' रिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम – InMarathi

रिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

२७ डिसेंबर २००२ रोजी “कर लो दुनिया मुठ्ठी में” या घोषवाक्यासह रिलायन्स इन्फोकॉमचा शुभारंभ करताना, त्यावेळी मोबाइल फोनवर बोलण्यासाठी मिनिटाला ४ ते ६ रूपये मोजणाऱ्या भारतीयांना मुकेश अंबानींनी “पोस्ट-कार्डापेक्षा स्वस्तात फोन” करण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यानंतर ७ महिन्यात रिलायन्स भारतातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी बनली खरी. पण कंपनीच्या विभाजनात रिलायन्स इन्फोकॉम अनिल अंबानींकडे गेल्यानंतर एकूणच टेलिकॉम क्षेत्राला आलेली मरगळ, महाग स्पेक्ट्रम, २जी घोटाळा अशा एकापाठोपाठ एक संकटांमुळे कंपनीची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली.

२०१० साली मुकेश व अनिल अंबानींमध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही रिलायन्स समुहांना एकमेकांच्या क्षेत्रात गुंतवणूक करायचे दरवाजे खुले झाले व मुकेश अंबानींच्या टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी स्वप्नांना पुन्हा एकदा पालवी फुटली. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेल्या औत्सुक्याचा अंत करताना आज मुकेश अंबांनींनी रिलायन्स उद्योग समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करताना रिलायन्स जिओची महत्त्वाकांक्षी योजना उलगडली दाखवली. जिओमुळे भारतातील इंटरनेट व टेलिकॉम क्षेत्रावर मोठी त्सुनामी चालून आली आहे.

 

reliance Jio marathipizza

स्त्रोत

५ सप्टेंबर २०१६ पासून रिलायन्स जिओच्या सेवांना अधिकृतरित्या सुरूवात झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व टेलिफोन कॉल, आणि डेटा सर्वांसाठी मोफत असणार आहेत. त्यानंतरच्या कालावधीतही देशांतर्गत टेलिफोन कॉल आणि एसएमएस मोफत, देशभर कुठेही रोमिंगची आवश्यकता नाही, फक्त ५० रूपयांत १ जीबी डेटा प्रति महिना या दरात उपलब्ध असेल. या इंटरनेटचा कमाल वेग सेकंदाला १३५ एमबी असेल. याशिवाय शहरांतील विविध ठिकाणी जिओ हॉटस्पॉटच्या माध्यमातून तुम्ही तितक्याच प्रमाणात डेटा डाउनलोड करू शकाल. हवा तो प्लॅन निवडणे सहज शक्य व्हावे यासाठी रिलायन्स जिओने फक्त १० प्लॅन उलपब्ध केले आहेत. याशिवाय चॅटिंग, वॉलेट, सिनेमे, संगीत, बातम्या आणि क्लाउड स्टोरेज अशा अनेक सुविधा पुरवणारी अ‍ॅप वर्षभर फुकट उपलब्ध असतील.

 

reliance-jio-tarrif marathipizza 02

स्त्रोत

जिओच्या माध्यमातून ६००० सिनेमे आणि १ लाखाहून अधिक टीव्ही मालिकांचे भाग पाहाणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना जिओ प्लॅन्समध्ये २५% सवलत असून अनेक शाळा/महाविद्यालयांना जिओची जोडणी फुकट मिळणार आहे. यासाठी आघाडीच्या देशी-विदेशी मोबाइल उत्पादक कंपन्यांशी रिलायन्सने हातमिळवणी केली असून ग्राहकांना VoLTE मोबाइल फोन मॉडेलचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
रिलायन्सच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रावर चांगले-वाईट, पण दूरगामी परिणाम होणार आहेत. आजवर अब्जावधी डॉलर खर्च करून आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी सरकारकडून स्पेक्ट्रम (ध्वनीलहरी) विकत घेतल्या. पण देशातील गरिब आणि कनिष्ठ मध्यम वर्गियांचे प्रचंड मोठे प्रमाण, पोस्टपेडपेक्षा प्रिपेड आणि स्वतःहून फोन करण्यापेक्शा मिस्ड-कॉलला प्राधान्य, तीव्र स्पर्धा आणि इंटरनेटपेक्षा व्हॉइस म्हणजे बोलण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर दिलेला भर यामुळे या कंपन्या आजवर केलेली गुंतवणूकीची भरपाई करू शकल्या नाहीत.

 

reliance Jio marathipizza 03

स्त्रोत

भारतासारख्या खंडप्राय देशात सर्वत्र चांगल्या दर्जाच्या दूरध्वनी सेवा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर या क्षेत्रातील पायाभूत सुविधांत प्रचंड गुंतवणूक करण्याची आणि अनेक वर्ष तोटा सहन करण्याची तयारी हवी. ती बहुतेक कंपन्यांची नव्हती. पुन्हा १०%हून कमी लोकसंख्या इंग्रजी बोलण्यास सक्षम असताना मोबाइल आणि इंटरनेटवर जनता करणार काय या प्रश्नाचेही त्याकाळात उत्तर नव्हते.

त्यामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहाने या क्षेत्रात उडी घेताना या सगळ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. या क्षेत्रात उशीरा शिरल्यामुळे अन्य स्पर्धकांप्रमाणे त्यांचे हात पोळून निघाले नाहीत. पेट्रोलियम रिफायनरी आणि अन्य उद्योगांच्या अनेक वर्षांच्या फायद्यातून निर्माण झालेल्या प्रचंड गंगाजळीमुळे या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करणे शक्य होते. पण प्रश्न केवळ गुंतवणूकीपुरता मर्यादित नाही.

मोबाइल स्पेक्ट्रम, हार्डवेअर आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या अद्ययावतीकरणामुळे त्यात केलेली गुंतवणूक अल्पावधीत पाण्यात जाण्याची भीती असते. यु-ट्यूब आणि नेटफ्लिक्सच्या जमान्यात जगात आजवर जेवढा कंटेंट उपलब्ध झाला नाही तेवढा पुढील २ वर्षांत तयार होतो. या शिवाय समाज-माध्यमं, वॉलेट, सिनेमा, संगीत इ. क्षेत्रात तुमची अ‍ॅप केवळ चांगली असून भागत नाहीत. कारण फेसबुक, ट्विटर, पेटीएम, यु-ट्यूबसारख्या अ‍ॅपशी काडीमोड घेऊन त्यांच्या पर्यायांना चटकन स्विकारण्याची ग्राहकांची तयारी नसते.

दुसरीकडे हे सगळे करायचे तर तुमची स्पर्धा फक्त देशी टेलिकॉम कंपन्यांशी रहात नाही. एकाच वेळेस तुम्हाला गुगल, फेसबुक, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, लिंक्ड-इन, उबर आणि यु-ट्यूबसारख्या सेवांबरोबर काम करता करता त्यांच्याशी स्पर्धा करायची असते.

चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे चीनने जागतिक कंपन्यांच्या प्रवेशावर निर्बंध लादून स्वतःच्या सेवा विकसित केल्या. पण भारतात तसे करणे सोपे नाही.

एवढ्यावरच न थांबता भविष्यात निर्माण होणाऱ्या ऑनलाइन सेवा, चांगली अ‍ॅप या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिक पातळीवर स्टार्ट-अप कंपन्या, इन्क्युबेटर तसेच अ‍ॅसेलेरेटरशी स्वतःला जोडून घेणे आवश्यक आहे. एका अर्थाने हा जुगारच आहे. पण दुसरीकडे या जुगारात जिंकण्याची क्षमता असलेल्या दोन किंवा तीन भारतीय कंपन्यांत रिलायन्सचा समावेश आहे.

रिलायन्स जिओचा फटका फक्त टेलिकॉम कंपन्यांनाच बसणार नसून विविध इ-कॉमर्स सेवा, पेटीएम-फ्री चार्जसारख्या इ-वॉलेट सेवा, हंगामा आणि गाना डॉट कॉमसारख्या मोबाइल मनोरंजन सेवा कंपन्या अशा सगळ्यांनाच त्याची धास्ती आहे.

कदाचित यातील अनेक कंपन्यांशी रिलायन्स जिओ हातमिळवणी करू शकते. भारती एअरटेल आणि वोडाफोन या बलाढय टेलिकॉम कंपन्या जिओच्या आव्हानाला कसे उत्तर देतात ते पहाणे रंजक ठरेल. आजच्या जगात मोबाइल क्रमांक ही तुमची मुख्य ओळख झाली असताना ग्राहकही आपला मोबाइल क्रमांक बंद करून रिलायन्स जिओचा स्विकार करतील का सध्याचा मोबाइल टिकवून जिओ घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कदाचित रिलायन्सचे आव्हान पेलण्यासाठी काही मोठ्या कंपन्या एकत्र येतील तर काही कंपन्या दिवाळखोरीत निघतील. पण एक मात्र नक्की रिलायन्सच्या स्पर्धेमुळे लवकरच भारतातील इंटरनेटचे थेंब थेंब ठिबक सिंचन बंद होऊन लवकरच बहुतांश भारतीयांना अतिजलद इंटरनेट वापरायची संधी मिळेल.

या इंटरनेटमुळे त्यांच्या शिक्षण, रोजगार, मनोरंजन आणि आर्थिक सामावेशिकरण अशा सगळ्याच गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. त्यासाठी तरी आपल्याला रिलायन्स “जिओ” म्हणावे लागेल.

==

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?