श्रावणात व्रतवैकल्य आणि उपवास करताय? उपवासाचे हे १० पौष्टिक पदार्थ करून बघा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्म आणि भाविकांसाठी खास महिना! ह्या महिन्यात भरपूर सणवार आणि व्रतवैकल्य असतात. शिवाय अनेक लोक श्रावणात अनेक प्रकारचे उपास करतात.

पण उपास म्हटलं की जे पदार्थ खाल्ले जातात त्याने अनेक वेळा पोटाला त्रास होतो. अशा वेळी उपासाला काही अर्थ उरत नाही.

एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणत पोटाला जड असणारे पदार्थ खाल्ले जातात आणि मग पित्त होणे, पोट बिघडणे असे त्रास होऊ लागतात. उपासाचे पौष्टिक पण पचायला हलके पदार्थ खाल्ले तर त्रास होत नाही.

तर ह्या चातुर्मासात पुढील पौष्टिक पदार्थ खाऊन तुम्ही तुमचा उपवास करू शकता.


१. फराळी ढोकळा

 

farali dhokala inmarathi
whiskaffair.com

साहित्य- १ कप शिंगाड्याचे पीठ, १/४ कप भगरीचे पीठ, १/२ कप दही, १ हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३/४ टीस्पून इनो, १टीस्पून काळीमिरी पूड, मीठ चवीनुसार, लाल तिखट आवश्यकतेनुसार, १ टेबलस्पून ओलं खोबरं, तेल आवश्यकतेनुसार

कृती- एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, मिरचीचा ठेचा, दही ,बारीक चिरलेली कोथींबीर, काळीमिरी पूड ,मीठ हे सगळे जिन्नस एकत्र करा आणि १० मिनिटे मुरायला ठेवा. दहा मिनिटांनी त्यात एक टेबलस्पून तेल आणि इनो घाला आणि एकत्र करून घ्या.


ढोकळ्याच्या साच्याला थोडेसे तेल लावून त्यात हे मिश्रण घाला आणि त्यावर वरतून लाल तिखट घाला. मिश्रण मोठ्या आचेवर दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

साधारण पंधरा मिनिटांनी त्यात सुरीचे टोक बुडवून बघा. ढोकळा तयार झाला की साचा स्टीमर मधून बाहेर काढून थोड्यावेळ थंड करून घ्या. ढोकळा साच्यातून बाहेर काढून त्याच्या वड्या पाडून घ्या. त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला आणि उपवासाच्या चटणी बरोबर फराळी ढोकळ्याचा आस्वाद घ्या.

२. बटाट्याचा कीस

 

batatyacha kiss inmarathi
1.bp.blogspot.com

साहित्य- २ बटाटे किसून घेणे, १/२ कप दाण्याचे कूट , २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणे, १ टीस्पून जिरे, २ टेबलस्पून तूप, १ टीस्पून लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार..


कृती- बटाट्याची साले काढून जाडसर कीस करून घ्या. हा कीस पाच मिनिटे गार पाण्यात ठेवा. कीस कमीत कमी तीन वेळा पाण्याने धुवून घ्या जेणे करून त्यातील सगळे स्टार्च निघून जाईल. कीस नीट पिळून घ्या.

कढईत तूप गरम करून घ्या. त्यात जिरे घाला आणि जिरे तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. नंतर त्यात बटाट्याचा कीस घाला आणि त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्या. कीस अर्धवट शिजला की त्यात दाण्याचे कूट घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या.

त्यावर परत झाकण ठेवून किस चांगला शिजवून घ्या. मधून मधून मिश्रण ढवळा. कीस शिजला की त्यात चवीनुसार मीठ (साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरल्यास अधिक चांगली चव येईल) आणि लिंबाचा रस घाला आणि गरमागरम असतानाच पटापट संपवा.

३. रताळ्याची खीर

 

ratalyachi kheer inmarathi
firstcry parenting

साहित्य- १ कप रताळ्याचा कीस, २ कप दूध, ३ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून तूप, काजू व बदामाचे काप चवीनुसार, १/४ टीस्पून वेलची पूड, २-३ केशराच्या काड्या

कृती- रताळी स्वच्छ धुवून, साले काढून घेऊन किसून घ्या. कढईत तूप घ्या आणि त्यात काजू आणि बदाम तळून घ्या. त्याच तुपात रताळ्याचा कीस घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात दूध घाला आणि मंद आचेवर ठेवून एक उकळी काढून घ्या. दहा मिनिटे मंद आचेवर ठेवून मिश्रण शिजवून घ्या.

मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल. ते मधून मधून ढवळून घ्या. नंतर त्यात साखर घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या व मंद आचेवर तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या. त्यात वेलची पूड घाला आणि एकत्र करून घ्या.

रताळी शिजली की गॅस बंद करून त्यावर काजू व बदामाचे काप घालून तुमच्या आवडीनुसार गरमागरम किंवा थंड झाल्यावर रताळ्याच्या खिरीचा आनंद घ्या.

४. भगरीचे उत्तपम


 

fasting dosa inmarathi
madhurasrecipe.com

साहित्य- १ कप भगर (वरीचे तांदूळ), १ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरुन, चवीनुसार मीठ

कृती- भगर/ वरीचे तांदूळ धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा. त्यातील पाणी काढून टाका. भिजलेले वरीचे तांदूळ डोश्याच्या पिठाप्रमाणे मिक्सरमधून बारीक करून घ्या.

त्यात जिरे, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथींबीर आणि मीठ घाला व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. तवा गरम करून घ्या आणि त्यावर हे मिश्रण पसरून लहान आकाराचे उत्तपम पसरवून घ्या.

त्यावर थोडेसे तेल सोडा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर उत्तपम शिजवून घ्या. एका बाजूने उत्तपम शिजले की ते उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. उपवासाची बटाट्याची भाजी किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरमागरम उत्तपम खाऊ शकता.


५. क्रिमी टॅपिओका पर्ल्स

 

crymy tapioka purlse inmarathi
archanaskitchen.com

साहित्य- १ कप साबुदाणा, १ कप गोड दही, १ पिकलेल्या केळ्याचे काप, १ सफरचंदाचे तुकडे, १/२ कप अनारदाना पावडर, ४ टेबलस्पून मध, २ टेबलस्पून बदामाचे काप

कृती- साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून घेणे. नंतर अर्धा कप पाण्यात साबुदाणा घाला आणि पाच मिनिटे उकळून शिजवून घ्या. सगळी फळे चिरून घ्या.


शिजवलेला साबुदाणा व घट्ट गोड दही एकत्र करून घ्या. त्यात फळांचे काप आणि बदामाचे तुपावर भाजून घेतलेले काप घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात आवडीप्रमाणे मध घाला आणि उपवासाच्या डेझर्टचा आनंद घ्या.

६. शिंगाड्याचा गोड शिरा

 

fasting shira inmarathi
i.ytimg.com

साहित्य- १ कप शिंगाड्याचे पीठ, १ कप साखर, १ कप तूप, ३ कप पाणी, २ टीस्पून वेलची पूड, १/४ कप काजूचे काप

कृती- एका कढईत मध्यम आचेवर पाणी व साखर एकत्र करा आणि साखर विरघळेपर्यंतमिश्रण ढवळून घ्या. गॅसची आच मंद करा. एक जाड बुडाचे भांडे घ्या. त्यात मध्यम आचेवर १ कप तूप वितळवून घ्या आणि त्यात शिंगाड्याचे पीठ घाला.


मध्यम आचेवर शिंगाड्याचे पीठ चांगले भाजून घ्या. आता गॅसची आच मंद करून घ्या आणि त्यात वेलची पूड घाला. आता त्यात हळू हळू पाणी व साखरेचे मिश्रण घाला आणि ढवळून घ्या. मंद आचेवर मिश्रण आटवून घ्या.

दहा ते पंधरा मिनिटांनी मिश्रण घट्ट होऊ लागेल. गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवा. एका छोट्या कढईत १ टेबलस्पून तूप वितळवून घ्या. त्यात काजूचे काप घालून ते तळून घ्या. आता तूप व काजूचे काप शिंगाड्याच्या शिऱ्यात घालून मिश्रण एकत्र करून घ्या. तुमचा उपवासाचा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा तयार आहे.

७. राजगिरा पनीर पराठा

 

rajgeera paneer paratha inmarathi
tarladalal.com

साहित्य- १ कप राजगिऱ्याचे पीठ, २ बटाटे उकडून बारीक करून घेणे, १ कप पनीर किसून घेणे, २ हिरव्या मिरच्यांचा ठेचा, १ टीस्पून जिरे पावडर, कोथिंबीर बारीक चिरून घेणे, १/२ टीस्पून काळीमिरी पूड, साधे मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार


कृती- राजगिऱ्याचे पीठ, बटाटा, पनीर, हिरवी मिरचीचा ठेचा, जिरे पावडर, कोथिंबीर, काळीमिरी पूड आणि मीठ एकत्र करून गरजेपुरते पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाचे लहान लहान गोळे करून घ्या आणि पोळपाटावर पराठा लाटून घ्या.

तव्यावर तूप सोडून पराठे दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. हा उपवासाचा पराठा दही किंवा तुपाबरोबर खाऊ शकता.

८. शिंगाड्याच्या पिठाचे घावन

 

fasting ghavan inmarathi
http://3.bp.blogspot.com

साहित्य- ३/४ कप शिंगाड्याचे पीठ, १ हिरवी मिरची बारीक चिरुन, १/२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून घेणे, २ टीस्पून जिरे पूड, २ टीस्पून काळीमिरी पूड, सैंधव मीठ चवीनुसार, तूप आवश्यकतेनुसार


कृती- एका भांड्यात सगळे जिन्नस एकत्र करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि डोश्याच्या पिठासारखे पीठ भिजवून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर हे पीठ घालून घावन पसरवून घ्या. त्यावर थोडे तेल किंवा तूप घाला आणि झाकण ठेवून एक बाजू भाजून घ्या.

एक बाजू पूर्ण शिजली की घावन उलटवून दुसरी बाजू तुपावर नीट भाजून घ्या. आवडत असल्यास त्यावर थोडेसे तीळ लावा आणि दह्याच्या चटणीबरोबर गरमागरम घावन खाऊ शकता.

९. उपवासाची आलू टिक्की

 

fasting aloo tikki inmarathi
4.bp.blogspot.com

साहित्य- ४ बटाटे, १ टीस्पून लाल तिखट, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून जिरे, २ टेबलस्पून साबुदाण्याचे पीठ किंवा आरारूट पावडर, कोथिंबीर बारीक चिरून, १ टीस्पून लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, २-३ टेबलस्पून तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कृती- प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्या. आणि उकडून घेतल्यावर बटाटे किसून घ्या. त्यात तेल सोडून इतर सगळे जिन्नस घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून घ्या. आणि त्यांना टिक्कीचा गोल आकार द्या.

ह्या टिक्की झाकून एक तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्राय पॅनमध्ये एका वेळी तीन चार टिक्क्या घ्या आणि त्या तेलावर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्या.

खोबरं -शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याच्या चटणीबरोबर टिक्कीचा आस्वाद घ्या. ह्याच टिक्की रताळी किंवा कच्ची केळी वापरून सुद्धा बनवू शकता.

१०. क्रिस्पी आलू फ्राय

 

cryspy aloo fry inmarathi
bharatzkitchen.com

साहित्य- २ बटाटे, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून जिरे पावडर, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल

कृती- बटाटे धुवून त्यांची साले काढून घ्या. कुकरमध्ये बटाटे अर्धवट शिजवून घ्या. बटाटे थोडे गार झाले की ते चिरुन घ्या. कढईत तेल गरम करा आणि त्यात बटाटे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा. टिश्यू पेपर वर बटाटे काढून घ्या. त्यावर लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घाला. आणि गरमागरम क्रिस्पी आलू फ्रायचा आनंद घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?