कट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम |

===

मागील भागाची लिंक : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १

===

या लेखमालेच्या मागच्या भागात आपण भारतीय मुस्लीम जनमानसाची मुल इस्लाम, कुराण यावरील श्रद्धा, कुराण विरोधी भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांचे इस्लाम मधील स्थान, भारतातील मुस्लीम जनतेची संविधान निष्ठा, मुस्लीम नेतृत्वाची भूमिका इत्यादी बद्दल चर्चा केली. या लेखावरील प्रतिक्रियांकडे पाहता, मुस्लीम जनतेला स्वधर्माचे कट्टर आचरण करण्याची प्रेरणा देणारे मुलभूत घटक कोणते, या विषयावर विचारमंथन होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

त्या अनुषंगाने ‘हदीस’ या विशुद्ध इस्लामचा मूलाधार असलेल्या साहित्याचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. सांप्रतकालात इस्लामचे योग्य आचरण कसे करावे याचा वस्तुपाठ देणारे हे साहित्य आहे. त्यामुळे अर्थातच या साहित्याला मुस्लीम समुदायात प्रचंड सन्मान आणि मान्यता आहे.

जगभरातील मुस्लीम पंडित कुराण नंतर सर्वात पहिली प्राथमिकता हदीसलाच देतात. कारण पवित्र कुरणाच्या नंतर मुसलमानाच्या जवळ धर्मशास्त्राचा दुसरा आधार म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची वचने आणि कृती, ज्यांच्या संग्रहाला हदीस असे म्हटले जाते.

 

hadith-marathipizza01
hemuslimissue.wordpress.com

हदीस म्हणजे काय?

हदीस हा शब्द मुळचा अरबी भाषेतला. ज्याचा ढोबळ अर्थ ‘वचन’ असा होतो. इस्लामच्या परिभाषेतील हदीस चा अर्थ ‘प्रेषितांची वचने, कृती अथवा कार्ये’. म्हणजेच, पैगंबर मुहम्मद यांनी ४० वर्षांच्या आयुष्यात अल्लाहच्या वतीने प्रेषित म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देहान्तापर्यंत ते ज्या गोष्टी बोलले, ज्या गोष्टी त्यांनी इतरांना सांगितल्या आणि ज्या कृती इतर लोकांनी त्यांच्या समोर केल्या असता त्याला सहमती दर्शवली, त्या गोष्टींना हदीस असे म्हणतात. हा झाला हदीस चा शब्दशः अर्थ.

मुळ कुरणात हदीस या शब्दाचा अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. त्यातून या मुळ अर्थाच्या सुसंगत राहून हदीस चे अनेक अर्थ अपेक्षित असल्याचे दिसून येते. ते समजून घेण्यासाठी कुराणातील काही आयती उदाहरणादाखल पहा-

१. ‘हदीस’ या शब्दाचा वापर ‘कुराण’ या अर्थाने- “तर हे पैगंबरा, जे लोक माझ्या या हदीस ला पाखंड म्हणतात त्यांना तू आपापल्या स्थितीवर सोडून दे. त्यांस मी पाहून घेईन. आम्ही त्यास जाणीवही होणार नाही अशा रीतीने नरकाग्निकडे ओढीत जाऊ.” (सुरह-कलम, आयत क्र. ४४)

या आयतीत ईश्वराने आपल्या कुरानासाठी कुरानासच हदीस म्हणून संबोधले आहे. येथे हदीस या शब्दाचा ‘वचन किंवा आज्ञा’ या अर्थाने वापर केल्याचे कळते. कारण कुराण ही अल्लाह्चीच आज्ञा आहे म्हणून अल्लाहने येथे कुराणाला कुराण असे न म्हणता हदीस असे संबोधले आहे.

२. हदीस या शब्दाचा वापर ‘बातमी’ या अर्थाने- “काय तुम्हास मुसा ची हदीस आली?” (सुरह-ताहा, आयत क्र. ९) येथे अल्लाहने हदीस या शब्दाचा वापर ‘बातमी’ या तत्कालीन प्रचलित अर्थाने केला आहे.

३. हदीस या शब्दाचा वापर ‘साधारण वार्तालाप’ या अर्थाने- “जेव्हा प्रेषितांनी त्यांच्या पत्नीला एक गोपनीय गोष्ट सांगितली” (सुरह-तहरीम, आयत क्र. ३) येथे प्रेषितांनी त्यांच्या पत्नीशी जे बोलणी केली ती सांगण्यासाठी अल्लाहने हदीस हा शब्द वापरला आहे. कारण हदीस चा शब्दश अर्थ ‘बोलणे’ असाही होतो.

हदीसचा अभ्यास केलेले पंडित म्हणतात,

अशी कोणतीही गोष्ट की जी प्रेषितांशी संबंधित आहे, जसे की त्यांचे बोलणे, त्यांच्या आज्ञा, त्यांच्या कृती, त्यांचे एखाद्या गोष्टीवरील मौन, त्यांची वागण्याची पद्धत, त्या प्रत्येक गोष्टीला हदीस म्हटले जाईल.

 

इस्लामी परंपरेतील हदीस चे स्थान:

इस्लामचा मूलाधार असलेल्या कुराण मध्ये जीवनात येणारी प्रत्येक समस्या, आणि तिचे समाधान सांगण्यात आले आहे. प्रेषितांच्या जीवनकाळात आलेल्या प्रत्येक आदेशाला संकलित करून कुराण बनले आहे. पहा-

“आम्ही कोणाही वस्तूबद्दल लिहिण्यात कोताई केलेली नाही.” (सुरह-अल-अनआम, आयत-३८)

पण कुराणात ज्या अनेक विषयावर आज्ञा आहेत त्या सर्व संक्षिप्त पद्धतीने आल्या आहेत. आणि अर्थात त्यांच्या विस्तृत व्याख्या करण्याची जबाबदारी अल्लाहने पैगंबर यांच्याकडे सोपवली आहे. पहा-

“(आणि आम्ही पैगंबर पाठविले होते तेही) स्पष्ट प्रमाणे व पुस्तके यांच्यासह. (याच तर्हेने) आम्ही तुलाही हे कुराण प्रकटविले आहे. अशासाठी की जे हुकुम लोकांच्या सन्मार्ग दर्शनार्थ त्यांजकडे पाठविले गेले आहेत ते त्यांना तू स्पष्ट करून सांगावेस आणि हे की त्यांनीही त्याचे मनन करावे.” (सुरह-अल-नहल, आयत क्र. ४४) या आयतीप्रमाणे, प्रेषित पैगंबर यांनी लोकांच्या समोर कुराणाच्या ज्या व्याख्या केल्या त्या खुद्द अल्लाहच्या मार्गदर्शनानेच केल्या होत्या, त्यात त्यांनी काहीही संकलन केले नाही. म्हणून-

“आणि तो आपल्या मनेच्छेने बोलत नाही. किंबहुना हे तो जे वाचून ऐकवितो ते दिव्य प्रकटीकरण होय की ते त्याला प्रकट केले जाते” (सुरह-अल-नज्म, आयत ३, ४)

या वर उधृत केलेल्या आयतीतून हादीस हा ग्रंथ कुराण इतकाच दैवी असून त्यालाही कुराण इतकेच ईश्वरी अधिष्ठान असल्याचे सिद्ध होते. कुराण समजून घेण्यासाठी हदीस चा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हदीस हीच कुराणाची व्याख्या आहे.

प्रत्येक मुसलमानासाठी हदीस अनिवार्य आहे काय?

इस्लाम हा अल्लाहने प्रेषित यांच्यामार्फत पाठवलेला दीन आहे. या धर्मात गेल्या चौदाशे वर्षाच्या इतिहासात तसूभरही ढवळाढवळ झालेली नाही. कारण त्याच्या रक्षणाची जबाबदारी खुद्द अल्लाहने घेतलेली आहे अशी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची ढळ श्रद्धा असते.

 

scontent-sea1-1.cdninstagram.com

मुस्लीम पंडित म्हणतात की,

ईश्वराने प्रत्येक जमान्यात माणसाला मार्ग दाखवण्याकरिता आपले एक प्रेषित पाठवले आणि त्यांच्यामार्फत त्या दैवी आज्ञा लोकांवर उतरविल्या गेल्या. असे तर कधीच झाले नाही की आज्ञा आल्या आहेत परंतु प्रेषित आलेले नाहीत. कारण त्या आज्ञा समजून सांगणारा आणि त्याप्रमाणे वागून दाखविणारा प्रेषित नसेल तर अल्लाहच्या आज्ञा आणि वचन यातून नेमका हुकुम काय हे शोधणे मोठ्या जिकीरीचे काम होऊन बसेल. त्यामुळे प्रत्येक श्रद्धावंताला हे जाणणे जरुरीचे आहे की कुराण हा ईश्वराचा शेवटचा शब्द आहे आणि पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत.

त्यामुळे प्रेषित यांनी आयुष्यभर ज्या गोष्टी अवलंबिल्या, मग त्या ठराविक महत्वाच्या गोष्टी असोत वा दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी, त्या गोष्टी अर्थात हदीस प्रमाणे वागणे हे इस्लाम मानणाऱ्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

दुसरे म्हणजे, फक्त कुराण च्या आधारावर रोजच्या जगण्यातील निर्णय घेता येत नाही. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. उदाहरणार्थ, कुराणात नमाज पढण्याची आज्ञा आहे, परंतु नमाज कसा पढावा, त्याच्या पद्धती कोणत्या, कोणत्या वेळी नमाज पढावा हे सविस्तरपणे कुराणात सांगितलेले नाही. कुराणात जकात देण्याचा आदेश असला तरी त्यात जकात कशी द्यावी हे सांगितले गेलेले नाही. रोजा ठेवण्याचा आदेश असला तरी रोजाची व्याख्या केलेली नाही.

या गोष्टींबद्दल निर्णय करायचा असल्यास पैगंबर यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात या गोष्टींची कशी अंमलबजावणी केली हे पाहणे महत्वाचे ठरते. त्या अंमलबजावणी चे वर्णन म्हणजेच एका अर्थाने हदीस आहे. हदीस मध्ये नमाजाची पद्धत, अटी, संख्या या सर्वांबद्दल स्पष्ट माहिती आहे.

 

islam-marathipizza
en.protothema.gr

 

हदीस साहित्य-

हदीसचे संग्रह साधारणतः विषयांच्या आधारावर वर्गीकृत करण्यात आले आहेत. जीवनाचा प्रत्येक पैलू, प्रत्येक क्षेत्र या विषयांत अंतर्भूत आहे. या संग्रहाच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणावर हदीस चे अवलोकन करण्यासाठी साहित्यनिर्मिती झाली. अनेक विषयांचा अंतर्भाव असणारी पुस्तके प्रकाशित झाली. या पद्धतीने विशाल हदीस-साहित्याची निर्मिती झाली आहे, आणि हे साहित्य मुस्लीम देशातच नव्हे तर भारतासारख्याही अनेक देशांत उपलब्ध आहे. हदीस चे खालील सहा विश्वसनीय आणि प्राथमिक संग्रह आहेत, ज्यात एकूण २९,५७८ हदीस आहेत.

१. सहिह बुखारी: संग्रहकर्ता- अबू अब्दुल्लाह- मुहम्मद- बिन- इस्माईल बुखारी, एकूण ७२२५ हदीस.
२. सहिह मुस्लीम: संग्रहकर्ता- अबुल- हुसैन- मुस्लीम- बिन- अल- हज्जाज, एकूण ४००० हदीस.
३. सुनन तीर्मिजी: संग्रहकर्ता- अबू- इसा मुहम्मद- बिन- इसा-तीर्मिजी, एकूण ३८९१ हदीस.
४. सुनन अबू-दाउद: संग्रहकर्ता- अबू- दाउद सुलैमान- बिन- अशअस साजीस्तानी, एकूण ४८०० हदीस.
५. सुनन इब्ने मजाह: संग्रहकर्ता- मुहम्मद- बिन- याजीद- बिन- मजाह, एकूण ४००० हदीस.
६. सुनन नसाई: संग्रहकर्ता- अबू- अब्दुर्रहमान- बिन– शोएब खुरासानी, एकूण ५६६२ हदीस.

या सहा प्राथमिक हदीस संग्रहांवर आधारित दोन वेगळे संकलित ग्रंथ आहेत. मिश्कात आणि रियाज-उस-सालीहीन. त्यात अनुक्रमे १८९४ आणि ६२९४ हदीस आहेत.

हदीस चा अवलंब अनिवार्य करणाऱ्या काही हदीस पहा-

हज्रते अबू हुरैरा से वर्णीत है की अल्लाह के रसूल (सल्ल) ने फर्माया, मेरी सारी उम्मत जन्नत मी प्रवेश करेगी अलावा उसके जिसने इन्कार किया, लोगो ने कहा: ऐ अल्लाह के रसूल, इन्कार करनेवाला कौन है? आपने फर्माया: जिसने मेरा अनुसरण किया, वाह जन्नत मे प्रवेश करेगा, और जिसने मेरी अवज्ञा की उसने इन्कार किया|” (सहिह बुखारी)

मिकदाम बिन मादिकरब (रजिअल्लहु अन्हू) से रिवायत है की नबी ने कहा: “जान रखो, मुझे कारान दिया गाय और उसके साथ ऐसी ही एक और चीज भी, खबरदार रहो, ऐसा न हो के कोई पेट भरा व्यक्ती, अपनी मस्नद पर बैठ हुवा कहने लगे के तुम्हारे लिये इस कुराण का पालन आवश्यक है, जो इसमे हलाल पाओ उसे हलाल समझो, और जो इसमे हराम पाओ उसे हराम समझो, हाला की जो कुच्ह अल्लाह का रसूल हराम निर्धारित करे वह वैसा ही हराम है जैसा की अल्लाह का हराम किया हुआ है|” (अबू दिऊद, तीर्मिजी, इब्नेमाजा)

वरील दोन हदीस या हदीस साहित्याचे इस्लामी धर्मशास्त्रातील महत्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशा आहेत. हदीस चे हे अनन्यसाधारण महत्व जाणून घेण्याचे प्रयोजन काय याचा आता विचार करूया. जगभरात जिथे जिथे इस्लामचे पालन केले जाते त्या पालनासाठीचा वस्तुपाठ म्हणजे हदीस आहे.

उत्तर प्रदेशातील देवबंद विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ इत्यादी इस्लामचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांमध्ये हदीसचे रीतसर शिक्षण दिले जाते. या शिक्षणामुळेच देवबंद विद्यापीठ जगभरातील मुस्लीम पंडितांमध्ये प्रचंड मान्यताप्राप्त आहे. इस्लामचा भारतभर प्रचार प्रसार करून त्याला प्रत्येक मुस्लिमाच्या पर्यंत पोचविण्याचे श्रेय या हदीस चे शिक्षण देणाऱ्या अनेक शिखर संस्थाना निर्विवादपणे द्यावे लागेल.

याहून महत्वाचे म्हणजे आयसीस सारख्या अनेक दहशतवादी संघटना त्यांच्या प्रत्येक कृत्याला हदीसचे प्रमाण देत असतात. ज्याचा मुळ हदीस मध्ये संदर्भ तपासला असता तो सत्य आहे. इस्लामी मुलतत्ववादाची वैचारिक मांडणी हदीस मधून आलेली असल्याने ती जगातील सर्व मुस्लीम समुदायात सर्वमान्य होते यात आश्चर्य असे काहीच नाही. ते स्वाभाविक आहे. दहशतवादी संघटनांना कोणतीही वैचारिक मांडणी नाही आणि ते नुसत्याच कारवाया करत आहेत, त्यांनी इस्लामचा चुकीचा अर्थ लावला आहे अशा वल्गना करणाऱ्या विद्वान लोकांनी ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.

वास्तविक पाहता सर्वच दहशतवादी संघटनांची मांडणी स्फटिकाईतकी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, खलिफा अबू-बकर म्हणतो की,

मुहाम्मादाची मुहर म्हणजे पहिल्या ओळीत अल्लाहचे नाव, ज्याखालोखाल दुसर्या ओळीत प्रेषित आणि तिसर्या ओळीत मुहम्मद असे लिहिलेले असेल.

(हदीस- सहिह अल बुखारी) म्हणजेच एक मोठा काळा आयताकृती ध्वज ज्यावर पांढर्या रंगाने मोठ्या अक्षरात “मुहम्मद रसूल अल्लाह” असे लिहिलेले होते. तो ध्वज स्वतः प्रेषित मुहम्मद यांनी वापरला. ह्या किंवा अशा झेंड्याला आज “Black Banner” म्हणून ओळखले जाते आणि हाच ध्वज इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना त्यांचा अधिकृत ध्वज म्हणून वापरते. यावरून कोणीही अंदाज लावू शकेल की धर्माचा चुकीचा अर्थ नेमका कोणी लावला आहे.

 

isis-marathipizzza
extracapsa.wordpress.com

इस्लामी मुलतत्ववादी आणि दहशतवादी संघटनांच वैचारिक अधिष्ठान इतके स्पष्ट आहे. याउपर, आजवर मुस्लीम समुदायात जे काही सुधारक होऊन गेले त्यापैकी, हमीद दलवाई यांच्यासारखे काही अपवाद वगळता किती सुधारकांनी थेट कुराण आणि हदीस या मूळ ग्रंथांवर टीका केली आहे.

प्रत्येक सुधारकाचा सूर असाच असतो की ‘हम कुराण और हदीस की रोशनी मी रहकर ही बात करेंगे” याचे कारण हेच असते की कुराण त्यांना तसे करण्याची परवानगी देत नाहीत आणि तसे केले तर काय होते हे सलमान रश्दी आणि इब्न बराक सारख्या अभ्यासकांनी अनुभवले आहे. त्यामुळे मुस्लीम जेव्हा उघडपणे संविधान नाकारतात तेव्हा ती प्रेरणा खुद्द कुराण आणि हदीस मधून आलेली असते हे समजून घेणे आवश्यक आहे. पण मुळ इस्लाम चांगला आहे असा समज जाणूनबुजून करून घेतला असेल त्यावर काय बोलावे?

आम्ही कुराण आणि हदीस च्या परिघात राहून निर्णय घेऊ असे म्हणून प्रश्न संपत नसतो. कुराण आणि हदीस मध्ये काय आहे आणि आजवर त्यांच्या परिघात राहून कोणते निर्णय घेतले गेलेत, याचा अभ्यास केला की या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे ऐकीव माहितीवर विसंबून न राहता या विषयाचा सखोल विचार केलेला प्रत्येकजण कुराण नाकारत असल्याचे दिसून येते, पण हे बिगरमुस्लीम लोकांनी नाकारून फायदा नाही. मुस्लीम लोक नाकारतात की नाही ते पाहावे लागेल.

अर्थात ते कुराण नाकारत नाहीत हे उघड आहे आणि म्हणून ते घटना विरोधी आहेत! कट्टर मुस्लिमांना आंजारून गोंजारून जवळ ठेवण्याची खानदानी सवय असलेल्या पुरोगामी पंडितांनी ही गोष्ट ध्यानी घेणे आज जास्त आवश्यक आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?