महापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सार्वाधिक औत्सुक्याचा व चर्चीला जाणारा विषय म्हणजे मुंबई महानगरपालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार?!!!

शिवसेना-भाजप युती परत होणार काय? शिवसेना-काँग्रेस युती होणार काय? हेही उपप्रश्न यात दडलेले आहेत आणि यांच्या उत्तरातच पहिल्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. यासंबंधी विविध आणि वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. काही लोकांनी तर WhatsApp वर काँग्रेस+राष्ट्रवादी+शिवसेना यांच्या आमदार आणि नगरसेवक यांची बेरीज करून भाजपाला सत्तेवरून हाकलून सेनेला तिथे बसवलेही आहे. याला फॉरवर्ड करणाऱ्यांना एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो – उद्धव ठाकरे, शरद पवार, आशोक चव्हाण यांना बेरीज येत नसेल काय? जर येत असेल तर असे का घडत नसेल? या बाजूचा विचार कुणालाही करावासा वाटत नाही किंवा जाणीवपूर्वक केला जात नसावा.

तर मुंबईत विविध पक्षांसमोर काय पर्याय आहेत हे आधी तपासून त्यातील वास्तवात कुठला येईल याची चाचपणी आपण करण्याचा प्रयत्न करूयात.

maharashtra-political-leaders marathipizza

पहिला पर्याय भाजप-सेना युतीचा आहे.


माझ्यामते सेनेसाठी आणि भाजपसाठीही हाच सर्वोत्तम पर्याय आहे. अर्थातच यात अनेक अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे नुकत्याच प्रचारात यांनी परस्परांवरील केलेल्या आरोपांमुळे आलेली कटूता आणि यांच्या नेतृत्वांचा आपापसावरील अविश्वास ही आहे. प्रचारात ज्या पद्धतीने यांनी ऐकमेकांनवर आरोप प्रत्यारोप केले ते ऐकून आता यांच्या समोर कुठल्या तोंडाने युती करायची आणि ती जनतेला कशी पटवून द्यायची हा फार मोठा प्रश्न आहे. याची समाधानकारक सोडवणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पुढे पाऊलही टाकणार नाहीत. काहीतरी मजबूत फेससेव्हिंग मिळाल्याशिवाय यांना परत युतीत जाता येणार नाही. अन्यथा त्यातून मतदारांशी दगाफाटा करण्यात आल्याचा आरोप संबंधित पक्षांवर होऊ शकतो.

पण या युतीमुळे एक गोष्ट मात्र चांगली होऊ शकेल ज्यावर फारच कमी लोकांनी लक्ष दिलंय – ती म्हणजे परप्रांतिय आणि मराठी माणसे यांच्यात या निवडणुकीमुळे वाढलेली दरी होय. जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर ही थोडीफार सांधली जाऊ शकेल. अन्यथा जर हे इथे परस्परांच्या विरोधात उभे राहिले तर मुंबई महानगरपालीका ही स्थानिक विरूद्ध परप्रांतीय यांच्यात आखाडा बनेल. आशा करूयात यावर या दोन्ही पक्षाचे नेते विचार करतील.

दुसरा मुख्य मुद्दा – समजा युती झालीच तर सत्तावाटपाचा समोर येईल. दोन्ही पक्षांच्या बलाबलातील तुल्यबळता बघून सत्तेचे समसमान वाटप हे अपरिहार्यच असल्याचे लक्षात येते पण शिवसेना ही नवीन वास्तविकता मान्य करेल काय – हा यातील कळीचा प्रश्न आहे. तिने जर मान्य केले तर मग काही संभाव्य तडजोडी खालीलप्रमाणे निघू शकतील.

१ – दोघांना महापौरपद अडीच अडीच वर्षे देणे तसेच स्थायीसमीतीचे अध्यक्ष पदही अनुक्रमे अध्यक्ष जर भाजप असेल तर महापौर सेनेचा असेल. जेव्हा महापौर भाजपचा असेल ते स्थायी समितीचे अध्यक्ष सेनेकडे येईल. यामुळे सत्तासंतुलन राखले जाईल.

२ – एकास पाच वर्षे महापौरपद तर दुस-यास स्थायी समितीचे अध्यक्षपद अशीही तडजोड करता येऊ शकेल.

माझ्यामते ही न्याय्य तडजोड आहे. पण आता यासाठी लवचिकता दाखवून पुढाकार कोण घेणार – हाच प्रश्न आहे आणि तो सुटला की यावर काम सुरू होईल.

दुसरा पर्याय अर्थातच काँग्रेस आणि शिवसेना युतीचा आहे. हाही पर्याय महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ पुरवतो पण अशी युती होणार काय आणि झालीच तर त्याचे संबंधित पक्षांवर भविष्यकालीन राजकारणाच्या दृष्टीने काय परिणाम होऊ शकतात – याचे आकलनही केले पाहिजे.

युती म्हणजे आकड्यांची बेरीज नसते – ती राजकीय, सामाजिक आधाराचीही बेरीज असते.

काँग्रेस पक्षाची विचारधारा पाहता किंवा शिवसेनेची विचारधारा यांच्यात परस्परपूरक असे काहीही नाही. कुणाची विचारधारा चांगली वाईट हा स्वतंत्र आणि वेगळा विषय आहे. धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणारी आणि जन्मापासूनच सेनेला संकुचित, धर्मांध पक्ष म्हणून आपल्या मतदारांच्या स्थापित करणाऱ्या काँग्रेस ने जर सेनेसोबत जायचा निर्णय घेतलाच तर याची तिला जबर किंमत चुकवावी लागू शकते. देशभरात धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणात स्वतःला केंद्रीय स्थानी ठेवणारी काँग्रेस जर शिवसेनेसोबत गेलीच तर तिचा भाजपाविरोधातील मत मागण्याचा प्रमुख आधारच तिला गमवावा लागेल.

दुसरे असे की काँग्रेस चा प्रमुख मतदार असलेला दलीत आणि मुस्लीम समुदाय हा यावर काय प्रतिक्रिया देईल? त्यांना ही युती मान्य असेल काय? हा ही मोठा प्रश्न आहेच.

तिसरे – उत्तर भारतीय राजकारणात जिथे सेने विषयी लोकांच्या मनात भूतकाळातील व तिच्या अजेंड्यामुळे एकप्रकारची आढी आहे तिथे या युतीचे काय परिणाम संभवतात – याचाही विचार केला पाहिजे. दलीत आणि मुस्लीम समुदाय हा या युतीने कधीही खूश होणार नाही. त्यामुळे तो जर यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी लागला तर त्याचे राजकीय परिणाम काँग्रेसच्या स्थितीवर काय होतील याचे सहज आकलन करता येईल.

उत्तर भारतातील अल्पसंख्यक समुदायही यावरून नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळेच अशा बातम्या माध्यमातून आल्यानंतर त्याचे ताबडतोब खंडन करण्यात आले. कारण उत्तर प्रदेशातील पाचव्या फेरीतील मतदान आठ तारखेला आहे…! कामत आणि मुंबईतील अनेक नेत्यांचे भवितव्य यातून धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच त्यांनी जाहीर पत्र लिहून यास आपला विरोध कळवला आहे.

शिवसेनेबाबतीतही हीच परिस्थिती आहे.

तिचा मतदार या सेने-काँग्रेस युतीला कसे घेईल – हाही मुख्य प्रश्न आहे. काही उत्साही फेसबूक सैनिक भाजपला धडा शिकविण्यासाठी अशा प्रकारच्या युतीबाबतीत आग्रही असले तरी याचे सेनेच्या एकूणच राजकारणावर पडणाऱ्या प्रभावाचे आकलन या पैकी कुणीही केलेले नाही. असे पूर्ण आकलन करूनच आणि ते लाभदायी आहे की नुकसानकारक याचा पूर्ण विचार करूनच त्यांना यावर पुढे जावे लागेल. कारण, आधी म्ह्टल्याप्रमाणे, युती म्हणजे आकड्यांची बेरीज नसते. तर त्यांच्या सामाजिक आधाराचीही बेरीज असते आणि आज घडीला तरी या दोन्ही पक्षांचा सामाजिक आधार हा परस्परांच्या विरोधात भूमिका बाळगून आहे, त्याला कशाच्या आधारावर सांधायचे…?! तसे सांधता येऊ शकेल काय? यांची समाधानकारक सोडवणूक न करताच जर अशी सांधवणूक केली गेली तर त्याचे परिणाम मग या दोन्ही पक्षांसाठी फारच वाईट असतील. आणि याचे लाभ अर्थातच भाजप व राष्ट्रवादी यांना मिळू शकतील.

त्यामुळे माझ्या दृष्टीने हा पर्याय यांना तात्काळ लाभकारी असला तरी दिर्घकाळात हानीकारकच आहे. दिल्लीत काँग्रेस ने जी चूक “आप”ला पाठिंबा देऊन केली आणि त्या चुकीचे जे परिणाम तिला भोगावे लागलेले – ते पाहता काँग्रेस ही चूक पुन्हा करणारच नाही असे वाटते. पण शेवटी द्वेषामुळे माणसे स्वतःला अहितकारक असेही निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात त्यामुळे काँग्रेस पाठिंबा देणारच नाही असेही नाही.

“भाजप सेनेला संपवायला निघाला आहे आणि त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेस परवडली” असाही एक मतप्रवाह सध्या सोशलमाध्यमात चर्चीला जात आहे. पण काँग्रेस सोबत जाऊन सेना भाजपच्या संभाव्य आक्रमणातून वाचेलच याची कुठल्याही प्रकारची शाश्वती आज रोजी देता येत नाही. शिवसेनेकडे जबरदस्त कँडर आहे, जबरदस्त संघटना आहे तरीसुद्धा हा पक्ष महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही. यांच्या आधारानेच महाराष्ट्रात स्वतःला विस्तारणाऱ्या भाजपने यांना आज प्रत्येक ठिकाणी मागे टाकलेले निकाल सांगतात. याला माझ्या दृष्टीने एकच कारण आहे – ते म्हणजे सर्वोच्च स्तर ते बुथलेव्हलपर्यंत बुद्धीवाद व तर्कशास्त्राशी घेतलेली फारकत आणि याला पर्याय म्हणून जवळ केलेली अहंमगडता हे होय.

शिवसेनेला भाजपच काय कुठलाही पक्ष कधीही संपवू शकणारच नाही – जर तिने प्रामाणिकपणे आत्मचिंतन केले व आपण केलेल्या चुका वेळीच सुधारल्या – तर. पण या अश्या निकालानंतरही जर ती ये रे माझ्या मागल्या याच पद्धतीने चालणार असेल तर मग भविष्यकाळात याहून जास्त दुर्गती ओढवेल.

मला वाटते उद्धव ठाकरे हुशार व लवचिक आहेत. ते नक्कीच आत्मचिंतन करतील आणि सेनेला योग्य मार्गावर आणतील. शेवटी महाराष्ट्राला एका मजबूत प्रादेशिक पक्षाची गरज आहेच. आणि आजघडीला ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त शिवसेनेतच आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 30 posts and counting.See all posts by shivraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *