' “विद्यार्थ्यांनी कशाला पडावं राजकारणात?”- हा विचार करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी…! – InMarathi

“विद्यार्थ्यांनी कशाला पडावं राजकारणात?”- हा विचार करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: चिन्मय भावे

===

“अभ्यासाच्या वयात कशाला हवं आहे राजकारण? असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर, “उद्याच्या समर्थ राजकारणाचा पाया विद्यार्थी राजकारणात आहे” असा दुसरा मतप्रवाह आहे. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर विचारांना खुलं आकाश मिळणं आहे त्यामुळे विद्यार्थी राजकारणात असण्याचं स्वागत केलं पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे.

माझं या बाबतीत थोडं वेगळं मत आहे. ते डाव्या उजव्या मधल्या कोणालाही पटणार नाही तरीही मांडतो…

१) राजकारण पार्टी शिवाय असू शकतं याचा आपण विचार केला आहे का? पार्टी नसलेल्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी विशिष्ट विचारधारेच्या चौकटीने बांधले गेलेले नसतात. गोष्टींकडे वस्तुनिष्ठपणे पाहू शकतात. स्वतंत्र विचार करू शकतात, नवे विचार मांडू शकतात.

 

 student and politics inmarathi
Ihe Indian Express

 

२) लाला लजपतराय आणि अमेरिकेतील स्थानिक चळवळीतील अनेक नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पीएचडी काळाच्या दरम्यान राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी निश्चयपूर्वक पण नम्रपणे नकार कळवत त्यांना सांगितले,

“बडोदा नरेशांनी मला अपरिमित साहाय्य केलं आहे, त्यांना दिलेलं वचन न मोडता आपला अभ्यास पुरा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे” (डॉ बाबासाहेब आंबेडकर – चरित्र – धनंजय कीर – विद्येसाठी खडतर तपश्चर्या – पृष्ठ ३८)

 

Dr_Babasaheb_Ambedkar_reading_a_book inmarathi
wikipedia

 

आता आदरणीय बाबासाहेबांना पुस्तकी अभ्यासू कोण म्हणेल? त्यांनी लिहिलेले विविध प्रबंध अगदी जहाल राजकीय आहेत. इतके की ते प्रकाशित करताना ब्रिटिश विद्यापीठांनी हात आखडता घेतला.

आजही त्यांनी केलेलं संशोधन citations मध्ये आहे. वस्तुनिष्ठ राजकीय सजगता असणे गरजेचे आहेच. विद्यार्थी पुस्तकी कीडा असू नये म्हणून त्याला एखाद्या राजकीय पार्टीच्या दावणीला बांधलं पाहिजे असं नाही.

३) स्वतंत्र विचारांना, वस्तुनिष्ठ दृष्टीला पार्टीची चौकट मारक आहे. अभाविपची आंदोलने ही उजव्या विचाराच्या चौकटीतच काही अपवाद वगळले तर फिरत असतात. डाव्या संघटनांचेही तेच.  मग विद्यार्थी म्हणून काम/ संशोधन करताना तीच पार्टीची चौकट डोक्यावर बसते.

आत्ता जामियाची मुले अनेकांना सेक्युलर मूल्याला समर्थन देणारी वाटत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी इस्राएलचे कोणीही कॅम्पस वर नको असलं अति माठ आंदोलन केलं आणि प्रशासनाने त्याला मान्यताही दिली.

 

jamia protest inmarathi
Hindustan times

 

“द वायर” च्या एका मुस्लिम महिला पत्रकाराने दुर्गापूजा आणि होळी वर ट्विट केल्याबद्दल याच जामियातून टीका, हल्ले वगैरे झालेले आहेत. अभाविप चे कार्यकर्तेही अनेकदा धार्मिक भावना दुखावल्या वगैरे मुद्दे घेऊन आंदोलने वगैरे करतात. युवा काँग्रेस वाले गांधीजींचा अपमान झाला म्हणून भडकतात.

डाव्या विद्यार्थ्यांना सगळी सांस्कृतिक/ आर्थिक धोरणे मार्क्सच्या पोथीवादातून तपासायची असतात. या किंवा कोणत्याही पार्टीच्या चौकटीत बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी निपजणे शक्य आहे का?

 

student protest inmarathi
scroll.in

 

४) राजकीय पार्टीची चौकट आणि आंदोलनांच्या पलीकडे जाऊन राजकारण शक्य आहे. राजकारण सत्तेसाठी असते. सत्ता हे चांगल्या गोष्टी करण्याचे साधन आहे. आयआयटीत निवडणूक होते. प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जातात. ते कोणत्या पार्टीचे असतात असं नाही. पण निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असतात.

कोट्यवधी रुपयांचे बजेट ते मूड इंडिगो सारखे महोत्सव आयोजित करताना नियोजित करतात. खासगी प्रयोजकांकडून त्यांना निधी आणण्याचे कसब दाखवावे लागते. शैक्षणिक धोरणात मुलांना अडचण येत असेल तर मुलांना आवश्यक बदल, व्यवस्था करणे.. त्यासाठी विभाग प्रमुख, डीन यांच्याशी मीटिंग करणे त्यांना शक्य असते.

 

student union inmarathi

 

हॉस्टेल व्यवस्था कशी असावी, जेवण नीट मिळावे.. कंत्राटदार योग्य ते जेवण पुरवत नसेल तर त्याला काढून टाकणे असे अनेक निर्णय हे विद्यार्थी प्रतिनिधी घेतात. नियमांचा अभ्यास करून त्यासाठी काळजी घेतात. विविध सण समारंभांना विविध समाजाच्या, विविध प्रदेशातील मुलांना घरी मिळते तसे जेवण मिळावे याची काळजी ते घेतात.

हा प्रशासनाचा आणि गोष्टी घडवण्याचा अनुभव आहे आणि राजकारणाचा पाया म्हणून आंदोलन करण्याच्या अनुभवापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं.

५) भारतीय विद्यापीठांना संशोधनाच्या बाबतीत अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. जितके पेपर आपण प्रकाशित करू, जितके उत्कृष्ट प्रबंध आपली मुले प्रकाशित करतील तितकं आपल्या विद्यापीठांचं वजन वाढेल. समाजाला आवश्यक असं संशोधन आपण जगासमोर आणू.

अनेक भारतीय विषयांवर सध्या भारतापेक्षा जास्त सकस संशोधन परदेशातील विद्यापीठात होते ही काही सन्मान वाटावा अशी गोष्ट नाही. अशावेळेला पूर्णवेळ संशोधन शिष्यवृत्ती घेणाऱ्या मुलांना इतर गोष्टी करायला वेळ आणि रिसोर्स कुठून मिळतात? कोणाच्याही राजकीय आकांक्षांचा मी आदर करतो. पण मग तुम्ही पार्ट टाइम विद्यार्थी म्हणून नोंदणी करा.

 

दुप्पट फी भरा आणि शिष्यवृत्ती घेऊ नका. आपल्या सोयीने राजकारण आणि अभ्यास सांभाळत आरामात डिग्री पूर्ण करा. ही अपेक्षा जर तुम्हाला अन्याय वाटत असेल तर पुढील गोष्टीचा विचार करा…

भारतात नोकरी करून स्व-कमाईने अभ्यास करणे याला आदर आहे, पण पूर्ण वेळ केंद्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी नोकरी करू शकत नाही. फ्रीलान्स काम करू शकत नाही (लपूनछपून करणे वेगळे) मी जेव्हा केंद्रीय विद्यावेतन घेऊन शिकलो तेव्हा दोन वर्षे माझा व्यवसाय पूर्णतः बंद केला. लग्न झालेला विद्यार्थी म्हणून तो काळ माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी फारच कठीण होता..

तशात आमचं खासगी राहतं घर दोन वर्षे उशीरा मिळालं. म्हणजे नोकरी नाही. अभ्यास सुरु… गृहकर्ज आणि घरभाडे असं सगळं काही काळ एकत्र. आजही मी जर पूर्णवेळ पीएचडी उमेदवार झालो तर मला तुटपुंजे ३०-३२ हजार विद्यावेतन मिळेल. कुटुंबासोबत राहता येईल असे घर मिळायला ३-४ वर्षे वेटिंग लिस्ट आहे.

इतर मार्गानी पैसे कमवायला मनाई. का? तर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास आणि संशोधन करणे अपेक्षित आहे. अर्थार्जन नाही. मग ज्याला संशोधन कमी आणि डावं-उजवं राजकारण करण्यात जास्त रस आहे त्याला हा नियम का लागू असू नये?

६) विद्यार्थी राजकारण हा जर पाया असेल तर त्यात होणारी गुंडागर्दी हे बाळकडू म्हणायचं का?

तुम्ही कोणत्याही पार्टीचे सदस्य न होता.. राजकीय दृष्ट्या जागरूक, जहाल आणि मुक्त असू शकता. तुमचं शैक्षणिक काम तुमच्या राजकारणाचा वैचारिक आधार बनू शकतं आणि त्यातून तुम्ही तुमच्या विचारधारेला वैचारिक बैठक देऊ शकता.

 

JamiaProtest inmarathi

 

तुम्ही अर्थशास्त्रज्ञ असाल तर गरीबीची समस्या सोडवण्याचा तुमच्या वैचारिक बैठकीतील मार्ग शोधू शकता. तुम्ही उजवे असाल तर इतिहासाची तुम्हाला अभिप्रेत योग्य मांडणी संशोधन करून साधने तपासून करू शकता. वस्तुनिष्ठ होऊन हे करणे जमत असेल तर उत्तमच.

स्वातंत्र्य म्हणजे मेंदूवर जोखड नाकारणं. पार्टीची वैचारिक चौकट हे एक जोखडच आहे. पार्टी सिस्टीमची उपयुक्तता मी देशाच्या राज्याच्या राजकारणात नाकारत नाही. विद्यार्थी राजकारणात ही झिंग नसणे जास्त चांगलं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?