प्रिय राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल, थँक्स! तुम्हा दोघांनी आम्हाला उत्तम धडे शिकवले आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल.

आमच्या पिढीने जीव ओवाळून टाकलेले हे दोन नेते.

आमची पिढी किशोर वयात असताना कुणी तरूण, तडफदार नेता समोर दिसत नव्हता. कुणीतरी लार्जर दॅन लाईफ हिरो सदृश नेता मिळावा आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकावा असं वाटण्याचं वय होतं. इंजिनिअरिंगमध्ये OMS नावाचा प्रकार होता…श्रीमंत हिंदी पोरं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली.

चकाचक इंग्लिश बोलणार, बास्केट बॉल खेळणार, धूम 2 टायटल वर फ्लॉलेस नाचणार, इंग्रजी गाणी म्हणणार, आणि सर्वात वाईट…”आपल्या मराठी पोरी” त्यांच्याशी बोलणार…! जळून खाक व्हायचो.

ह्या अश्या वयात राज ठाकरे नावाचा झंझावात घोंघावत समोर आला.

 

Raj-Thackeray-marathipizza

 

मोबाईल दुर्मिळ नसला तरी “अमीर पोट्टे”च घेऊ शकत होते असा तो काळ. मित्राच्या नोकिया 6600 वर विनवण्या करून करून राजची भाषणं बघत बसायचो. राजचा विषय निघाला की मराठी-अमराठी दोस्त झटकन मौनात जायचे. एकमेकांशी विषय टाळायचे. अवघ्या काही महिन्यांत एवढा प्रभाव पडला होता.

 

राज ने “जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो, भगिनीनो आणि मातांनो…” असं म्हटलं की व्हिडिओतलं पब्लिक बेभान होऊन टाळ्या वाजवायचं, ओरडायचं आणि मोबाईल-कम्प्युटर (तेव्हा असेम्बल केलेलं कम्प्युटर असायचं! आतासारखे लॅपटॉप नसत!) समोर बसलेल्या आमच्या अंगावर काटा यायचा.

पण जस जसे दिवस गेले तस तसं डोकं ताळ्यावर यायला लागलं. आपल्या मराठी पोरी आपल्याशी बोलत नव्हत्या कारण- साला आपणच धड बोलत, वागत नव्हतो- हे कळायला लागलं.

राज भारीच बोलतात, मुद्दे पण योग्य उचलतात पण लॉंग टर्म सोल्युशन दिसत नाही, हे उमजायला लागलं.

नोकरीच्या बातम्या मराठी वृत्तपत्रांत यायला हव्यात हे स्पष्टपणे बोलणारे राज साहेब, “आपली मराठी पोरं नोकरी लागण्यालायक बनावीत” म्हणून काही करतील, शिक्षण व्यवस्था सुधारण्याबद्दल काहीतरी बोलतील असं नेहेमी वाटायचं.

मनसेच्या लॉन्च स्पिचमध्ये “महाराष्ट्राच्या दौऱ्यात अख्खा महाराष्ट्र भकास, उजाड दिसला” हे म्हणताना त्यांच्या आवाजातली धग भिडली होती. पण हे बदलायचं कसं? नेमकं काय करायचं, काय करणार हे कुणी मनसैनिक सांगायला तयार दिसला नाही.

 

mns workers inmarathi
news18.com

अर्थात, हे इतर पक्षांच्या बाबतीत तितकंच सत्य होतं. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा, आपला राज इतरांसारखाच फक्त मनाला भिडतो, मेंदूत शिरत नाही – हे कळत्या वयात जाणवलं. आणि…

आणि दिल टूट गया…

लवकरच राजच्या अगदी विरुद्ध प्रकारचा दुसरा हिरो सापडला. इकडच्या लोकांना तिकडच्या लोकांची भीती दाखवणं नाही. खळ्ळ खट्याक नाही. गाठीशी संपत्ती किंवा प्रीमियम बिजनेसचं बॅकअप नाही. साधं, सोपं बोलणारा माणूस.

Everything boils down to laws and their implementation – हे सत्य उमगलेल्या काळात व्यवस्था सुधारण्याबद्दल, बदलण्याबद्दल बोलणारा साधा सरळ अरविंद केजरीवाल.

हा गडी लार्जर दॅन लाईफ नाही! आपल्यासारखाच आहे! किल्ल्यात बसून पोरांना लाठ्या खायला पाठवत नाही! स्वतः येतो सरकारचं लोकपाल बिल जाळायला. (ते बिल जाळतानाचा केजरीवालांचा रूद्र अवतार अजूनही लक्षात आहे!)

 

arvind kejriwal burning central governments lokpal bill marathipizza

 

हा स्वतः लढतो, पडतो, आपटतो. केजरीवालांचा जनलोकपाल आणि स्वराज – दोन्हीही अजिबात आवडले नाहीत.

दोन्हीही लोकशाहीवादी असल्याचा बनाव करणारे, परंतु लोकांना कोणताही हक्क/सहभाग नं देणारे आहेत. पण तरी केजरीवाल आवडायचा. तो अजून पुढे यावं असं वाटायचं.

पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला आणि तिथून गाडी जे घसरली ती सावरायचं नाव नाही. इतकी की प्रशांत भूषण, योगेंद्र यादवांना हाकलून देण्यापर्यंत मजल गेली.

 

Prashant-Bhushan-Yogendra-Yadav-AAP-marathipizza
financialexpress.com । Express Photo By Amit Mehra

आजही दोघांवर जीव ओवाळणारे समर्थक आहेत. मोदींनी अनेकांना असंच झपाटून टाकलं आहे. अश्या झपाटलेल्यांना बघितलं की, आपले जुने दिवस आठवतात. तरूण तर तरूण, मध्यम वयीन लोकसुद्धा वहावत जाताना बघून गंमत वाटते.

अधूनमधून राज पुन्हा पुन्हा सक्रिय झालेले दिसतात. महत्वाच्या विषयांवर चपखल भाष्य करतात. अरविंद सुद्धा आताशा बरेच संयत झाल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे अजूनही कधीकधी धूसरशी आशा वाटते. परंतु आधी होतं ते झपाटलेपण आता नाही.

आमच्यासारखे अनेक लोक मोदी ज्वरात झपाटले गेले नाही ह्यामागे राज-अरविंद कडून मिळालेला धडा, तिथून आलेलं शहाणपण असावं कदाचित. आता कुणी नेता बेहद्द आवडला तरी त्यामागे वेडं होणार नाही आम्ही!

राज आणि अरविंद, दोघांनीही आम्हाला झपाटून टाकून आमच्यावर उपकारच केलेत. What doesn’t work, हे फार लवकर कळालं आम्हाला.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “प्रिय राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल, थँक्स! तुम्हा दोघांनी आम्हाला उत्तम धडे शिकवले आहेत!

 • March 18, 2018 at 11:10 pm
  Permalink

  अगदी बरोबर.

  Reply
 • October 30, 2018 at 11:18 pm
  Permalink

  कोणताही राजकीय नेता वा पक्ष जनतेचे भले करू शकत नाही. आपण आपल्या देशासमोरील प्रश्न सोडवण्याची अपेक्षा या नेत्याकडून करतो.हे अत्यंत चुकीचे आहे.याचे कारण आपल्या देशासमोरील मुख्य प्रश्न गरिबी ,बेरोजगारी,भ्रष्टाचार ,शिक्षण व आरोग्य यांची कुव्यवस्था,खराब नागरी व्यवस्था इ.आहेत.या सर्वांचे मुळ आपल्या अर्थव्यवस्थेत म्हणजेच करव्यवस्थेत आहे हे कोणी लक्षात घेत नाहीत .1.मोठ्या नोटा असल्याने भ्रष्टाचार करणे सोपे जाते.म्हणून मोठ्या नोटा चलनतून काढून घेतल्या पाहिजेत .मोठ्यातमोठी पन्नास रूपयाची असावी.2.सध्याच्या कर व्यवस्येमधून सरकारची तिजोरी भरत नाही. कारण कर सःरचना व व्यवस्था भ्रष्ट व दोषपूर्ण आहे.म्हणून सर्व कर रद्द करून फक्त 2%बँक व्यवहार कर लागू करावयास हवा.कर संकलन आपोआप बँकेतूनच होईल.सरकारी तिजोरी पूर्ण भरेल.वरील बाबी कार्यविन्त केल्यास सर्व प्रश्न सुटतील.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?