मृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की सुंदर आयुष्य जगल्यानंतर मृत्यूपश्चात देखील आयुष्यभर कमावलेली भौतिक, भावनिक आणि अध्यात्मिक कीर्ती कायम राहावी.

मानसिक समाधान अथवा ज्याला पुण्यकर्म परोपकार म्हणतात तो नि:संदिग्धपणे व्यक्तीनिष्ठ ठरतो. राहता राहिला प्रश्न व्यक्तीने कमावलेल्या भौतिक इस्टेटीचा तर मात्र मरणानंतर ही इस्टेटीचा वाद हा १०० पिढ्यांपर्यंत चालू राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या स्वअर्जित संपत्ती बाबतचा भीषण वाद टाळण्यासाठी ती हयात असतानाच योग्य प्रकारे इच्छा’पत्राच्या आधारे विल्हेवाट लावणे हे सर्व दृष्टीने न्याय ठरते.

 

ambani family inmarathi
forbes.com

व्यक्तीने इच्छापत्र अथवा मृत्युपत्र ज्याला सर्वसाधारणपणे “Will” म्हणून ओळखले जाते ते जर स्वतःच्या हयाती मध्ये बनवून ठेवले नाहे तर मृत्यूपश्चात व्यक्तीची संपत्ती ही तिच्या वाली वारसांमध्ये “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार वाटप केली जाते.

मात्र जर व्यक्तीने तिच्या हयातीमध्ये इच्छापत्र करून ठेवले असल्यास मृत्यपश्चात संपतीचे वाटप हे “Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारसअनुक्रम कायदा १९२५” च्या अखत्यारीत येते. इच्छापत्राच्या आधारे व्यक्ती तिच्या इच्छेनुसार तिच्या संपत्तीचे वाटप करू शकते.

“Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारसअनुक्रम कायदा १९२५” ही इच्छापत्रा संबंधीचा कायदा मुक्रर करते. हा कायदा सर्व हिंदू, बौद्ध, शेख आणि जैन समाजाला संपूर्ण भारतभर लागू आहे.

इच्छापत्र हे व्यक्तीच्या इच्छांचे कायदेशीर स्वरूप आहे ज्यामध्ये व्यक्ती तिच्या मृत्यू पश्चात तिच्या मालकीची संपत्ती कुणाकडे जाणार हे तिच्या हयातीमाध्येच ठरवू शकते. शिवाय इच्छापत्र हे व्यक्ती जिवंत असताना तिच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये तिच्या इच्छेनुसार कितीही वेळा रद्द होवू शकते. आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार नव्याने बनू ही शकते.

इच्छापत्रा द्वारे व्यक्ती स्वतःची स्वअर्जित संपत्ती ही तिच्या इच्छेने दान करू शकते. म्हणजेच –

व्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती ही वारसाहाक्काच्या कायद्या नुसार पुढील पिढी कडे हस्तांतरीत होते आणि त्यावर व्यक्तीचा अधिकार चालत नाही. प

रंतु व्यक्तीने आयुष्य मध्ये स्वत:च्या कष्टामधून आणि स्वतःच्या पैशामधून जी काही स्थावर आणि जंगम मालमत्ता संपत्ती कमावली असेल त्या संपत्तीचे इच्छापत्र होवू शकते.


इच्छापत्राचा अर्थ :

 

last-will-and-testament-inmarathi jpg
bankrate.com

“Indian Succession Act 1925” कलम २ (ह ) नुसार इच्छापत्र अथवा मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीच्या तिच्या संपती संदर्भातील मरणोत्तर इच्छांचे कायदेशीर अभिव्यक्त स्वरूप होय. व्यक्ती स्वता:च्या इच्छापत्रा द्वारे कुठ्ल्याही व्यक्तीला स्वतःच्या संपत्तीच्या वाटपा संदर्भातील अधिकार देवू शकते. २१ वर्षाच्या वरील कुठलीही व्यक्ती भारतात स्वतःचे इच्छापत्र बनवू शकते.

कायदेशीर इच्छापत्राचे काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

· इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचे नाव:-

इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचे बिनचूक नाव सदर इच्छापत्रात आले पाहिजे.

· इच्छापत्रा अन्वये केलेल्या दानाचा वारस नेमण्याचा अधिकार:-

इच्छापत्र करू इच्छिणारी व्यक्ती तिच्या इच्छेनुसार कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या संपत्तीचा वारस नेमू शकते. सदर वारसदारास कायद्याच्या आधीन राहून व्यक्तीने तयार केलेल्या इच्छापत्राच्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.

· मृत्युपश्चात अंमलबजावणी:-

कुठलेही इच्छापत्र तयार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात होवू शकते. व्यक्ती जिवंत असताना तिने इच्छापत्रान्वये दान केलेल्या वस्तूची अथवा संपत्तीची मालकी ही तिच्या मृत्यूपश्चातच वारसदारास मिळू शकते.

· इच्छापत्र रद्द करण्याचा अधिकार:-

सामान्यपणे एखाद्या व्यक्तीने तयार केलेले इच्छापत्र हे त्या व्यक्तीच्या कालखंडात तिच्या मृत्युपूर्वी ती व्यक्ती स्वत: रद्द करू शकते. आणि दुसरे नवीन देखील तयार करू शकते. कधी कधी व्यक्तीस तयार केलेल्या इच्छापत्रात काही दुरुस्त्या करावयाच्या असल्यास सदर इच्छापत्र तसेच ठेवून त्यामध्ये व्यक्तीने सुचविलेल्या दुरुस्त्या करता येतात. त्यास कायद्या मध्ये “कोडीसाईल” असे म्हटले जाते.

इच्छापत्रात केलेल्या दुरुस्त्या बद्दल कुठलीही तिर्हाईत व्यक्ती इच्छापत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर बंधन घालू शकत नाही अथवा कोर्टात केस दाखल करू शकत नाहीत. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तिने मृत्युपूर्वी केलेले शेवटचे इच्छापत्र हे कायदेशीर ठरते. त्यापूर्वी व्यक्तीने केलेली सर्व इच्छापत्रे (जर अस्तित्वात असतील तर ती) रद्दबातल ठरतात.

will-picture-In marathi
SmartAsset.com

इच्छापत्राचे प्रकार

· प्रिव्हिलेज विल (Privileged Wills) :-

नावाप्रमाणेच या प्रकारचे इच्छापत्र हे काही विशिष्ट व्यक्ती करू शकतात.

सैनिक, हवाई , नाविक , आणि आर्मी मध्ये काम करणारे सर्व सैनिक दर्जाचे लोक अशा प्रकारचे Privileged will बनवू शकतात.

याला privilege अशासाठी म्हणायचे की सैनिक हा त्याच्या नोकरीवर देशासाठी काम करताना कधीही मृत्युमुखी पडू शकतो त्यासाठी जिवंतपणी आणि नोकरीमध्ये असतानाच या लोकांना त्यांचे इच्छापत्र करण्याचा अधिकार कायद्याने त्यांना दिलेला आहे.

· अनप्रिव्हिलेज विल (Unprivileged Wills):-

“Indian Succession Act 1925” कलम ६३ नुसार या प्रकारच्या इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते. सैनिक सोडून बाकी कुठल्याही व्यक्तीने केलेले इच्छापत्र हे Unprivileged ठरते.

१८ वर्षाखालील व्यक्तीने केलेले अथवा दिवाळखोरीत गेलेल्या व्यक्तीला मात्र इच्छापत्र करण्याचा अधिकार नाही. इच्छापत्रा द्वारे व्यक्ती स्वत:च्या स्थावर आणि जंगम संपतीचे वाटप करू शकते. अर्थात दान करताना त्यावर कायदेशीर बंधने ही येतात.


कुठल्याही १८ वर्षाखालील व्यक्तीला जर इच्छापत्रा द्वारे कुठल्या संपत्तीचे दान मिळाले असेल तर इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने अशा वारसावर त्याने १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याचा पालनकर्ता इच्छापत्रान्वाये नेमला पाहिजे.

इच्छापत्र तयार करण्याचा कुठलाही आखीव रेखीव Format नाही. व्यक्ती स्वतःचे हेतू स्पष्ट स्वरूपात इच्छापत्रात व्यक्त करू शकते. व्यक्तीच्या स्व कष्टार्जित मालकीच्या वस्तूंचे, जमिनीचे आणि इतर मालमत्तेचे सविस्तर वर्णन त्याच्या मालकी हक्काबाबतचे पुरावे, इ. वर्णन इच्छापत्रात येणे आवश्यक आहे.

इच्छापत्राच्या शेवटी इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीची सही अत्यावश्यक आहे. ही सही त्या व्यक्तीने दोन स्वतंत्र साक्षीदारासमोर केली पाहिजे. इच्छापत्रावरती तारीख आणि ठिकाण नमूद केलेले असले पाहिजे.

इच्छापत्रावरती तयार करणाऱ्या व्यक्तीशिवाय “आमच्यासमोर इच्छापत्र तयार करणाऱ्या व्यक्तीने सही केलेली आहे” अशा आशयाच्या दोन साक्षीदारांच्या सह्या देखील असल्या पाहिजेत. शिवाय हे इच्छापत्र करताना व्यक्ती शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे MBBS डिग्री असणाऱ्या डॉक्टर चे प्रमाणपत्र देखील आवश्यक असते.

प्रोबेट ची संकल्पना:-

व्यक्तीच्या मृत्युपश्चात त्याचे वारसदार प्रोबेट मिळवण्यासाठी कोर्टाकडे अर्ज करू शकतात. प्रोबेट म्हणजेच व्यक्तीने केलेल्या इच्छापत्राची नक्कल ज्यावर कोर्टाचे सही शिक्के असतात. म्हणजेच कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी प्रमाणित केलेली व सील केलेली इच्छापत्राची नक्कल म्हणजे प्रोबेट होय. कोर्ट सर्व वारासादाराना त्यांची काही हरकत असल्यास तसे विचारून त्यांचे म्हणणे record करू शकते.

जर कुठल्याही वारसदाराची हरकत नसेल तरच प्रोबेट grant केले जाते. त्यानंतरच त्या इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते.

इच्छापत्राचे रजिस्ट्रेशन:-

इच्छापत्राचे रजिस्ट्रेशन हे भविष्यातील अनेक तंटे टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. इच्छापत्र हे रजिस्टर करण्यासाठी त्या भागातील रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार कडे सदर करावे लागते.

ज्यावेळी रजिस्ट्रार संपूर्ण कागदपत्राची तपासणी करतो आणि सर्व शंकाचे समाधान झाल्यावर त्याची नोंद तारीख, वार, दिवस, तास इ. सह केल्यावर त्याच इच्छापत्राची प्रमाणित सही शिक्क्याची नक्कल व्यक्तीला किंवा तिच्या नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. व त्यानंतर ते इच्छापत्र रजिस्टर झाले म्हणून प्रमाणित करण्यात येते.

अनेक प्रकारच्या खटल्यांमध्ये रजिस्टर्ड इच्छापत्राची पुरावा म्हणून सर्वात जास्त किमत मानण्यात येते.

अंततः प्रत्येक व्यक्तीने भविष्यातील आपल्या वाली वारसांचे वाद टाळण्यासाठी इच्छापत्र करणे हे आवश्यक ठरते.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Adv. Anjali Zarkar

Lawyer by profession. belletrist by heart!

anjali-zarkar has 19 posts and counting.See all posts by anjali-zarkar

One thought on “मृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?