दहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


दरवर्षी दहावी बारावी चे निकाल लागले की “मार्क्स महत्वाचे नाहीत” हे सांगणाऱ्या मेसेजेसचा धबधबा सुरू होत असतो. आज जे इयत्ता नववी आणि अकरावी मध्ये आहेत – त्यांना एक आवर्जून सांगावंसं वाटतंय – “असल्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करा.”

हे सांगावंसं वाटतंय कारण बारावी नापसांना, कमी मार्क्स मिवलेल्यांना धीर देणाऱ्या पोस्ट्स वाचतोय. काय एकाहूनएक कथा आहेत लोकांच्या! आज त्यांची credentials बघितली तर त्यांना “नापास” म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. “लढ रे पठ्ठया, अजून जिंदगी बाकी आहे” असा संदेश देण्याची पात्रता कमावलेले अस्सल हिरे आहेत जगात. आपण त्यांच्या संपर्कात असणं हे आपलं भाग्यच!

पण अपयशी विद्यार्थ्यांना धीर देतानाच, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवसुद्धा करून द्यायला हवी असं वाटतं. १० वी, १२ वी ला अवाजवी महत्व आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला ही वर्षं महत्वाची आहेत हे पक्कं ठाऊक असतं. ते माहित असूनही हलगर्जीपणा केलास – हे तू चूक केलंयस — हे शांतपणे पण ठामपणे सांगायला हवं.

 

fear-student-looking-at-exam-paper
isha.sadhguru.org

इंजिनीअरिंगमधे, १२ वीच्या मार्क्समुळे campus ची कवाडं बंद होती, असे खूप मित्र कुरकुर करायचे. मी त्यांना हेच सांगायचो की त्या मार्कांचा आपल्या इंजिनीअरिंगच्या स्किलशी संबंध नसला तरी “त्या महत्वाच्या वर्षात तुमच्यात सिरियसनेस नव्हता” हे त्यावरून दिसतं. मोठ्या कम्पनीज ते बघतात. हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा, पण हीच जगाची रीत आहे.


मी मेरिट येईन अशी अपेक्षा माझ्या शिक्षकांना आणि पालकांना असताना १० वी आणि १२ वी, दोन्हीवेळा मी त्यांची घनघोर निराशा केली. इंजिनीअरिंगमधेसुद्धा अजिबात चमकलो नाही. ह्या सर्वांची फळं नातेकाईकांची कुजबुज ऐकून भोगली आहेत. इंजिनीअरिंगनंतर, काहीही झालं तरी चांगल्याच कॉलेजमधून MBA करणार हे ठरवून एक वर्ष घालवलं.

त्यावेळी “ह्याचं इंजिनीअरिंग तर झालंय, तरी हा गॅप का घेतोय?! कुछ तो गडबड है!” अश्या गप्पा “आपलं” समजलेले लोक मारत होते. माझ्या कुटुंबाला ह्या सर्वाचाच खूप त्रास झालाय.

 

frustrated-man-marathipizza01
indianhusbands.blogspot.in

पण MBA, त्यात कमावलेलं नाव, कॅम्पस रिक्रुटमेंटमधे पहिल्या कम्पनीत सिलेक्शन आणि त्या पॅकेजचा आकडा – ह्याने सर्व काही एका फटक्यात बदललं. आता ओंकार परत एकदा “चांगला मुलगा” झाला होता. केवळ शैक्षणिक अपयशांमुळे झाकले गेलेले माझे सर्व सद्गुण आता एकदम उजळून निघाले होते. सगळेजण प्रेमाने वागत होते. मी मनातल्या मनात हसत होतो.

Point is, जगाची रीत पाळावीच लागते. ती पाळली नाही किंवा त्यात कुठे कमी पडलात तर भुवया उंचावणारच, तोंडं वाकडी होणारच. ह्याची तयारी करायला हवीच – पण त्याचवेळी, जगाला शिव्या नं घालता, ही माझ्याच कर्माची फळं आहेत, हेही स्वतःला सांगायला हवं.

वेगळी वाट जरूर चालावी. पण त्या आधी नेहेमीची वाट जिंकून स्वतःला सिद्ध करून दाखवावं. त्याने आपला आणि सर्वात महत्वाचं – आपल्या कुटुंबाचा – खूप त्रास वाचतो.

बऱ्यापैकी यशस्वी किंवा स्थिरसावर झालेले लोक जेव्हा “कमी मार्क्स वाचून माझं काही अडलं नाही” असं म्हणतात तेव्हा ते ह्याच अडचणीतून मार्ग काढून मिळवलेल्या यशाची उजळणी करत असतात. अश्यावेळी त्या अडचणींकडे डोळेझाक करून चालणार नाही.

परीक्षा होऊन गेल्यावर, निकाल हातात पडल्यावर नाऊमेद होऊ नये, “आता सगळं संपलं” असं वाटू नये म्हणून असे संदेश दिले जातात. जे योग्यच नव्हे, आवश्यक सुद्धा आहेत. पण हे बघून ज्यांनी परीक्षा यायची आहे, त्यांनी रिलॅक्स होऊन चालणार नाहीये. मार्क्स कमी मिळाले तर जग संपत नसतं – फक्त जगात जगणं अतिशय अवघड होऊन बसतं. हा त्रास वाचवायचा असेल तर कंबरकसून तयारीला लागायला हवं.

successfull man02-marathipizza
iStock.com

अपयशाची कौतुकं तेव्हाच होतात जेव्हा शेवट दणदणीत यशात होतो. पण यशासाठी सुरूवातीपासूनच मेहनत घेऊ नये, असं थोडीच आहे?


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 229 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?