जगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पहिला भाग इथे वाचा: My Name is Khan – पण मी मुस्लिम नाही! : चंगेज खान – भाग १

===

५०० माणसांचा तो काफीला शेवटी एकदाचा ओत्रारला पोचला. सगळे जण व्यापारी होते. अलाद्दीन मोहम्मदच्या ख्वारेझमी राज्यात व्यापार करायला आले होते. अलाद्दीन मोहम्मद ख्वारेजमियाचा शाह होता. आजच्या अफगाणिस्तान-कझाखस्तानचा हिस्सा असलेल्या ख्वारेजमियाची राजधानी होती समरकंद. ओत्रार हे त्याच्या राज्यातलं एक मुख्य शहर होतं आणि तिथला राज्यपाल होता ‘इनालचुक’.

शाहला शंका आली की ते व्यापारी नसून गुप्तहेर आहेत…शाहच्या आज्ञेनुसार इनालचुकने त्या ५०० निरुपद्रवी व्यापाऱ्यांना कैद केलं. काहीही चूक नसताना बिचारे 500 व्यापारी तुरुंगात सडत पडले! शाहला अंदाज नव्हता पण त्याने भयंकर मोठी चूक केली होती. शाहला पुढच्या सर्वनाशाचा अंदाजच नव्हता! हे सर्व ५०० व्यापारी मंगोलीयाच्या सर्वशक्तीशाली सम्राटाने मैत्रीपूर्ण संबंध बनवण्यासाठी ख्वारेजमियामध्ये पाठवले होते…हा सम्राट म्हणजे चंगेज खान!

 

changez-khan-marathipizza

आजच्या चीन आणि रशियाच्या पश्चिम-मध्यावर असणाऱ्या काराखिताई राजवटीचा सणकून पराभव केल्यानंतर चंगेजच्या राज्याच्या सीमा ख्वारेजमियाच्या अलाद्दीन मोहम्मदाच्या प्रदेशाला येऊन टेकल्या होत्या. चीनमध्ये जीन, जुरचेन राजवटिंविरुद्ध लढाईत गुंतलेल्या चंगेजला ख्वारेजमियामध्ये कसलंच स्वारस्य नव्हतं. उलट त्याला आता अलाद्दीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोडून व्यापार आणि कलेची देवाणघेवाण करण्याची इच्छा होती. पण अलाद्दीन शाह मोहम्मदाच्या बीजिंगमधल्या दूताने शाहजवळ चंगेजच्या खुंखार आणि निर्दयी स्वभावाची वर्णने करून ठेवली होती. चंगेजने जीन राजवटीची अक्षरशः दाणादाण उडवून ठेवली होती. हे ऐकून शाह सावध आणि साशंक झाला होता! व्यापारी पाठवण्याआधी चंगेजने शाहला एक पत्र देखील लिहिलं होतं:

मी सूर्योदयाच्या भूमीचा शासक आहे आणि तुम्ही सूर्यास्ताच्या भूमीचे शेहेनशाह आहात. आपण मैत्री करून एकमेकांचं हीत जपलं पाहिजे.

– असा प्रामाणिक आणि सौहार्दाचा संदेश देखील शाहची शंका दूर करू शकला नव्हता!

 

khwarezmian_empire_1190_-_1220_ad-marathipizza

 

काफीला कैद झालेला पाहून चंगेज स्वभावानुसार चिडला नाही, उलट चक्रावला. नक्कीच शाहचा काहीतरी गैरसमज झाला असावा म्हणून चंगेजने 3 दूत शाहकडे पाठवले. पैकी दोन मंगोल आणि एक मध्यआशियायी मुसलमान होता. मैत्री आणि शांतीचा संदेश घेऊन दूत शाहकडे आले. चंगेजने दूतांतर्फे व्यापाऱ्यांना सोडून द्यावे आणि ओत्रारच्या राज्यपालाला शिक्षेसाठी चंगेजच्या स्वाधीन करण्यात यावे अशा मागण्या केल्या होत्या. उत्तर म्हणून शाहने दोन्ही मंगोल दूतांचं टक्कल केलं तर मुसलमान दूताचं शीर धडावेगळं करून त्याच दूतांकरवी चंगेजकडे पाठवून दिलं! विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी!

शाहचं हे माजोरडं वर्तन पाहून चंगेज खान प्रचंड संतापला! प्रचंड म्हणजे प्रचंड!! मंगोलिया चीन आणि पूर्व आशियामधल्या भल्या भल्या तुर्रम खानांना आणि मोठ्या मोठ्या राजवटीना आडवं टाकून त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभा असणाऱ्या चंगेजला आता अलाद्दीन मोहम्मदाला धुळीत जिवंत गाडायचं होतं! समजतो कोण स्वतःला…कोण कुठला अलाद्दीन मोहम्मद…चंगेज खानशी वाकडं?!

चंगेजचं गुप्तहेर खातं अफाट होतं. शत्रूच्या ताकदीची आणि तयारीची पूर्ण माहिती असल्याशिवाय चंगेज हल्ला करायचा नाही. हेरांकरवी त्याने मोहम्मदाच्या एकूण औकातीचा अचूक अंदाज घेतला. एखादा वाघ शिकारीच्या आधी रानरेड्याच्या शक्तीचा अंदाज घेतो तसा! आणि मग निरनिराळ्या प्रांतात जाऊन लढणाऱ्या सर्व फौजांना चंगेजने एकत्र केलं! ह्यावेळी सबुताई हा चंगेजचा सरदार तर पार युरोपवर जाऊन चढला होता. घोड्यावर स्वार असणारे अत्यंत अचूक निशाणबाज धनुर्धर ही चंगेजची ओळख असली तरी चिनी राजवटिंकडून तो आणखी घातक शस्त्रांचा वापर शिकला होता…बारूद ही त्यातली एक! शिवाय 20 फुटी अग्निबाण दूरवर अचूक मारणारी यंत्रे, तटाचे दरवाजे उध्वस्त करणाऱ्या गाड्या इत्यादी.

लाखोंचं मंगोल रानटी लष्कर गोळा करून चंगेज ख्वारेजमियावर झडप घालायला निघाला! खानाचं ते नरभक्षी वादळ रोंरावत अलाद्दीन मोहम्मदाच्या रक्ताच्या वासावर निघालं!

 

changez-khan-battle-marathipizza

मंगोल आणि शाहच्या इस्लामी फौजांचा नेमका आकडा किती ह्यावर अनेक इतिहासकारांचे अंदाज वेगवेगळे असले तरी किमान चार ते पाच लाख मंगोलिअन फौज होती, शाहची फौज त्याहून कमीच होती. चंगेजने आपल्या लष्कराच्या अनेक तुकड्या बनवून ख्वारेजमियाचे चोहो बाजूनी लचके तोडायला सुरुवात केली आणि तो स्वतः एक तुकडी घेऊन ओत्रारवर चालून गेला! वेढा घालून शिकार साधणे हि पारंपरिक मंगोल नीती नव्हती पण चंगेजने ओत्रारला वेढा दिला. त्यात चिनी यंत्रणांचा आणि युद्धपारंगत लोकांची मदत घेतली. कमीत कमी नुकसान हा ह्यामगचा उद्देश.

एक मोठी तुकडी चंगेज ने केवळ आणि केवळ अलाद्दीन मोहम्मद शाहच्या मागावर पाठवली, उद्देश असा की शाह जीव मुठीत धरून स्वतःच्याच राज्यात पळत रहावा…राज्य आणि जीव तर जावाच शिवाय इज्जत देखील जावी! आणि नेमकं हेच झालं.

चंगेजचा सरदार जेबे मोहम्मदाच्या मागे लागला! त्याने मोहम्मदाला अनेक दिवस इकडून तिकडे पळवलं आणि अखेर मोहम्मद पाठीला पाय लावून पोरासकट धूम पळाला आणि भूमध्य समुद्रातल्या एका बेटावर लपून बसला. राज्य आणि इज्जत गेल्याने त्याला जबर धक्का बसला आणि त्यातच तो मेला.

इकडे चंगेजने ओत्रार काबीज केलं आणि स्वतः इनालचुकला मारलं! चंगेजच्या क्रौर्याचा आणि संतापाचा अंदाज त्याने ज्याप्रकारे इनालचुकला मारलं त्यावरून येतो. इनालचुकचे डोळे फोडून चंगेजने त्याच्या डोळ्यात आणि कानात विताळलेली तप्त चांदी ओतली…आतले सगळे अवयव विरघळवत त्या चांदीने इनालचुकच्या कवटीच्या आकार घेतला! चंगेज खानच्या अपमानाचे मुख्य गुन्हेगार मेले होते…पण ना चंगेजचा संताप संपला होता ना मंगोल फौजेचं मन भरलं होतं! चंगेजला संपूर्ण ख्वारेजमिया नेस्तनाबूत करायचा होता. ओत्रार पाठोपाठ चंगेजने खुरासान, बुखारा, उर्गेंंच इत्यादी शहरे जमीनदोस्त केली! दुसऱ्या बाजूला ख्वारेजमियाची धूळधाण उडवून चगताई आणि ओगेडाई हे खानाची मुले फौजांसाकट खानाला येऊन मिळाली आणि चंगेजने समरकंद देखील जिंकून घेतलं.

तिकडे अलाद्दीन मोहम्मदाचा मुलगा जलाल अलदिन अफगाणिस्तानात सैन्य गोळा करायला लागला. ही बातमी कळताच चंगेज स्वतः त्याच्यावर चाल करून गेला आणि जलाल अलदिनला त्याने इतका बेदम मार दिला की जलाल फौज सोडून पळत सुटला आणि हिंदुस्थानात त्याने शरण घेतली.

 

changez-khan-khwaremia-battle-marathipizza

ख्वारेजमिया ही त्या काळची एक मोठी इस्लामी रियासत होती! चंगेजने त्याची राखरांगोळी करून टाकली. शहरेच्या शहरे उध्वस्त केली. दहा लाखांच्या वर लोक मारले. काही इतिहासकारांच्या अंदाजानुसार ख्वारेजमियाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ह्या मंगोल आक्रमणात गतप्राण झाले. चंगेजने शरण आलेल्या सैनिकांना कैद केलं, शिकलेल्या तरुणांना आणि कलाकारांना मंगोलियामध्ये पाठवून दिलं. स्त्रियाना गुलाम बनवण्यात आलं तर विरोध करणाऱ्या प्रत्येकाला वय-लिंग न पाहता क्रूरपणे ठार करण्यात आलं!

फक्त एका राज्याच्या राजाने मैत्री करण्यास नकार दिला आणि अपमान केला म्हणून चंगेज खानाने त्याची राजवट मुळासकट उखडून काढली!

 

changez-khan-statue-marathipizza

स्रोत

बऱ्यापैकी मंगोल सैन्य तिथे ठेवून चंगेज मंगोलियात परतला. पण ह्या युद्धाचे मध्य-आशियायी इस्लामी इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. ख्वारेजमिया टाचेखाली आल्यानंतर चंगेजचं राज्य आता आजवर जगात राज्य केलेल्या कुठल्याही सम्राटापेक्षा मोठं होणार होतं.

पण – चंगेज खान आपल्याला आजवर सांगण्यात आला तसा फक्त एक क्रूर कर्दनकाळ युद्धखोर नव्हता. त्याच्या राजकारणाचे, स्वभावाचे अनेक पैलू होते. त्याबद्दल आणि त्याच्या मंगोल सैन्याच्या अजून काही आक्रमणांबद्दल थोडीशी माहिती पुढच्या भागात. पुढच्या भागाची लिंक :

१२ व्या शतकातील पुरोगामी, सेक्युलर सम्राट: चंगेज खान – भाग ३

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c)  InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 30 posts and counting.See all posts by suraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?