घोटाळ्याची भेदक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भ्रष्टाचार ही आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. ही कीड इतकी फोफावली आहे की आपला संपूर्ण देश पोखरून गेला आहे. गेल्या १० वर्षांत उघडकीस आलेल्या घोटाळ्यांवरून आपले लोकप्रतिनिधी किती विश्वासघातकी आहेत याची प्रचीती आली.
एकीकडे सामान्य माणूस दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी झगडतोय आणि दूसरीकडे राजकारणी आणि काही मुठभर लोक मिळून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपयांत खेळत आहेत.
हा तोच पैसा आहे जो जनतेच्या भल्यासाठी वापरला जायला हवा, पण दुर्दैवाने तो पैसा जातो संपत्तीच्या हव्यासाने पछाडलेल्या राक्षसांच्या घश्यात! भारतात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी असाच एक घोटाळा म्हणजे व्यापम घोटाळा होय.

“व्यापम” म्हणजे मध्य प्रदेशचे व्यावसायिक परीक्षा मंडळ होय. ही राज्य सरकारने स्थापन केलेली संस्था असली, तरी ती विनाअनुदानित आहे.
या संस्थेमार्फत वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक शाखांच्या प्रवेश परीक्षा होतात.
या परीक्षा मंडळाने घेतलेल्या वैद्यकीय व अन्य व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा तसेच राज्य सरकारच्या नोकरभरतीसाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षा घेताना सामूहिक कॉप्या प्रकरणे, व कोऱ्या उत्तरपत्रिका सापडल्या. पैसे घेऊन नंतर उत्तरपत्रिका लिहून घेण्यात आल्या. काहींना तत्कालीन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नोकऱ्या मिळाल्या.
त्यात मोठी आर्थिक तडजोड झाली, असा आरोप होता. हा भ्रष्टाचार २००४ सालापासून होत होता आणि तो किमान १० वर्षे चालू होता.
ज्या प्रकरणात नोकरशहा, सत्तेतीलच नव्हे, तर विरोधी पक्षांतीलही नेते, व्यापारी, गुन्हेगार आणि दलाल आरोपी आहेत. खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह राज्यपाल रामनरेश यादव यांच्यावरही संशय व्यक्त केला गेला. सध्या या घोटाळ्याची चौकशी सी.बी.आय. करत आहे.
या घोटाळ्याची संपूर्ण जगात चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहित आहे का, हा घोटाळा कोणी उघडकीस आणला होता? चला जाणून घेऊया त्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या आजच्या सद्यस्थितीबद्दल..!

आशिष चतुर्वेदी त्यांचे नाव! आजवर व्यापम घोटाळ्याशी निगडीत ४० साक्षीदारांचा अतिशय संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे आणि ४१ वा क्रमांक कदाचित आपला असेल या भीतीसह आशिष आपले आयुष्य कंठत आहेत. पण त्यांनी अजूनही धीर सोडलेला नाही की, माघार घेतलेली नाही.
या प्रकरणाबद्द्दल आवाज उठवून स्वत:चा जीव धोक्यात घातलाच होता आणि जेव्हापासून त्यांनी हा घोटाळा उघडीकीस आणला आहे, तेव्हापासून प्रत्येक क्षणाची किंमत त्यांनी मोजली आहे.
व्यापम मधून विविध सरकारी खात्यांमध्ये वशिलेबाजीने, पैसे खाऊन उमेदवारांच्या भरत्या होत असतं आणि त्याला वैद्यकीय खाते देखील अपवाद नव्हते.
पात्रता आणि अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टरची पदे देऊन भरती केली जात असे. २००८ मध्ये आशिष यांच्या आईला कॅन्सर असल्याचे निदान आले. आशिष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याने आईला उपचारासाठी ते कोणत्याही रुग्णालयात दाखल करू शकत होते. परंतु दुर्दैवाने २०११ मध्ये त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली.
या ३ वर्षांच्या कालावधीमध्ये आशिष यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही, ती म्हणजे अकार्यक्षम उमेदवार जे डॉक्टर म्हणून खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये मिरवत होते त्यांचा भोंगळ कारभार!
हळूहळू सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येऊ लागला. वैद्यकीय क्षेत्रात सगळीकडेच भ्रष्टाचाराची आणि सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याची पाळेमुळे रुजली होती.
–
- सिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच!
- CID आणि CBI या Investigating Agencies मध्ये काय फरक आहे…?
–
आणखी एक निराश करणारी गोष्ट त्यांच्या नजरेत आली, ती म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते, त्याच संघातील काही प्रतिनिधी देखील या घोटाळ्याच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेत होते.
यामुळे त्यांचा संघावरील ठोस विश्वास डळमळला, पण हताश न होता त्त्यांनी स्वत:हून सर्व गोष्टींचा छडा लावला आणि व्यापम घोटाळा उघडकीस आणलाच!

पण ज्या क्षणी त्यांनी या घोटाळ्याच्या विरुद्ध युद्धात पाउल ठेवले तेव्हापासून आशिष यांना एक रात्रही सुखाची झोप लागलेली नाही.
इंडिया टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीनुसार आशिष आपली व्यथा मांडताना म्हणतात की,
जेव्हापासून मी या घोटाळ्याविरोधात एक तक्रारदार म्हणून पुढे आलो आहे, तेव्हापासून मी माझे सर्व मित्र गमावले. आज आजूबाजूचे लोकही माझ्याशी बोलत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मी अशी लढाई लढतोय जी मी कधीच जिंकू शकत नाही.
आशिष यांच्या जीवाला असलेला धोका ओळखून आज आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास त्यांना पोलीस संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत एक कॉन्स्टेबल नेहमी कॅमेरा घेऊन असतो. हा कॉन्स्टेबल आशिष यांच्या प्रत्येक क्षणाची शुटींग करत असतो.
आशिषला मात्र ही एक प्रकारची नजरकैद वाटते. त्यांच्या मते राज्य सरकारने मुद्दाम त्यांचे वैयक्तिक आयुष्य कैद करून ठेवले आहे. त्यांना संरक्षण देण्याच्या बहाण्याने राज्य सरकारमधील व्यापमचे सूत्रधार त्यांची निगराणी करत आहे, असा त्यांचा आरोप आहे.
आशिष म्हणतात,
मला दिलेले संरक्षण हे निरुपयोगी आहे, कारण गेल्या २ वर्षांत पोलीस आजूबाजूला असून देखील माझ्यावर १६ वेळा हल्ला झाला आहे आणि जेव्हा जेव्हा मी माझ्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलो, तेव्हा तेव्हा प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष देण्यासाठी माझ्यासोबत असलेल्या पोलिसाने नकार दिला आहे.
–
यावरून सिद्ध होते की, माझ्यासोबत असणारे पोलीस माझ्या संरक्षणासाठी नसून मी काय करतो, कोणाशी बोलतो, कोठे जाते हे तपासण्यासाठी आहेत.

सध्या आशिष यांचे मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये वास्तव्य आहे. मुख्य म्हणजे त्यांना आजही येणाऱ्या धमक्या ह्या गुंडांकडून वा स्थानिक नेत्यांकडून येत नाहीत, तर बड्या बड्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून येतात, ज्यांना भीती आहे की, आशिष त्यांचं व्यापममधील पितळ उघडं पाडतील.
अशी आहे आपल्या देशाची आजची व्यवस्था. अर्थात देशाला नावं ठेवून काही उपयोग नाही, कारण शेवटी देश चालवणारे आहे प्रशासन आणि राजकारणी!
बाकी ‘लोकांची सत्ता’ वगैरे गोष्टी तर अंधश्रद्धा आहेत. आशिष चतुर्वेदी यांची जिद्द अभेद्य आहे, म्हणून ते आजही या लढाईत ठामपणे उभे आहेत, अन्यथा दुसरा कोणी असता तर त्याने कधीच हात टेकले असते. आशिष चतुर्वेदी यांच्या धैर्याला सलाम…!
–
- EVM घोटाळा – इलेक्शन कमिशनचा, राजकारण्यांचा की “आक्रस्ताळ्या” कॉंग्रेस समर्थकांचा?
- भारतात PNB घोटाळा रोजचाच! दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.