पराभूतांच्या इतिहासातूनच “खरा” इतिहास समजतो

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

इतिहास हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि अहोरात्र चिलखत, शिरस्त्राण घालून, भाले, बर्च्या हातात घेऊन कमरेला तलवार लाऊन उशाला ढाली घेऊन झोपणाऱ्या आणि जाज्वल्य इतिहासाबद्दल कुणीही उणा शब्द लिहिला, बोलल्यास लगेच तुगडूक तुगडूक अश्व घेऊन समोरच्याला मजबूत अश्व लावणाऱ्या सगळ्या इतिहासप्रेमी यार दोस्ताना हा लेख समर्पित…!

सध्याच्या आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, दक्षिणपूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि सौराष्ट्र एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर पसरलेले सातवाहनांचे राज्य इसविसनपूर्व २७० ते ३० च्या दरम्यान कधीतरी उदयास आले. पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत हे राज्य कार्यरत होते ज्याची राजधानी अमरावती, पैठण आणि जुन्नर येथे होती.

 

satavahan empire marathipizza

स्रोत

यादवांचे राज्य ८५० ते १२३० च्या दरम्यान महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश ह्या प्रदेशात तुंगभद्रा आणि नर्मदा यांच्या मधल्या पट्ट्यात पसरलेले होते.

देवगिरीचा किल्ला धनगर राजांनी १२०० मध्ये बांधून काढला आणि नंतर वेळोवेळी त्यात मध्ये वाढ करत त्याला अजून बेलाग आणि अवघड केला गेला.

मोहम्मद गझनवी किंवा गझनीचा मोहम्मद ( ९७१-१०३० ) भारतात १००१ साली आला आणि मग अनेक स्वाऱ्या करत त्याने अमाप संपत्ती लुटून नेली.

१३०६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी जिंकला आणि यादवांच्या साम्राज्याचा शेवट सुरु झाला.

१५२६ च्या पानिपतावर झालेल्या पहिल्या लढाईत बाबराच्या विजयाने मोगल साम्राज्याचा पाया रचला जे पुढे रडतखडत नामधारी का होईना बहादूरशहा ‘जफर’ च्या कालखंडात १८५७ पर्यंत राहिले.

 

first_battle_of_panipat_babar empire marathipizza

 

जुन्नरजवळ नाणेघाटात असलेले दगडी रांजण करवसुलीसाठी वापरले जायचे. पैठण, कारंजा, जुन्नर, अहमदनगर, अमरावती ह्या त्या काळातल्या मोठ्या बाजारपेठ होत्या. इथला व्यापार अगदी बगदाद ते चीन असा पसरलेला होता.

पुढे काय झालं? ही साम्राज्य का पतन पावली? तीन चारशे वर्ष राज्य करणारे राज्यकर्ते कसे काय हरले, का पराभूत झाले?

नेमकं काय घडलं?

तीच माती, तीच माणसं, त्याच नद्या, तोच भूगोल आणि तोच सगळा प्रदेश…! तरीसुद्धा ही गत झाली.

असं का बरं?

जेव्हा आपण आपला जाज्वल्य इतिहास म्हणून एखाद्या कालखंडाला डोक्यावर घेऊन मिरवतो तेव्हा त्याच्या आगेमागे असणारी इतिहासातली भूत पण मग पिच्छा सोडत नाहीत.

 

Sambhji Shivaji Maharaj MarathiPizza

थोरले शहाजी महाराज, जिजाऊ, शिवाजी आणि मग संभाजीराजे…ह्यांनी स्वराज्याची स्थापना केली हे जितकं सत्य आहे तितकंच – स्वराज्याची स्थापना करण्याची वेळ त्यांच्यावर आली – हेही सत्य आहे ना ?

यशाचे वाटेकरी सगळेच असतात पण अपयशाला कुणीही वाली नसतो – असं काहीसं झालंय हे.

सातवाहन आणि यादव का पडले, का पराजित झाले? तीच मराठी माती, तीच लढवय्यी माणसं आणि त्याच तलवारी ना?
जेव्हा अपयशाचा, आपल्या दारूण पराभवाचा, आपल्या गावावर फिरवल्या गेलेल्या गाढवांच्या नांगराचा इतिहास आपण समजून घेतो आणि काय चुकलं – ह्याचा आपण विचार करतो – तेव्हाच इतिहास समजतो.

मानवी स्वभाव आणि माणसाच्या मनातल्या सत्ता, संपत्ती आणि राज्य-विस्ताराच्या लालसा माणसाच्या इतिहासाइतक्याच चिरंतन आहेत. आणि ह्या लालसा जितक्या चिरंतन आहेत तितक्याच त्या लालसा, ती ध्येय गाठताना होणाऱ्या चुका, हुकलेले आडाखे चिरंतन आहेत.

जेत्यांच्या इतिहासातून फक्त जेत्यांचा उदोउदो करणारी कवनं आणि यशोगाथा वाचायला मिळतात. पराभूतांच्या इतिहासातून काय चुकलंय आणि का चुकलंय ह्याचे धडे मिळतात.

वारसा सांगताना जेत्यांचा आणि पराभूतांचा वारसा नेहमी हातात हात घालून येत असतो…! आपली गोची नेमकी इथेच होतेय.

इसवीसन १५००-१६०० सालाच्या पाठीमागे ना आपला इतिहासाचा विचार जातोय ना कुणाला पराभूतांचा इतिहास समजून घेण्याची आणि त्यानाही आपलेच वंशज म्हणण्याची ना हिंमत आहे ना दानत आहे ना इच्छाशक्ती आहे.

panipat-battle-lone-warrier-marathipizza

स्रोत

आमचा आज्जा, पणजा असा लढला आणि असा विजयी झाला ह्याचे पवाडे गाताना त्या आज्ज्याचा पणजा कसा लढून-हरून-मेला — हे मात्र कुणाला आठवत नाही आणि त्याचा वारसा सांगण्याची गरजही वाटत नाही.

चार पावलं अजून मागे गेलात तर तुटून पडलेल्या ढाली अन मोडलेल्या तलवारी जसा झुंजून पराभूत झाल्याचा इतिहास सांगतील – तसाच झालेल्या चुकांचा आणि त्याची प्राण देऊन मोजलेली किंमतही सांगतील.

इतिहास बहुतांशी कुणाला तरी नायक म्हणून समोर ठेवून लिहिला जातो, तसं झालं की त्याची पुराणकथा होऊन जाते, इतिहास असा एकरंगी पांढरा काळा नसतो तर तो अनंत रंगाच्या धाग्यांनी विणलेला असतो हे लवकर समजायला हवं आपल्याला.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?