सती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (?)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’ सुरू होण्यापूर्वी एक सूचना झळकते. ‘आम्ही सती वा जोहर यांसारख्या कुठल्याही प्रथांचे समर्थन करत नाही.’ वास्तविक पाहता चित्रपट हा राणी पद्मिनीने केलेल्या जोहारावर आधारित असताना इथे ‘सती’ हा उल्लेखच अनाठायी होता. मात्र तसे न केल्यास दिगदर्शकाचे पुरोगामित्व सिद्ध कसे होणार बरे?

चित्रपटासंबंधित झालेल्या काही चर्चांतही हिंदू धर्मात कशा प्रकारे स्त्रियांना सती प्रथेच्या नावाखाली नाडले जात होते अशा आशयाची मते ऐकली.

सती आणि जोहार या स्त्रियांवरील अत्याचाराचे दोन चेहरे असून एक आक्रमकांमुळे झाला तर दुसरा हिंदूधर्मात आधीपासून होता असे काहींनी तोडलेले अकलेचे तारेही अनुभवले आणि ब्रिटिशांनी करून ठेवलेली बुद्धिभेदाची विषवल्ली आता किती फोफावली आहे याचा प्रत्यय आला.

मुळात ‘सती’ नामक कोणतीही ‘प्रथा’ या देशात कधीही अस्तित्वातच नव्हती. इतकेच कशाला? ‘सती’ हा शब्दही आमच्याकडे अस्तित्वात नव्हता. हा शब्दसुद्धा ब्रिटिशांची देण आहे.

आपले वडील दक्ष प्रजापती यांनी आपले पती असलेल्या शंकराचा केलेला अपमान सहन न झाल्याने त्याच्या मुलीने स्वतःला अग्नीत झोकून दिले अशी पौराणिक कथा आहे. या मुलीचे नाव सती असे असल्याने आणि तिने आत्मदहन केल्याने याच कथेला सतीप्रथेचा संदर्भ मानून ब्रिटिशांनी आमच्या डोक्यावर मारले. मात्र तसे करत असताना या सतीचे पती असलेले शिवशंकर हे मेलेले नव्हते याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.

 

sati-inmarathi
cdn.spell-hub.com

पतीचे निधन झाल्यावर पत्नीनेही त्याच्यासह जिवंतपणीच चितेवर चढणे याला ‘सहगमन’ असा शब्द प्राचीन वाङ्मयात आढळतो. मात्र या शब्दाचा उगमही १२-१३ शतकातला आहे. त्यापूर्वी कोणत्याही साहित्यात सती वा सहगमनाचा प्रथा म्हणून उल्लेख नाही. सतीप्रथेवरून हिंदू धर्माची नालस्ती करणारे लोक महाभारतातील पंडु राजासह त्याची पत्नी माद्री हिने सहगमन केले हा संदर्भ देतात.

मात्र त्याच वेळी त्याची दुसरी पत्नी असलेल्या कुंतीने तसे केलेले नाही याकडे कानाडोळा करतात. सहगमन ही ‘प्रथा’ असती तर एकीनेच का बरे केले असते; इतका साधा प्रश्न आमच्याही डोक्यात येत नाही हे विशेष. त्यातही माद्रीने आपल्या चुकीमुळेच पंडु मेला असल्याने प्रायश्चित्त घेण्यास सहगमन केले असा स्पष्ट उल्लेख महाभारतात आहे.

मात्र त्यासाठी अभ्यास करावा लागतो; मूळ ग्रंथ वाचावे लागतात. इतके कष्ट हे तथाकथित पुरोगामी कसे घेणार बरे?!

आता त्याही अलिकडच्या काळातले संदर्भ पाहूया. रामायणात रावणादि राक्षसांचा संहार झाल्यावर त्यांच्या कोणाही पत्नीने सहगमन केल्याचा दाखला नाही. ही ‘प्रथा’ असती तर असे झाले असते? त्याही पूर्वीच्या ग्रंथांत सहगमनाची उदाहरणे नाहीत. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ज्या ऋचेचा संदर्भ याबाबत दिला जातो तो तर चक्क खोटा संदर्भ आहे हे आम्ही प्रत्यक्षात पाहिल्यावर लक्षात आले.

 

sacred-books-inmarathi
media.winnipegfreepress.com

वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके या कोणत्याही ग्रंथांत सहगमनाचा एकही संदर्भ नाही. याज्ञवल्क्य वा नारदस्मृतीतही असे संदर्भ नाहीत. किंबहुना; पती मृत झाल्यावर त्याचे दागिने व शस्त्रास्त्रे इत्यादि पत्नीकडे सुपूर्द करण्यात यावीत. पतीचे निधन झाल्यावर त्या महिलेला घरातील अन्य ज्येष्ठ पुरुष मंडळींनी स्मशानातून घरी परत आणावे असे संदर्भ तैत्तिरीय आरण्यकात मिळतात.

येल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेव्हिड ब्रिक्स आपले निरीक्षण नोंदवताना स्पष्टपणे लिहितात; ‘आपस्तम्भ असोत वा अन्य कोणतीही धर्मसूत्रे असोत; सनातन धर्मात कुठेही सहगमन (सती) याचा प्रथा म्हणून कोठेही उल्लेख नाही.’ (The Dharmasastric Debate on Widow Burning”. Journal of the American Oriental Society. 130 (2): 203–223)

आळतेकरांसारख्या विद्वानांनीदेखील हेच मत मांडलेले दिसते. थोड्क्यात; सहगमन वा तथाकथित सती ही कधीही प्रथा वा परंपरा नसून तशा काही ‘घटना’ अवश्य घडलेल्या दिसतात. अगदी आजही आपला प्रियकर/पती मेल्यावर आपले आयुष्य संपवण्याच्या घटना घडतातच की!! मात्र अशा तुरळक घटनांना ‘प्रथा’ म्हणणे हे कितपत योग्य असेल? नेमकी हीच परिस्थिती सहगमनाबद्दल आहे.

लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.

तेराव्या शतकातील मेधातिथी नामक विद्वानाने याबाबत मत नोंदवताना शतपथ ब्राह्मणातील ‘आत्महत्या हे पातक आहे’ (१०.२.६.७) या सूत्राचा उल्लेख करत सहगमनाचा विरोध केलेला आढळतो तर बृहस्पती स्मृतीतदेखील असाच उल्लेख आढळतो. असे असताना हे कोणतेही संदर्भ न मांडता ज्या राममोहन रॉय यांनी प्रत्यक्षात सहगमनाविरुद्ध काहीच केले नाही त्यांना मात्र ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे नायक केले आणि आम्हीही ते स्वीकारले!!

 

RajaRamMohan-roy-inmarathi
thehindu.com

“Can the Subaltern Speak?” या आपल्या पुस्तकात गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांनी ब्रिटिशांनी हिंदूंना हीन लेखण्यास कशाप्रकारे ‘सतीप्रथा’ हे मिथक जन्माला घातले आणि पोसले याचे सुंदर विवेचन केले आहे. जिज्ञासूंनी ते आवर्जून वाचावे. सरतेशेवट सगळ्यात महत्वाचा मुद्दा;

पतीच्या पश्चात पत्नीनेही त्याच्या चितेवर स्वतःला झोकून देण्याच्या घटना या सर्वाधिक घडून आलेल्या दिसतात त्या या देशावर इस्लामी परचक्र आल्यावर.

यामागील कारण वेगळे सांगावयास हवे काय? या आक्रमकांत इतकी विकृती भरलेली होती की; स्त्रियांच्या शवांनादेखील हे हैवान सोडत नसत. त्यामुळेच स्वतःच्या अब्रुरक्षणासाठी कित्येक कुलीन राजपूत स्त्रियांनी जिवंतपणीच स्वतःला अग्नीत समर्पित करण्याचा पर्याय निवडला; याला जोहार असे म्हणतात. चित्तोडचे जोहार हे याच कारणास्तव झाले.

 

johar-tradition-inmarathi
qph.ec.quoracdn.net

सती असो जोहार या दोन्ही अत्यंत दुर्दैवी घटना या हिंदू धर्मातील भाग वा परंपरा नसून परकीय आक्रमकांपासून शीलरक्षण करण्यासाठी आमच्या माता भगिनींनी नाईलाजास्तव उचललेले पाऊल होते. हे सत्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचलेच पाहिजे.

याउपरही सती आणि जोहर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे कोणी म्हणत असल्यास आम्ही मान्य करायला तयार आहोत. मात्र हे नाणे इस्लामी परचक्राचे आहे हे त्यांनीही मान्य करावे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “सती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (?)

  • December 4, 2018 at 10:32 pm
    Permalink

    Mala asa mhanayach ahe ki,etihasat fakt Raja tasech mothya mansache udaharan ahet yat jan samanya lokancha samavesh far kinchit ahe .mhanun apnas jast mahiti bhetu shakat nahi ki hi pratha kuth paryant ruju hoti Samajat.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?