इस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे तो मेंढपाळ माळरानावर मेंढ्या चरायला घेऊन आला होता. मेंढ्या चरतायत तोवर मजेने इकडे तिकडे पाहात असताना एकदम त्याला कसलीतरी हालचाल जाणवली. पाहिलं तर झुडुपाआड एक पोरगा हळूच त्याची मेंढी चोरून न्यायला पाहत होता. मेंढपाळाचं डोस्कं सणकलं! ह्यापूर्वीही त्याच्या चार दोन मेंढ्या कोणीतरी पाळवल्या होत्या. लांडग्याने धरून नेल्या असाव्यात असा समज करून घेतलेल्या मेंढपाळाला आज मात्र चोर दिसला! संतापाने तिरिमिरीत त्याने खांद्यावरचं धनुष्य काढून पोरावर निशाणा धरला! पोराला चाहूल लागली तसा तो पळायला लागला पण मेंढपाळाने बाण सोडलाच! बाण येऊन पोराच्या मांडी आणि कंबरेच्या सांध्यावर बसला…लंगडत लंगडत पोरगा पळून गेला.

===

बाराव्या शतकात चंगेज खानने मध्य आशियातल्या राजवटींची पळता भुई थोडी केली. चंगेजच्या पश्चात त्याच्या मुलांनी आणि नातवांनी अजूनच गोंधळ घातला. मध्य आशिया जवळपास सगळाच बळकावला. मंगोल धर्मवेडे नव्हते. त्यांनी आपला धर्म किंवा संस्कृती कुठे कोणावर लादली नाही. ते जिथे जातील तिथल्या संस्कृतीत विरघळत गेले. मध्य आशियात तेंव्हा इस्लाम जबरदस्त जोमात होता त्यामुळे तिथे तळ ठोकून असणाऱ्या मंगोलानी इस्लाम जवळ केला. तिथल्या स्त्रियांशी लग्ने वगैरे प्रकार रुळत गेले. चंगेजचा मूळ ‘बोर्जीगीन’ वंश आणि तुर्की स्त्रिया ह्यांच्यातून एका नवा वंश तयार झाला. त्याला म्हणत “बरलास”.

बरलास अर्धे मंगोल असले तरी धर्माने मुस्लिम होते आणि तुर्की भाषा बोलायचे. चंगेज खानाने मोहम्मद अलाद्दीन शाहची तुर्की-उझबेगिस्तान-कजाखस्तानमधली ख्वारेझमी राजवट धुळीत गाडल्यावर तिथे चगताई ह्या चंगेजच्या मुलाने सूत्रे सांभाळली होती. पुढे चगताईच्या वंशजांनी तुर्की इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्या भागात बेमालूम मिसळून गेले. बरलास वंश उदयाला आला. बरलास वंशाचा एक ‘तारकाई” म्हणून बऱ्यापैकी मोठा माणूस होता. समरकंदच्या दक्षिणेला असणाऱ्या केश नावाच्या गावात त्याचा मान होता. एकदा एका दुसऱ्या मंगोल टोळीने केशवर हल्ला केला. त्यात बरेच लोक कैद करून ते समरकंदला घेऊन गेले. त्यात ताराकाईची बायको आणि मुले देखील होती. त्याचा मुलगा कसाबसा कैदेतून निसटला आणि त्याने स्वतःची एक लहानशी टोळी तयार केली. हा पोरगा जंगलात, माळरानावर दबा धरून बसे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वा टसरूना लुबाडत असे.

एकदा असाच हा पोरगा एका मेंढपाळाची मेंढी चोरायला गेला आणि तैमूरचा तैमूर-ए-लंग झाला !

taimur-e-lang-marathipizza

तैमूरचा जन्म 9 एप्रिल 1434ला केश जवळ झाला. तैमूरचा खरा तुर्की उच्चार ‘देमीर’ असा होतो. काळाच्या ओघात देमिरचा तीमुर आणि तीमुरचा तैमूर झाला. एक पाय लंगडा झाला म्हणून तैमूरलंग. पाश्चात्य लोक त्याकाळी तैमूरलंगला टॅमर म्हणायचे. लंगडा झाला म्हणून टॅमर-द लेम. आज अपभ्रंश होऊन युरोप-अमेरिकेत तैमूरलंग हा “टॅमरलेन” ह्या नावाने ओळखला जातो. तैमूरचा शब्दशः अर्थ लोखंड/पोलाद असा होतो. आणि हे नाव मूळ ‘तीमुजीन’ ह्या मंगोल नावावर आधारलेलं आहे. तीमुजीन म्हणजे सुद्धा लोखंड. आणि तीमुजीन कोणाचं नाव होतं? “चंगेज खान”चं!

मध्य आशियात पर्शिया-तुर्कमेनिस्तान-उझबेगिस्तान भागाला अरब मुस्लिम ‘मावार अन् नहर’ म्हणत. म्हणजे अमू दरीया (तुर्कमणिस्तानातील नदी) च्या पलीकडचा प्रदेश. आज ह्या भागाला transoxiana म्हणतात. समरकंद आणि केश ह्या प्रदेशात येतात. तैमूर लहान असताना ह्या भागावर मंगोलांची सत्ता होती. तैमूर 10 वर्षांचा असताना तिथे बंड पुकारलं गेलं आणि एक काजगन नावाचा ‘अमीर’ सत्तेत आला. अमीर म्हणजे योद्धा…जेता. तैमूर विशीच्या आसपास आल्यानंतर काजगनचा खून झाला आणि मंगोल पुन्हा सत्तेत परतले. तोपर्यंत तैमूरने टोळी बनवून बऱ्यापैकी नाव कमावलं होतं. वेळेची नजाकत साधून तैमूर मंगोलाना शरण गेला आणि त्यांचा मदतनीस म्हणून काम पाहू लागला आणि tansoxiana प्रदेशाचा शासक इलियास खोजाचा मंत्री बनला.

पुढे तैमूरने बल्ख शहरातल्या हुसेनसोबत दोस्ती केली. हा हुसेन देखील सैन्य बाळगून असणारा मोठा योद्धा होता. अमीर काजगनचा नातू असणाऱ्या हुसेनसोबत हातमिळवणी करून तैमूरने इलियास खोजाविरुद्ध युद्ध पुकारलं. इलियास खोजा सुरुवतीची लढाई हरून प्रदेश सोडून पळाला असला तरी त्याने पुन्हा हल्ले करून तैमूर आणि हुसेनला पळवून लावलं. खोजाने पुन्हा समारकंदचा ताबा घेतला. तैमूर खोरासानला तर हुसेन बल्खला परतला. समरकंदमध्ये जवळपास लोक मुस्लिम होते. त्यांनी इलियास खोजा विरुद्ध बंड पुकारले. त्यात सरबेदर नावाच्या बंडखोरांनी इलियास खोजाला पळवून समरकंदमध्ये इस्लामिक राजवट निर्माण केली. तैमूरने सुरुवातीला सरबेदर लोकांशी मैत्री केली आणि पुढे ताकद वाढल्यानंतर हुसेनसोबत मिळून मारून समरकंद ताब्यात घेतलं. तैमूर समरकंदचा तर हुसेन बल्ख आणि इतर प्रदेशाचा ‘अमीर’ बनला. हुसेनच्या बहिणीशी त्याने लग्न केलं.

taimur-e-lang-02-marathipizza

तैमूर आणि हुसेनच्या स्वभावात खूप फरक होता. तैमूर लोकांकडून फारसा कर वसूल करत नसे. तो व्यापाऱ्यांना संरक्षण देई. गरीब लोकांची स्वतःच्या पैशातून मदत करत असे. माणसे जोडत असे. ह्यामागे त्याची दूरदृष्टी होती. आपल्याला जर विदेश जिंकायचा असेल तर आधी देशात मजबूत पाठिंबा हवा हा डोळसपणा होता. हुसेन अगदी विरुद्ध होता. Transoxiana प्रांतात आता तैमूरचा बोलबाला व्हायला लागला. लोक त्याला मानायला लागले. त्याचा दबदबा आणि रुतबा दिवसेंदिवस वाढू लागला. हे हुसेनला सहन होईना! दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. सुरुवातीचा बेबनाव आता तीव्र स्वरूप घ्यायला लागला. तैमूरच्या बायकोच्या मृत्यूनंतर दोघा मित्रातली कडीच तुटली आणि दोघेही सैन्यासकट एकमेकांसमोर उभे ठाकले.

प्रांतातले अनेक सरदार आणि मोठे लोक तैमूरच्या बाजूने होते. एकेकाळी तैमूरसारखे 50 सरदार पगारी ठेवणाऱ्या हुसेनचा सहज पराभव झाला! किकरसाव ह्या तैमूरच्या सरदाराने हुसेनला बेड्यात बांधून तैमूरसमोर हजार केलं. किकरसावचा भाऊ हुसेनकडून मारला गेला होता त्यामुळे त्याचा हुसेनवर प्रचंड राग होता.

बेडीत जखडलेल्या हुसेनला पाहून तैमूर विरघळला! हुसेनने कठीणकाळी केलेली मदत आठवून आणि मित्र म्हणून तैमूरने त्याला माफ केले आणि मक्केला निघून जाण्यास सांगितले. पण मक्केच्या प्रवासाला निघालेल्या हुसेनला किकरसावने रस्त्यात गाठून मारून टाकले!

1470, वयाच्या चौतीसाव्या वर्षी तैमूर ‘अमीर तैमूर’ म्हणवला जाऊ लागला. चगताई राजवट असलेल्या ‘मावार अन् नहर’चा पेशवा असणाऱ्या तैमूरने पुढे चगताई राजवट उधळून तिमूरी राजवट कायम केली!

स्वतःला चंगेज खानाचा वंशज आणि इस्लामची तलवार म्हणवणाऱ्या, चंगेज खान नंतर आशिया खंडातले सर्वात मोठे साम्राज्य बनवणाऱ्या, अनेक महाक्रूर कर्म करून बदनाम झालेल्या अमीर तैमूरलंग बद्दल अजून पुढची माहिती पुढील भागात!

पुढील भागाची लिंक: इस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 31 posts and counting.See all posts by suraj

One thought on “इस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १

  • December 22, 2016 at 11:27 pm
    Permalink

    खुप छान माहिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?