विश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर?! विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

विश्वाची निर्मिती आणि वय ह्या गोष्टींचे मानवाला कायमच कुतूहल वाटत आलेले आहे. मानवजीवनाच्या विविध टप्प्यांवर जगाच्या विविध संस्कृती आणि धर्मांनी ह्याबद्दल अंदाज आणि दावे केलेले आहेत ज्यात विश्वाचे वय काही हजार वर्षे ते काही कोटी वर्षे सांगितले जाते. विश्वाची निर्मिती ‘बिग बँग’ पासून झाली ह्या सिद्धांताला आधुनिक विज्ञान जगतात आता सर्वमान्यता मिळते आहे. ह्या घटनेत उत्पन्न झालेल्या लहरी (Cosmic Background radiation) अवकाशात आजही आढळतात. ह्यातून ‘बिग बँग’ होऊन अंदाजे १३.८ अब्ज वर्षे (१३६०००००००० वर्षे!) लोटली असल्याचा निरीक्षण करता येण्याजोगा पुरावा मिळतो. हेच विश्वाचे वय गृहीत धरले जाते.

 

The Big Bang MarathiPizza

ह्या प्रचंड कालखंडाच्या तुलनेत मानवी आयुष्य व मानवाचे कालगणनेचे सहजज्ञान अगदीच तोकडे असल्याने हा अवाढव्य प्रवासपट समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना विश्वाच्या आयुष्यातील टप्पे त्यातील कालसापेक्षतेसह समजून घेता यावे ह्यासाठी ‘Cosmic Calendar’ ही पद्धत वापरली जाते. प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी हि पद्धत लोकप्रिय केली. ह्यामध्ये विश्वाच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा काळ एका वर्षाच्या कॅलेंडर मध्ये मांडला जातो. म्हणजे १ जानेवारीला मध्यरात्री १२.०० वाजता ‘बिग बँग’ झाले असे गृहीत धरले आणि त्याच वर्षाचा ३१ डिसेंबर रोजी रात्री शेवटचा सेकंद आजचा काळ गृहीत धरला तर हे वर्ष जणू विश्वाचे वयच ठरेल.

ह्याप्रमाणे विश्वाच्या आयुष्यातील सर्व टप्पे ह्या कॅलेंडरवर प्रमाणानुरूप मांडले तर १३.८ अब्ज वर्षांचा इतिहास एका वर्षात व्यक्त करता येतो. ह्या प्रमाणानुसार (Scale) कॅलेंडरवरचा एक दिवस ३.७८ कोटी वर्षांइतका असेल, एका तासात १५.७५ लाख वर्षे असतील तर एका सेकंदमात्रात तब्बल ४३७.५ वर्षे लोटतील.

हे कॅलेंडर वापरून विश्वातील घडामोडी अभ्यासणे अतिशय रंजक आहे. १ जानेवारी च्या मध्यरात्री ‘बिग बँग’ झाल्यानंतर आपली आकाशगंगा अस्तित्वात येण्याला जवळपास मे महिना उजाडतो. आपली सौरमाला आणि पृथ्वीचा तब्बल ८ महिने पत्ताच नाही! ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अस्तित्वात येतात.


solar system marathipizza

पृथ्वीवरील सर्वात जुने खडक ६ सप्टेंबर रोजी अस्तित्वात आलेले दिसतात. ह्याच महिन्यात पृथ्वीवर जीवसृष्टीला सुरुवात होते. शेवटच्या म्हणजे डिसेंबर महिन्यात प्राणीजीवनाची भरभराट झालेली दिसते. ह्याच महिन्याच्या मध्याच्या शेवटी प्राणीजीवन पाण्यातून जमिनीवर येते. डायनासोर २५ डिसेंबर ला अस्तित्वात येतात आणि ३० डिसेंबर ला नष्ट होतात.

dynasore-marathipizza

जवळपास १८ कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य करणाऱ्या डायनासोरचा कालखंड विश्वाच्या आयुष्यवर्षात फक्त साडे चार दिवसांचा.  सह्याद्रीच्या पर्वतरांगा अंदाजे २७ डिसेंबर पासून अस्तित्वात आल्या तर हिमालयाचे वय इथे फक्त दीड दिवस!

Cosmic Calender

ह्या कॅलेंडर वर मानवी उत्क्रांतीचे पूर्ण प्रक्रिया केवळ शेवटच्या दिवशीच म्हणजे ३१ डिसेंबर रोजी घडते. सकाळी ६ च्या सुमारास वानरासारखा दिसणारा मानवाचा पूर्वज संध्याकाळपर्यंत दोन पायांवर चालू लागतो. रात्री १०.२४ च्या सुमारास मानवाचा पूर्वज दगडाची हत्यारे वगैरे वापरण्यास शिकतो तर आगीवर नियंत्रण तो दिवसाच्या शेवटच्या १५ मिनिटात मिळवतो. आपल्या सारखा दिसणारा आधुनिक मानव प्राणी सुमारे २ लाख वर्षांपूर्वी म्हणजे विश्वाच्या आयुष्यवर्षाच्या शेवटच्या ८ मिनिटात अस्तित्वात येतो. शिकार करून जगणारा मानव शेवटच्या ३० सेकंदात शेतीचा शोध लागून स्थिरावतो.

neanderthal-marathipizza

सुरुवातीच्या लेखनकलेचे पुरावे साधारणत: १३ सेकंद जुने आहेत. चाकाचा शोध सुमारे ११ सेकंद आधी लागलेला आढळतो. वेदांची निर्मिती ७-८ सेकंदांपूर्वी संपन्न झालेली दिसते. गौतम बुद्ध ६ सेकंदापूर्वी, येशू ५ सेकंदापूर्वी तर मुहम्मद ४ सेकंदापूर्वी होऊन गेलेले लक्षात येते. विश्वाच्या आयुष्यवर्षातील शेवटचा सेकंद गेली ४३७ वर्षे सुरु आहे. अकबराचे मुघल राज्य, शिवरायांचे हिंदवी स्वराज्य, गुरुत्वाकर्षणाचा शोध, अमेरिकेचा उदय, फ्रेंच राज्यक्रांती, वाफेच्या इंजिनाचा शोध, औद्यीगीकीकरण, वसाहतवादी विस्तार, सापेक्षतावादाचा शोध, अणुबॉम्बचा शोध आणि वापर, भारतीय स्वातंत्र्य, चांद्रमोहीम, इंटरनेट चा शोध आणि दळणवळण क्रांती असा मानवी संस्कुतीचा व वैज्ञानिक प्रगतीचा प्रचंड मोठा प्रवास विश्वाच्या आयुष्यवर्षाच्या शेवटच्या – अजून न संपलेल्या- सेकंदात होताना दिसतो.

मानवी बुद्धीला झेपेल अशा कालसापेक्षतेने विश्वाचा जीवनपट समजून घेणे रंजक व उद्बोधक आहेच परंतु ह्यामुळे विश्वाच्या रहाटगाडग्याची भव्यता आणि त्यातुलनेत मानवी जीवनाची क्षुल्लकता ह्याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

ही जाणीव मानवाला वैज्ञानिकदृष्ट्या अधिक डोळस आणि जबाबदार बनविते…!

जिज्ञासूंनी कॉस्मिक कॅलेंडर वरील हा व्हिडिओ नक्की बघावा.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *