हिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेल्या काही दिवसांपासून गुरमेहर कौर, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (एआयएसए), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या शब्दांची आपल्याला सवय झाली आहे. २७ फेब्रुवारीला सर्व डाव्या संघटनांनी एकत्र येऊन अभाविपच्या हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ”शांततेच्या मार्गा”ने मोर्चा काढला. हा मोर्चा इतका हास्यास्पद की जर उद्या व्हॅलेंटाइन डे प्रेमपूर्वक साजरा करण्यासाठी सुट्टी मिळावी म्हणून श्रीराम सेनेनी किंवा तिहेरी तलाक रद्द व्हावा म्हणून एमआयएमने मोर्चा काढला तर तुम्ही काय म्हणाल?

हा मोर्चा अगदी त्याचप्रमाणे होता.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक राजकीय हिंसा करणाऱ्या डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी म्हटले की अभाविप हिंसक आहे. अभाविपने बळाचा वापर केला. अभाविप संविधानविरोधी आहे असे सर्व आरोप डाव्या संघटनांनी केले. आता अभाविप म्हणजे युनिस्कोच्या शांतीदूताची भारतीय शाखा असे आपण म्हणण्याचे कारण नाही. त्यांनी जर हिंसा केली असेल तर त्यांच्यावर जरुर कारवाई करावी आणि त्यांचे सभासदस्यत्वही रद्द करावे. परंतु, एकदा तरी राजकीय हिंसा काय आहे? तिचे स्वरुप काय आहे? आणि कोणता पक्ष राजकीय (विचारधारा) हिंसेच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये अडकला आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत का? भारतात असा एकही राष्ट्रीय पक्ष नाही ज्याच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे नाहीत. भारतीय जनता पक्ष असो की काँग्रेस या दोन्ही पक्षांशी निगडित लोकांनी वेळोवेळी हिंसेचा वापर केला आहे. परंतु, जर डाव्या विचारांच्या संघटनांच्या हिंसाचाराची यादी केली तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या एकत्रित यादीपेक्षा लांब होईल यात शंकाच नाही.

communist violence in india marathipizza

राजकीय हिंसाचार काय आहे त्यावर आपण आधी विचार करू.

एखादे सरकार उलथून टाकण्यासाठी किंवा आपली विचारधारा थोपवण्यासाठी केलेला हिंसेचा वापर, म्हणजे राजकीय हिंसाचार. या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर अभाविपने रामजस महाविद्यालयात जो धुडगूस घातला त्याला आपण राजकीय हिंसा म्हणू शकतो का? एकतर केंद्रामध्ये अभाविपच्याच मातृसंस्थेचे सरकार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुहेला रशीद आणि उमर खालिद यांचे चर्चासत्र होऊ नये या कारणामुळे त्यांनी गोंधळ केला होता. म्हणजे ती प्रतिक्रिया होती. त्यामुळे ते राजकीय हिंसेच्या व्याख्येत बसत नाही. त्यांच्या विरोधात ओरड करणाऱ्या संघटना मात्र घसा फुटेपर्यंत या कथित हिंसाचाराचा विरोध करत आहेत. उलटपक्षी कम्युनिस्ट पक्षांनी मात्र वेळोवेळी हिंसेचा वापर करुन सरकार उलथून टाकण्याचे प्रयत्न केले आहेत हे दिसते. त्याचवेळी ज्या राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहे त्या ठिकाणी दडपशाही करुन आपली विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केलेला दिसतो.

सेंटर फॉर सिस्टमिक पीसने इंडिया नॅशनल प्रॉब्लेम सेटने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. १९६० ते २००४ झालेल्या हिंसाचाराचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. या शोधनिबंधाचं विश्लेषण ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट जिनेव्हाच्या डॉ. रोहित टीकू यांनी एका इंग्रजी लेखात केले आहे.

देशात झालेल्या एकूण राजकीय हिंसाचाराच्या ७४ टक्के हिंसाचार भाजप, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी मिळून केला आहे. राजकीय हिंसाचाराच्या जास्त घटनांमध्ये काँग्रेसचा सहभाग सर्वाधिक आहे तर राजकीय हिंसाचारामध्ये सर्वाधिक बळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामुळे गेले आहेत असे हा अभ्यास सांगतो. आणखी एक बाब म्हणजे ज्या राज्यांमध्ये आपली सत्ता आहे तेथे आपली एकाधिकारशाही आणण्यासाठी हिंसाचार झाल्याच्या घटनांमध्ये कम्युनिस्ट पार्टीच पुढे आहे असे हा अभ्यास सांगतो.

violence by political parties marathipizza
स्रोत huffingtonpost.in

म्हणजेच जिथे सत्ता असेल त्या ठिकाणी आणि नसेल त्या ठिकाणी डाव्या विचारांच्या पक्षांनी केलेला हिंसाचार हा सर्वाधिक आहे.

पश्चिम बंगाल असो की केरळ – कम्युनिस्ट पक्षांनी केलेल्या पद्धतशीर हिंसाचाराची तोड कशाला येणार नाही. या अभ्यासाच्या मते काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील सदस्य ज्या घटनांशी निगडित आहे त्यामध्ये धार्मिक-जातीय तणावांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करण्यासाठी भारतातील धार्मिक हिंसाचाराच्या संदर्भातूनच ते तपासणे योग्य राहील. परंतु, केवळ राजकीय हिंसाचाराचा विचार केला असता २७ फेब्रुवारीला मोर्चा काढणारेच सर्वाधिक पुढे आहे हे लक्षात येईल.

जर सर्व विद्यार्थ्यी संघटनांच्या (अभाविप धरुन) नेत्यांची भाषणे ऐकली तर प्रत्येक नेता नवनिर्माण आणि समता-न्यायावर आधारित व्यवस्था आणणे ही आपली दोन उद्दिष्टे आहे असे सांगतो. घटनेनी दिलेल्या स्वांतत्र्याचा वापर करुन समाज व्यवस्थेत जर काही बदल आणता आले तर स्वागतार्हच आहे परंतु घटनेची पायमल्ली करुन नेहमी गोंधळ घालू पाहणाऱ्या या डाव्या संघटनांबद्दल काय बोलावे?

पॅलेस्टाइनवर इस्राइलने हल्ला केला म्हणून दिल्लीमध्ये निदर्शने फक्त डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनाच करू शकतात. ज्या विचारसरणीच्या पक्षाने सर्वाधिक हिंसा केली आहे त्याची पहिली इयत्ता म्हणजे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आहेत. त्यातील सर्वच विद्यार्थी तसे आहेत असं समजण्याचं कारण नाही. कारण नवनिर्मितीचं स्वप्न नाही असा तरुण सापडूच शकणार नाही. त्यामुळे समता, न्याय, बंधुता या शब्दांचा आधार घेऊन या संघटना पुढे येतात आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी हिंसाही योग्य आहे असा विचार देऊन जातात. त्यांच्या या विचारसरणीला धक्का देणाराही त्यांच्यापैकीच असतो. त्यामुळेच जेव्हा अभाविप-एआयएसच्या एपिसोडनंतर या संघटना खडबडून जाग्या झाल्या, अभाविप हिंसाचार करत आहे म्हणून त्यांनी मोर्चा काढला, त्यामध्ये हजारो तरुण सामील झाले – त्यात वावगं काही नाही. परंतु आपण ज्या संघटनांमध्ये सहभागी होत आहोत त्या संघटनांना पोसणाऱ्या पक्षाचा इतिहास तर रक्तलांच्छित नाही ना याची त्यांनी शहानिशा जरुर करायला हवी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “हिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?