लै भारी! या शेतकऱ्याच्या मुलाची दृष्टी गेली, तरीही यूपीएससी मध्ये उत्तुंग यश मिळवणारा गडी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात राहणारा सत्तावीस वर्षीय सतेंदर सिंग हा एक सर्वसामान्य घरातला तरुण असून त्याने भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी म्हणजेच युनियन सर्व्हिस कमिशन परीक्षेत यश मिळवले आहे.

संपूर्ण भारतातून त्याचा ७१४वा क्रमांक आहे. पीएचडी करत असलेला सतेंदर हा बघू शकत नाही. तो लहान असतानाच चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याची दृष्टी गेली.

तरीही त्याने खूप कष्ट आणि संघर्ष करून हे यश मिळवले आहे. सतेंदरने सांगितले की,

“मी दीड वर्षांचा असताना मला न्यूमोनिया झाला होता. माझ्या आईवडिलांनी मला एका डॉक्टरकडे नेले. पण त्या लोकल हॉस्पिटलमध्ये मला दुर्दैवाने चुकीचे इंजेक्शन दिले गेले ज्यामुळे माझ्या रेटिनल आणि ऑप्टिकल नर्व्हवर गंभीर परिणाम होऊन त्या निकामी झाल्या व माझी दृष्टी गेली. ”

लहानपणापासूनच तो स्वस्थ बसून राहणारा मुलगा कधीच नव्हता.त्यात दृष्टी गेल्याने अपंगत्व आल्याने त्याची चिडचिड होत असे, तो अस्वस्थ राहत असे.त्यामुळे शेजारी पाजारी राहणाऱ्या मुलांशी कायम त्याचे लहानसहान कारणांवरून भांडण होत असे.

सतेंदरचे आईवडील हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्यामुळे त्याची एनर्जी योग्य ठिकाणी घालवायचा त्यांना उपाय माहित नव्हता तसेच त्यांना मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते.

 

Satender-inmarathi
thebetterindia.com

लहान असताना तो एका ठिकाणी बसून त्याच्या मित्रांना शाळेत जे इंग्लिश आणि गणित शिकवले जायचे ते पाठ करत बसत असे.

“मी दिव्यांग असून देखील मी त्यांच्यापेक्षा जास्त लवकर शिकू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो हे मला सिद्ध करून दाखवायचे होते” असे सतेंदर म्हणतो.

सतेंदरची शिकण्याची इच्छा आणि त्याची क्षमता बघून त्याच्या काकांनी म्हणजेच जनम सिंग ह्यांनी त्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले.

त्याचे काका त्यावेळी दिल्लीत काम करत असल्यामुळे दिल्लीतच राहत होते आणि एक दिवस त्यांना दृष्टिहीन मुलांसाठी असलेल्या किंग्सवे कॅम्प भागात असलेल्या गव्हर्मेंट सिनियर सेकंडरी स्कुल बद्दल कळले. सतेंदरचे शिक्षण तिथे व्हावे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

त्याबद्दल सांगताना सतेंदर म्हणतो की,

“मला आठवतं, त्या शाळेत जायला लागल्यानंतर सुरुवातीला गणितासाठी टेलर्स फ्रेम्सवर मी प्रॅक्टिस करायचो. टेलर्स फ्रेमवर विविध आकडे शिकता येतात. तसेच त्या ठिकाणीच पहिल्यांदा मला ब्रेललिपी बद्दल कळले.”

पण हा सगळ्याचा सतेंदरवर खूप ताण येत होता. नवी शाळा,नवी जागा, नवे शिक्षण ह्या सगळ्यामुळे तो गोंधळून गेला होता. त्याला त्याच्या घरी परत जावेसे वाटत होते.पण सुदैवाने लवकरच त्याने ह्या सगळ्यात नैपुण्य मिळवले व त्याला शिक्षणात रस वाटू लागला.

केवळ दहाच वर्षांत त्याने २००९ साली सिनियर सेकंडरीचे शिक्षण पूर्ण केले. त्याने बोर्डाच्या परीक्षेत अगदी घवघवीत यश मिळवले. आणि नंतर बीए करण्यासाठी दिल्लीतीलच प्रसिद्ध सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

 

satendar Inmarathi

पण तिथे त्याच्यापुढे एक मोठी समस्या होती की त्याचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे तो इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलू शकत नव्हता आणि शिक्षण सुद्धा इंग्रजी माध्यमातूनच असल्याने ते समजून घेणे त्याला जड जात होते.

त्याचे ह्या आधीचे सर्व शिक्षण हिंदी माध्यमातून झालेले असल्याने त्याला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण जात होते.

त्यामुळे पहिले काही आठवडे त्याला कॉलेज म्हणजे एक अतिशय वेगळीच जागा भासत होती. त्याच्यासाठी हा अनुभव आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. तो म्हणतो की,

“तिथे सर्वच लोक अश्या भाषेत बोलत होते जी मला कळत तर होती पण मला त्या भाषेत बोलणे आणि इतरांचे समजून घेणे कठीण जात होते. लोक विविध ऍक्सेंटमध्ये बोलत होते आणि ते समजून घेणे मला जड जात होते.

मला त्यांच्यापैकीच एक व्हायचे होते पण माझ्यात तेवढा आत्मविश्वास नव्हता. ह्या नवीन जागेला मी घाबरलो होतो.

मला तर असे वाटत होते की आता हे पुढे सुरु ठेवण्यात काही अर्थ नाही.माझ्या काही मित्रांनी मला हा कोर्स सोडून दुसऱ्या एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेण्याचा सल्ला दिला.पण मी खूप विचार केला. आणि प्रयत्नपूर्वक सगळे शिकून घेण्याचे ठरवले.

माझ्या निर्णयावर मी ठाम राहिलो आणि सगळ्याला तोंड देत शिकण्याचे ठरवले. ह्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाचा खूप चांगला विकास झाला. मी निर्णय बदलला नाही ह्याचा मला फायदाच झाला.”

 

rajendra singh inmarathi
www.inmarathi.com

त्याने शिकण्याची जिद्द दाखवली तेव्हा त्याच्या सर्व शिक्षकांनी व मित्रांनी त्याला मदतच केली. शिवकुमार मेनन सारख्या शिक्षकांनी त्याला चांगले मार्गदर्शन केले. त्याला कुठलीही विचित्र वागणूक न देता कॉलेजने, शिक्षकांनी व वर्गमित्रांनी त्याला पूर्णपणे स्वीकारून त्याच्या शिक्षणात मदत केली.

एकाच वर्षात त्याने स्वतःच अभ्यास व सराव करून इंग्लिशवर चांगले प्रभुत्व मिळवले. ह्यासाठी त्याला त्याच्या शिक्षक व मित्रांनी सुद्धा सहकार्य केले.

त्यावेळचे त्यांचे प्राचार्य डॉक्टर वल्सन थांपु ह्यांनी विद्यार्थ्यांसाठी रोजचे सकाळचे असेम्ब्ली भाषण, अतिरिक्त अभ्यासक्रम-नियोजन मंच, इन्फॉर्मल डिस्कशन गृप, डिबेटिंग सोसायटी आणि गांधी स्टडी सर्कल हे सगळे आयोजित केले.

कॉलेजने त्याला द हिंदू, फ्रंटलाईन, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली हे सगळे नियमित वाचनासाठी उपलब्ध करून दिले. “सेंट स्टीफन कॉलेजमध्ये असताना माझ्या व्यक्तिमत्वात खूप सुधारणा झाली. त्यासाठी त्या सर्वांचे मी कसे आभार मानू हे मला कळत नाही.

कॉलेजमुळे मला एक्सट्रा करिक्युलर गोष्टी करायचा अनुभव सुद्धा मिळाला. माझे सगळे शिक्षक इतके प्रेमळ आणि समजून घेणारे होते, दयाळू होते.असे शिक्षक लाभले म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो”, असे सतेंदर म्हणतो.

सेंट स्टीफन्समधून पदवीधर झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याने मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स ह्या कोर्सला प्रवेश घेतला.

जिथे सेंट स्टीफन्समध्ये त्याला इतका चांगला अनुभव आला, तिथे JNU मध्ये मात्र ह्यापेक्षा अगदी वेगळा अनुभव आला असे तो म्हणतो.

 

jnu inmarathi
www.jnu.ac.in

“तिथे रिक्षावाल्याच्या मुलापासून तर श्रीमंत घरातल्या मुलांपर्यंत सगळेच एकत्र बसून भारतीय लोकशाहीविषयी चर्चा करीत असत. आपापली मते मांडत असत. विविध प्रकारची पार्श्वभूमी आणि विचारसरणी असलेली माणसे एकत्र येऊन समाजातील विविध समस्यांवर आपापल्या दृष्टीकोनांतून उपाय सुचवत असत.

ह्यातून विविध लोकांनी सुचवलेले विविध उपाय आम्हाला कळत असत. कधी कधी एकमेकांचे विचार न पटल्यामुळे आमचे वादविवाद सुद्धा होत असत.

जरी एकमेकांचे विचार आणि दृष्टिकोन पटले नाहीत तरी एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहणे आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे हे मी JNU मध्ये असताना शिकलो.”

सतेंदरने शिक्षण कसं घेतलं असेल? दहावीपर्यंत तो ब्रेल लिपी वापरून अभ्यास करत असे. त्यानंतर त्याचे स्थानिक पालक हरीश कुमार गुलाटी ह्यांनी त्याला कंप्यूटर विकत घेण्यासाठी साहाय्य केले.

त्या कम्प्युटरवर तो इ-बुक्स वाचत असे आणि त्याच्या अभ्यासाच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स परत परत ऐकत असे. त्याने स्क्रीन रिडींग सॉफ्टवेअर घेतले जे स्क्रीनवर जे असेल ते वाचून दाखवते. त्या सॉफ्टवेअरची सतेंदरला अभ्यासासाठी खूप मदत झाली.

तो त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या पीडीएफ डाउनलोड करत असे किंवा इ-बुक डाउनलोड करत असे आणि स्क्रीन रिडींग सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास करत असे.

रोजचे इ पेपर स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकत असे. अश्या प्रकारे त्याने आपला अभ्यास करण्याचा मार्ग शोधला होता. कधी कधी तो पेन ड्राईव्हवर रेकॉर्ड केलेली पुस्तके किंवा लेसन्स पुन्हा पुन्हा ऐकून अभ्यास करत असे.

“तुम्हाला दिलेले काम पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग असतात. जेव्हा तुमच्यापुढे एखादा अडथळा येतो तेव्हा तुम्ही तुमचे काम करण्यासाठी अनेक दुसरे मार्ग शोधून काढू शकता. तुम्हाला असे वाटले की आता सगळे संपले आणि आपण पुढे जाऊच शकणार नाही असे वाटेल तेव्हा दुसरा मार्ग शोधा,पण थांबू नका.” असे सतेंदर म्हणतो.

 

upsc inmarathi

त्याने एमए पूर्ण केल्यानंतर JNU मध्येच एम फील साठी प्रवेश घेतला. एम फीलचा अभ्यास करतानाच त्याने दिल्लीतील श्री अरबिंदो कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. तसेच सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांसाठी सुद्धा तयारी सुरु केली.

त्याने २०१६ साली पहिल्यांदा परीक्षा दिली होती पण तेव्हा त्याला मनासारखे यश गवसले नव्हते. त्याने २०१७ साली आणखी अभ्यास करून परीक्षा दिली.

पण तेव्हा नेमके त्याच्या पोटाला इन्फेक्शन झाले त्यामुळे त्याला इतका अशक्तपणा आला की तो हवा तसा अभ्यास करू शकला नाही. पण त्याने एमफील मात्र पूर्ण केले आणि JNU मध्येच पीएचडी सुद्धा सुरु केले.

ह्या काळात त्याच्या जवळच्या मैत्रिणीने(गर्लफ्रेंड) त्याला खूप मदत केली. त्याच्या सर्व प्रयत्नांत त्याला साथ दिली. ती सुद्धा शिक्षिका आहे. पण हे दोघेही तिचे नाव इतक्यात उघड करू इच्छित नाहीत. तिने त्याच्या खाण्यापिण्याची, आरोग्याची आणि अभ्यासाची संपूर्ण काळजी घेतली.

त्याचे मनस्वास्थ्य चांगले राहील ह्यासाठी तिने पूर्ण प्रयत्न केले. त्याच्या त्या मैत्रिणीची काळजी आणि सतेंदरचे कष्ट फळाला आले आणि त्याला मनाजोगते यश मिळाले.

सतेंदर म्हणतो की हे त्याने त्याच्या आईवडिलांसाठी केले. त्या दोघांनीही आयुष्यभर खूप कष्ट केलेत. त्यामुळे इतके तर मी त्यांच्यासाठी करूच शकतो असे त्याचे म्हणणे आहे.

त्यांना माझ्याविषयी अभिमान वाटतो हे बघून मला माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.

तो म्हणतो की, “मी दिव्यांग आहे म्हणजे मी कुठेतरी अपूर्ण आहे असे लोकांना वाटते. त्यांच्या मनात माझ्याविषयी दयाभाव असतो. पण मला सगळ्यांना हे दाखवून द्यायचे आहे की मी कुठेही अपूर्ण नाही. माझ्यात शारीरिक कमतरता असली ती कमतरता माझ्या कामात आड येत नाही.

स्टीफन हॉकिंग ह्यांचे उदाहरण बघा. त्यांनी सगळ्यावर मात करून आपले कार्य सुरूच ठेवले. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझी निवड झाली आहे.

आता ह्यात माझ्यापुढे कुठली आव्हाने आहेत हे काही काळात मला कळेलच. पण त्यावरही मात करून मला समाजासाठी आणि माझ्या देशासाठी काम करायचे आहे. ” असे सतेंदर म्हणतो.

सतेंदरसारखे लढाऊ वृत्तीचे लोक कुठल्याही परिस्थितीत हार न मानता आपले काम करीत राहतात आणि यश संपादन करतात. आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. सतेंदरच्या जिद्दीला आणि कष्टांना सलाम व त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “लै भारी! या शेतकऱ्याच्या मुलाची दृष्टी गेली, तरीही यूपीएससी मध्ये उत्तुंग यश मिळवणारा गडी…

  • October 3, 2019 at 10:37 am
    Permalink

    खूप प्रोत्साहन देणारा!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?