' “लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील” – InMarathi

“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोदी सरकारच्या ३ वर्षांहुन अधिक काळात अनेकांच्या मनात ही भावना बळावली आहे की मोदींनी निवडणूक प्रचारामध्ये जी काही आश्वासने दिली होती, ती आश्वासने केवळ आश्वासनेच राहिली. प्रत्यक्षात काहीच अवतरलं नाही. एकीकडे अशी भावना बळावते आहे, दुसरीकडे आपली लोकशाही संकटात आहे असं ही अनेकांना वाटत आहे. तिसरीकडे, विरोधी पक्षाकडून काही ठोस पर्याय ही सापडत नाहीये. जनता कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर, Rediff.com चे पत्रकार सैयद फिरदौस अश्रफ यांनी प्रसिद्ध राजकीय तज्ञ सुहास पळशीकर यांची घेतलेली मुलाखत वाचायला हवी. मोदी सरकाच्या ३ वर्षांच्या कालावधीपूर्ती निमित्त घेतलेल्या या मुलाखतीत सुहास पळशीकर यांनी मोदींच्या ३ वर्षांच्या कारकिर्दीवर आपले परखड मत मांडले होते. त्या मूळ इंग्रजी मुलाखतीचा काही भाग मराठी पिझ्झाच्या वाचकांसमोर मांडत आहोत. संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

१) जर विरोधी पक्ष कमकुवत असेल तर त्या देशाची लोकशाही कोणत्या स्थितीत आहे असे तुम्हाला वाटते?

 

opposition-marathipizza01
cloudfront.net

विरोधी पक्ष जर निष्क्रिय असेल तर ती लोकशाहीसाठी खरंच धोक्याची घंटा आहे. लोकशाहीमध्ये खंबीर विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे, जो सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक धोरणावर चर्चा घडवून आणून त्यातून सत्ताधारी पक्ष नेमके काय मिळवू पाहतो आहे आणि जनतेला काय देवू पाहतो आहे ते समोर आणतो. पण खेदाची गोष्ट म्हणजे सध्या भारतात सरकार विरोधात टिकेल असा कोणताही विरोधी पक्ष नाही.

 

२) येणाऱ्या काळात भारताचे ‘तुर्कस्तान’ होईल असे तुम्हाला वाटते का, जेथे सध्या विरोधी पक्षाला किंवा सरकार विरोधी उठवल्या जाणाऱ्या कोणत्याही आवाजाला काहीच किंमत दिली जात नाही?

 

turkey-india-marathipizza
alternet.org

भारत आणि तुर्कस्तानची अशी तुलना होऊच शकत नाही. कारण दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे. गेल्या ७ दशकामध्ये भारतीय लोकशाहीने अनेक उलथापालथ अनुभवली आहे, पण आजही आपली लोकशाही पाय रोवून टिकून आहे. त्यामुळे भारताचा तुर्कस्तान होणे कठीण आहे.

 

३) विद्यमान नरेंद्र मोदी सरकारमध्ये आणि पूर्वीच्या इंदिरा गांधी सरकारमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?

 

indira-gandhi-narendra-modi-marathipizza
india.com

इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानाचा आधार घेऊन स्वत:च्या अधिकारांचा मनासारखा वापर केला. पण सध्या मोदी सरकारला तसे करण्याची गरज नाही. त्यांनी सत्त्तेवर इतके वर्चस्व प्रस्थापित केले आहे की भारतीय संविधानाचा आधार न घेता देखील ते स्वत:च्या मर्जीने हवे ते निर्णय ते लोकांवर लादू शकतात. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून जे साध्य करण्याचा प्रयत्न केला होता ते आजचं मोदी सरकार जास्त कष्ट न घेता केवळ भावनिक राजकारण करून साध्य करू शकतं. इंदिरा गांधी या थेट स्वत:चे निणर्य जाहीर करून मोकळ्या होत, पण विद्यमान मोदी सरकार मात्र राष्ट्रभक्ती, देशहित यांसारख्या बाबींचा खुबीने वापर करून त्या आडून मनाजोगते राज्यकारभार करीत आहेत.

 

४) काश्मिरातील परिस्थिती आणि माओवादी आतंकवाद अधिक बिकट होत असताना भारतीय जनता लोकशाही मार्गाने राग व्यक्त का करत नाहीये? जनता मोदींवर इतका विश्वास का ठेवते?

 

Maoist-and-stone-pelters-marathipizza
india.com

खरं सांगायचं तर मोदींनी जनतेच्या मनात हे बिंबवलय की “मी काहीतरी वेगळं, काहीतरी अचाट, आजवर कोणत्याही सरकारला करता आलं नाही असं काहीतरी करणार आहे.” हा जो लोकांच्या मनात विश्वास आहे तो ३ वर्षे उलटून गेल्यानंतर अजूनही अबाधित आहे आणि हाच मोदींचा एक नेता म्हणून आणि पंतप्रधान म्हणून विजय आहे. लोकांना कळतंय की सरकार तोंडघशी पडतंय, पण त्यांचा संपूर्ण सरकारवर नाही तर एकट्या नरेंद्र मोदी या नावावर विश्वास आहे, त्यांना आशा आहे की हा मनुष्य स्वत: काहीतरी करू शकतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे त्याच प्रतीक्षेत आहेत.

 

५) तुम्हाला काय वाटतं, अजून किती काळ ही जनता मोदींवर विश्वास ठेवेल? आपली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल लोक  मोदींना कधी प्रश्न विचारण्यास सुरुवात करतील?

 

modi-marathipizza
pbs.twimg.com

हे आता लगेच घडणार नसलं तरी येणाऱ्या काळात नक्क्कीच घडेल. जोवर जनतेचा मोदींवर विश्वास आहे तोवर तरी त्यांना कोणीही प्रश्न करणार नाही. पण समस्या ही आहे की जेवढा काळ लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील, तेवढी अधिक त्यांची निराशा होणार आहे आणि एकदा का विश्वासाच्या जागी निराशेने पकड बसवली की तो काळ मोदींसाठी कठीण असेल.

 

६) मोदी समर्थकांमध्ये असा एक विश्वास निर्माण झालाय की, भारतात हिंदूंचे स्थान दुय्यम झाले आहे आणि हिंदुस्तानातील हिंदूंचे वर्चस्व कायम राखण्यासाठी मोदी गरजेचे आहेत. याबद्दल तुमचे काय मत आहे?

 

muslim-marathipizza
indianexpress.com

भाजपाला ज्यांनी मत दिले तो गट आणि भाजपा समर्थक यांच्यामध्ये असा विश्वास रुजलाय हे खरे आहे. पण मला वाटतं की हा एक गैरसमज आहे. हिंदूंवर अन्याय होतोय असं मला वाटत नाही. कारण आपल्या संविधानामध्ये प्रत्येक धर्म समान आहे असे म्हटले आहे आणि त्यानुसारच प्रत्येक धर्म भारतात सामावलेला आहे. पण ९० च्या दशकानंतर भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनात हा समज निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे की, भारतात हिंदुंवर अन्याय होतोय, त्यांना मागे टाकलं जातंय. भाजपाने खेळलेली ही एक राजकीय खेळी आहे आणि ह्याच खेळीवर येणाऱ्या काळातील त्यांचं राजकारण अवलंबून असणार आहे हे नक्की!

 

७) भारतातील विरोधी पक्ष मोदींना पर्याय उभा करण्यात अयशस्वी का ठरत असावेत?

 

opposition-marathipizza02
indianexpress.com

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते सर्व संघटीत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा त्यांना उत्तम राज्यकारभार करता येत नाही आणि तिसरं कारण म्हणजे ते अजूनही १९९० च्या भाषेत अडकले आहेत. मोदी त्या पलीकडे जाऊन भाष्य करताना दिसत आहेत.

त्यांच्या बोलण्यात हिंदुत्व आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी एकत्र दिसून येतात आणि विरोधी पक्षाने मात्र अजूनही मोदींची ही खेळी गांभीर्याने घेतेलेली नाही. त्यामुळे मोदींच्या विचारसरणीला पुरून उरेल असा एकही राजकीय पक्ष मला भारतात दिसत नाही.

 

८) भाजप आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे नेहमी “इलेक्शन मोड” मध्ये असतात असे तुम्हाला वाटत नाही का?

 

modi-marathipizza01
newsmobile.in

एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष या नात्याने अमित शहा नेहमी इलेक्शन मोड मध्ये असणे गैर आहे असे नाही. आपल्याकडे वर्षभर कोठे न कोठे निवडणुका सुरु असतात, त्यामुळे त्याच दृष्टीने विचार करणे त्यांची सवय देखील बनून जाते. पण दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी देखील इलेक्शन मोड मध्ये असणे मला बरोबर वाटत नाही. कारण एका देशाचा पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षा पेक्षा देशाला जास्त महत्त्व देणे अपेक्षित आहे.

 

९) जर राहुल गांधी कॉंग्रेस पासून दूर झाले तर कॉंग्रेसचे पुन्हा नवनिर्माण होऊ शकते का?

 

rahul-gandhi-marathipizza
indianexpress.com

एकट्या राहुल गांधींना हटवलं तर काँग्रेसची समस्या सुटेल हे अगदीच सरळीकरण झालं. राहुल गांधी ही कॉंग्रेसची समस्या नाही आहे. कॉंग्रेसची समस्या त्याहून खूप मोठी आहे. काँग्रेसची तळागाळात पक्ष बांधणीच राहिली नाहीये. राहुल गांधींना बाजूला केल्याने ती समस्या सुटणार नाही.

 

१०) आज ६० टक्के भारतावर भाजपाचं वर्चस्व आहे. केंद्रात देखील ते मजबूत स्थितीत आहेत. भविष्यात मोदी हुकुमशहा म्हणून उदयास येतील असं वाटतं का?

 

modi_media-marathipizza
governancenow.com

मी आधीपासूनच हे म्हणत आलोय की हा हुकुमशाहीचा प्रश्न नाहीये. भारतातील राजकीय स्थिती अशी आहे की मोदीच काय त्यांच्या जागी दुसरा कोणीही मनुष्य असेल आणि तो कितीही प्रभावी असेल तरी त्याला नेहमी झगडावेच लागणार. त्याच्यावर नेहमी टीका होत राहणार. अश्या परिस्थितीत मोदी हे हुकुमशहा होतील ही शक्यता अतिशय धूसर आहे. हुकुमशहा होण्यासाठी संपूर्ण देशातील परिस्थिती तुमच्या नियंत्रणात हवी, पण भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात अशी एकहाती सत्ता गाजवणे ते ही ह्या काळात अतिशय कठीण आहे. त्याउलट भविष्यात भारतीय लोकशाही कमकुवत होईल आणि सत्ताधारी प्रबळ होतील ही शक्यता नाकारता येत नाही.

पण त्याला ‘हुकुमशाही’ म्हणता येणार नाही. कानन चंद्रा ह्यांनी नुकतीच त्यासाठी एक संज्ञा वापरली आहे – Democratic Authoritarianism – हुकूमशाहीवादी लोकशाही.

आपण कदाचित त्या दिशेने जाऊ. जिथे लोकशाही तत्व क्षीण होऊन हुकूमशाही अंग बळावलेले असतील.

संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?